हॉकीच्या जादुगाराला शेवटच्या दिवसात स्वतःच्याच देशात उपेक्षा पदरी पडली

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादुगार म्हणून ओळखले जाते. ध्यानचंद यांनी पहिल्याच मॅचमध्ये तीन गोल केले होते, ऑलिम्पिक सामन्यात ३५ गोल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी ४०० गोल केले होते. एकूण १००० गोल हा आकडाच सांगतो की मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादुगार का म्हटले जात होते.

ज्या मेजर ध्यानचंद यांनी आपल्या खेळाने हुकुमशहा हिटलरवरही मोहिनी घातली होती, त्यांचे अखेरचे दिवस मात्र फारच वेदनादायी होते.

आयुष्याच्या संध्याकाळी मेजर ध्यानचंद खूपच उदास आणि निराश झाले होते. घरची परिस्थिती हे तर यामागचे एक कारण होतेच, शिवाय त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य हेही याचे आणखी एक कारण होते. देशात हॉकीला पूर्वी सारखे दिवस राहिले नाहीत हे पाहून तर ते जास्तच निराश आणि दु:खी राहू लागले.

या काळात ते नेहमी म्हणत, भारतात हॉकीचे दिवस राहिले नाहीत. या विचाराने त्यांना आतून खूपच वेदना होत होत्या.

त्याचवेळी त्यांचे छोटे बंधू आणि उत्तम हॉकीपट्टू रूपसिंह यांचे निधन झाले. अशा घटनांनी त्यांचे निराश मन आणखीन खचू लागले. घरची आर्थिक स्थिती तर अगदीच हलाखीची होती.

त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या बँक खात्यावर फक्त दहा हजार रुपये शिल्लक होते. घराच्या जबाबदाऱ्या वाढत असताना त्यांना कसलीच हालचाल करता येत नव्हती. एक मुलगी आणि तीन मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न अशा कितीतरी जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावर होत्या.

सततच्या चिंतेने आणि नैराश्याने त्यांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला. अशा कठीण काळात त्यांच्याकडे त्यांच्या चाहत्यांनी, सरकारने आणि हॉकी फेडरेशनने देखील पाठ फिरवली होती.

ज्या हॉकीसाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले, आपल्या कुटुंबाकडेही फारसे लक्ष दिले नाही, त्याच हॉकीने त्यांच्यावर ही वेळ आणली होती.

याकाळात त्यांची मानसिक स्थिती पूर्ण खचली होती. मारण्यापूर्वी दोन दिवस आधीच ते म्हणाले होते, “मी मरेन तेंव्हा संपूर्ण जगाला दु:ख होईल, परंतु भारतीयांना मात्र काहीही फरक पडणार नाही. मला माहित आहे.”

अखेरच्या दिवसात सर्वांनाच आपला विसर पडला याची त्यांना किती तीव्र सल होती हे या विधानातूनच दिसते.

इतके महान खेळाडू असूनही त्यांच्या कठीण काळात कुणीही त्यांची विचारपूस केली नाही. कुणी त्यांना आर्थिक मदत दिली नाही. त्यांच्याकडे आर्थिक स्त्रोत काहीच नव्हते, तरीही सरकारने त्यांची दखल घेतली नाही. भारतीय हॉकी फेडरेशनने देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. शेवटच्या वर्षांत हॉकी फेडरेशनने या महान खेळाडूची फारच उपेक्षा केली.

पण मेजर ध्यानचंद देखील प्रचंड स्वाभिमानी होते. त्यांनी कधीच कुणासमोर आपल्या परिस्थितीचा बाऊ केला नाही. हॉकीच्या माध्यमातून ज्याने देशाचे नाव उज्वल केले त्याच खेळाडूची शेवटच्या दिवसात कुणीच दखल न घ्यावी याहून दुर्भाग्य ते काय!

त्यांचे मित्र वैद्यनाथ शर्मा यांना वाटले की, काही दिवस बाहेर फिरल्यावर त्याच्या मित्रांच्यात पुन्हा पहिल्या सारखे दिवस घालवल्यावर त्यांची प्रकृती सुधारेल. शिवाय, युरोप, अमेरिकेतील त्यांचे चाहते आणि मित्र त्यांच्यासाठी काही आर्थिक मदतही करतील. त्यांनी विमान प्रवासाची सोयही केली पण, ध्यानचंद यांची तब्येत इतकी खालावली होती, की ते या प्रवासासाठी अजिबात तयार नव्हते. यानंतर काही महिन्यातच त्यांचे निधन झाले.

आजारी पडल्यानंतर झांशी येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु त्यांची प्रकृती या उपचाराला अजिबात साथ देत नव्हती. ध्यानचंद यांच्या विदेशी मित्रांनी त्यांना उपचारासाठी युरोपमध्ये येण्याचा साला दिला.

उपचारांचा खर्च उचलण्याचीही तयारी दर्शवली. परंतु त्यांनी उपचारासाठी युरोपला जाण्यास नकार दिला. त्यांची जीवनावरील श्रद्धाच ढळली होती.

१९७९ साली गंभीर अवस्थेतच त्यांना रेल्वेने दिल्लीला नेण्यात आले. दिल्लीतील ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. एम्समध्ये त्यांना एक धडसा बेड देखील मिळाला नाही.

सुरुवातीला तर त्यांना वॉर्डमध्ये जागा नसल्याने हॉस्पिटलच्या व्हरांड्यात बेड लाऊन ऍडमिट करण्यात आले. राष्ट्रीय दर्जाच्या हॉकीपट्टूला अशी वागणूक मिळू शकते यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे.

एक आठवडाभर मृत्यूशी चाललेली त्यांची झुंझ अखेर अपयशी ठरली. त्यांची तब्येत पुन्हा बरी होईल आणि आपण त्यांना पुन्हा झाशीला घेऊन जाऊ शकू या आशेने त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीत आले होते. परंतु एम्समध्ये भरती केल्यानंतर त्यांना लिव्हर कॅन्सर असल्याचे निदान करण्यात आले. ते कधी उपचाराला प्रतिसाद देत तर कधी त्यांची प्रकृती एकदमच खालवत असे.

अखेरच्या या दिवसातही ते फक्त हॉकीचाच विचार करत. मृत्युच्या चार दिवस आधी ते बेशुद्ध अवस्थेत होते. अर्धी शुद्ध हरपली असताना ते काहीही बडबडत असत. पूर्णतः कोमात जाण्यापूर्वी ते डॉक्टरांशी बोलत होते. भारतात हॉकीला भविष्य नाही, असे म्हणत होते. यावर डॉक्टरांनी त्यांना विचारले, “असे का म्हणता?”

यावर त्यांचे उत्तर होते, आमच्या खेळाडूंना आता कष्ट करायची मेहनत घ्यायची सवय उरली नाही. त्यांना फक्त फायदा हवाय. उत्तर देताना त्यांची नजर शून्यात पोहोचली होती. भारताच्या खेळाडूंमध्ये त्याग, समर्पण, कष्ट करण्याची तयारी, दृढ इच्छाशक्ती या सगळ्या गोष्टींचा अभाव त्यांना जाणवत होता.

३ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत कायमची मालवली. दिल्लीमध्ये जेंव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी पोहोचली तेंव्हा एम्सच्या बाहेर गर्दी होऊ लागली. किती उपरोधिक बाब आहे, जेंव्हा त्यांना उपचारासाठी दिल्लीत आणले गेले तेंव्हा कुणी फिरकलेही नाही. पण, त्याच्या मृत्यूची बातमी काळातच सर्वजण एम्सकडे धाव घेऊ लागले.

झाशीहून दिल्लीपर्यंत रेल्वेने प्रवास करण्यासारखी त्यांची अवस्था नव्हती, त्यावेळी कुणी त्यांची सोय पहिली नाही, मात्र त्यांचे पार्थिव शरीर नेण्यासाठी तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली.

झाशीत दुसऱ्या दिवशी, ४ डिसेंबर रोजी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली तेंव्हा कुणीही राष्ट्रीय नेते त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित नव्हते. ध्यानचंद यांनी पंजाब रेजिमेंटमध्येच अधिक काळ सेवा दिली. योगायोगाने पंजाब रेजिमेंट तेंव्हा झाशीतच होती. या रेजिमेंटने त्यांचे एका सर्वोच्च सैनिकी सन्मानात अत्यसंस्कार केले. त्यांना सलामी दिली.

शोक संगीत वाजवण्यात आले आणि बंदुकीची सलामीही देण्यात आली. ज्या ग्राउंडवर कधी काळी ते हॉकी खेळत त्याच हिरोज ग्राउंडवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंतिम समयीही त्यांनी आपल्या परिवाराला आपल्या पदकांची जीवापाड काळजी घेण्याची विनंती केली. आपली पदके आपल्या खोलीत सुरक्षित ठेवली जावीत आणि तिथे कुणालाही जाऊ देवू नये अशा सूचना त्यांनी कुटुंबियांना दिल्या होत्या. अखेरच्या काळात प्रचंड अवहेलना सोसूनही त्यांचे हॉकी प्रेम मात्र तिळभरही कमी झाले नव्हते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!