आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
शिवसेनेचे संस्थापक म्हणजे एक निडर, बेडर, बिनधास्त, बेधडक थोडक्यात दबंग व्यक्तिमत्त्व होते. याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. भलेही त्यांनी कुठल्याही सत्तेचा स्वीकार केला नाही पण, शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट हे असे पद होते जिथे भल्याभल्या सत्ता कावडीमोल ठरतील.
शिवसेनेसाठी प्रसंगी जीव द्यायला आणि जीव घ्यायला तयार असणाऱ्या शिवसैनिकांची जी फौज त्यांनी निर्माण केली ती न भूतो न भविष्यती अशीच होती. त्यांच्या एका इशाऱ्यावर हे सैनिक कुठलीही कामगिरी फत्ते करण्यास सज्ज होत. परंतु इतक्या निडर आणि बेधडक, दबंग बाळासाहेबांनाही काही गोष्टींची धास्ती होती.
बाळासाहेब ठाकरेंना १९६९ साली तीन महिन्यांसाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. जेव्हा ते तुरुंगातून बाहेर आले तेव्हा ‘हे दिवस पुन्हा कधीच आपल्या वाटेला यायला नको’, अशी त्यांची मानसिकता झाली होती.
अर्थात दिवसेंदिवस शिवसेना वाढत गेली आणि पर्यायाने बाळासाहेबांची ताकदही, त्यामुळे कोणीही त्यांच्या केसालासुद्धा धक्का लावण्याचा प्रयत्न करू शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. एवढा धाक आणि जरब त्यांनी निर्माण केली होती.
१९६० च्या दशकात बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा कदाचित त्यांनीही कल्पना केली नसेल की, आपले ही सांस्कृतिक संघटना एक दिवस महाराष्ट्रातील ताकदवान पक्ष म्हणून उभा राहील. नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख, शिवसेना आणि शिवसैनिक यांचा एक दबदबा निर्माण झाला.
महाराष्ट्रभर त्यांची प्रतिमा एका दबंग नेत्याची असली तरी शिवसेनाप्रमुखांना मनातून दोन गोष्टींची नेहमीच धास्ती होती. शिवसेनेची ताकद वाढत गेली तसतशी त्यांची ही भीती नाहीशी झाली.
मुंबईतील प्रसिद्ध पत्रकार सुजाता आनंद यांनी २०१४मध्ये “हिंदूह्रदयसम्राट – हाउ द सेना चेंज्ड मुंबई फॉरेव्हर” या पुस्तकात ठाकरेंच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून पुढील ५० वर्षांतील शिवसेनेची आणि शिवसेना प्रमुखांची वाटचाल यांचा तपशीलवार आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे यांना ज्या दोन गोष्टींची भीती होती त्याचाही थेट उल्लेख करण्यात आला आहे.
सुरुवातीला शिवसेना वेगवेगळ्या आंदोलनात व्यस्त असे. बऱ्याचदा या आंदोलनांना बंद किंवा हाणामारीचे वळणही मिळत असे. या बंद आणि संपामुळे ट्रेड युनियनशी संबधित लोकांचे आणि शिवसेनेचे कायम वादविवाद होत असत.
या वादावादीतून आपल्यावर कदाचित ह*ल्ला देखील होऊ शकतो अशी भीती बाळासाहेबांना वाटत असे.
त्यांना नेहमी असे वाटे की कम्युनिस्ट लोक त्यांच्या ह*त्येचा कट रचताहेत. त्यांच्या जीवाला यामुळे धोका आहे. सततच्या बंद आणि संप पुकाराण्याने ट्रेड युनियनवाल्यांशी त्यांचे बऱ्याचदा खटके उडाले होते. या युनियनच्या नेत्यांनाही ठाकरेंची भीती होती. त्यांना वाटे ठाकरे त्यांचे नुकसान करत आहेत.
दुसरी भीती होती, ती म्हणजे जेलमध्ये जाण्याची. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती. १९६९ साली त्यांना जो तुरुंगवास भोगावा लागला त्याचाच हा परिणाम असावा.
यावेळी तीन महिने ते तुरुंगात होते आणि तुरुंगातून सुटल्यानंतर ही वेळ पुन्हा कधीही आपल्यावर येता कामा नये अशीच त्यांची इच्छा होती. त्यामुळे जेल होण्याच्या कल्पनेलाही ते घाबरत होते.
१९६९ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत आले होते. त्यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी ह*ल्ला केला होता. बरीच तोडफोड केली होती. याच कारणाने बाळासाहेबांना अटक करण्यात आली. कोर्टात सुनावणी झाली आणि त्यांना तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
यानंतर त्यांना सतत जेलमध्ये जाण्याची भीती लागून राहिली. यांनतर हळूहळू शिवसेनेची ताकद वाढत गेली आणि बाळासाहेबांची प्रतिमा बदलत गेली. मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत गेली तसे कुठल्याच सरकारने त्यांना अटक करण्याचे धाडस दाखवले नाही.
कारण शिवसैनिकांचे एक अभेद्य कवच त्यांच्या भोवती तयार झाले होते. बाळासाहेबांना धक्का म्हणजे या शिवसैनिकांच्या आत्मसन्मानाला धक्का असे समीकरण होते. हे शिवसैनिक कधीही कुठेही तोडफोड, जाळपोळ करून राडा करायला तयार असत.
त्यांचा मातोश्री बंगला म्हणजे महाराष्ट्रातील एक समांतर सत्ता केंद्र होते. राजकारणातील बड्या बड्या नेत्यांपासून ते सिने जगतातील स्टार मंडळींपर्यंत अनेक लोक बाळासाहेबांच्या बंगल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जमत असत.
१९८९ साली सामना या शिवसेनेच्या मुखपत्राची सुरुवात झाली. यातील संपादकीय लेख स्वतः बाळासाहेब लिहित असत. यातील लेख भडकावू आणि चिथावणीखोर भाषेने भारलेले असत. या लेखांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बाळासाहेबांची लेखणी प्रत्येक घटनेवर तुटून पडत असे.
एकेकाळी त्यांचा डावा हात असलेल्या छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा चंगच बांधला होता. मुंबईच्या एका भागात भाजी विकणारे छगन भुजबळ शिवसैनिक बनले आणि त्यांचा कायापालटच झाला. परंतु त्यांना डावलून मनोहर जोशींना जेंव्हा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले, तेव्हा छगन भुजबळ यांचा रागाने तीळपापड झाला होता.
१९८९ साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि ते कॉंग्रेसमध्ये गेले. त्यांना काहीही करून बाळासाहेबांवर सूड उगवायचा होता. २००० साली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले तेव्हा ते ९२-९३ च्या दंगलींसाठी सामनातील भडकावू अग्रलेख जबाबदार असल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचे आदेश दिले. परंतु न्यायालयाने लगेचच बाळासाहेबांना अटकपूर्व जमीन मंजूर केला आणि भुजबळांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले.
बाळासाहेबांची जनमानसांत एक बेडर, बेधडक, बेदरकार, दुस्साहसी नेता अशी प्रतिमा दृढ झाली होती. ते स्वतः आतून कितीही घाबरलेले असले तरी त्यांचे राजकारणही दह*शत आणि भीतीच्या आधारावरच निर्माण झाले होते.
त्यांच्यामुळे महाराष्ट्रात चैतन्याचे वारे वाहू लागले, मराठी माणसातील स्वाभिमानी आणि लढाऊ बाणा जागा झाला, सामान्य मराठी माणसाला त्यांचा हात पाठीवर असला तरी हत्तीचे बळ आल्याचा भास होत होता.
आज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीत मराठी माणसांची टक्केवारी वाढते आहे, यामागे त्यांच्या अस्मिता जागृतीच्या राजकारणाचा मोठा हात आहे. आज राम जन्मभूमी मंदिर देखील उभे राहिले, ज्यासाठी बाळासाहेबांनी फक्त प्रयत्नच केले नाहीत तर घडणाऱ्या घटनांची बेदरकारपणे जबाबदारी देखील घेतली. मुंबईचा कायापालट करण्यात तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









