आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जेव्हा कधीही जगातील बलाढ्य फौजांचा विषय निघतो, तेव्हा भारतीय सैन्यदलाचे नाव अगदी अग्रक्रमाने घेतले जाते. भारतीय सैन्याच्या या रुतब्याचं सगळं श्रेय हे देशासाठी बलिदान देणाऱ्या व शौर्य गाजवणाऱ्या हजारो सैनिकांना जातं.
अशा स्वतंत्र भारताच्या शूर सैनिकांमध्ये एक नाव घेतले जाते ते ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांचे. त्यांना पाकिस्तानचे पितामह मोहम्मद अली जिना व लियाकत अली खान यांनी इस्लामची शपथ देत पाकिस्तानी फौजेचे लष्करप्रमुख होण्याची ऑफर दिली होती. जितक्या प्रेमाने ही ऑफर त्यांना दिली गेली होती तितक्याच द्वेषाने त्यांनी ती धुडकावून आपले भारत देशाप्रती असलेले प्रेम व निष्ठा दाखवून दिली.
ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांचा जन्म १५ जुलै १९१२ रोजी उत्तरप्रदेशमधील आजमगढ येथे झाला. त्यांचे वडील तेव्हा ब्रिटिशांच्या पोलिसदलामध्ये अधिकारी होते. आपल्या मुलाने प्रशासकीय सेवेत भरती व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण मोहम्मद उस्मान यांना सैन्यातच जायचे होते. त्यावेळी सामान्य घरातील मुलांना सैन्यात अधिकारी होणे सहजासहजी शक्य नव्हते.
१९२० साली भारतीयांना सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त करण्यास इंग्रजांनी सुरुवात केली होती. त्यापूर्वी भारतीय हे ब्रिटिश सैन्यात सैनिक म्हणून लढत असत. फार फार तर हवालदार पदापर्यंत त्यांची बढती होत असे.
अधिकारी पदासाठी केवळ मोठ्या आणि राजघराण्यातील लोकांनाच प्राधान्य दिले जात असे. म्हणून सैन्यात भरती होण्यासाठी त्यांनी सँडहर्स्ट (ब्रिटिश सैन्याची इंग्लडमध्ये असणारी प्रशिक्षण अकादमी) साठी अर्ज केला व त्यांची निवड देखील झाली.
जुलै १९३२ साली आर्मी प्रशिक्षणासाठी ते इंग्लडला रवाना झाले. सँडहर्स्टमध्ये भारतीयांसाठी तो अखेरचा कोर्स होता. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांना डेहराडून येथे त्याचवर्षी सुरू केलेल्या ‘इंडियन मिलिटरी अकादमी‘मध्ये प्रशिक्षण दिले जाऊ लागले. दहा इतर भारतीयांसोबत ब्रिगेडियर उस्मान फेब्रुवारी १९३४ मध्ये सँडहर्स्टमधून उत्तीर्ण झाले.

मार्च १९३५ मध्ये उस्मान यांची भारतीय सैन्यात नियुक्ती झाली. १०व्या बलुच रेजिमेंटच्या ५व्या बटालियनमध्ये त्यांना नियुक्त करण्यात आले. एप्रिल १९३६ मध्ये लेफ्टनंट तर ऑगस्ट १९४१ मध्ये त्यांनी कॅप्टन पदापर्यंत बढती मिळवली. नंतर त्यांनी काही काळ बर्मामध्ये (आजचा म्यानमार) सेवा दिली. तसेच लंडन गॅझेटमध्ये मानाचे कार्यवाहक मेजर हे पद देखील भूषवले. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिगेडियर उस्मान हे बलुच रेजिमेंटमध्येच आपली सेवा बजावत होते.
१९४७ साली देशाची फाळणी झाली तशी भारतीय सेनेची देखील भारत-पाकिस्तान यांच्यात विभागणी झाली. ब्रिगेडियर उस्मान तैनात असलेली बलुच रेजिमेंट पाकिस्तानच्या वाट्याला गेली. आपल्या नेतृत्वगुण आणि पराक्रमामुळे आधीच उस्मान सर्व रेजिमेंट्समध्ये प्रसिद्ध होते.
म्हणून मोहम्मद अली जिना आणि लियाकत अली खान यांनी उस्मान यांना पाकिस्तानी सैन्यात येण्याची विनंती केली. त्यांना पाकिस्तानचे लष्करप्रमुखपद देखील द्यायचे कबूल केले.
पण मोहम्मद उस्मान यांनी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही उस्मान हे राजी होत नाहीत हे पाहून शेवटी जिनांनी त्यांना इस्लामची शपथ दिली, पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. ब्रिगेडियर उस्मान आपल्या निर्णयावर ठाम राहिले व बलुच रेजिमेंट सोडून त्यांनी डोगरा रेजिमेंटमध्ये आपली बदली करून घेतली.
देशाच्या फाळणीनंतर लगेचच पाकिस्तानने कबायली घुसखोरांना जम्मू-काश्मीरवर ह*ल्ला करण्यास पाठवले. घुसखोरांनी डिसेंबर १९४७ मध्ये झांगर व नौशेरावर कब्जा केला. झांगर हे गाव राजकीयदृष्ट्या भारतासाठी अतिशय महत्त्वाचे होते. कारण झांगर ही अशी जागा होती, ज्याने मिरपूर व कोटली जोडले जात होते. ब्रिगेडियर उस्मान यांनी या भागांना शत्रूच्या तावडीतून सोडवण्याचा संकल्प केला.
जोपर्यंत झांगर व नौशेरावर परत कब्जा मिळवत नाही, तोपर्यंत जमिनीवरच चटई टाकून झोपण्याची शपथ त्यांनी घेतली. पाकिस्तानी सीमेवर काही घुसखोर एका मशिदीमध्ये लपून बसले होते, याची खबर भारतीय सैनिकांनी लागली पण एका धार्मिक वास्तूवर ह*ल्ला करण्यास भारतीय सैनिकांना संकोच वाटू लागला.
ही गोष्ट जेव्हा ब्रिगेडियर उस्मान यांना समजली तेव्हा त्यांनी स्वतः तिथे जाऊन सैनिकांना मशिदीवर ह*ल्ला करण्याचे आदेश दिले व सैनिकांना सांगितले की, ज्या दिवशी घुसखोरांनी या इमारतीवर कब्जा केला त्याच दिवसापासून ही इमारत धार्मिक राहिली नाही. ब्रिगेडियर उस्मान हे तसे खूप धार्मिक होते, पण त्यांनी आपल्या कर्तव्याच्या आड कधीही आपल्या धर्माला येऊ दिले नाही.
जानेवारी-फेब्रुवारी १९४८ मध्ये त्यांनी घुसखोरांवर जोरदार ह*ल्ले चढवले. अगदी कमी सैन्याच्या बळावर त्यांनी शत्रूची दाणादाण उडवून दिली. तब्बल १००० शत्रूंना यमसदनी धाडले तर हजारपेक्षा जास्त जणांना घायाळ केले. मात्र त्या बदल्यात भारताचे २१ जवान कामी आले, तर १०२ जखमी झाले. या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना ‘नौशेरा का शेर‘ हे नाव पडले.
पाकिस्तानने तर त्यांचा एवढा धसका घेतला होता की, त्यांच्यावर ५०,००० चे इनाम ठेवले होते. काही दिवसांनी परत पाकिस्तानने आपल्या नियमित सैन्याला झांगरवर कब्जा करण्यास पाठवले. पाकिस्तानने जोरदार ह*ल्ला चढवला, प्रचंड गोळीबार झाला, पण ब्रिगेडियर उस्मान यांनी शत्रुसैन्याच्या प्रत्येक ह*ल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानी सेनेच्या अशाच एका ह*ल्ल्याला प्रत्युत्तर देताना ३ जुलै १९४८ रोजी ब्रिगेडियर उस्मान यांना वीरमरण प्राप्त झाले. शेवटचा श्वास घेतानासुद्धा त्यांनी सैनिकांना एवढेच सांगितले की, “मी तर जात आहे, पण ज्या भागावर शत्रूने कब्जा करू नये म्हणून आपण लढत आहोत, तो कोणत्याही परिस्थितीमध्ये शत्रूच्या हाती जाता काम नये.”
ब्रिगेडियर उस्मान यांना त्यांच्या साहस,पराक्रम व प्रेरक नेतृत्वासाठी ‘महावीर चक्र‘ देऊन गौरविण्यात आले. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी हजेरी लावली होती. इतिहासात हे प्रथमच घडत होते की, एखाद्या देशाचे पंतप्रधान सैन्यातील एका अधिकाऱ्याच्या अंत्यविधीसाठी आले होते.
अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्रास कोटी कोटी प्रणाम!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








