आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
ना*झींच्या ज्यूद्वेषाबद्दल तर आपल्याला कल्पना आहेच. पण ना*झींचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे ना*झी पक्षाचा सैन्यावर भर असूनही त्यांनी विज्ञान क्षेत्रात भरपूर संशोधन केले आहे. हि*टलरने स्वतःकडे अनेक शास्त्रज्ञ, संशोधक आणि डॉक्टर्स ठेवले होते. त्याच्या पर्सनल डॉक्टरनेच त्याचा घात केला, पण आपल्या जगावर सत्ता प्रस्थापित करण्याच्या इच्छेने त्याने अनेक संशोधक कामाला लावले होते. आपल्या सुदैवाने आइन्स्टाइनसारखा प्रतिभावान आणि अणू-शास्त्रज्ञ हिट*लरच्या नजरेत येण्याआधीच अमेरिकेत गेला होता.
हिट*लरच्या ना*झी पक्षाच्या डॉक्टर्समध्ये एक भयानक डॉक्टर होता, त्याला जर्मन भाषेत ‘टोडेसएंजल’ हे टोपणनाव देण्यात आले होते, म्हणजेच ‘मृत्युदेवता!’. जोसेफ मेंगेले असं या ऑशविट्झ एक्सटर्मिनेशन कॅम्पमधील ना*झी डॉक्टरचं नाव. जोसेफ १९४३ पासून एक्सटर्मिनेशन कॅम्पमध्ये काम करत होता. गॅस चेम्बरमध्ये टाकून मारण्यासाठी तो कैद्यांची निवड करत असत आणि काही कैद्यांचा उपयोग वांशिक अभ्यासावर आधारित प्रयोगांसाठी करत असत.
जोसेफ मेंगेलेचा जन्म १६ मार्च १९११ रोजी जर्मनीच्या उलमजवळील गुन्झबर्ग येथे झाला. तो शेती अवजारांच्या उत्पादक आणि यशस्वी उद्योजक कार्ल मेंगेलेचा मोठा मुलगा होता. जोसेफने १९३३ साली स्टर्मबटेइलंग “असॉल्ट डिव्हिजन”मध्ये प्रवेश घेतला.
एक अतिउत्साही ना*झी असल्याने त्याने १९३४ साली नव्याने स्थापन झालेल्या ‘वंशपरंपरागत जीवशास्त्र आणि जातीय स्वच्छता संस्थेच्या संशोधन’ कर्मचाऱ्यांबरोबर काम केले. १९३५ साली त्याने म्युनिक विद्यापीठातून ‘भौतिक मानववंशशास्त्रात’ पीएचडी केली. त्याने अनुवांशिक औषध शास्त्रात डॉक्टरेट पदवी देखील घेतली.
फ्रँकफर्ट येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर हेरेडिटरी बायोलॉजी अँड रेसियल हायजीन’ येथे डॉ. वर्सच्युअर हा जुळ्या मुलांवरील त्याच्या संशोधनासाठी प्रसिद्ध होता. जानेवारी १९३७ मध्ये डॉ. वर्सच्युअरचा सहाय्यक म्हणून जोसेफ मेंगेलेला नियुक्त करण्यात आले. १९३७ मध्येच तो ना*झी पक्षाचा सदस्य बनला.
पूर्व पोसेन येथील ‘रेस अँड सेटलमेंट मेन ऑफिससाठी’ १९४० च्या मार्च-एप्रिल दरम्यान जोसेफने वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून काम केले. मेंगेलेला जून १९४० साली सैन्यात भरती करण्यात आले. दुसऱ्या महायु*द्धादरम्यान ‘एसएस डिव्हिजन “वायकिंग”’ या सैन्यतुकडीत त्याची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘एसएस डिव्हिजन वायकिंग’सोबत त्याने यु*द्धाचा पहिला-वाहिला अनुभव घेतला. जोसेफने यावेळी पूर्व आघाडीवरील कारवाई पाहिली. यावेळच्या घटनांचे आणि १९४३ च्या सुरुवातीच्या काळातील मेंगेलेच्या कामांविषयीचे खूप कमी आणि अत्यन्त विरोधाभासी दस्तऐवज आहेत.
मोहिमेवर जखमी झाल्याने मेंगेले १९४३ साली जर्मनीमध्ये परतला. त्यांने ‘कैसर विल्हेम इन्स्टिट्यूट’मध्ये मानवशास्त्र, मानवी अनुवांशिकता आणि युजेनिक्ससाठी काम सुरू केले, यासाठीचे मार्गदर्शन त्याला त्याच्या आधीच्या वरिष्ठांकडून म्हणजेच, व्हॉन वर्चुअर कडून मिळाले. एप्रिल १९४३ मध्ये त्याला एस.एस.च्या कॅप्टन पदावर पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीनंतर लगेचच मेंगेलेला ऑशविट्झ येथील शिबिरात मुख्य डॉक्टर म्हणून पाठवण्यात आलं.
ऑशविट्झ येथील शिबिरात त्याने आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या ज्यूंना एकतर विशिष्ट प्रकारचे श्रम किंवा संहार करण्यासाठी निवडले. जर्मन वंश वेगाने वाढावा यासाठी त्यांनी प्रजनन क्षमता वाढवण्याचे साधन शोधण्याच्या हेतूने कैद्यांवर वैद्यकीय प्रयोग केले. त्याच्या संशोधनाचा मुख्य विषय मात्र जुळी अपत्यं होती. मेंगेलेच्या अशा प्रयोगांमुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला होता.
रॅम्पवरील त्याच्या क्रू*र वर्तनामुळे मेंगेलला “मृत्यूचा देवदूत” किंवा “व्हाईट एंजल” म्हणून ओळखले जात. तो ऑशविट्झमधील इतर कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कामापेक्षा या “कैदी निवडण्याचे” काम सर्वांत जास्त करीत असे. त्याचा या कामाशी असलेला संबंध यु*द्धांनंतर झालेल्या बदनामीमुळे उघडकीस आला. जेव्हा नवीन कैद्यांच्या ट्रेन्स ऑशविट्झ येथे येत असत तेव्हा मेंगेले “ऑफ-ड्यूटी” असतानाही जुळ्या मुलांचा शोध घेत असत.
असंच एक कैदी जुळी भावंडं त्याच्या तावडीतून कशीबशी निसटली. रेनेट नावाच्या मुलीला ६ वय वर्ष पूर्ण होण्याआधीच तिला तिच्या कुटुंबासह ऑशविट्झला पाठवण्यात आले. तिला तिच्या भाऊ आणि आईपासून वेगळे करून रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयात तिचे वजन, उंची इत्यादी मोजमाप करून एक्स-रे करण्यात आले, गळ्याचे रक्त जमा केले गेले. रेनेटला दिल्या गेलेल्या एका इंजेक्शन मुळे ती आजारी पडली. ना*झी सैनिक आजारी लोकांना ठार मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये शिरले आहेत हे समजताच तिच्या नर्सने आपल्या लांब स्कर्टखाली रेनेटला लपवून ठेवल्याने तिचा जीव वाचला.
कसेबसे रेनेट आणि तिचा भाऊ या नरकातून वाचले आणि १९५० साली अमेरिकेत भेटले. “मेंगेले ट्विन्स” ची एक जोडी म्हणून त्यांचा वैद्यकीय प्रयोगांसाठी वापर झाल्याचं त्यांना कळालं.
२ सप्टेंबर १९४५ रोजी अधिकृतरीत्या दुसरे महायु*द्ध संपले. यु*द्धांनंतर मेंगेले मित्रराष्ट्रांच्या नजरकैदेतून सुटला आणि काही काळासाठी भूमिगत राहिला. त्याने आपले मूळ गाव, बावरियामधील रोसेनहाइमजवळ शेतांमध्ये चार वर्षे शेत-कामगार म्हणून काम केले. त्यानंतर १९४९ साली मेंगेले जिनिव्हा, इटलीमार्गे दक्षिण अमेरिकेत पळून गेला. त्याने १९५८ साली उरुग्वेमध्ये दुसरे लग्न केले आणि १९५९ साली पॅराग्वेचे नागरिकत्व प्राप्त केले.
१९६१ साली तो ब्राझीलला गेला, तेथे जुन्या काळातील ना*झी असलेल्या वुल्फगँग गेरहार्डशी त्याने मैत्री केली. ब्राझीलमध्येच हंगेरियन जोडप्याच्या मालकीच्या घरामध्ये ते राहू लागले. १९७९ साली पोहताना मेंगेलेचा मृत्यू झाला. पुढे. १९८५ मध्ये डॉ. मेंगेलेने गेरहार्डची ओळख धारण केल्याचे ब्राझिलियन, पश्चिम जर्मन आणि अमेरिकन फॉरेन्सिक तज्ञांच्या लक्षात आले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.