आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजचा जमाना हा इंटरनेट, संगणक, प्रोग्रामिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या सर्वांचा आहे. समोर येणारी प्रत्येक गोष्ट ही प्रोग्रॅम केलेली असते, त्यामागे माणसाचं डोकं असतं आणि त्या मानवी आदेशानुसार तो प्रोग्रॅम त्याप्रकारे त्या त्या ठिकाणी काम करत असतो. याच प्रोग्रामिंगच्या सुधारणांमधून उदयाला येत आहे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा एक नवा आयाम.
एकदा एखाद्या संगणकाला योग्य त्या आज्ञा दिल्या किंवा आपल्याला हवा तो प्रोग्रॅम त्या टाकला की ती सगळी सिस्टीम स्वतःचं हवं तसं स्वतःच्याच (कृत्रिम) बुद्धीने सगळी कामं करत जाते. आणि हाच नवा प्रकार आता हरएक महत्वाच्या ठिकाणी दिसून येत आहे. फेसबुक, गुगल, सारख्या जगातल्या काही मोठ्या कंपन्यांमध्येही याचा सर्रास वापर होतो आहे.
गुगल किंवा फेसबुक सारख्या मोठा कारभार असणाऱ्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाणं यात काही नवल नाही फारसं! नवनवीन ग्राहकांना आकर्षित करणं, वेगवेगळ्या सुविधा देणं, त्यातून सर्वांशी संपर्क ठेवणं अशी कामं करण्यासाठी काही बॉट निर्माण केले गेले. हे असतात आभासी (virtual) रोबोट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून हे बॉट त्यांना दिली गेलेली कामं करतात.
आपण याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, म्हणजेच ही सगळी बुद्धिमत्ता एकूणच कृत्रिम आहे, पण त्यामुळे हे विसरून चालणार नाही की आपण याला मूळच्या दिलेल्या सूचनांनुसार त्याला स्वतःहून स्वतःमध्ये बदलही करता येतात. ही गोष्ट अतिशय काळजीची आहे. जर हे होत राहिलं आणि हे कृत्रिम बदल मानवी आवाक्याबाहेर गेले तर? तुम्हाला रजनीकांतचा ‘रोबोट’ चित्रपट आठवतो ना? काय झालं होतं. हे सगळं एकूणच काळजीचं आहे!
नुकतीच फेसबुकने त्यांची अशीच एक कृत्रिम रोबोट्सची सिस्टीम बंद केली. याला कारणही तसंच होतं. हे दोन कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले आभासी (virtual) बॉट होते. यात वेगवेगळ्या प्रकारच्या बॉट्सचा समावेश होतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे ‘चॅटबॉट्स’.
चॅटबॉट्स हे संगणक प्रोग्राम आहेत जे ऐकू येईल किंवा शब्द पुरवलं जातील त्याप्रमाणे मानवी संभाषणांची नक्कल करतात. अर्थातच हे तंत्रज्ञान नवं असल्यामुळे सगळंच प्रायोगिक तत्वावर चालू होतं. यातल्या तयार केल्या गेलेल्या दोन बॉट्सची नावं होती बॉब आणि ॲलिस.
या नव्या बॉट्सकडे एक साधं काम दिलं होतं. त्यांनी आलेल्या माणसांशी किंवा ग्राहकांशी देवाणघेवाणीची बोलणी करायची. बॉब आणि ॲलिसची गोष्ट अशी आहे की, त्यांची नावं अगदी साधी होती आणि त्यांना दिलेलं कामंही तसंच. समोरचा माणूस आणि बॉब किंवा ॲलिस यांच्यामध्ये एखाद्या वस्तूच्या देण्याघेण्याची बोलणी होणार.
सुरुवातीला, एका साध्या युजर इंटरफेसने एक माणूस आणि एक बॉट यांच्यातील संभाषण सहज होईल अशी योजना किंवा सिस्टीम बनवली. पुस्तक, टोपी, बॉल अशा रोजच्या वापरातल्या गोष्टी किंवा शब्द वापरून माणूस आणि या बॉब किंवा ॲलिसमध्ये संभाषण होईल अशी व्यवस्था केली गेली.
हे संभाषण इंग्रजीमध्ये नियोजित केलं गेलं होतं. आणि यातून त्या कृत्रिम बॉट्सच्या तोंडून काही वाक्य बाहेर पडू लागली – “मला एक चेंडू द्या मग मी तुम्हाला टोपी देईन”, “आपण एक पुस्तक खरेदी करू” वगैरे अशा प्रकारचं हे बोलणं होतं.
ॲलिस आणि बॉब यांना निगोशिएशन चॅटबॉट्स म्हटलं जात होतं. हे दोघं पण सुरवातीला फक्त चॅटबॉट्स म्हणूनच मर्यादित होते. हे चॅटबॉट्स अद्याप ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे किंवा अन्न ऑर्डर करणे या पलीकडे अधिक अत्याधुनिक कार्ये करण्यास सक्षम नसल्यामुळे, फेसबुकच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस रिसर्च ग्रुप(FAIR)ने या बॉट्सना वाटाघाटी(निगोशिएशन) करणं शिकवलं जाऊ शकतं का हे पाहण्यासाठी सेट केलं.
म्हणजेच या बॉट्सचा वापर करून फेसबुकने बाकी माणसांशी जे व्यवहार फेसबुकमध्ये काम करणारी माणसच करत होती तेच सामान्य व्यवहार बॉट्सना करता येतात का हे बघण्यासाठी या ॲलिस आणि बॉब यांना प्रोग्रॅम केलं. सुरवातीला या प्रोग्रॅम ला यशही आलं. ॲलिस आणि बॉब यांनी दाखवून दिलं, की ते वेगवेगळ्या प्रमाणात यशस्वी असे सौदे करू शकतात आणि त्याचा फायदा फेसबुकला होऊ शकतो. पण पुढे एक वेगळाच प्रश्न उभा राहिला.
सामान्यपणे या बॉट्सनी माणसांशीच बोलावं असं काहीसं त्यांना प्रोग्रॅम केलं गेलं होतं. पण जेव्हा या बॉट्सची तोंडं एकमेकांकडे वळवली गेली तेव्हा पुढे काय घडले याभोवती खरोखर मनोरंजक भाग फिरतो. कारण या आधी बोलणाऱ्यापैकी एक माणूस होता ज्याला खरी बुद्धी होती आणि दुसरा होता तो बॉट ज्याची कृत्रिम बुद्धिमत्ता होती.
पण जेव्हा दोन्ही बाजूला कृत्रिम बॉट्सच असतात तेव्हा जरा वेगळा प्रकार बघायला मिळाला. ते ज्या प्रकारे एकमेकांशी बोलत होते ते माणसांना समजणं अशक्य झालं. त्या बॉट्सनी स्वतःची अशी वेगळी भाषा बोलता बोलता अगदी सहजगत्या निर्माण केली.
आता हेच बघा-
बॉब: मी सर्व काही करू शकतो
ॲलिस: बॉल्समध्ये शून्य आहे
बॉब: तू मी बाकी सर्व काही
ॲलिस: बॉलकडे बॉल आहे
यातल्या कशाचाच आपल्याला अर्थ लागत नाही पण याचा अर्थ त्या बॉट्सना अगदी व्यवस्थित कळतो हे विशेष, कारण ही वेगळी भाषा त्यांनीच निर्माण केली होती.
सुरवातीला हे फार मोठं आश्चर्य नाही असं वाटलं कारण हे इतरही अनेक कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्या गेलेल्या सिस्टिम्समध्ये याआधीही पाहिलं गेलं होतं. बॉब आणि ॲलिसने जे विकसित केलं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखच, तेही अगदी समतुल्यच होतं. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की यंत्रमानवांनी अगम्य भाषेत बोलणं हेही काही नवीन नव्हतं.
आपण त्यांना जोपर्यंत आपल्या मनाप्रमाणे आपल्या प्रोग्रॅमनुसार वागवू तोपर्यंत ते आपली (इंग्रजी) भाषा बोलतात पण जेव्हा त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता दिली जाते तेव्हा मग ते स्वतःची बुद्धी वापरून त्यांच्या स्वतःच्या अगम्य अशा भाषेतही बोलू लागतात. आणि ही गोष्ट अडचणीची ठरू शकते.
यातून कदाचित धोका किंवा अडचणी निर्माण होईल अशी काहीशी शंका फेसबुकवाल्यांना वाटली. कारण हे दोन कृत्रिम बॉट्स समजा स्वतःच्या कृत्रिम भाषेतून वेगळंच काहीतरी बोलून अनपेक्षित गोष्टी करत गेले तर सगळंच अवघड होईल. म्हणूनच फेसबुकने हे बॉट्स बंद केले. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता देऊन असे बॉट्स निर्माण करणं आणि स्वतःवर अशा उमेदीच्या काळात संकट ओढवून घेणं फेसबुकला सध्या तरी परवडणारं नव्हतं !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.