The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भटकंती – पुण्याजवळच्या या मंदिरातल्या भिंतींवर रामायण, महाभारत कोरलंय

by द पोस्टमन टीम
12 May 2025
in भटकंती, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लेखक – सागर बोरकर


पुण्यापासून जवळच असणाऱ्या प्रसिद्ध भुलेश्वर मंदिरातील काही पौराणिक शिल्पपट उलगडून दाखवण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

भुलेश्वर मंदिरात रामायण आणि महाभारताचे प्रत्येकी तीन शिल्पपट आहेत. या शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप, सभामंडपातील दर्शनी भाग आणि त्याच्या काटकोनात डाव्या-उजव्या बाजूंना. त्यापैकी डाव्या बाजूला रामायणाचे तर उजव्या बाजूस महाभारताचे शिल्पपट आहेत.

महाभारताचे तीन शिल्पपट संपूर्ण आहेत, मात्र सध्याच्या जागेवर रामायणाचा एकच पट चांगल्या स्थितीत अस्तित्वात असून इतर दोन पट सध्याच्या जागेवर नाहीत. त्यापैकी त्या उरलेल्या दोन पटांचे काही तुकडे (fragments) मात्र आपल्याला मंदिरातच इतरत्र चुकीच्या जागी जोडलेल्या स्थितीत पाहण्यास मिळतात जे शोधणे खूपच जिकिरीचे आहे.

चला तर एकेक शिल्पपट पाहूयात. रामायणपटापासून सुरुवात करुयात.



इस्लामी वावटळीत मंदिराची झालेली नासधूस आणि नंतर पेशव्यांचे गुरु ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केलेला मंदिराचा जीर्णोद्धार यात हे रामायणाच्या शिल्पपटांचे तुकडे चुकीच्या जागी बसवले गेले. रामायणपटाचा पहिला तुकडा आपल्याला दिसतो तो मंदिराच्या बाहेर, पायर्‍यांनजीकच्या उजव्या बाजूच्या भिंतीत. 

याच भिंतीत शैव द्वारपालांच्या प्रतिमासुद्धा बसवलेल्या आहेत. दोन धनुर्धारी पुरुष आणि पाठीमागे एक भग्न स्त्री प्रतिमा असा हा प्रसंग. बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता. हा रामायणातला प्रसंग आहे याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही मात्र हा प्रसंग नेमका कुठला हे ओळखणे अवघड आहे. बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्याचा हा प्रसंग असावा.

the postman
राम, लक्ष्मण आणि सीता

यानंतर आपल्याला दुसरा शिल्पपट थेट मंदिराच्या सभामंडपातच दिसतो. नंदीमंडप आणि सभामंडप यामधील डाव्या बाजूने काटकोनात वळताच उजव्या हाताला हा रामायणाचा अखंड शिल्पपट आहे. हा पट बराच विस्तृत असून पाच भागात कोरलेला आहे. मध्यभागी राम, लक्ष्मण आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना प्रत्येकी दोन-दोन प्रसंग कोरलेले, अशी याची रचना आहे. अगदी अशाच पद्धतीचा महाभारतातील एक शिल्पपट याच्या बरोबर विरुद्ध बाजूस आपणास दिसतो.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

the postman
रामायण अखंड शिल्पपट

आता यातील एक एक प्रसंग आपण विस्ताराने पाहूयात.

मध्यभागी जे दोन धनुर्धारी दिसत आहेत, ते बहुधा राम-लक्ष्मण असावेत. हा प्रसंग कदाचित सीता स्वयंवराच्या आधीचा असावा. कारण राम-लक्ष्मण हे दोघेही दागदागिने तसेच राजवस्त्रांमध्ये येथे आहेत. विश्वामित्रांसोबत त्राटिका वधानंतर मिथिला नगरीच्या प्रवासापर्यंतचा हा प्रसंग असावा. नक्की कुठला ते मात्र सांगता येत नाही.

उजव्या बाजूच्या खालच्या पटात अग्नी हा दशरथाला पायसदान देत असल्याचा प्रसंग कोरलेला आहे, तर त्याच्या शेजारी उजवीकडे एक स्त्री आपल्या सेविकांसह शिवलिंगाची पूजा करताना दाखवली आहे. 

ही बहुधा कौसल्या असावी जी अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करत आहे किंवा हा संपूर्ण वेगळाच प्रसंग असून ती स्त्री ही सीता असावी जी सुयोग्य पतीसाठी प्रार्थना करत आहे. दुसरी शक्यताच अधिक योग्य वाटते.

याच्या वरच्या शिल्पपटात रामाकडून धनुर्भंग होतो आहे आणि सीता ही वरमाला घेऊन स्वयंवरासाठी सज्ज असल्याचे दाखवले आहे. उजवीकडे जनक हा सिंहासनावर बसलेला असून रामाच्या डाव्या बाजूला मृगाजीनात दाढीवाला विश्वामित्र व लक्ष्मण अगदी स्पष्ट दिसतात. त्यांच्याच शेजारी सांडणीस्वार सीतास्वयंवराची दवंडी पिटत असताना दाखवले आहेत.

the postman
फोटो : (सीतास्वयंवर (वरचा पट) व पायसदान (खालचा पट) )

 मध्यभागातील राम-लक्ष्मणांच्या डावीकडे असेच दोन शिल्पपट आपणास दिसतात. यातील दोन्ही प्रसंग नक्की कुठले हे ओळखू येत नाहीत, पण बहुधा हे प्रसंग रावणवधानंतर राम सीतेसह अयोध्येला परत येतात तेव्हाचे असावेत. कारण हे दोघेही आसनस्थ असून सेवक उभे आहेत, तर वानरांनाही उच्चासन दिलेले असून ते हात जोडून नम्र भावाने बसलेले दिसतात.

the postman
रामायण प्रसंग

यानंतरचे येथील सलग असलेले दोन शिल्पपट मात्र गायब आहेत. त्यापैकी त्यातील एक भाग जो पायर्‍यांपाशी असलेल्या भिंतीत आहे, तो आपण यापूर्वीच पाहिला आहे.

यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर अजून एक भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. 

हे दोन्ही पट पूर्णपणे अंधाऱ्या आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे जिकीरीचेच आहे. त्यातीलच एक नंदीमंडपाशेजारील भिंतीत असलेला पट म्हणाजे मारिचवध.

the postman
मारिचवध

पटाच्या उजव्या बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारिचाचा वध राम करत आहे. मृगाच्या धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली पडलेले आहे.

मरताना रामाच्या आवाजात ‘लक्ष्मणा धाव’ असा आर्त टाहो फोडल्यामुळे भयशंकित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी पाठवलेले आहे आणि ही संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर सीतेला भि़क्षा मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या अगदी बेतात आहे.

 याच्या समोरील पट मात्र अगम्य आहे. या पटात वृक्ष्, त्यावर वानरे, पक्षी आदी दाखवलेले असून वनांमध्ये काही प्राणी दाखवलेले आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे मात्र ह्यात सुग्रीवाच्या किष्किंधानगरीतला किंवा रावणाच्या अशोकवनापैकी एखादा प्रसंग असू शकेल. इथे रामायणातील शिल्पपट पूर्ण होतात. यातील एकच अखंड असून इतर दोघांचे काही अंशच सध्या इतस्ततः पाहता येतात.

आता वळूयात महाभारतातील शिल्पपटांकडे. 

महाभारतातील शिल्पपट मात्र संपूर्ण आणि सलगपणे आजही बर्‍यापैकी चांगल्या अवस्थेत आहेत. त्यापैकी एक अखंड पट हा द्रौपदी स्वयंवराचा असून हा सभापर्वातील आहे, तर इतर दोन पट हे महाभारत यु*द्धातील भीष्मपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व या पर्वांमधील आहेत. रामायण पटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूपासून हे पट सुरु होतात.

आधी आपण द्रौपदी स्वयंवर शिल्पपट पाहूयात. यातही रामायणातील अखंड पटाप्रमाणेच पाच प्रसंग कोरलेले असून मध्यभागी अर्जुनहस्ते मत्स्यभंग असून दोन्ही बाजूला खालीवर असे दोन दोन पट कोरलेले आहेत.

the postman
द्रौपदीस्वयंवर संपूर्ण शिल्पपट

यातील आता उजवीकडचे दोन पट आता आपण पाहूयात. यातील सर्वात उजवीकडे द्रुपद राजा हा सिंहासनावर बसलेला असून खालच्या बाजूला द्रौपदीची शिवपूजा दाखवलेली आहे. द्रुपदाच्या डावीकडे शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्रीकृष्ण द्रुपदाशी बोलताना दाखवलेला आहे.

भुलेश्वर मंदिरातील हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, जे की येथील शिल्पांमध्ये श्रीकृष्णाला त्याच्या विष्णूरुपी दैवी स्वरुपात दाखवते.

कृष्णाच्या डावीकडे तीन पांडव आहेत. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, ज्यांची वेषभूषा मृगाजिने धारण केल्यामुळे ऋषींसारखी आहे.  वारणावतातील लाक्षागृहातून नुकतेच सुटून आल्यामुळे ते ओळख लपवण्यासाठी मृगाजिने धारण करुन द्रौपदी स्वयंवर पाहण्यासाठी आलेले आहेत. अर्जुन मात्र मत्स्यभंगाचा पण पूर्ण करण्यासाठी सज्ज असल्यामुळे तसेच भीम हा त्याच्या संरक्षणासाठी गेल्यामुळे यात तीनच पांडव दाखवलेले आहेत. पांडवांच्या बाजूला द्रौपदी हाती वरमाला घेऊन सज्ज असून तिच्या शेजारी बंधू खङगधारी दृष्टद्द्युम्न आहे.

the postman
द्रौपदीस्वयंवर पट (उजवीकडील बाजू)

यानंतर मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार फिरत असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज आहे. अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय. डाव्या बाजूच्या शिल्पपटामध्ये द्रौपदी स्वयंवरानंतर अर्जुन हा द्रौपदीला घेऊन कुंतीकडे आलेला असून भिक्षा आणलीय असे म्हणून द्रौपदीची ओळख कुंतीला करून देत आहेत. तर त्याच्या बाजूला डावीकडे व्यास मुनी हे द्रौपदीचा पाच पतींशी विवाह कसा समर्थनीय आहे हे कुंतीला पटवून देत आहेत असे वाटते. याच्याच खालच्या बाजूला कृष्ण आणि कुंतीसह इतर पांडवांची भेट दाखवलेली आहे.

the postman
द्रौपदीस्वयंवर (डावी बाजू)

याच्या शेजारचा एक पट मात्र द्रोणपर्वातील आहे, जो आपण नंतर पाहू. सुरुवातीला आधी आपण भीष्मपर्वातील पट पाहू ज्यात भीष्मवधाचा प्रसंग कोरलेला आहे. हा पट नंदीमंडपाच्या समोर असलेल्या सभामंडपाच्या उजव्या बाजूने सुरु होतो. हा शिल्पपट सुरु होतो भीष्म आणि अर्जुन यांच्या यु*द्धापासून.

या शिल्पपटांच्या रथींच्या प्रतिमा भंग झाल्यात पण त्यांच्या ध्वजांवरुन ते यो*द्धे अगदी सहजी ओळखू येतात. या पटात अर्जुन भीष्मांशी शरयुद्ध खेळत आहे. सारथी कृष्ण चतुर्भुज विष्णूरूपात असून अर्जुनाच्या ध्वजावर वानर आहे, तर त्याच्या समोर भीष्म तालध्वजासह रथावर आरूढ आहे.

the postman
अर्जुन -भीष्म युद्ध

याच्या पुढचा पट आहे तो भीष्म वधाचा.

कितीही प्रयत्न करूनही भीष्म अवध्य असल्याचे बघून रात्री कौरवशिबिरात जाऊन पांडव भीष्मांनाच त्यांच्या वधाचा उपाय विचारतात, तेव्हा भीष्म पूर्वी स्त्री असलेल्या शिखंडीशी मी यु*द्ध करणार नाही असे म्हणून अप्रत्यक्षपणे शिखंडीच्या आडून यु*द्ध करण्याचे पांडवांना सुचवतात. या पटात डावीकडे तालध्वजासहित भीष्म असून उजवीकडे कपीध्वजधारी अर्जुन आहे. अर्जुनाच्या पुढ्यात शिखंडी त्याच्या मेषध्वजासह भीष्मावर शरवर्षाव करताना दिसत आहे. सध्या जरी भग्न असले तरी मूळातून अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे.

the postman
भीष्मवध

यानंतर याच्या उजवीकडचा जो शिल्पपट आहे तो आहे भीष्म शरशय्येचा. भीष्म हे शरशय्येवर पडलेले असून त्यांच्या आजूबाजूला कौरव- पांडव हे शोक व्यक्त करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्मांना तहान लागली म्हणून भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे.

the postman
भीष्म शरशय्या

यानंतरचा शिल्पपट आहे द्रोणपर्वातील. जो भीष्मपर्व आणि द्रौपदी स्वयंवर यामधील भागात आहे. यातील पहिल्या प्रसंगात एक द्रोणाचार्य आहेत हे निश्चित, जे त्यांच्या सुवर्णमय कमंडलूच्या ध्वजावरुन समजून येते. त्याच्याशी यु*द्ध करणारा पांडवयौद्धा बहुधा खङगधारी दृष्टदद्युम्न किंवा मेष ध्वजधारी शिखंडी असावा.

the postman
द्रोणपर्व (संपूर्ण शिल्पपट)

यानंतर अर्जुन एका कौरवाबरोबर यु*द्ध करताना दाखवलेला असून कौरवयो*द्धा त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही. याच्या पुढचे शिल्प मात्र अतिशय रोचक आहे. द्रोणपर्वात अर्जुनाची खबरबात घ्यायला जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात घुसतो तो एकेका हत्तीलाच आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच. एकेक करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात.

the postman
भीम-गजयुद्ध

याच्या बाजूलाच पट आहे तो शल्यपर्वातला. इथे एक पांडवयो*द्धा दाखवला असून तो मी ओळखू शकलो नाही. त्याच्या ध्वजावर मनुष्याचे शिर आहे. असा ध्वजचिन्ह असलेला कुठलाही यो*द्धा मला माहितीत नाही. द्रौपदेयांच्या ध्वजांवर चंद्र, सूर्य, यम आणि अश्विनीकुमारांच्या प्रतिमा होत्या, असा महाभारतात उल्लेख आहे पण तो या आकृतीशी जुळत नाही.

शल्याचा वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि उपनंद अशा नावाचे दोन मृदंग आहेत, जे या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र विरोधातला कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू येतो.

इथे भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट संपतात. याव्यतिरिक्त भुलेश्वर मंदिरात काही आगळीवेगळी शिल्पेही आहेत. यापैकी येथील छतांवर असलेली मातृकांची शिल्पे सर्वपरिचित आहेत. मात्र मंदिराच्या मागच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर चामुंडेचे एक भग्नावस्थेतील अप्रतिम शिल्प आहे. प्रेतवाहिनी चामुंडा अस्थिपंजर देहासह उभ्या स्थितीत असून तिचा चेहरा भयानक आहे. ओठांतून दाढा बाहेर आल्या असून तिच्या पोटात विंचू आहे, जो तिच्या राक्षसी भुकेचे प्रतिक आहे. पायांतळी प्रेत आहे. इथल्या माझ्या सर्वाधिक आवडीच्या शिल्पांपैकी हे एक.

the postman
चामुंडा

याशिवाय भुलेश्वर मंदिरातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे इतके स्तंभ असूनही फक्त स्तंभाच्या मधल्या चौकटीवर शिल्प आहे. इतर सर्व स्तंभचौकटी या शिल्पविरहीत आहेत. या चौकटीवर नर्तिक नृत्य करत असून दोन्ही बाजूंना वादक वादन करत आहेत.

the postman
स्तंभचौकटीवरील एकमेव शिल्प

भुलेश्वर मंदिरातील अजून रोचक शिल्प म्हणजे एक आभासी शिल्प. यात तीन पुरुष असून ते एकमेकांना जोडलेले आहेत आणि पाय मात्र चारच आहेत. म्हणाजे प्रत्यक्षात एकाच वेळी दोन पुरुष उभे असून ते पाय एकमेकांना जोडले असल्याने तिघा जणांचा आभास निर्माण करीत आहेत. हे अतिशय भग्न शिल्प असले तरी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्वपरिचय असल्याने हे शिल्प ओळखू येतेय. चांगल्या अवस्थेत असताना हे शिल्प अतिशय देखणे असणार यात काहीच शंका नाही.

the postman
आभास निर्माण करणारे शिल्प

 आणि जाता जाता जिच्याशिवाय भुलेश्वर वारी पूर्ण होऊच शकत नाही, ती जगप्रसिद्ध दर्पणसुंदरी.

the postman
दर्पणसुंदरी

या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
 फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: bhuleshwarmahadev
ShareTweet
Previous Post

पाकिस्तानचे चार रणगाडे उ*द्ध्वस्त करत २१व्या वर्षी हौतात्म्य पत्करणारे अरुण खेत्रपाल

Next Post

हा भारतीय माणूस बनलाय चीनचा रामदेव बाबा !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

हा भारतीय माणूस बनलाय चीनचा रामदेव बाबा !

मुस्लिम शासकांनी भारतीय संगीताला राजाश्रय देऊन भरभराटीला आणले

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.