आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय सणांच्या दिवशी फक्त देशभक्तीपर गीते वाजवली जातात. इतर वेळी या गीतांचा काहीसा विसर पडतो. मेरे देश की धरती, ये देश है वीर जवानोंका, ये वतन मेरे वतन आबाद रहे तू, अशी कित्तीतरी गाणी या दिवशी कानावर पडतात. सकाळी प्रार्थनेच्या वेळी ‘सारे जहांसे अच्छा’सारखी गीते आपण शाळेतही म्हणायचो.
परंतु, “ए मेरे वतन के लोगो” हे लतादीदींच्या आवाजातील गाणे ऐकले की अक्षरश: हृदयाला पीळ पडतो. या गाण्याचे पछाडून टाकणारे शब्द आणि लतादीदींच्या आवाजातील दर्द याने हे गाणे थेट हृदयाला जाऊन भिडते.
परंतु या गीताचे गीतकार नेमके कोण याची माहिती फारच थोड्या लोकांना असेल. १९६२ साली भारत-चीन यु*द्धानंतर, या यु*द्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी म्हणून कवी प्रदीप यांनी हे गीत लिहिले.
या यु*द्धात देशाचा पराभव झाला. या गीतातून शहीद झालेल्या जवानांप्रती समानुभूती बाळगत देशातील लोकांनी आपल्या जवानांशी आणि देशाशी एकनिष्ठ राहण्याचे आर्जव या गीतातून केले आहे.
देशाच्या सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांमुळेच आपण देशात निर्धास्तपणे राहू शकतो, हे सांगताना कवीने वापरलेले शब्द काळजाला अक्षरशः पीळ पडतात. जवानांच्या त्यागाचे वर्णन करताना त्यांच्या अतुलनीय शौर्यापुढे नतमस्तक होण्यास भाग पडतात.
या यु*द्धाच्या पराभवाने संवेदनशील मनाचे कवी प्रदीप अत्यंत निराश झाले. परमवीर चक्र प्राप्त मेजर शैतान सिंग भाटी यांचे बलिदान पाहून कवी प्रदीप यांचे मन हेलावून गेले. त्यांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे कवी प्रदीप यांना हे गीत सुचले.
असं म्हणतात की कवी प्रदीप माहीमच्या किनाऱ्यावर फिरत होते. तेव्हाच अचानक त्यांना या गीताच्या ओळी सुचल्या. शेजारून चाललेल्या एका अनोळखी व्यक्तीला त्यांनी पेन मागितला आणि खिशातील सिगारेटच्या पाकिटाच्या चिटोऱ्यावर त्यांनी हे शब्द उतरून काढले.
हे गीत लिहून काढण्यापासून ते या गीताचे बोल संगीतबद्ध होऊन ते प्रदर्शित होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रदीपजींनी खूप महत्त्वाची भुमिका निभावली आहे.
एका आठवड्यानंतर निर्माते मेहबूब खान प्रदीपजींना भेटायला आले. त्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर निधी उभारण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी त्यांना एक नवे कोरे गीत हवे होते. मेहबूब खान यांचा हा प्रस्ताव प्रदीपजींनी तात्काळ मान्य केला. पण, गीताबद्दल जास्त काही माहिती देण्यास त्यांनी त्यावेळी नकार दर्शवला.
या गाण्याचे बोल संगीतबद्ध करण्यासाठी त्यांनी सी. रामचंद्र यांना विनंती केली. हे गाणे दुसरे तिसरे कुणी नाही तर, लताजीनींच गायिले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.
परंतु, सी. रामचंद्र आणि लताजी यांचे काही तरी बिनसले आणि लताजींनी गायला नकार दिला. मग सी. रामचंद्र यांनी त्यांच्याऐवजी आशा भोसले हे गाणे गातील असा तोडगा काढला. प्रदीपजी मात्र लताजींच्या नावावरच अडून राहिले. त्यांनी स्वतः जाऊन लताजींचे जे काही गैरसमज झाले ते दूर केले. तरीही लताजी ऐकायला तयार नव्हत्या. तेव्हा प्रदीपजींनी त्यांना स्वतःहून गाणे ऐकवले.
गाण्याचे बोल ऐकूण लताजी हेलावून गेल्या आणि त्यांनी हे गाणे एकाच अटीवर गाण्याची तयारी दाखवली. गाण्याच्या प्रत्येक रेकॉर्डिंगच्या वेळी स्वतः प्रदीपजी स्टुडीओत हजर असले पाहिजेत, अशी त्यांची अट होती. प्रदीपजींनी ही अट मान्य केली.
नवी दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर १९६३च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लताजींनी हे गाणे पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या सादर केले. या कार्यक्रमासाठी स्वतः पंतप्रधान नेहरू देखील हजर होते.
हे आर्त आणि हृदय पिळवटून गाणे ऐकून नेहरूंच्या डोळ्यात देखील पाणी आले. या कार्यक्रमाला प्रदीपजींना आमंत्रण नव्हते त्यामुळे नेहरूंची भारावलेली प्रतिक्रिया ते प्रत्यक्ष बघू शकले नाहीत.
या गीताचे शब्द त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना इतक्या सच्च्या आहेत की, ऐकणाऱ्याचे डोळे आपसूकच भरतील.
आज कित्येक वर्षे आपण हे गाणे ऐकत आहोत पण प्रत्येकवेळी या गाण्याचे बोल आपल्याला भावनिक करून सोडतात. त्याला लताजींच्या आवाजाची जी सुमधूर जोड दिली आहे, त्यामुळे तर हे गाणे अजरामर झाले आहे. कितीही वेळा एकले तरी ऐकत राहावे असेच वाटते.
प्रदीपजींना गाणी लिहिण्याचे जणू वेडच होते. आयुष्यातील पाच दशके त्यांनी आपल्या या वेडाला दिली. आज त्यांच्या नावावर १,७०० पेक्षा जास्त गाणी लिहिल्याची नोंद आहे. परंतु “ए मेरे वतन के लोगो” या गाण्याने त्यांना गीतलेखकांच्या यादीत अत्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवले.
ए मेरे वतन के लोगो हे आजवर देशातील सर्वात जास्त गाजलेले देशभक्तीपर गीत आहे. त्यांच्या या सृजनशील कामाची आणि देशाप्रतीच्या अत्युच्च भावना शब्दबद्ध करण्याच्या कलेची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय कवी म्हणून सन्मानित करण्यात आले.
मुंबईच्या एका शाळेच्या कार्यक्रमासाठी नेहरुंना निमंत्रण होते. याच कार्यक्रमासाठी प्रदीपजींना देखील निमंत्रण होते. नेहरूंच्या उपस्थितीत प्रदिपीजींनी स्वतः हे गाणे सादर केले. यावेळी त्यांना नेहरूंची प्रतिक्रिया जवळून जाणून घेता आली. इतकी आर्त भावना इतक्या नेमक्या शब्दात व्यक्त केल्याबद्दल नेहरूंनी त्यांचे अभिनंदन केले. या गाण्याची लिखित प्रत देखील यावेळी प्रदीपजींनी नेहरूंकडे सोपवली.
आज प्रदीपजी हयात नसले तरी त्यांचा हा वारसा आपल्यासोबत कायम आहे. वीर सैनिकांच्या त्यागाला बलिदानाला, शौर्याला अभिवादन करणारी ही कलाकृती कायम अमर राहील. भारतीयांच्या मनात या गीताला एक वेगळेच स्थान आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.