कॉंग्रेसच्या या नेत्याला खुद्द गांधीजींनी ‘भारतीय राष्ट्रवादाचा लेखक’ म्हटलं होतं…

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


तो नवसारी गावात जन्मलेला अभ्यासात अतीशय हुशार पारसी पोरगा होता पण त्याला जर लंडनला पाठवलं तर तो गोऱ्या पोरींच्या नादी लागून ख्रिश्चन होईल म्हणून त्याच्या प्रायोजकाने त्याला मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात पाठवलं. नंतर त्याच कॉलेजात पुढे तो पहिला भारतीय प्रोफेसर बनला. पुढे लंडनला व्यवसायासाठी गेला. तिथे दुकान थाटून बसलेला हा बहुतेक पहिला भारतीय माणूस असावा. नंतर धंद्यात चलाखी अन् बेइमानी न जमल्याने त्याचं त्याच्या भागीदारासोबत वाजलं.

पुढे दुसरा व्यवसाय टाकला तो इमानदारीने केला आणि चाललासुद्धा. पण समाजसेवेचा किडा अंगात असल्याने प्रत्येक लंडनला येणाऱ्या भारतीयांना ICS परिक्षेच्या खर्चात तसेच शिक्षणात केलेल्या मदतीमुळे तब्बल २० हजार शिलिंग कर्ज उरावर घेऊन त्याचा हाही उद्योग डूबला.

पुढे समाजसेवेनंतर राजकारणाच्या नादी लागून १८८६ ला फिन्सबरी मतदारसंघातून हाऊस ऑफ कॉमन्सची निवडणूक लढायला हा उभा राहिला. पण भारतीय लोकांच्या व्यथा प्रचारात मांडता मांडता त्याला कळलंच नाही की आपण निवडणूक इंग्लंडमध्ये लढतोय. तिथल्या कामगार वर्गाला हा माणूस ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात आहे असे वाटल्याने फ्लॉरेन्स नाईटेंगलचा पाठिंबा असूनही याचा दारुण पराभव झाला. पण याच दरम्यान ब्रिटनचा पंतप्रधान साल्सबरी याने “भलेही ब्रिटिश लोक कितीही प्रगत असले तरी ते काळया माणसाला त्यांचा प्रतिनिधी म्हणून स्वीकारायला अजूनही तयार नाहीत असं मला वाटतं”
अशी टिका याच्यावर केली.

यानंतर याच्याबद्दल तिथल्या लोकांचं कुतूहल अजून वाढलं. तिथे पेपरबाजी झाली.

पुढे १८९२ च्या निवडणूकीत त्याने ‘मी माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कैकपटीने गोरा असून इथल्या कामगार वर्गासाठी काम करायलाच इथे आलो आहे’ असं म्हणत याने प्रचाराची राळ उडवून दिली. थट्टा म्हणून तो हाताच्या बाह्या मागे सारून सभेतच लोकांना त्याच्या त्वचेचा रंग दाखवत असे. त्या निवडणूकीत तो फक्त ३ मतांनी जिंकला. त्याच्या जिंकण्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराने आक्षेप घेतला. परत मतमोजणीत त्याची २ मते वाढून तो ५ मतांनी विजयी झाला.

त्या काळात तिथल्या हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहाचा पहिला आशियाई सदस्य बनणारा तो युवक होता दादाभाई नौरोजी. पुढं तिथली लोक त्याला मिश्किलपणे ‘दादाभाई नॅरो मेजाॅरीटी’ म्हणून ओळखायला लागली.

पण त्याला याचा राग नव्हता. कारण त्याच्यानंतर पुढे अजून दोन भारतीय ब्रिटनमध्ये त्या सभागृहात निवडून आली. एल्फिन्स्टन कॉलेजात त्याला जेव्हा त्याचे सहकारी ‘प्रॉमिस ऑफ इंडिया’ किंवा ‘होप ऑफ इंडिया’ म्हणून डिवचायचे तेव्हा त्यांना सुद्धा वाटले नसेल की हा माणूस असं काही अचाट करेल.

ब्रिटिश लोकांना भारतीयांच्या मागण्या कळाव्यात आणि तिथे जनमत संघटित करून तिथल्या सरकारवर दबाव आणण्यासाठी नौरोजींनी लंडनला ईस्ट इंडिया असोशिएशन स्थापन केली. तिथल्या संसदेत ब्रिटनच्या स्त्रियांना समान अधिकार आणि भारतीयांना स्वराज्य (ऑस्ट्रेलिया अन् कॅनडा टाईप स्वशासन) या अधिकारांसाठी नौरोजी शेवटपर्यंत लढले. अर्थात त्यांचा हा लढा अपयशी होता पण त्या काळात जिंकण्यापेक्षा लढण्याला जास्त महत्त्व होतं.

उदारमतवादी विचारांचा हा माणूस एकाचवेळी अनेक लढाया लढत होता. ‘रास्त गोफ्तार’ हे वृत्तपत्र चालवून पारसी समाजातील पडदा पद्धत, स्त्रियांचे अधिकार तसेच त्यांच्या धर्मातील नियम बदलून त्याला अजून आधुनिक बनवण्याचे काम नौरोजी करत होते. ‘राहे रहनुमाई मजदायिनी सभा’ त्यांनी याच कामासाठी काढली. त्यांच्या प्रयत्नामुळे पारसी धर्माचे लोक आज सगळ्यात कौशल्यपूर्ण अन् सुधारीत आहेत.

त्याचवेळी ते काँग्रेसचे संस्थापक व सक्रिय सदस्य होते व तीनवेळा अध्यक्षही बनले. १९०६ च्या कलकत्ता अधिवेशनात (टिळक गटाच्या) ‘पूर्ण स्वराज’च्या मागणीला पाठिंबा देवून काँग्रेसचे ते अधिकृत ध्येय बनवले अन् काँग्रेसमध्ये फूट पडण्यापासून तिला वाचवले. अर्थात १९०७ ला काँग्रेस फुटलीच.

पण त्यांच्याबद्दल असलेला आदर अन् त्यांचा असलेला अनुभव यामुळे सगळे त्यांना “ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया” किंवा “भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह” म्हणत. त्या काळात एकही असा भारतीय राजकारणी नव्हता जो त्यांच्या हाताखाली सेक्रेटरी किंवा त्यांच्या संपर्कात नव्हता.

जीना सुरुवातीच्या काळात नौरोजींचे सेक्रेटरी होते. गांधींनीही लंडनला जाताना दादाभाईंसोबत पत्रव्यवहार केलेला होता. त्यांनी हिंद स्वराजमध्ये दादाभाईंना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले होते.

दादाभाई आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत ते त्यांच्या आर्थिक निःसारणाचा सिद्धांत (ड्रेन थेअरी) मांडला. सोप्या भाषेत हा सिद्धांत म्हणजे “ब्रिटिश हे असे ढग आहेत जे पाणी इथे शोषतात अन् पाऊस इंग्लंडला पाडतात.” त्यांच्या या आर्थिक टिकेचा आधार घेवून पुढे स्वदेशी अन् परदेशी मालावर बहिष्कार अशी आंदोलने भारतात उभारण्यात आली. ‘Poverty and UnBritish Rule in India’ हे पुस्तक आजवर ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाची पिसे काढणारे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे.

“अनब्रिटिश” म्हणजे ब्रिटिशांची भारतातली राजकीय सत्ता ही त्यांच्या स्वतःच्या देशातील राजकीय सत्तेपेक्षा वेगळी म्हणजेच अन्यायी, क्रूर अन् निरंकुश आहे हे पटवून दिलं. त्यांनी १८६७ साली पहिल्यांदा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजले. तसेच भारतीयांचे दरडोई उत्पन्न हे २० रुपये असून ते जेलमधील कैद्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आहे हेही पहिल्यांदा ठासून सांगितले.

त्यांच्याबद्दल बोलताना टिळक एकदा म्हटले की “जर २८ कोटी भारतीयांना त्यांचा एकच प्रतिनिधी ब्रिटिश संसदेत पाठवायचा असेल तर ते निसंदेहपणे दादाभाई नौरोजींना पाठवतील.” पण त्यांचा ब्रिटिशांच्या न्यायवादी भूमिकेवर असलेला विश्वास अन् प्रत्येक वेळी ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज देण्यात यावे अशी त्यांनी केलेली मागणी टिळकांना रुचली नाही. त्यावर टिळकांनी त्यांना “उरली सुरली शेवटची वर्षे दादाभाईंनी भारतात घालवली तर ते वेगळ्या निष्कर्षावर पोचतील” असा टोमणा मारला.

श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्यांच्या ‘द सोशालिस्ट’मधून नौरोजींच्या दुटप्पीपणाबद्दल म्हणजेच एका बाजूला ब्रिटिशांवर टिका तर दुसऱ्या बाजूस त्यांच्या न्यायवादी भूमिकेचं समर्थन केल्याने त्यांना भारतीय राजकारणातील “एक दुःखद अपयश” असे संबोधले. पण गांधींनी मात्र नौरोजींना ‘भारतीय राष्ट्रवादाचे लेखक’ म्हणत “ते नसते तर आमच्या युवकांना होमरूल हा शब्द सुद्धा माहित नसता” असे उद्गार काढले.

इतक्या टिका होवून दादाभाई नौरोजी स्वतःच्या ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज या मागणीवर का ठाम होते?

यावर ते बोलले, “माझ्या सुरुवातीच्या सगळ्या प्रयत्नांत मी अपयशी ठरलो. ब्रिटिशांच्या न्याय्य भूमिकेवर विश्वास ठेवत ठेवत मी म्हातारा झालो पण माझ्या हाती अपयशाशिवाय दुसरं काहीच आलं नाही. अपयशांनी मी इतका खचलोय की आता बंड करण्याची हिंमत माझ्यात नाही.”

त्यांच्या जागी कुठलाही ब्रिटिश साम्राज्यात सुमारे ९२ वर्षे वाढलेला माणूस असता तर हेच बोलला असता. गांधींची स्वातंत्र्य लढ्यातील उडी ही पहिल्या महायुद्धात अडकलेल्या आणि थोड्याशा कमकुवत ब्रिटिशांशी होती तर नौरोजींच्या काळात ब्रिटिश सत्ता ही बलाढ्य अन् वाढतच जात होती.

आयुष्यात एकच तोही निसटता विजय तरीही राजकारणाची सुमारे ५० वर्षे हा माणूस एकच मागणी लावून धरत होता ते म्हणजे स्वशासन. त्यांनी हे करताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक संघटना म्हणजे काँग्रेस अन् शेकडो नेते दिले. आजही अशी मवाळ माणसं आपल्या आजूबाजूला असून खूप काही मोठं घडवून मागे ठेवून जातात अन् आपण मात्र कायम ‘वाजणारे चिमटे ‘ बघत बसतो.

आपण लोकांना त्यांच्या यशावरून मोजत बसतो अन् कुणीतरी अपयशी तोपर्यंत इतरांच्या पुढच्या यशाची हमी काळाच्या हवाली करून शांतीत दिगंताला जातो. आपण एकीकडे जहाल, शुर, तिखट, आकर्षक अशा सगळ्या माणसांकडे ओढले जात असतो. त्यांना आपण विद्रोही म्हणतो. पण दुसरीकडे मऊ, मृदू, गोड अन् रुक्ष पण तरीही प्रवाही माणसांना दूर ढकलतो. आपण झगमगाटाचे वारस बनू इच्छितो पण अंधारातील दिव्यांची कधीच दखल घेत नाही.

कधी कधी प्रतिभावान माणूस अपयशाच्या फेऱ्यात अडकतो. याने प्रतिभेला न्याय दिला नाही असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा त्याने मागे सोडलेला यशस्वी इतिहास ते कधीच धुंडाळून बघत नाहीत. गांधीपूर्व काळातील सर्वात मोठ्या तीन नेत्यांत समाविष्ट असूनही नौरोजी ना कधी वाचले जातात, ना कधी चर्चिले जातात. ते शिकवले जातात तेही फक्त स्पर्धा परीक्षेपूरते!


या माध्यमावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकाची असतात, संपादक मंडळ त्याच्याशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!