आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘हे विश्व अनेक रहस्यांनी कसं भरलेलं आहे’ यावर तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या किंवा कित्येकदा पाहिल्याही असतील. या विश्वामध्ये होणाऱ्या रहस्यमयी घटनांची कारणपरंपरा शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. कित्येक गोष्टींमागील कार्यकारण भाव आपल्याला सापडतोही. कित्येकदा यामुळेच अनेक शोधही लागतात.
कित्येकदा या रहस्यांमागील कारणांचा मागोवा घेत असताना मानव आपली संपूर्ण क्षमता वापरतो पण त्यानंतरही काही रहस्यांचा उलगडा होत नाही. उदाहरणार्थ, एरिया-५१, व्हॉयनीच हस्तलिखित आणि अशीच अनेक रहस्ये! अशा रहस्यांची यादी बर्मुडा ट्रँगलचे नाव घेतल्याशिवाय संपूच शकत नाही. बर्मुडा ट्रँगलबद्दल तुम्ही आजवर अनेक वदंता ऐकल्या असतील. पण आज त्याबद्दल आणि बर्मुडाच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
बर्मुडा ट्रँगल हा उत्तर अटलांटिक महासागरामध्ये, अमेरिका आणि ग्रेटर अँटिल्सच्या (क्युबा, हिस्पॅनियोला, जमैका आणि प्यूर्टो रिको) आग्नेय (दक्षिण-पूर्व) किनारपट्टीलगत आहे. या जागेचे अंदाजे क्षेत्रफळ ५ लाख ते १५ लाख चौरस मैल आहे. बर्मुडा ट्रँगल जगाच्या कोणत्याही अधिकृत नकाशावर दाखवला जात नाही. तर ‘यूएस बोर्ड ऑफ जिओग्राफिक नेम्स’ बर्मुडा ट्रँगलला अटलांटिक महासागराचा अधिकृत प्रदेश म्हणून मान्यता देत नाही. २०१३ साली ‘वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड’ने सागरी वाहतूक मार्गांचा संपूर्ण अभ्यास करून बर्मुडा ट्रँगल सागरी वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे निर्धारित केले आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या प्रदेशातून विचित्र घटनांच्या बातम्या येत असल्या तरी, १९६४ सालापर्यंत “बर्मुडा ट्रँगल” शब्दप्रयोग कोठेही दिसत नाही. या शब्दाचा वापर पहिल्यांदा ‘विन्सेन्ट गड्डीस’ यांच्या लेखात आला. त्यांनी हा शब्द प्रामुख्याने शेकडो विमाने आणि जहाजे नष्ट होत असलेल्या ‘त्रिकोणी’ प्रदेशासाठी वापरला. अशी जहाजे आणि विमाने नष्ट झाल्यानंतर आजतागायत त्यांचा कोठेही मागमूस लागला नाही.
या प्रदेशातील अशाच दोन घटनांमध्ये अमेरिकेच्या लष्करी वाहनांचा समावेश आहे. मार्च १९१८ मध्ये ‘कोलियर यूएसएस सायक्लॉप्स’ यु*द्धनौका बर्मुडा ट्रँगलच्या प्रदेशामध्ये गायब झाली. ‘कोलियर यूएसएस सायक्लॉप्स’ ही यु*द्धनौका ब्राझीलहून बाल्टीमोरला जात होती. पण ती बाल्टीमोरला पोहोचलीच नाही.
यु*द्धनौकेच्या गायब होण्याची कोणतीही ठळक कारणे दिसून आली नाहीत शिवाय अपघात किंवा ह*ल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. या घटनेच्या सुमारे २७ वर्षांनंतर, बॉ*म्बर्स स्क्वॉड्रन किंवा ‘फ्लाईट १९-चार्ल्स कॅरोल टेलर’ बर्मुडा ट्रँगलवरच्या हवाई क्षेत्रात गायब झाले. या घटनेतही यूएसएस सायकलॉप्सच्या घटनेप्रमाणे, अपघात किंवा ह*ल्ल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
चार्ल्स बर्लिट्झच्या ‘द बर्मुडा ट्रँगल’ या ‘बेस्ट सेलर’ पुस्तकातून बर्मुडा ट्रँगलची आख्यायिका सर्वत्र प्रसिद्ध झाली. परंतु आजमितीस बर्मुडा ट्रँगलच्या क्षेत्रातून हवाई आणि समुद्री वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. तसेच बर्मुडा ट्रँगल जगातील सर्वात जास्त प्रवास होत असणाऱ्या सागरी शिपिंग लेनपैकी एक मानला जातो.
या ट्रँगलचे नाव ‘बर्मुडा’ हे पडले, याला कारण म्हणजे याच भागात असलेले ‘बर्मुडा’ नावाचे एक टुमदार पण सुंदर आणि अनेक वर्षे ‘अनएक्सप्लोर्ड’ राहिलेले बेट . एकूण अटलांटिक बेटांपैकी अत्यल्प युरोपियन लोकसंख्या असलेले हे एकमेव ‘अटलांटिक बेट’ आहे. पूर्वी याठिकाणी फक्त उथळ खडक, वारंवार येणारी चक्रीवादळे आणि भयानक आवाज करणारी पेट्रेल पक्षाची प्रजाती याशिवाय काहीही नव्हते. स्पॅनिश लोक त्याला ‘डेमोनोरियम इन्सुलम’ किंवा ‘राक्षसाचे बेट’ म्हणू लागले, इतके हे बेट निर्मनुष्य होते.
बर्मुडाचा शोध पहिल्यांदा सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला लागला आणि १५११ साली ‘बर्मुडा‘ जगाच्या नकाशावर अवतरला. स्पॅनिश, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांना माहिती असूनही यापैकी कोणत्याही क्रू*र वसाहतवाद्याला याठिकाणी दावा तर सांगायचा नव्हताच, पण अशा वसाहतवाद्यांना या बेटाला विश्रांतीचे ठिकाणही बनवायचे नव्हते. परंतु, कालांतराने इंग्लडने या बेटावर दावा केला आणि आजही ‘बर्मुडा‘ हे ‘ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरी’ आहे.
खडक आणि धोकादायक वादळे यांमुळे या बेटावर संसाधनांचा आभाव होता. शिवाय वादळं आणि किनाऱ्यावरील उथळ खडकांमुळे याठिकाणी येण्याची हिम्मत खलाशांमध्येही नव्हती. बर्मुडावर वसाहत झाली, तीसुद्धा जहाज अपघातातून वाचलेल्या लोकांची. त्यांनाही येथे राहणे अजिबात पसंत नव्हते आणि लवकरात लवकर त्यांना बाहेर पडायचे होते.
१६०९ साली, ‘ब्रिटिश व्हर्जिनिया कंपनी’ने व्हर्जिनियामधील नव्या वसाहतींना आवश्यक संसाधनांचा पुरवठा करण्यासाठी एक नवीन जहाज सुरु करून त्याला ‘सी व्हेंचर’ असे नाव दिले. या जहाजाचे नेतृत्व ‘जॉर्ज सोमर्स’ने केले होते. कॅप्टन ‘फ्रान्सिस ड्रेक’ आणि ‘वॉल्टर रॅली’ याच्यासोबत आपण प्रवास केला होता असा जॉर्ज सोमर्सचा दावा होता.
सी व्हेंचरने नव्या जगाच्या शोधासाठी नऊ जहाजांच्या ताफ्याचे नेतृत्व केले. त्याने कंपनीच्या नफ्यासाठी कायमस्वरूपी वसाहती शोधण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रवासादरम्यान, या ताफ्याला वादळाचा जबरदस्त धक्का बसला. ताफ्याचा प्रवास जूनमध्ये सुरु झाला होता आणि हे ‘चक्रीवादळ’ असण्याची दाट शक्यता होती.
खराब हवामानामुळे समुद्रात ताफा विखुरला आणि ‘सी व्हेन्चर’चे प्रचंड नुकसान झाले. प्रमुख जहाजावरील क्रूने काही अंतरावर उथळ खडकांचे ढीग पाहिले. वादळामध्ये हरवून जाण्यापेक्षा किंवा जहाज बुडण्यापेक्षा त्यांनी त्या खडकांजवळील किनाऱ्यावर जाण्याचे ठरवले. यामुळे जहाजातील सर्व दीडशे जणांचे प्राण वाचू शकले. ज्या बेटावर हे लोक स्थिरावले, त्याचंच नाव, ‘बर्मुडा‘.
सर सोमर्स आणि त्याचे कर्मचारी बर्मुडावर नऊ महिने अडकले होते. या काळात त्यांनी ‘सी व्हेन्चर’ची मोहीम पूर्णतः बंद करण्याचे ठरवले आणि बर्मुडा बेटावरील झाडांचा वापर करून दोन नवीन बोटी बांधल्या. या बोटींचा वापर त्यांनी व्हर्जिनियामध्ये असलेल्या ताफ्यात पुन्हा सामील होण्यासाठी केला. चार जणांचा मृत्यू आणि ह*त्येच्या आरोपानंतर, हा क्रू जेम्सटाउन कॉलनीसाठी रवाना होण्यास तयार होता. पण जेव्हा ते व्हर्जिनियामधील जेम्सटाउनच्या किनाऱ्यावर उतरले तेव्हा ती वसाहतसुद्धा निराधार आणि उपाशी होती.
नवीन जगात बर्मुडा त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी किती उपयुक्त आहे हे पाहून, व्हर्जिनिया कंपनीने बर्मुडा बेटांचा युनायटेड किंगडममध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न केले. १६१२ सालापासून हे बेट अधिकृतपणे ‘ग्रेट ब्रिटन’चा एक भाग होता आणि सेंट जॉर्ज शहराचे बांधकाम सुरू करण्यासाठी इंग्लडने तीन लोकांच्या नेतृत्वाखाली एक नवीन गट पाठवला. १६१२ साली या शहराची स्थापना झाली तेव्हा ‘सेंट जॉर्ज’ आणि ‘बर्मुडा’ “नवीन जगातील सर्वांत जुने वास्तव्य असलेले ब्रिटिश शहर” बनले.
आज एक श्रीमंत समुदाय बेटावर राहत असूनही, बर्मुडा अजूनही धोकादायक खडक, वादळ आणि चिमुकल्या पेट्रेलचे घर आहे. विसाव्या शतकात जगातील सर्वाधिक जीडीपी बर्मुडामध्ये होती. बर्मुडाचे सर्वात मोठे उद्योग ऑफशोर इन्शुरन्स, पुनर्विमा आणि पर्यटन हे आहेत. जुलै २०१८ पर्यंत, बर्मुडाची लोकसंख्या ७१ हजार १७६ होती. ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरीमध्ये ही सर्वाधिक लोकसंख्या होती.
संदर्भ: ज्ञानकोश – ब्रिटानिका
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.