या क्रांतीकारकाने स्वदेशीच्या आग्रहासाठी स्वतःचं बलिदान दिलंय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गांधीनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने स्वदेशी चळवळीचा पुरस्कार करत असताना वयाच्या २२ व्या वर्षी तो देशासाठी शहीद झाला. त्याच्या बलिदानाचे स्मरण राहावे म्हणून मुंबई, पुणे आणि दिल्ली या देशातील महत्वाच्या शहरात त्याचे स्मारक उभारले असले तरी, बाबू गेनूचे स्वातंत्र्य चळवळीतील नेमके योगदान काय असे विचारल्यास आजच्या पिढीला ते सांगता येणार नाही.

ऐन तारुण्यात जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीर योद्ध्याचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे.

१९३० मध्ये महात्मा गांधींनी सत्याग्रह सुरु केला आणि संपूर्ण भारतातील लोक गांधींच्या हाकेला प्रतिसाद देत देशातील अबाल-वृद्धांनी या सत्याग्रहात उडी घेतली. बाबू गेनूदेखील इतर सत्याग्रहींसोबत अनेक आंदोलनात सहभागी झाले. बाबू गेनू अशिक्षित होते, ते गिरणी कामगार होते. पण गांधींच्या स्वदेशीच्या नाऱ्याने बाबू गेनू भारावून गेले.

बाबू गेनू फक्त २२ वर्षांचे होते तेंव्हा अमानुषपणे ट्रकखाली चिरडून त्यांची हत्या करण्यात आली.

बाबू गेनू यांचा जन्म १९०८ मध्ये पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे, पडवळ येथे झाला. त्यांचे वडील गरीब शेतकरी होते. पण, बाबू दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर शेतीच्या कामासाठी एकमेव आधार असलेला बैलदेखील मृत्यू पावला. घराचा बैलच दगावल्याने शेती करणे अवघड झाले. बाबूच्या आईने कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाईलाजाने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. बाबू आणि त्याच्या मोठ्या भावा-बहिणींना शेजाऱ्यांच्या भरवश्यावर सोपवून तिने मुंबईचा रस्ता धरला. मुंबईत जाऊन ती घरकाम करू लागली. थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर तिने मुलांनाही मुंबईत बोलावून घेतले.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बाबूला शाळेत जाणे शक्य नव्हते. थोडा मोठा झाल्यावर तो गिरणीत कामावर जाऊ लागला. शिक्षण कमी असल्यामुळे बाबूला चांगले काम मिळत नसे. पण, काम नाही म्हणून तो उगाच हतबल होऊन बसत नसे. फावल्या वेळात तो स्थानिक राजकारणात रस घेऊ लागला. लाल लजपतराय, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यासारख्या क्रांतिकारकांच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्यावर पगडा होता. तरीही महात्मा गांधींच्या विचारांनी बाबू गेनूवर जास्त प्रभाव टाकला.

गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या कल्पनांनी बबाबुला पछाडले होते. परंतु, ब्रिटीश राज उलथवून टाकण्यासाठी स्वदेशीचा पुरस्कार करणे अत्यावश्यक असल्याचा विचाराने बाबू गेनू भारावून गेले. भारतात पसरलेली ब्रिटीशांची राजवट उलथवून टाकायची असेल तर त्यांची आर्थिक कोंडी केली पाहिजे हा विचार त्यांना पुरेपूर पटला होता. म्हणूनच ते स्वदेशीच्या लढ्यात स्वयंस्फुर्तीने उतरले. परदेशी मालाचा बहिष्कार करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी उभारलेल्या आंदोलनात ते स्वतःहून सहभाग घेऊ लागले.

स्वदेशी चळवळीचा पुरस्कार करत असतानाच त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्याच्या बलिदानाने ब्रिटीश साम्राज्यावरील सामान्य भारतीयांचा रोष अधिकच वाढू लागला. एकप्रकारे आपल्या बलिदानातून त्यांनी हजारो स्वातंत्र्य सैनिकांना स्वदेशी चळवळीसाठी प्रेरित केले.

आर्थिक सुबत्ता हीच भारतातील त्यांच्या सत्तेचे मूळ आहे हे बाबू गेनू यांनी ओळखले होते. भारतातून इंग्लंडला जाणारा संपत्तीचा ओघ आटल्यास ब्रिटीशांची भारतातील सत्ता खिळखिळी होऊन जाईल, हे त्यांनी ओळखले. ब्रिटीश राजवटीचे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गुंतागुंत त्यांनी पुरती ओळखली होती. म्हणूनच ब्रिटिशांना तीव्र विरोध दर्शवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वदेशी चळवळीचा प्रसार करणे होय, असे त्यांचे मत होते.

ब्रिटीश राजवटीचे हे सर्व पैलू लक्षात घेत त्यांनी १२ डिसेंबर १९३० रोजी आपल्या काही सहकाऱ्यांसह परदेशी कपड्याने भरलेल्या एका ट्रकला अडवून धरण्याचा बेत आखला. मुंबईच्या कालबादेवी भागात परदेशी कपड्यानी भरलेला हा ट्रक येणार होता.
जॉर्ज फ्रेझर हा व्यापारी परदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक घेऊन कालबादेवी परिसरात आला. पण, त्याला आणि त्याच्या मालाला संपूर्ण पोलिस सुरक्षा देण्यात आली होती.

रस्त्यावर आडवे पडून बाबू गेनू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ट्रकचा रस्ता अडवून धरला होता. त्यांनी ट्रक पुढे जाऊ देणार नाही, असा हट्टच धरला होता. दुपारपर्यंत पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, आंदोलक ऐकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अमानुषपणे बाबू गेनू यांना ट्रकखाली चिरडत ट्रक पुढे रेटला, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसमधून देण्यात आली होती.

या घटनेची इत्थंभूत माहिती सर्वच वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाली होती. बाबू गेनू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मन वळवण्याचा पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला. पण, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. ट्रक ड्रायव्हर बलबीर सिंग हादेखील भारतीय होता. पोलिसांनी आंदोलकांच्या अंगावरून ट्रक पुढे नेण्याचा आदेश दिला. पण, बलबीर सिंग म्हणाला, की मी एक भारतीय आहे, माझ्या भारतीय बांधवांची हत्या करण्याचे पाप मी करणार नाही. त्याचे हे उत्तर ऐकून पोलीस अधिकारी प्रचंड संतापला. त्याने बलबीर सिंगला ट्रक मधून ओढून बाहेर काढले आणि ट्रक स्वतःच्या ताब्यात घेतला.

ट्रक पुढे जाऊ देणार नाही, या ठाम निर्धाराने बाबू गेनू पुन्हा जाऊन रस्त्यावर आडवे झाले. पण, संतप्त पोलीस अधिकाऱ्याने जराही विचार न करता बेदरकारपणे बाबू गेनू यांच्या अंगावरून भरधाव वेगाने ट्रक चालवला. बाबू गेनू यांचा देह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

दवाखान्यात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. बाबू गेनू यांच्या मृत्युच्या बातमीने संपूर्ण मुंबई शहरात संतापाची लाट उसळली. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हा मृत्यू म्हणजे हत्या नसून अपघात असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. पण संताप अनावर झालेल्या जनतेला ब्रिटिशांची कोणतीच कारणे ऐकून घ्यायची नव्हती. शहरभर ब्रिटिशांविरोधात निदर्शने आणि आंदोलने सुरु झाली. ब्रिटिशांच्या या क्रौर्याचा सर्व स्तरातून निषेध होऊ लागला.

भारतीय जनतेच्या ब्रिटीश विरोधी भावनेला अधिकच खतपाणी मिळाले. बाबू यांच्या बलिदानाने स्वदेशी चळवळ आणखीन तीव्र झाली. आपल्या बलिदानातून त्यांनी हजारो भारतीयांना ब्रिटिशांविरोधात लढण्याची एक प्रबळ प्रेरणा दिली होती.

ब्रिटीशांचा आर्थिक साम्राज्यवाद स्थानिक अर्थव्यवस्थेला खिळखिळा करत असल्याचे बाबू गेनू यांनी अचूक हेरले होते. त्यांनी ब्रिटीशांची आर्थिक कोंडी करण्यानेच देशाची आर्थिक स्थिती सुधारेल हे लक्षात घेऊन ते आर्थिक साम्राज्यवादाच्या विरोधात उभे राहिले. त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदाण द्यायलासुद्धा मागेपुढे बघितलं नाही. त्यांचे हे बलिदान कुठलाच भारतीय विसरू शकणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!