गद्धेगळ : सह्याद्रीतील हा दगड म्हणजे एक शिवी आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सह्याद्रीत फिरताना एखाद्या किल्ल्यावर किंवा मंदिरांशेजारी अनेक घडवलेले दगड आपल्या नजरेस पडतात. या दगडांवर अनेक आकृत्या, चिन्हे किंवा लेख कोरलेले असतात. अशा वेळेला कुतूहलाने का होईना पण आपण त्यांचे निरीक्षण करतो आणि मग काही वेळाने या शिल्पांना विरगळ किंवा गद्धेगळ असे म्हणतात असे कळून येते.

विरगळ आणि गद्धेगळ या दोन वेगळ्या गोष्टी. तर लेखात आपण गद्धेगळबाबत जाणून घेऊ.

गद्धेगळचा अर्थ काढायला गेलं तर आपल्याला सहज लक्षात येईल की, ‘गद्धे’ म्हणजे गाढव आणि ‘गळ’ म्हणजे दगड. इंग्रजीमध्येसुद्धा याला ‘ass-curse stone’ असे म्हणतात.

गद्धेगळ, स्पष्ट शब्दात सांगायचं तर एक शिवी आहे.

ही शिवी कशासाठी?

पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या जमिनी दान देण्याची पद्धत होती. त्याकाळचे राजे एखादा किल्ला किंवा मंदीर यांना जमीन किंवा त्या गावचे उत्पन्न दान म्हणून देत असत. या दानाचा कुणी अव्हेर केला किंवा गैरवापर केला तर त्यासाठी शापवाणी दिलेली असते. ती शापवाणी किंवा शिवी म्हणजे गद्धेगळ! 

हे दान कुणी नाकारील अक्षरशः त्याच्या आईला गाढव किंवा घोडा लागेल असे शब्द उच्चारलेले असतात. १२व्या, १३व्या शतकातील काही शिलालेखात “तया माये, गाठोऊ घोडौ झाविजे” असेसुद्धा उल्लेख आहेत. ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते त्यांच्यासाठी मग दगडी शिल्पे कोरली जाऊ लागली.

कर्वेनगर, पुणे येथील गणेश मंदिरामधील गद्धेगळ

हे शिल्प ओळखायचे कसे?

साधारणपणे एका दगडावर तीन भागात कोरीव काम केलेले असते. वरच्या भागात चंद्र-सूर्य कोरलेले असतात, याचा अर्थ दिलेला शाप हा चिरकाल टिको. मधल्या भागात दिलेल्या दानाविषयीचा लेख कोरलेला असतो आणि तळाच्या भागात झोपलेल्या अवस्थेत एका स्त्रीची आकृती आणि तिच्याशी प्रणय करताना गाढव अशा प्रकारची आकृती कोरलेली असते. पण प्रत्येक गद्धेगळ हा तीन भागांचा असेलच असे नाही. काही गद्धेगळ हे आकृती असलेले असतात तर काही गद्धेगळवर लेख असतो तर काही मात्र तिन्ही भाग असतात.

गद्धेगळचा काळ जर आपण काढायला गेलो तर हे साधारण ९व्या ते १०व्या शतकातील आहेत म्हणजे हे दगड शिलाहारांच्या व यादवांच्या  काळातील असले पाहिजेत असा निष्कर्ष काढू शकतो. कदाचित त्याच्या आधीच्या काळातसुद्धा गद्धेगळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता गद्धेगळ सापडणे इतके महत्वाचे का मानले जाते?

तर याच्या मागे मुख्य कारण म्हणजे यासाठी दिलेले दान. एखाद्या महत्वाच्या वास्तुसाठीच हे दान दिले जायचे त्यामुळे ज्याठिकाणी गद्धेगळ सापडतो ते ठिकाण पूर्वीच्या ठिकाणी महत्वाचे असले पाहिजे असा निष्कर्ष काढता येतो. बऱ्याचदा दिलेल्या छोट्या दानाचा उल्लेख हा शिलालेखांमधून होतो परंतु जर दिलेल्या मोठ्या दानाचा कुणी अव्हेर केला तर त्यासाठी गद्धेगळ उभारला जाते.

महाराष्ट्रात अशा गद्धेगळ फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात. अक्षीचा प्रसिद्ध गद्धेगळ, संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिरामधला गद्धेगळ किंवा रतनवाडीमधील गद्धेगळ हे दर्शवून देतात की याठिकाणांना पूर्वी फार महत्व होते.

बऱ्याच वेळेला असे होते की एखाद्या ठिकाणची वास्तू ही उध्वस्त झालेली असते आणि जर समजा त्या ठिकाणच्या आसपास गद्धेगळ सापडला तर आपण कमीतकमी असा निष्कर्ष काढू शकतो की याठिकाणी एखादे भव्य मंदीर किंवा मोठी वास्तू होती.

बरेच जण बोलताना ती गद्धेगळ किंवा ती विरगळ असा उल्लेख करतात तर असा उल्लेख चुकीचा आहे. विरगळ म्हणजे ‘विराचा दगड’ किंवा गद्धेगळ- ‘गाढवाचा दगड’ हे पुल्लिंगी शब्द आहेत. म्हणून तो विरगळ किंवा तो गद्धेगळ हे बोलणे जास्त योग्य.

बऱ्याच गद्धेगळवर शिल्पे कोरलेली आहेत पण काही गद्धेगळ हे शिल्पे आणि लेख यांचे मिश्रण आहे. भिवंडीजवळ चौथर पाडा येथे असलेला गद्धेगळ आणि आक्षीचा गद्धेगळ ही प्रमुख उदाहरणे.

आक्षी येथील गद्धेगळावर तर सालसुद्धा कोरलेले आहे ते म्हणजे शके ९३४. म्हणजेच आत्ताच्या काळातील इसवी सन १०१२. या गद्धेगळला आत्ता १००४ हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि हा गद्धेगळ जवळपास १००४ वर्ष उन, वारा पाऊस यांना तोंड देत सक्षमपणे उभा आहे आणि पुढेसुद्धा राहिल यात वाद नाही.

सध्याच्या काळात मात्र यांना कुणी वाली नाही. इतिहासाचा हा ठेवा नेहमीप्रमाणे काळाच्या ओघात नाहीसा होणारे. याची जपणूक व्हायला हवी. सरकारी पातळीवर किंवा तुम्हा-आम्हा प्रवाशांना तर तळमळ हवीच पण स्थानिकांनासुद्धा या ठेव्याची माहिती देणे महत्वाचे आहे.

बरेच वेळा गावकरी भोळ्याभक्तीने या दगडांना शेंदूर फसतात किंवा त्यावरच्या आकृती खरवडून काढतात तर यागोष्टी आधी थांबवायला हव्यात.

शेंदूर फासलेल्या अवस्थेतील गद्धेगळचे एक उदाहरण म्हणजे सासवड येथील गद्धेगळ.

असे अनेक गद्धेगळ महाराष्ट्रामध्ये आहेत, भले त्यांचे अस्तित्व हे मर्यादित संख्येमध्ये आहे परंतु ते सर्व हुडकून काढून त्यांच्या माहितीचे योग्य रीतीने संकलन करणे हे गरजेची गोष्ट झाली आहे. कदाचित एक लपलेला इतिहास यातून कळू शकेल.

सासवड येथे सापडलेली गद्धेगळ

काही गद्धेगळवर आढळलेले शिलालेख-

1. अक्षी येथील गद्धेगळवर असलेला शिलालेख- ‘जो लोपी तेहासिये मायेसी गाढाऊ घोडू झवे’

2. वसई येथील गद्धेगळ वर असेलला संस्कृत भाषेतील  शिलालेख – ‘तस्यां माता गाढभेनं’संदर्भ- 

१.   Tulpule, S. G. (1963) –  Pracheen Marathi Koriv Lekh. Pune: University of Pune.

२. Mokashi Rupali (2015) – Gaddhegal Stones: An Analysis of Imprecations and Engraved Illustrations: International Journal of Innovative Research and Development. 

३. Mirashi, V. V. (1977) – Inscriptions of the Silaharas (Corpus Inscriptionum Indicarum Vol VI). New Delhi: Archaeological Survey of India.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!