आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला प्रत्येक वेळी मिळतेच असे नाही. विजेचा शोध लावणारा निकोला टेस्ला त्याच्या आयुष्याच्या शेवटी गरिबीचं आयुष्य जगला. विजेच्या शोधासाठी आजही सगळे एडिसनलाच महत्त्व देतात. आयुष्यभर एखाद्या गोष्टीसाठी केलेल्या प्रयत्नाची पोचपावती न भेटणे म्हणजे किती मोठे दुर्दैव.
वैज्ञानिक क्षेत्रात कित्येक वेळा या घटना घडतात. अशीच एक घटना भारतातसुध्दा प्रसिध्द आहे, ती म्हणजे महान भारतीय वैज्ञानिक डॉ. संभू नाथ डे यांची. कॉलरासारख्या त्यावेळी जीवघेण्या असणारया साथीच्या आजारावर औषध शोधण्यात त्यांचा मोठा हात होता.
कलकत्त्यापासुन ३० किमी अंतरावर असलेल्या गारीबती गावात त्यांचा जन्म १५ एप्रिल १९१५ या दिवशी झाला. डे यांचे वडील एक छोटासा उद्योग चालवत असत. १९३५ साली त्यांनी वैद्यकीय विद्यालयात प्रवेश मिळवून तिथली शिष्यवृत्तीसुध्दा मिळवली. विद्यालयातील एम एन डे या प्राध्यापकाच्या सांगण्यावरुन त्यांनी १९४७मध्ये लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. लंडनच्या विद्यापीठात जाऊन त्यांनी पीएचडीचे शिक्षण घेतले.
डॉक्टरेट मिळवल्यानंतर ते कलकत्त्याला परत आले. आल्यानंतर त्यांनी ‘रॅबिट इंटेस्टीनल लूप मॉडेल’ या आपल्या महत्त्वपुर्ण विषयावर काम चालू केले. पुढे जाऊन कॉलरा आजाराच्या निदानासाठी याच विषयाचा त्यांना अमाप फायदा झाला.
१९व्या शतकात कॉलराची जीवघेणी साथ पसरली. या साथीत भारतीय उपखंड आणि युरोपात लाखो लोकांचे प्राण गेले. या रोगाची सुरुवात आत्ताच्या बांगलादेशमधील जेस्सोर इथे झाली. अर्थात याबद्दल काही वैज्ञानिकांचे मतभेद आहेत. परंतु साथ जास्ती पसरल्यावर युरोपमधील वैज्ञानिक लुई पाश्चर, जर्मन वैज्ञानिक रॉबर्ट कोच यांनी या जीवघेण्या आजाराची कारणे जाणुन घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी कॉलराची लागण झालेल्या हजारो रुग्णांचा अभ्यास केला.
या प्रयत्नात यश आले नसले तरी रॉबर्ट कोच यांच्या मते बॅसिलस नावाचा जीवाणू कॉलरा पसरवण्यासाठी कारणीभूत होता. या जीवाणूचा शोध लावल्याचा चुकीचा दावा त्यांनी केला होता.
कोचच्या पॉईझनच्या सिद्धांतावर डे यांचा विश्वास नव्हता. या सिध्दांतानुसार कॉलराचा जीवाणू एक्झोटॉक्झीन निर्माण करतो ज्याने रुग्णाचा मृत्यू होतो. या सिध्दांताला चुक ठरवण्यासाठी ७६ वर्षाचा कालावधी लागला. विब्रीओ कॉलरी नावाच्या जीवाणूने इंटरटॉक्सीन निर्माण केल्यानंतर कॉलराची लागण होते हे डे यांनी सिध्द केले.
एवढेच नाही तर डेंनी कॉलरासाठी पहिले यशस्वी रॅबिट मॉडेल तयार केले. यामध्ये त्यांनी सशाच्या आतड्यात एक विशेष प्रकारची अखंड साखळी निर्माण केली, या साखळ्यांना वैद्यकीय भाषेत “लिगेटेड इंटेस्टीनल लूप” असे म्हटले जाते. या साखळ्यांचा वापर करून दे यांनी सिध्द केले की विब्रीओ कॉलरी नावाच्या जीवाणूने एक विशेष प्रकारचे एंडोटॉक्झीन निर्माण केले की कॉलरा होतो.
कॉलराची लागण झाल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता का जाणवते याचे स्पष्टीकरण देण्यातही त्यांना यश आलं होतं.
डेंना मिळालेल्या या यशानंतरही १९६०-६५पर्यंत कॉलराचे थैमान चालू होतेच. १९५०मध्ये १,७६,३०७ लागण झालेल्या रूग्णांपैकी ८६,९९७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. ४९.३४ % असणारा हा मृत्यूदर १५ वर्षानंतर दे यांच्या संशोधनाच्या परिणामाने २९.९ % एवढा झाला.
म्हणुनच डॉ. संभू डे यांचं कार्य महत्त्वपुर्ण होतं. फक्त भारतीय उपखंडासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठीच. कॉलरा संबंधीत काम करत असताना डे यांनी बोस संस्थेत खरा चमत्कार केला.
बोस संस्थेत डे यांनी १९५४ पासुन काम करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांचे खरे काम सुरु झाले ते १९५७मध्ये. ३ वर्ष काम केल्यानंतर १९६०मध्ये त्यांनी कॉलरावर उपचार म्हणुन एग्झोटॉक्सीनची निर्मिती केली.
परंतु वैज्ञानिक संशोधनाच्या सेवांची भारतात असलेली दुर्दैवी अवस्था, त्यातच वैद्यकीय संशोधनास त्यावेळी प्रतिकूल असलेले भारतीय हवामान त्यांना हे काम पुर्ण न करु देण्यास कारणीभूत ठरले. शेवटी १९७३मध्ये त्यांनी सगळ्या शैक्षणिक कामातुन आणि संशोधनातुन निवृत्ती घेतली.
१९७८ मध्ये ४३व्या नोबेल संमेलनात आपल्या भाषणात ते म्हणतात,
“१९६०च्या सुरुवातीपासुनच मी मृत आहे, नोबेल समितीने मला नेहमीच दुर्लक्षित केले आहे. कॉलराच्या औषधावर मला गरजेचे साहित्य आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने मी त्यावर काम करणे सोडुन दिले”
“डे यांचा १९८५मध्ये मृत्यू झाला तेव्हाही त्यांना फार प्रसिद्धी नव्हतीच. त्यांना एकही मोठा भारतीय पुरस्कार दिला गेला नाही, तसेच कोणत्याही विद्यापीठाने त्यांचा यथोचित सन्मान केला नाही ही एक खुप मोठी शोकांतिका राहील. कॉलरासारख्या विषयावर संशोधन करण्याचा त्यांचा निर्णय त्यावेळी काळानुरुप अतिशय योग्य होता.
डे यांची ही प्रेरणादायी कथा, जिच्यात त्यांच्यातील जिद्द, त्याग, समर्पण यांची ओळख आपल्याला होते, नक्कीच खुप लोकांना प्रेरित करेल. प्रसिध्दी आणि मोठमोठ्या वैज्ञानिक प्रकल्पांच्या मागे पळणाऱ्या या जगात जिथे कधीकधी वैज्ञानिक निर्मितीचीच कमतरता असते अशावेळी डॉ. संभू डे यांचे जीवन एक आदर्श चरित्र म्हणुन उभे राहते”,
असे मत ‘करंट सायंस’ या वैज्ञानिक मासिकाच्या संपादकीयमध्ये पद्मनाभन बाळाराम लिहितात.
१५ एप्रिल १९८५ला वयाच्या ७०व्या वर्षी डॉ. डेंचे निधन झाले.
त्यांच्या कार्याला सलाम!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक ,युट्युब|
Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.