आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात फक्त स्वतःसाठी असा वेळ काढणंसुद्धा अवघड होऊन बसलंय. पण, आपल्या कामात अव्वल असण्यासाठी डोकं ताजंतवानं असणं आवश्यक आहे. केवळ झोप घेतल्याने ते शक्य होईल असं नाही तर, एखाद्या दुसऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. यासाठी एखादा तरी छंद जोपासावा असं म्हणतात. मग तो कुठला का असेना.
कोणाला वाचनाचा छंद असतो, बाहेर जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेण्यापेक्षा तासनतास पुस्तकांच्या सानिध्यात वेळ घालवण्याला ते जास्ती प्राधान्य देतात. कोणाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडतं तर कोणाला संगीतात स्वतःला हरवून घ्यायला आवडतं.
काही लोक आपले छंद जोपासण्यासाठी कुठल्या थराला जातील याची काहीच शाश्वती नाही. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेऊयात ज्याने चक्क आपल्याला घरालाच आपल्या छंदामध्ये रुपांतरीत केलं आहे.
आश्चर्य वाटलं नं वाचून?
रवी होंगल. बेळगावमध्ये राहणारा एक सामान्य माणूस. लहानपणापासूनच रवीला फोटोग्राफीची आवड होती. त्यांच्याकडे असणारा जुना “पेंटॅक्स” कॅमेरा घेऊन तो आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन वेगवेगळे फोटो काढायचा. तेव्हापासूनच त्याने फोटोग्राफर होण्याचं स्वप्न बघितलं. आपल्या छंदालाच आपलं करिअर बनवून आज तो बेळगावमधील एक यशस्वी फोटोग्राफर झालाय.
त्याचं फोटोग्राफीचं वेड इतकं आहे की, त्यानी आपल्या तीन मुलांचे नावं पण कॅमेरा कंपन्यांच्या नावावर ठेवले आहेत. एकाचं इप्सन, एकाचं कॅनन आणि तिसऱ्याचं निकॉन.
पण हे वेड इथेच थांबलं नाही. रवीनी नुकतंच स्वतःचं घर बांधलं. ते पण एका कॅमेराच्या आकारात! त्याच्या घराचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होतायत.
“हे घर बांधणं आमच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. यासाठी आम्ही कर्ज काढलं, जुनं घरसुद्धा विकलं”, असं रवीची पत्नी सांगते.
इंडिअन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला मुलाखत देताना रवी सांगतात,
“फोटोग्राफर होणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्नं होतं. मला फोटोग्राफीशी संबंधित सगळ्याच गोष्टींचं प्रचंड आकर्षण आहे. या क्षेत्रात आता बरेच बदल झाले आहेत. मला कायम वाटायचं की आपलं घर हे एका कॅमेरासारखं असावं पण ते कसं बांधता येईल, किती खर्च होईल याचा मला काहीच अंदाज नव्हता.”
अनेक वर्षं बचत करून बऱ्याच आर्किटेक्टच्या मदतीनं त्यांनी आपलं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. “की कन्सेप्ट इंटेरिअर” या कंपनीने हंगल यांच्या घराचं डिझाईन तयार करून त्याचं बांधकाम पूर्ण केलं. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं सगळं श्रेय रवी या कंपनीला देतात.
फोटोग्राफीशी संबधित बऱ्याच गोष्टी या घरात दिसून येतील. घराबाहेरील भिंतीवर त्यांनी कॅनन, इप्सन आणि निकॉन या कॅमेरा कंपन्यांचं नाव लिहिलेलं दिसेल. एक बाल्कनी कॅमेराच्या रीळच्या आकारात तयार केली आहे. याशिवाय बाहेरील बाजूस, लेन्सच्या वरती एक मोठा फ्लॅश बसवला आहे. कॅमेरा शटरच्या आकाराचे गेट, मेमरी कार्ड असे अनेक फिचर या घरात दिसून येतील.
“माझ्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरवणं इतकं सोपं नव्हतं. मला अगदी कॅमेरातील सगळ्या गोष्टी त्या घरात होत्या. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हे घर पूर्ण झालं. मला कधीच वाटलं नव्हतं की हे पूर्ण होईल.”
“क्लिक” नावाच्या या घराचं बांधकाम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं. ट्वीटरवर काही लोकांनी याचे फोटो शेअर केल्यापासून सगळीकडे या आगळ्यावेगळ्या घराचीच चर्चा होताना दिसून येतेय.
आपला छंद जोपासण्यासाठी एखादी व्यक्ती काहीही करू शकते याचं हे एक उत्तम उदाहारण ठरतं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.