ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी : भाग ६ – लोणावळा चिक्की

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुकयुट्युब


ब्रिटीश राजवटीचा काळात अनेक नव्या गोष्टींची ओळख भारतीयांना होत होती. अगदी जगभरात प्रसिद्ध असलेली लोणावळा चिक्कीसुद्धा या ब्रिटिश राजवटीचीच देणगी आहे. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान मिळणारी “लोणावळा चिक्की” हा आपला सर्वांचा लाडका खाद्यपदार्थ आहे.

खरंतर गुळ आणि शेंगदाण्यापासून तयार करण्यात आलेली ही चिक्की ऊर्जेचा एक अत्यंत महत्वपूर्ण स्रोत आहे, यामुळेच चिक्कीला इतिहासात एक फार महत्वाचे स्थान प्राप्त आहे.

ब्रिटिशांनी भारताला ज्या देणग्या दिल्या त्यापैकी एक असलेली लोणावळा चिक्की खरंतर ब्रिटिशांनी भारतात अथवा महाराष्ट्रात आणली नाही. पण ब्रिटिश काळातच तिला न भूतो न भविष्यती ख्याती मिळाली, हे मात्र नक्की आहे.

चिक्कीचा हा ऐतिहासिक प्रवास आज आपण जाणून घेऊया..

१८१८मध्ये इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशव्याची राजवट बुडाली. पेशवाईचा जरी अस्त झालेला असला तरी पश्चिम महाराष्ट्रात त्यावेळी सातारा, कोल्हापूर, भोर, माणदेश, जंजिरा, इचलकरंजी इत्यादी अनेक संस्थाने होती. यापैकी भोर संस्थानाच पसारा फार मोठा होता.

पुण्याच्या दक्षिण, पश्चिमेचा मावळाचा प्रदेश आणि कुलाबा जिल्यातील सुधागड किल्ला व त्याच्या आसपासचा प्रदेश हा एकत्र करून जो विशाल भूभाग होता, त्यावर भोर संस्थानाची मालकी होती. भोर संस्थानाच्या प्रमुखांना पंडित किंवा पंत सचिव म्हणून ओळखले जात होते.

शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्या न्यायाधीश निराजी पंडितांचा वंशाने भोर संस्थानाचा कारभार बघितला होता.

छत्रपती संभाजी महराजांच्या मृत्यूनंतर संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बलकवडे, ढमाले, विठोजी चव्हाण इत्यादी शूर सरदारांनी स्वराज्य टिकवण्याचे काम केले होते. त्यांनी पुढे लोहगड आणि मावळचा प्रदेश जिंकून घेत भोर संस्थानाच्या ताब्यात देऊन, त्या भागाचे नियंत्रण करणारी पंडित आणि पंत सचिवांची गादी निर्माण केली होती.

या गादीवर बसणारे पंडित घराणे हे देशस्थ ब्राम्हण होते.

पेशवाई जरी बुडाली, तरी भोर संस्थान अस्तित्वात होते. १८३०मध्ये उमाजी नाईक या रामोशी नेत्याच्या नेतृत्वात झालेल्या उठावाला भोर संस्थानाचे पाठबळ लाभले होते. परंतु हा उठाव इंग्रजांनी दडपून टाकला आणि भोर संस्थानाने इंगजांशी तह केला.

या तहाअंतर्गत बोरघाट आणि आजचा “मुंबई-पुणे एक्प्रेस वे’चा प्रदेश इंग्रजांना दळणवळणासाठी देण्यात आला आणि त्या मोबदल्यात ब्रिटिशांनी भोरमध्ये धरण, पुल इत्यादीचे बांधकाम करण्याचे कबूल केले.

ब्रिटिशांनी हा पूर्ण प्रदेश विकत न घेता १०० वर्षांच्या कराराने भाडे तत्वावर घेतला होता, त्यांनी याठिकाणी रस्ते निर्माण, रेल्वेमार्ग निर्माण, पटबंधारे आणि धरण निर्माण इत्यादीचे काम सुरु केले. अठराव्या शतकाच्या मध्यावधीत हे काम मोठ्या प्रमाणावर केले जात होते. डोंगर फोडण्यापासून ते भुयार निर्माण करण्यापर्यंत त्यावेळी ब्रिटिशांनी भारतीय नागरिकांची मदत घेऊन रस्ते बांधणी सुरु केली होती.

लोणावळा हे त्या काळातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ होते, तसे ते आजही आहे. लोणावळा त्याकाळी लेक डिस्ट्रिक्ट म्हणून प्रसिद्ध होते. लोणावळ्याच्या आसपासच्या प्रदेशात ८ तळे होते. ब्रिटिशांना भारताच्या उष्ण हवामानाचा ताप होत असे. या उष्ण हवामानापासून सुटका म्हणून हे गोरे लोक लोणावळा खंडाळा गाठायचे कारण त्याठिकाणी वातावरण स्कॉटलंडसारखे थंड होते.

सतत हवा खेळती रहायची त्यामुळे एक आल्हाददायक अनुभूती होत होती. या तळ्यांच्या बांधकामासाठी, सुशोभीकरणासाठी आणि विकासासाठी ब्रिटिशांनी अनेक भारतीय मजुरांना जुंपले होते.

प्रचंड कष्ट करून हे भारतीय मजूर थकून जात होते, या मजुरांना उर्जावर्धक अन्न पदार्थ खाऊ घालणे ब्रिटिश शासकांना गरजेचे वाटू लागले होते, पण लोणावळा आणि त्याचा आसपासचा पट्टा हा भातशेतीसाठी प्रसिद्ध होता.

भात हा इतका उर्जावर्धक नव्हता, त्यामुळे ब्रिटिशांचा पुढे मोठा पेच निर्माण झाला. भात वगळता या भागात तळेगावच्या पट्ट्यात शेंगदाणा होता, तर चाकणच्या पट्ट्यात ऊस पर्यायाने गूळ होता. पण कोणाला चिक्कीचे सूत्र गवसले नव्हते.

पुढे भीमराज अग्रवाल नावाचा एक मारवाडी नव्या व्यापाराच्या संधीच्या शोधात मुंबई सोडून लोणावळ्यात डेरेदाखल झाला. लोणावळ्यात आल्यावर ब्रिटिश आणि भारतीय मजुरांचा अन्नाचा प्रश्न त्याला समजला आणि त्याने सहजपद्धतीने यावर उपाय शोधला.

तळेगावचा शेंगदाणा आणि चाकणचा गूळ आणून त्याने आपल्या मूळ राजस्थानी पद्धतीची गुळदाणी तयार केली. ही गुळदाणी त्याने मजूर व ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटली. या गुळदाणीच्या चिकटपणामुळे तिचे “चिक्की” असे नामकरण करण्यात आले.

या चिक्कीच्या बळावर मजुरांनी मोठमोठे बोगदे निर्माण केले. पुढे रेल्वेमार्ग तयार केला. या रेल्वे मार्गावर लोणवळा स्टेशन उभारण्यात आले.

याच स्टेशनवर १८८८ साली भीमराज अग्रवाल यांनी आपले चिकीचे दुकान थाटले, ही चिक्की भारतभरात मगनलाल चिक्की म्हणून प्रसिद्ध झाली. रेल्वेच्या माध्यमातून भीमराज ही चिक्की देशाच्या कानाकोपऱ्यात रवाना करत होते. कालांतराने या चिक्कीची निर्यात सुरू झाली आणि जगभरात चिक्की प्रसिद्ध झाली.

सुरुवातीच्या काळात पळसाच्या पानात बांधून येणारी ही चिक्की, आज पॅकिंग करून सर्वत्र विकली जाते. या चिक्कीचे अनेक फ्लेवर देखील आता आले आहेत. लोणावळ्याच्या फूडमॉल अथवा रेल्वे स्टेशनवर मिळणारी चिक्की आज अबालवृद्धांचे लाडके खाद्य आहे. दिवसेंदिवस या पदार्थाची लोकप्रियता वाढत चालली आहे.

कामगारांचे खाद्य ते प्रवासादरम्याने स्नॅक असे चिक्कीचे स्वरूप आज काळाच्या ओघात पालटले आहे.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!