पुण्यात त्याकाळी गोऱ्या साहेबासह भारतीयांना जेवण देणारं दोराबजी एकमेव रेस्टॉरंट होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


साधारण १८७० चे दशक. १८५७ चा उठाव चिरडून टाकल्यानंतर भारतात इंग्रज सत्तेने चांगला जम बसवला होता. लष्करी सामर्थ्य आणि प्रशासकीय ताकदीच्या बळावर गोऱ्या साहेबाने जवळजवळ संपूर्ण भारतावर कब्जा केला होता. मोठ्या शहरात मोक्याच्या ठिकाणी लष्करी छावण्या सुरू करून त्यातून शहरावर वचक प्रस्थापित करण्याची नीती इंग्रजांना उपयोगी ठरत होती.

भारतात इंग्रज व्यापारी म्हणून आले खरे, पण त्यांनी अल्पावधीत इथे सत्ता स्थापन केली. त्याचबरोबर शहरात उपहारगृहे, सिनेमागृहे अशा साहेबांच्या थाटामाटासाठी लागणाऱ्या गोष्टीही हळूहळू येऊ लागल्या.

त्या काळात पुणे शहरात सध्या जिथे कॅम्प परिसर आहे त्या भागात सोराबजी दोराबजी नावाचा एक पारसी माणूस इराणी चहा आणि बन मस्का विकायचा.

इराणी चहाची भारी चव आणि भरपूर मस्का लावलेला बन! या फॉर्म्युलामुळे दोराबजीची चहाची टपरी पुण्यात फेमस होती. पुणेकरच नव्हे तर कित्येकदा इंग्रज अधिकारीही दोराबजीच्या टपरीवर चहा आणि बनमस्का खाण्यासाठी जायचे.

वाढती लोकप्रियता पाहून अनेकांनी दोराबजींना हॉटेल टाकण्याचा सल्ला दिला. त्या काळात पुण्यात असलेल्या उंची रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी फक्त गोऱ्या साहेबाला प्रवेश होता. नोकर म्हणून भारतीय असायचे पण ग्राहक म्हणून भारतीय जेवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकत नसत. लोकांच्या आग्रहास्तव अखेर दोराबजींनी रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय पक्का केला आणि दस्तर मेहेर रोडवरच्या सरबतवाला चौकात दोराबजी रेस्टॉरंट सुरू झालं.

रेस्टॉरंटबाबत सुरुवातीलाच त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे, तिथे जेवणासाठी भारतीयांनाही प्रवेश असेल! शहरात त्या काळात भरतीयांना जेवण देणारं दोराबजी हे एकमेव उपहारगृह ठरलं.

आज तब्बल १४० वर्षानंतरही दोराबजी त्याच थाटात आणि त्याच अस्सल चवीसह ग्राहकांना सेवा देत आहे. बिर्याणी, मटण कटलेट आणि खिमा पावसाठी दोरबाजी प्रसिद्ध आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी बांधण्यात आलेल्या रेस्टॉरंटमध्ये डागडुजीसाठी थोडाफार बदल केला असला तरी तेव्हाचं बांधकाम अजूनही तसंच आहे. हुबेहूब कौलाच्या टुमदार घरासारखं त्याचं रुपडं अजूनही जपलं आहे.

दोराबजी कुटुंबाची चौथी पिढी- दारीयस दोराबजी सध्या या हॉटेलची व्यवस्था पाहत आहेत. हॉटेलमध्ये प्रवेश करतानाच समोर एका फलकावर जेव्हा हॉटेल सुरू झालं तेव्हापासूनची बदलत गेलेली अनेक दरपत्रके लावलेली आहेत. बिर्याणी – सव्वा रुपया, मटण खिमा – १ रुपया असे दर वाचून आपण भूतकाळात हरवून जातो.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरे जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा ते न चुकता दोराबजीकडे बिर्याणी खायला जात असत. बाळासाहेबांचा एक फोटोही तिथल्या फलकावर लावलेला आहे. त्यावेळी तिथे खुर्च्या आणि टेबलही उपलब्ध नव्हते. जमिनीवर बसून मित्रांसोबत एकाग्रतेने बिर्याणीवर ताव मारतानाचा बाळासाहेबांचा फोटो प्रवेश करताच पाहायला मिळेल.

शहरातील इतर रेस्टॉरंटमध्ये असलेला थाटमाट, लक्झरी फर्निचर, वातानुकूलित रूम्स असलं काही दोराबजीमध्ये पाहायला मिळणार नाही. अतिशय साधी बैठक व्यवस्था, अस्सल पारसी आदरातिथ्य आणि दीर्घकाळ ओठावर रेंगाळणारी चव!

या सगळ्यासह दोराबजी हे पुण्यातीलच नव्हे तर भारतातील काही मोजक्याच सगळ्यात जुन्या पारसी रेस्टॉरंटपैकी एक आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्या काळात भारतीयांना प्रवेश देणारं दोराबजी हे पुण्यातील एकमेव रेस्टॉरंट होतं!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!