आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती भारतरत्न अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य देशहितासाठीच व्यतीत झाले. २००२ साली राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नाव पुढे आले तेंव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षासह सर्वांनीच त्यांना पाठींबा दिला. मिसाईल मॅन, देशाचे मार्गदर्शक, महान वैज्ञानिक, महान तत्त्ववेत्ते, सच्चे देशभक्त याही पुढे जाऊन ते एक चांगले व्यक्ती होते.
देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचून देखील जमिनीशी जोडलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. म्हणूनच त्यांना जनतेचे राष्ट्रपती अशी ओळख मिळाली. बाल, युवा आणि प्रौढ अशा सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना होती.
देशातील प्रत्येक मुलासाठी आणि तरुणासाठी ते एक आदर्श व्यक्तिमत्व होते. आज भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील प्रत्येक शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, इंजिनियर आणि टेक्निशियन डॉ, कलाम यांनाच आदर्श मानून वाटचाल करतात. डॉ. कलाम यांच्या पायवाटेने चालल्यामुळेच ते चंद्रयान-२ सारखा उपक्रम यशस्वी करू शकले. डॉ. कलाम यांचे जीवन आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
डॉ. कलामांनी आपले आयुष्य विज्ञान आणि संशोधनालाच वाहिले होते. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख अंतराळ संशोधन संस्थाच्या यादीत आज इस्रोला स्थान मिळाले आहे, यामागे डॉ कलाम यांचे अभूतपूर्व योगदानच कारणीभूत आहे.
आज इस्रो अनेक नवनवीन अंतराळ संशोधन उप्रकम हाती घेत आहे, इस्रोला ही सक्षमता मिळवून देण्यात डॉ कलाम यांनी घेतलेले कष्टच कारणीभूत ठरले आहेत.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडू येथील रामेश्वरम् जिल्ह्यातील धनुषकोडी या गावात झाला.
मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबातून आलेल्या कलाम यांनी आपल्या कार्यातून इतकी मोठी प्रेरणा उभी केली आहे की, संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
अब्दुल कलाम यांचे वडील जैनुलब्दीन फार शिकलेले नव्हते, घरची आर्थिक परिस्थितीही फार काही चांगली नव्हती. अब्दुल कलाम यांच्या आईचे नाव अशिअम्मा जैनुलब्दीन होते. त्यांची आई एक सर्वसामान्य गृहिणी होती. परंतु, त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे आणि कठीण काळातही कठोर परिश्रम करण्याची क्षमता निर्माण केल्यामुळेच डॉ. कलामांना हे यश मिळवणे शक्य झाले.
डॉ कलामांच्या विचारांवर त्यांच्या आई-वडिलांचा खूप मोठा प्रभाव होता. चिकाटी, सातत्य आणि कष्ट करण्याची तयारी हे गुण त्यांनी त्यांच्या माता-पित्यांकडूनच घेतले. ज्यामुळे त्यांना आयुष्यात एक वेगळी उंची गाठता आली. ते नेहमी म्हणायचे की, आईने मला चांगलं आणि वाईट यातील फरक ओळखायला शिकवलं आहे. ते आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईलाच द्यायचे. माझ्या आयुष्यात आई नसती तर कदाचित मी इतका यशस्वी झालोच नसतो असे ते नेहमी सांगायचे.
१९५८ साली डॉ. कलाम मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अंतराळ विज्ञानातील पदवी घेतली. त्यानंतर कलाम हॉवरक्राफ्ट उपक्रमावर काम करण्यासाठी भारतीय सरंक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर १९६२ साली डॉ. कलाम इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत आले. इथे आपल्या कठोर परिश्रम आणि अत्युच्च कल्पना करण्याची क्षमता, आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द आणि त्याप्रती असलेली निष्ठा या गुणांच्या जोरावर त्यांनी कित्येक उपग्रहांच्या प्रक्षेपणात महत्वाची भूमिका बजावली.
अग्नी क्षेपणास्त्र आणि पृथ्वी क्षेपणास्त्र अवकाशात पाठवण्यात भारताला यश मिळाले. या यशाचे श्रेय डॉ. कलामांनाच दिले पाहिजे.
भारताने १९८० साली एसएलवी-३ हा पहिला स्वदेशी उपग्रह अवकाशात पाठवला. या उपक्रमात डॉ. कलाम प्रकल्प संचालक म्हणून जबाबदारी पहिली. पुढील कित्येक वर्षे ते इस्रो मध्ये प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत राहिले. या काळात त्यांनी इस्रोच्या अवकाश संशोधन आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंची नेऊन ठेवले.
देशाचे पहिले रॉकेट लॉंच करताना डॉ. कलाम ते रॉकेट स्वतः सायकलवरून प्रक्षेपणस्थळी घेऊन गेले.
या मिशनमधील दुसरे रॉकेट देखील इतके वजनदार होते की, ते बैलगाडीतून प्रक्षेपण स्थळी नेण्यात आले. डॉ. कलाम आणि इस्रोच्या इतर शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमामुळेच भारताला आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचा सदस्य म्हणून मान्यता मिळाली.
डॉ. कलाम यांनी इस्रोमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला. त्याच तंत्रज्ञानाच्या जोरावर आज इस्रो आणखीन नवनवे उपक्रम राबवण्याचे काम करत आहे. इस्रोच्या या क्षमतेत वाढ झाल्यानेच आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थांच्या यादीत आज इस्रोचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते. आजही इस्रो चांगल्या चांगल्या अवकाश संशोधन योजनांना यशस्वी रूप देत आहे.
२००२ साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनवण्याचा प्रस्ताव स्वतः सोनिया गांधींसमोर मांडला तेंव्हा त्यांनीही आपली पूर्ण सहमती दर्शवली. सर्वच पक्षांनी एकमताने त्यांच्या राष्ट्रपती पदासाठी सहमती दर्शवली. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ देखील तितकाच चांगला होता.
राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर ते देशातील विविध संशोधन संस्थांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून जात होते. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी शिक्षकाची भूमिका निभावली.
२७ जुलै, २०१५ रोजी शिलॉंगच्या आयआयटीमध्ये व्याख्यान देत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले गंभीर अवस्थेतच होते. हॉस्पिटलच्या आयसीयु विभागात दाखल केल्यानंतर दोन तासांनी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू घोषित केले.
कलामांच्या संपूर्ण जीवनावर एक नजर टाकल्यास डॉ. कलाम खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते, हे मान्य करावेच लागेल. त्यांच्या सफल आयुष्याचे हेच रहस्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.