आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
योगायोग किंवा इन्तेफाक असे प्रकार आपल्या आयुष्यात जवळजवळ रोज घडत असतात. काहीतरी अनपेक्षित किंवा विचित्र झालं की आपण काही काळ आश्चर्यचकित होतो. पण अशी गोष्ट एक-दोनदा नाही तर तब्बल ६३ वेळा घडली तर? ही एखाद्या चित्रपटातील अथवा मालिकेमधील कल्पना किंवा अतिशयोक्ती मुळीच नाही, तर वस्तुस्थिती आहे.
स्थापत्यशास्त्र पहिल्यापेक्षा अनेक पटींनी पुढं गेलं आहे असा “गोड गैरसमज” आपल्याला असेल. पण खरंच तसं आहे का? स्थापत्यशास्त्राची प्रगती म्हणजे फक्त उंच, काचेच्या आणि सुंदर दिसणाऱ्या इमारतींमध्येच आहे का? थोडक्यात आधुनिक स्थापत्यशास्त्राची प्रगती “दुरून डोंगर साजरे” अशी तर नाही?
महिन्यातून एकदातरी वृत्तपत्रात किंवा बातम्यांमध्ये आपल्याला एखादा पूल तरी कोसळताना दिसतो किंवा एखादी इमारत तरी कोसळताना दिसते, २०१० साली कॉमनवेल्थ स्पर्धांच्या निमित्ताने बांधलेल्या पुलाने स्थापत्यशास्त्राचा नव्हे तर प्रामाणिकपणाचा आभाव दाखवून दिला होता. यासारख्या असंख्य घटना देशात होत असतानाही यावर काही उपाययोजना समाज अथवा सरकारकडून होताना दिसत नाही हीच शोकांतिका!
शिवचरित्रातून अनेक गोष्टी शिकून आपलं “चारित्र्य” घडवता येऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात झालेली बांधकामं विशेषतः राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, जिंजीचा किल्ला आणि प्रतापगड यांसारखे प्रचंड किल्ले. तसेच प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्वतीपुर या गावी जाण्यासाठी कोयनेवर बांधलेला पूल या वास्तू आजच्या समाजासाठी आणि शासनासाठी आदर्श आहेत. पण ‘जो देश आणि समाज आपला इतिहास विसरतो त्याच भविष्य अंधारात असतं’.
२०१६ सालच्या दुर्दैवी महाड दुर्घेटनेत ब्रिटीशांनी बांधलेला शंभर वर्षांपूर्वीचा पूल कोसळला आणि अनेकांचे बळी गेले. मात्र प्रतापगडाच्या पायथ्याजवळील कोयना नदीवरील पूल छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष तर देतोच, पण नव्या युगातील इंजिनीअर्सनाही बोध देतो.
२०१६ सालीच चेन्नई येथील विमानतळावरील काचेच्या साहाय्याने तयार केलेलं छत ६३व्या वेळी कोसळलं. होय! तब्बल ६३व्या! चेन्नई विमानतळाच्या या नव्या टर्मिनलचं उद्घटन २०१३ साली झालं होतं आणि २०१६ साली हे छत ६३व्या वेळी कोसळलं होतं! सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. २०१२ साली २२०० कोटी रुपये खर्च करून या विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले होते.
या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केंद्रीय उड्डयन मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांना हे ग्लास पॅनेलचे छत ६१व्या वेळी पाडण्याबाबत पत्र लिहिले होते. विमानतळाची काच पडण्याच्या ६१व्या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाचे वकिल एस. के. सामी यांनी याचिका दाखल केली.
विमानतळाच्या उद्घाटनाच्या पहिल्या सहा महिन्यांत अशा तीनपेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. २०१४ साली विमानतळ प्राधिकरणाचे काही अधिकारी आणि इतर तीन खाजगी विमान कंपनीचे कर्मचारी काचेचे पॅनल पडल्यामुळे जखमी झाले, असं एस. के. सामी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती डी. मुरुगेसन म्हणाले, “काच पडण्याच्या ६१ घटना असूनही, अधिकाऱ्यांनी लोकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलेले नाही, जर लावले गेलेले आरोप सत्य असले तर या बाबतीत सखोल चौकशी व्हायला हवी”.
काचेचे पॅनल पडण्याच्या या ६३व्या घटनेपर्यंत तब्बल १३ लोक जखमी झाले होते.
या ६३व्या घटनेनंतरही काचेचे पॅनल फुटण्याचा दावा केला गेला होता. पण प्रसार माध्यमांना जाहीर केलेल्या निवेदनात विमानतळाचे संचालक दिपक शास्त्रींनी एका प्रवाशाने मनी एक्सचेंज काउंटरची काच फोडली हे तथ्य सांगत अफवेचे खंडन केले. यावेळी जरी विमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही प्रवाशांची चूक होती आणि काचाचे दरवाजे तोडले गेले होते, काचेचे पॅनेल्स फुटल्याची घटना यापूर्वी अनेक वेळा घडून गेली होती.
टर्मिनल्सची देखभाल करण्याच्या कामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सुमारे ३५ लाखांचं कंत्राट देण्यात आलं होतं. ‘ट्रेंडिंग’ डिझाइन घटक असलेल्या काचेच्या पॅनल्सच्या स्थितीचे मूल्यांकन करणे आणि दुर्बल असलेले पॅनेल्स पुनर्स्थित करणे हे कंत्राटी काम भारतीय विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आले होते.
२०१४ साली तत्कालीन नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी विमानतळाची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले, या तपासाचे निकाल सर्वच आघाड्यांवर घाणेरडे होते. शौचालय आणि अन्न मिळण्याचे ठिकाण अस्वच्छ होते, खिडक्या तुटल्या होत्या तसेच निकृष्ट दर्जाची सामान हाताळणी इत्यादी या सर्व्हेतून बाहेर आलं. चेन्नई विमानतळ असुविधेच्या बाबतीत आशियात सातव्या क्रमांकावर आहे.
या घटनांवरून नोकरशाही आणि सरकारला असलेलं गांभीर्य लक्षात येतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.