या बटूग्रहावर पृथ्वीपेक्षाही जास्ती पाण्याचा साठा आहे..

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


आपल्या सूर्यमालेत मंगळ ग्रह आणि गुरू ग्रहाच्या मधोमध यात एक लघु ग्रहांचा पट्टा आहे. या पट्टयामध्ये ‘सेरेस’ नावाचा एक बटुग्रह आहे. सेरेस हा आपल्या सूर्यमालेतील तीन बटुग्रहांपैकी एक आहे. सेरेसच्या व्यतिरिक्त प्लूटो आणि कायपरच्या पट्ट्यातील एरिस हे दोन बटुग्रह आपल्या सूर्यमालेत आहेत.

सेरेस हा लघुगृह आहे की बटुग्रह हे ठरवण्यासाठी शास्त्रज्ञांना बरीच मेहनत घ्यावी लागली होती, कारण लघु ग्रहांच्या पट्ट्यात असणारा सेरेस हा इतर लघु ग्रहांच्या तुलनेत आकाराने मोठा होता. त्यामुळे त्याला बटु ग्रहाचा दर्जा देण्यात यावा असे अनेकांना वाटत होते. खरंतर सेरेस नेमका कुठल्या प्रकारात मोडतो, याविषयीचा वाद त्याचा शोध लागला तेंव्हापासूनच सुरू झाला होता.

ग्यूसीपे पियाझी या अंतराळ संशोधकाने १८०१ साली एक चकाकणारा ग्रह अवकाशात शोधून काढला, सुरुवातीला त्याला असे वाटले की हा एक धूमकेतू आहे.

पण ज्यावेळी त्याने दुसऱ्या एका अंतराळ संशोधकाशी सल्लामसलत केली त्यावेळी त्याचा लक्षात आले की हा एक धूमकेतू नसून एक ग्रह आहे. ग्यूसीपेने त्या ग्रहाचे नामकरण “सेरेस” असे केले. सेरेस हे ग्रीक पुराणातील एका कृषि देवतेचे नाव आहे.

कालांतराने याच सेरेसच्या आवती भोवती असंख्य लहान मोठे लघुग्रह आढळून आले, पुढे हा लहान लहान आकरांच्या लघु ग्रहांचा पट्टाच असल्याचे संशोधनात निष्पन्न झाले. या लघु ग्रहांच्या पट्टयात सेरेस असल्याने त्याला देखील लघुग्रह घोषित करण्यात आले.

सेरेस हा या पट्ट्यातील सर्वात मोठा लघुग्रह आहे आणि तो सूर्यमालेतील एकमेव बटुग्रह म्हणून देखील गणला जातो. त्याच्या व्यतिरिक्त प्लूटो आणि एरिस हे दोन बटुग्रह सूर्यमालेच्या बाहेरील भागात आहेत.

सेरेस हा त्याच्या सभोवताली असणाऱ्या इतर लघुग्रहांच्या तुलनेत आकाराने गोल आणि त्याच्या विषववृत्तीय भागात जरासा फुगीर आहे, त्यामुळे तो लघुग्रहांपेक्षा वेगळा सिद्ध झाला आहे. २००६ साली सेरेसला बटुग्रहाचा दर्जा प्रदान करण्यात आला, याच वर्षी प्लूटोचा ग्रहाचा दर्जा काढून त्याला बटुग्रहाचा दर्जा देण्यात आला.

सेरेस ला त्या लघुग्रह पट्टयातील सर्वात मोठा लघुग्रह मानतात. तो सूर्यापासून २.८ अस्ट्रॉनॉमिकल युनिट इतक्या अंतरावर आहे. त्याच्या पर्यंत २२ मिनिटात सूर्यप्रकाश येऊन पोहचत असतो, पृथ्वीवर हाच सूर्यप्रकाश ८.३ मिनिटांत येऊन पोहचतो.

सेरेस हा पृथ्वीपासून ३.५ अस्ट्रोनॉमिक युनिट अंतरावर असून त्याची त्रिज्या पृथ्वीच्या १/१३ व्या भागा इतकी म्हणजेच सरासरी ४७६ किलोमीटर इतकी आहे.

अनेक शास्त्रज्ञांच्या मते सेरेस हा एक “अविकसित” अथवा “भ्रूण अवस्थेतील” ग्रह आहे. सेरेस हा एक ग्रह म्हणून विकसित होणार होता पण तो तसा विकसित होऊ शकला नाही. असं मानलं जातं ४.५ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा आपली सूर्यमाला तयार होत होती, त्यावेळी गुरुत्वाकर्षणातून निर्माण झालेल्या धुलिकनांच्या एकत्र येण्याने सेरेसची निर्मिती झाली होती.

सेरेस हा देखील बुध, गुरू,शुक्र आणि पृथ्वी यांच्याप्रमाणेच एक टेरेस्ट्रीयल ग्रह आहे, असे मानले जाते. पृथ्वीप्रमाणेच याच्याही पोटात विविध भु आवरणे असावेत असं अनेक शास्त्रज्ञांना वाटते. सेरेसचा गर्भ हा दगडी स्वरूपाचा असून त्यावर पाण्याचे आणि बर्फाचे आवरण आहे, असं शास्त्रज्ञ मानतात.

सेरेसवर पृथ्वीपेक्षा जास्त पाणी आहे, असं शास्त्रज्ञांचे मत असून ते आता तिथे कुठल्या प्रकारचे जीवन आहे की नाही, यावर संशोधन करीत आहेत.

सेरेसचा आतील भाग हा टणक पाषाणी असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिठाचे साठे आहेत. पण हे मीठ आपल्यासारखे सोडियम क्लोराईड नसून मॅग्नेशियम सल्फेट असल्याचे शास्त्रज्ञ मानतात.

सेरेस हा मंगळ आणि गुरू ग्रहाच्या मधील कक्षेत सूर्याला प्रदक्षिणा मारत असतो. त्याला सुर्यप्रदक्षिणा पूर्ण करायला ४.७ वर्ष कालावधी लागतो, म्हणजेच १६८२ दिवसांचा कालावधीत त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

सेरेसवरील दिवस हा सर्वात लहान असून तिथे फक्त ९ तासांचा दिवस असतो, बाकी वेळ रात्र असते.

सेरेस हा त्याच्या भ्रमण कक्षेत ४ अंशाने झुकलेला असून त्याचे प्लेन ऑफ ऑरबीट सूर्याला समांतर आहे, याच कारणाने त्याठिकाणी कुठलेही पृथ्वीसारखे ऋतुचक्र अस्तित्वात नाही.

सेरेसच्या वातावरणात पाण्याची वाफ असल्याचे अनेक पुरावे आढळले आहेत. ही पाण्याची वाफ सेरेसवर असलेल्या बर्फाच्या ज्वालामुखीमुळे आणि बर्फ वितळल्यामुळे असल्याचे मानले जाते. सेरेसवर आढळून आलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी जीवन असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

२०१५ साली डॉन नावाचे एक अंतराळयान नासाने अवकाशात पाठवले होते. या अंतराळ यानाने अवकाशात अनेक ब्राईट स्पॉट्स शोधून काढले असून यामुळे जगभरातील शास्त्रज्ञामध्ये याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

याविषयी अनेक सिद्धांत समोर आले असून एका सिद्धांतानुसार हे स्पॉट्स सोडियम कार्बोनेटचे असल्याचा दावा करण्यात आला आहे, पण याविषयी अजूनतरी कुठलाच सबळ असा पुरावा शास्त्रज्ञांकडे नाही.

भविष्यात शास्त्रज्ञ या विषयात अजून संशोधन करणार असून या रहस्यमय सेरेस ग्रहावर काही सापडते का ? यावर सर्वांचेच लक्ष लागून आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!