चीनची राजधानी बीजिंगच्या खाली वसवण्यात आलंय एक महाकाय शहर!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हल्ली चीन कोणत्या ना कोणत्या कारणाने सततच चर्चेत असतो. एखादं व्रात्य, खोडकर, आगाऊ मुल जसं खोड्या काढून आगळीक करून सर्वांच लक्षं आपल्याकडे वेधून घेतं, तसंच काहीसं चीनचही नेहमी सुरु असतं. कधी कोरोना, कधी कोणता नवा विषाणू, कधी गलवान, अक्सर चीन, लडाख मधील आक्रमकता, कधी दक्षिण चीन समुद्रातील शक्ती प्रदर्शन, अशा अनेक कारणांनी चीन नेहमीच जगाचे लक्ष वेधून घेत असतो.

चीनचा इतिहास आणि चीनची संस्कृतीही तितकी रहस्यमय आहे. त्याच्या या गहन संस्कृतीतील काही खुलासे जेंव्हा उघड होतात तेंव्हा जगाला चकित करतात.

अशा या रहस्यमयी चीनमध्ये, बीजिंग शहराच्या थेट खाली जमिनीत एक भले मोठे शहर वसवण्यात आले आहे, हे तुम्हाला माहित आहे का?

या शहराचे नाव आहे दिक्सिया चेंग.

जमिनीखालील हे शहर २० हजार एकरात पसरलेले आहे. जमिनी खालील या शहरात अनेक भुयारे खोदण्यात आली असून, शहरात ज्या सुविधा असतात तशाच सर्व सुविधा इथेही उभारण्यात आल्या आहेत. 

जमिनीखालील या शहरात आज लाखोंच्या संख्येने नागरिक राहतात. परंतु इथे राहणाऱ्यांना कोणकोणत्या बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागते याबद्दल क्वचितच कुणाला माहिती असेल.

अजूनही जमिनीखाली नेमकी किती भुयारे खोदण्यात आली आहेत, याचीही नेमकी संख्या कोणाला सांगता येणार नाही. जमिनीखाली वसलेले हे शहर चीनच्या सर्व शासकीय आणि महत्वाच्या इमारतींना जोडलेले आहे. कधी काळी या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि यातून बाहेर येण्यासाठी ९०० पेक्षा जास्त रस्ते तयार करण्यात आले होते असेही म्हटले जाते.

या जमिनीखाली किती लोक राहतात, तिथे किती घरे आहेत, किती भुयारे आहेत, याचीही अधिकृत माहिती अजून उपलब्ध होऊ शकलेली नाही. परंतु या शहराच्या नावातूनच या शहराचे नेमके वर्णन केलेले आहे.

दक्सिया चेंगचा अर्थ होतो अंधार कोठडी. याला अंडरग्राउंड ग्रेट वॉल म्हणूनही ओळखले जाते.

१९६०च्या दशकात चीन आणि रशियाच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांदरम्यान शीतयुद्ध सुरु होते. या युद्धाच्या वेळी चीनला अशी भीती होती की रशिया त्यांच्यावर अणूबॉम्बचा मारा करू शकतो.

चीन आणि रशियामध्ये या काळात कित्येक महिने सातत्याने सैनिकी कारवाया, आक्रमण, होत होते. त्यामुळे चीनची ही भीती आणखीन गडद झाली. असा अणू हल्ला झालाच तर, अणू हल्ल्यातून वाचण्यासाठी चीनने बीजिंग शहराखाली एक भुयारी शहर निर्माण करण्याची योजना आखली .

चीनचे कम्युनिस्ट नेते माओत्से तुंग (माओ जेडोंग) यांनी आपल्या नागरिकांना जमीन खोदण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या नागरिकांना संदेश दिला, खोल भुयारे खोदा, अन्न जमा करून ठेवा आणि लढाईसाठी सज्ज रहा.

चीनी नागरिकांवर माओचा अद्भुत प्रभाव होता. त्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ३ लाखापेक्षा जास्त लोकांनी या खोदकामात सहभाग घेताला.

बीजिंग शहराच्या अगदी खालीच नागरीकांनी हे नवे शहर वसवायला घेतले. या शहराचे निर्माण करण्यात लष्करी अभियंत्यांनीही मदत केली. अणू बॉम्बचा हल्ला झाला तरी लोकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून जमिनीखाली दहा हजार ऑटोमिक बंकर खोदण्यात आले. या शहरात लोकांना आवश्यक अशा सर्व सुविधा या भुयारी शहरात करण्यात आलेल्या आहेत.

इथे कारखाने, थिएटर, गोदाम, शेती, खेळण्यासाठी विस्तृत मैदान अशा सर्व सुविधाही निर्माण केल्या आहेत. जास्ती काळ लोकांना इथेच राहावे लागले तर त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून लोकांना ज्या काही सुविधा महत्वाच्या वाटतात त्या सर्व सुविधा या शहरात उभारण्यात आल्या आहेत.

संपूर्ण बीजिंग शहर जरी जमिनी खाली हलवण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी, कोणतीही अडचण किंवा असुविधा जाणवू नये, याची काळजी घेऊनच या शहराची रचना करण्यात आली होती.

संपूर्ण बीजिंगची लोकसंख्य या शहरात सामावली जाईल इतके विस्तृत शहर खोदण्यात आले होते. ७०च्या दशकात बीजिंगची लोकसंख्या ६० लाखाच्या आसपास होती.

सुदैवाने, तेंव्हा चीनची भीती सार्थ ठरली नाही. रशिया आणि चीनमधील शीत युद्ध लवकरच समाप्त झाले. अणूयुद्ध झालेच नाही त्यामुळे या शहरात राहण्याची वेळच आली नाही.

या शहराचा काही भाग सरकारी कार्यालयांशी जोडलेला असल्याने तो भाग या सरकारी कार्यालयांकडून वापरला जातो. परंतु आता बीजिंगची लोकसंख्या वाढली आहे. गरिबांना शहरात राहणे परवडत नाही. मग हे लोक या जमिनीखालील शहारात राहण्याचा पर्याय निवडतात.

गावातून शहारात कामाच्या शोधात आलेल्या लोकांना हे जमिनी खालील शहर आपल्यात सामावून घेते. अशा लोकांना तातडीने निवारा मिळतो. तसेही या जमिनी खालील घरे जास्त स्वस्त आहेत. शहरात ज्यांना घर घेणे परवडत नाही असे लोक या दिक्सिया चेंगमध्ये घरे घेऊन राहतात. इथे सूर्यप्रकाशाची नेहमी कमतरता असते.

बीजिंगची लोकसंख्या वाढेल तसतसे लोक स्वतःच या भुयारी शहरात राहायला येऊ लागले. जे लोक केवळ इथे घरे स्वस्त मिळतात म्हणून येऊन राहतात तेही कधी ना कधी चांगले पैसे आले की या भुयारातून बाहेर पडू अशी आशा बाळगतात. चांगले पैसे आले आणि शहरात घर मिळाले की या अंधाऱ्या भुयारातून बाहेर पडतात.

परंतु या शहरातील ही घरे म्हणजे जमिनीत खोदलेली भुयारेच. या भुयारातच छोटीछोटी घरे बनवण्यात आली आहेत. पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी लोकांचे आरोग्य खालावते. इथे राहणारे लोक तेंव्हाच या भुयारातून बाहेर येतात जेंव्हा त्यांचे शहरात काही काम असते.

लोकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका पाहता सरकारने या भुयारी शहरात राहण्याची मनाई केली होती. परंतु तरीही आजही लोकं या शहरात राहतात. शहरात नव्याने स्थलांतरित होणाऱ्या लोकांना या भुयारी शहराचाच तर आधार वाटतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!