The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिंग शिह – एक वेश्या जी इतिहासातील सर्वात खतरनाक पायरेट बनली होती

by Heramb
12 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जेव्हा आपण “पायरेट्स” हा शब्द ऐकतो तेव्हा निर्विवादपणे पुरुषांची प्रतिमा आपल्या मनात उभी राहते. ब्लॅकबीयर्ड, हेन्री मॉर्गन, सयीदा अल हुरा आणि सर फ्रान्सिस ड्रेक अशी नावे पायरसीच्या इतिहासात कुप्रसिद्ध आहेत. हे पायरेट्स आजवरचे जगातील सर्वांत यशस्वी पायरेट्स आहेत.

परंतु अनेक इतिहासकार आणि पायरसीच्या इतिहासकारांच्या अभ्यासकांच्या मते, इतिहासातील सर्वात यशस्वी “लॉर्ड पायरेट्स” यांच्यापैकी कोणीही एक नसून एक आशियाई स्त्री होती. तीच स्त्री ‘चिंग शिह’ नावाने ओळखली जाते. याचा अर्थ ‘चिंगची विधवा’ असा होतो.

पायरसीच्या कारकिर्दीत तिने ८०० पेक्षा जास्त मोठी जहाजे, हजारभर लहान जहाजे आणि ७० हजारांहून अधिक पायरेट्सचे नेतृत्व केले होते. या तुलनेत, ब्लॅकबीर्डने फक्त ३०० जहाजे आणि काही हजार पायरेट्सचे नेतृत्व केले होते. या विलक्षण लेडी-पायरेटच्या चित्तथरारक आणि अविश्वसनीय जीवनप्रवासाचा अनुभव घेण्याचा हा प्रयत्न..

चिंग शिहचा जन्म १७७५ साली, चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात एका गरीब कुटुंबात झाला. तेव्हा तिचे नाव होते शिह यांग. समाजातील अनेक गरीब मुलींना तत्कालीन चिनी समाजामध्ये, तारुण्यात आल्यावर तिच्या कौटुंबिक उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. त्याप्रमाणे तिने ‘कँटोनीज’ या शहरातील वेश्यालयात काम केले. कँटोनीज हे एक बंदर असल्याने त्याठिकाणी बोटींवर वेश्यालय होते, यालाच ‘फ्लॉवर बोट्स’ म्हणूनही ओळखले जात. या बोट्स ग्राहकांना जवळच्या किनाऱ्यावर घेऊन जात असत.

वेश्याव्यवसाय सुरु केल्यानंतर चिंग शिह तिचे आकर्षक सौंदर्य, शांत स्वभाव आणि भव्य आदरातिथ्य यांमुळे शहरात चर्चेची विषय बनली होती. यामुळे तिच्याकडे अनेक ‘हाय-प्रोफाइल’ ग्राहक येऊ लागले. यामध्ये शाही दरबारी, लष्करी कमांडर्स, कँटोनीजला भेट देणारे श्रीमंत व्यापारी यांसह अनेक लोक होते. यापेक्षा जास्त माहिती तिच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल उपलब्ध नाही.



१८०१ साली, कुख्यात पायरेट गट ‘रेड फ्लॅग फ्लीट’चा कुख्यात पायरेट, ‘झेंग यी’ कँटोनीज शहरात आला. त्याने चिंग शिहबद्दल ऐकले आणि तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन तो तिच्या प्रेमात पडला. लवकरच त्याने या तरंगत्या वेश्यालयाला भेट दिली आणि चिंग शिहला भेटून आपल्या भावना तिच्यासमोर प्रकट केल्या. त्याने चिंग शिहला लग्नाचे प्रपोजल दिले.

यावर “जर तिला त्याच्या आर्थिक नफ्याचा पन्नास टक्के वाटा आणि त्याच्या पायरेट्सच्या ताफ्यावर अंशिक नियंत्रण दिले गेले तरच ती त्याच्याशी लग्न करेल.” असे शिहने ठामपणे सांगितले. तिच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या झेंग यीने तिच्या अटींना सहमती देऊन तिच्याशी लग्न केले. यावरून चिंग शिहला इतर स्त्रियांप्रमाणे नवऱ्याचा नोकर होऊन जगायचे नव्हते हे लक्षात येते. पण या घटनेच्या बाबतीत इतिहासकारांमध्ये अनेक वाद आहेत. अनेक इतिहासकारांच्या मते, झेंग यीने आपल्या माणसांना चिंग शिहला वेश्यालयातून पळवून नेण्याचा आदेश दिला होता आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले होते.

कोणत्याही मार्गाने लग्न झालेले असले, तरी चिंग शिहलाच त्यांच्या विवाहातून सर्वाधिक फायदा झाला आणि ‘झेंग यी’ बरोबरची तिची भेट हे तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण ठरले. यामुळे इतिहासात तिची नोंद ‘सर्वांत यशस्वी पायरेट’ अशी झाली. झेंग यी आणि चिंग शिह यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली, ‘रेड फ्लॅग फ्लीट’ची न भूतो न भविष्यती अशी प्रगती झाली आणि दिवसेंदिवस ‘रेड फ्लीट फ्लॅग’ समृद्ध होऊ लागला. त्यांच्या लग्नाच्या वेळी ‘रेड फ्लॅग फ्लीट’मध्ये फक्त दोनशे जहाजे होती. पुढील काही महिन्यांतच जहाजांची संख्या १८०० वर गेली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आपल्या पतीच्या फ्लीटमध्ये सामील झाल्यानंतर चिंग शिहने काही सुधारणा अंमलात आणल्या आणि कायद्याची संहिता तयार केली. या कायद्यांचे आणि नियमांचे सर्व क्रूने काटेकोरपणे पालन केले. त्या नियमांपैकी काही नियम होते:

ज्या पायरेट्सनी अधिकार नसतानाही आदेश दिले किंवा ज्यांनी ‘मास्टर पायरेट्स’च्या आदेशांचे पालन केले नाही, त्यांना कोणत्याही स्पष्टीकरणाची संधी न देता मृत्युदंड देण्यात येत होता. लुटलेला सगळा माल तपासणीसाठी सादर केला जात असे, जर कोणत्याही पायरेटने माल लपवून ठेवला किंवा कमी माल सादर केल्यास गुन्ह्याच्या प्रमाणानुसार त्यांच्या शरीराचा एक भाग कापला जात असे.

सर्वांनी नियमांचे पालन करावे म्हणून निष्ठा आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देण्यात आले. महिला बंदिवानांना आदराने वागवले जाणे आवश्यक होते. त्यांच्या सौंदर्याच्या आधारे त्यांचे वर्गीकरण केले जात असत. आकर्षक महिला बंदिवानांना खंडणीसाठी सुरक्षित ठेवले जात असत. तर पायरेट्सना परस्पर संमतीने या महिलांशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले.

फितुरी आणि बला*त्कार हे गंभीर गुन्हे मानले जात होते. या गुन्हेगारांना तातडीने फाशी देण्यात आली. विवाहापूर्वी संमतीने लैंगिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात, दोन्ही गुन्हेगारांना फाशी देण्यात येत असे. काही प्रकरणांमध्ये, पुरुषाला ‘नपुंसक’ करण्यात येत असे तर स्त्रीला ताफ्यातून हद्दपार करण्यात येत.

याव्यतिरिक्त, पायरेट्सच्या क्रू प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा आनंद लक्षात घेऊन अनेक आर्थिक सुधारणांना मंजुरी देण्यात आली. यामुळे या प्रदेशातील अनेक पायरेट्सचे गट बिनशर्त ‘रेड फ्लॅग फ्लीट’मध्ये विलीन झाले. यामुळे ‘रेड फ्लॅग फ्लीट’ हा जगातील सर्वात मोठा पायरेट्सचा ताफा बनला.

दरम्यान, चिंग शिहची गर्भधारणा न झाल्याने, या जोडप्याने जवळच्या किनार्‍यावरील गावातील ‘च्युंग पो’ नावाच्या विशीतील तरुण मच्छिमाराला दत्तक घेण्याचे ठरवले. ‘च्युंग पो’ हा ‘झेंग यी’ चा दुसरा कमांडर बनला तसेच ‘झेंग यी’ आणि चिंग शिह यांच्यानंतर मानाचा ‘पायरेट’ बनला.

लग्नानंतर अवघ्या सहा वर्षांनी, १८०७ साली, चिंग शिहवर दुःखाचा डोंगर कोसळला. व्हिएतनामच्या किनार्‍यावर असताना, एका वादळात सापडून ‘झेंग यी’चे निधन झाले. वारसदार या नात्याने त्यांचा दत्तक मुलगा ‘च्युंग पो’ याला ‘रेड फ्लॅग फ्लीट’चा प्रमुख कमांडर आणि पायरेट क्वीन चिंग शिहचा विश्वासू म्हणून नियुक्त करण्यात आले. परंतु, ‘झेन्ग यी’च्या निधनानंतर ‘रेड फ्लीट फ्लॅग’च्या पार्टनर शिप्समध्ये आपापसांतच संघर्ष सुरु झाला.

रेड फ्लीट फ्लॅगचे भवितव्य धोक्यात आले आहे असे दिसल्यावर मात्र काही डावपेच खेळून चिंग शिहने पुन्हा ताफ्यावर ताबा मिळवला. तिने ‘झेंग यी’शी एकनिष्ठ असलेल्या गटांचा पाठिंबा मिळवला. काही फितुरांना कैद करण्यात आले आणि त्यांची सार्वजनिक ह*त्या करण्यात आली. या घटना-क्रमानंतर मात्र कायदे संहिता लागू करण्यात आली आणि कायदा मोडणाऱ्यांना त्यांचा दर्जा काहीही असला तरी त्यांना तात्काळ ठा*र मारण्यात आले. आपल्या पतीच्या निधनानंतर काहीच दिवसांत पायरेट क्वीनने आपल्या सावत्र मुलाबरोबर लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला.

चिंग शिह आणि च्युंग पो यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या महाकाय पायरेट ग्रुपने समुद्रकिनाऱ्यावरील अनेक गावे काबीज केली. त्यांनी दक्षिण चीन समुद्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि हीच गोष्ट एक मोठं आव्हान म्हणून फ्रेंच आणि ब्रिटिश नेव्हीसमोर उभी राहिली. कारण व्यापाराच्या निमित्ताने आशियामध्ये येणाऱ्या या जहाजांवर नियमितपणे ‘रेड फ्लीट फ्लॅग’च्या पायरेट्सच्या धाडी पडू लागल्या.

चिंग शिहच्या ताफ्याच्या परवानगीशिवाय एकही जहाज दक्षिण चीन समुद्रात येऊ शकत नव्हते. याच भागातील अनेक किनाऱ्यावरील शहरे आणि गावे त्यांच्याचसाठी काम करत होती. त्यांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याच गावांतून होत असे. ज्या व्यापारी जहाजांना दक्षिण चीन समुद्रातून प्रवास करायचा असेल त्यांच्यावर ‘रेड फ्लीट फ्लॅग’ने कर आकारले होते. थोडक्यात त्यांनी आपलं स्वतंत्र सरकारच दक्षिण चीन समुद्रात चालवलं होतं असं म्हटलं तर अतिशयोक्त वाटायला नको.

पण चिनी राजघराण्याला हे सर्व संपवायचं होतं. नवशिक्या मँडरिन नौदलाच्या जहाजांना दक्षिण चीन समुद्रात रेड फ्लॅग फ्लीटचा सामना करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी पाठवण्यात आलं. लढाईला अवघे काही तास उरले असतानाच, मँडरिन नौदलाचा पराभव झाला. चिंग शिहने या संधीचं सोनं केलं आणि ‘मँडरिन क्रूने रेड फ्लॅग फ्लीटशी हातमिळवणी केल्यास त्यांना शिक्षा होणार नाही’ असं जाहीर केलं. त्याप्रमाणे मँडरिन नौदलानेही आत्मसमर्पण केलं आणि चिनी राजसत्तेने मँडरिन नौदलाचा एक मोठा भाग गमावला.

आपल्या मालकीच्या जमिनी, समुद्र, संसाधने आणि लोकांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका क्षुल्लक स्त्रीने नियंत्रण मिळवले आहे हा विचार करून चीनचा सम्राट प्रचंड संतापला. त्यामुळे पायरेट्सशी करार करण्याच्या प्रयत्नात, त्याने रेड फ्लॅग फ्लीटच्या सर्व पायरेट्सना माफीची ऑफर दिली. निदान यामुळे तरी चिंग शिहचे समुद्रावरील साम्राज्य संपुष्टात येईल अशी त्याला आशा होती. पण याच दरम्यान रेड फ्लीट फ्लॅगवर पोर्तुगीज नौदलाने मोठा ह*ल्ला केला. त्यांनी पोर्तुगीजांचा दोन वेळा पराभव केला होता पण यावेळी ते अत्याधुनिक शस्त्रे आणि जहाजे घेऊन आले होते. त्यामुळे रेड फ्लॅग फ्लीटला त्यांचा सामना करता आला नाही.

चिंग शिहने ओढावलेली भीषण परिस्थिती स्वीकारली आणि आता लढाईत टिकून राहण्यात काही अर्थ नाही हे तिच्या लक्षात आले. त्यामुळे चिनी सम्राटाने दिलेली माफीची ऑफर तिने स्विकारली. रेड फ्लॅग फ्लीटच्या संपूर्ण क्रूला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले गेले. पण चीनच्या सम्राटाने पायरेट्सना कोणतीही शिक्षा न करता वर्षानुवर्षे जमा केलेली सर्व लूट आपल्यासोबत नेण्याची परवानगी दिली शिवाय अनेक पायरेट्सना नोकऱ्या देण्यात आल्या. चिंग शिहचा दत्तक मुलगा आणि दुसरा पती, च्युंग पो याला किंगच्या ग्वांगडोंग नौदलाचे कर्णधारपद देण्यात आले. १८१३ साली तिला पहिला मुलगा झाला, त्याचं नाव ‘चेउंग यू लिन’. त्यानंतर तिला एक मुलगीसुद्धा झाली पण इतिहासात तिची नोंद आढळून येत नाही.

१८२२ साली तिच्या दुसऱ्या पतीचे समुद्रात असतानाच निधन झाले. त्यानंतर तिने आपल्या मुलांसह मकाऊ येथे स्थलांतर केले आणि तिने मिळवलेल्या सर्व संपत्तीसह जुगार अड्डा सुरु केला. तिने मिठाचा व्यापारही केला. आयुष्याच्या संध्याकाळी मकाऊमध्येच तिने एक वेश्यालय सुरु केले. जिथून हे सगळं सुरु झालं अखेर तिथेच हे सगळं थांबलंही होतं. वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.

रामदास स्वामींच्या ‘जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे, जनीं वंद्य ते सर्व भावे करावे’ या न्यायानुसार, या कथेत घेण्यासारखं बरंच काही आहे. फक्त वाचकाची दृष्टी राजहंसासारखी हवी. चिंग शिह फक्त एक शोषित वेश्या म्हणून जगली नाही तर मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून पायरसीच्या इतिहासात तिने एक नवा पायंडाच पाडून दिला, जिथे स्वतः राजघराण्याला पायरेट्सशी बोलणी करावी लागली. इतिहासातील या अध्यायाने आपल्याला एक गोष्ट निश्चितच शिकवली ती म्हणजे एका दृढनिश्चयी मानवामध्ये प्रचंड सामर्थ्य असते आणि इतिहासाची पानं बदलून टाकण्याची शक्तीही असते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

टी-ट्वेन्टीनंतर एकदिवसीय क्रिकेटचेही नेतृत्व रोहित शर्माकडेच येणार का?

Next Post

एलोन मस्कच्या स्पेसX च्या अंतराळवीरांची पहिली तुकडी अवकाशात पोहोचलीसुद्धा

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एलोन मस्कच्या स्पेसX च्या अंतराळवीरांची पहिली तुकडी अवकाशात पोहोचलीसुद्धा

वयाच्या पन्नाशीत महिलांचा एक ब्रँड उभा केला, संपत्तीत झुनझुनवालांनाही मागे टाकलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.