The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आई आपल्या मुलासाठी काय करू शकते याचं उदाहरण म्हणजे ही स्त्री..!

by द पोस्टमन टीम
3 January 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


खरे तर इतिहासात अडा ब्लॅकजॅक हिची फारशी कुठे नोंदही नाही. जणू इतिहास तिला विसरला आहे! बरोबर आहे; संकेतानुसार मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी तिने काही भरीव कार्य केलेले नाही. ना ती कुठल्या यु*द्धाची नायिका आहे, ना कला, साहित्य, क्रीडा, शिक्षण अशा कुठल्या प्रांतात तिने स्वतःचा ठसा उमटविला आहे. पण तरीही इतिहासाच्या कुठल्याशा पानावर छोट्या कोपऱ्यात का होईना तिची नोंद घेणे आवश्यक ठरते. कोण होती ही स्त्री? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

तिची एका वाक्यात ओळख करून द्यायची तर ती अत्यंत दुर्गम भागाच्या तितक्याच खडतर मोहिमेवर निघालेल्या चमूतील एकमेव जिवंत राहिलेली स्त्री होती. त्यासाठी तिने निकराची झुंज दिली होती. त्याआधी १९२१ साली या मोहिमेमध्ये ती शिवणकाम करणारी स्त्री म्हणून सहभागी झाली होती. सैबेरियाच्या उत्तर टोकाकडे असलेल्या रँगल आयलंड नावाच्या हिमाच्छादित प्रदेशात ही मोहीम चालणार होती. मोहिमेवर निघताना ती या मोहिमेची हिरोइन ठरेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल.

प्रत्यक्षात मात्र तसेच घडले होते. या मोहिमेत तिच्याबरोबर अजून चार पुरुष सहकारी होते आणि व्हिक्टोरिया ऊर्फ व्हिक नावाची एक मांजर होती. मोहिमेसाठी अडा ब्लॅकजॅकला एक वर्षाच्या करारावर सहभागी करून घेण्यात आले होते. त्यावेळी तिला व्यवस्थित खायला-प्यायला मिळेल आणि तिची पुरेशी काळजी घेतली जाईल याची हमी देण्यात आली होती. शिवाय मोहिमेदरम्यान चालणाऱ्या रोजच्या कष्टप्रद कामांमध्ये तिचा सहभाग असणार नव्हता. किंबहुना, अशा प्रदेशात टिकून राहण्यासाठी जी सर्व्हायव्हल गियर्स आवश्यक असतात त्यांचे शिवणकाम आणि दुरुस्ती हे तिचे मुख्य काम होते.

पण सुमारे दोन वर्षांनी जेव्हा रेस्क्यू शिप त्या बेटाच्या किनार्‍याला लागली तेव्हा परिस्थिती पूर्णतः बदललेली होती. अडा ही त्या चमूमधील एकमेव जिवंत सदस्य उरली होती. अर्थात तिच्याबरोबर व्हिकदेखील होती, पण त्या खडतर हवामानाने इतर सर्व माणसांचा बळी घेतला होता. आत्तापर्यंत एका आखीव चौकटीत आयुष्य जगलेल्या अडाने त्या दोन वर्षांच्या काळात जणू अख्ख्या आयुष्याला पुरून उरतील इतके अनुभव घेतले होते. निसर्गाच्या नाना लहरींचा सामना केला होता.

ज्या पोलर बेअरची तिला प्रचंड भीती वाटत असे, त्यांची शिकार करायला ती आता शिकली होती. परिस्थितीशी जुळवून घेऊन जिवंत राहायचे तर तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. याशिवाय उपासमारीपासून वाचण्यासाठी शिकार करणे, सापळे लावणे ही कौशल्ये तिने आत्मसात केली होती. अगदी आता आतापर्यंत ती लहानखुऱ्या देहयष्टीची, नाजूक चणीची, काहीशी भित्री आणि संकोची स्त्री होती. आता मात्र लोक तिला लेडी रॉबिन्सन क्रुसो म्हणून ओळखणार होते. रेनडियरच्या कातडीपासून शिवलेला कोट घातलेली ही स्त्री जेव्हा आपल्या सुटकेसाठी आलेल्या माणसांकडे धावली, तेव्हा तिच्या ओठावर रुंद हसू खेळत होते ज्यात जणू जग जिंकल्याचा आविर्भाव होता!

अडाचा जन्म अलास्कामधील इनुपियाट जमातीत झाला. अलास्कात जन्म घेऊनही लहानपणी तिला शिकार किंवा जंगलात टिकून राहण्यासाठी आवश्यक गोष्टी यांचे शिक्षण मिळाले नाही. उलट मिशनऱ्यांनी तिला बायबल वाचता येईल इतपत इंग्रजी शिकवले. याशिवाय ती घरकाम, स्वयंपाक, शिवणकाम या गोष्टी शिकली. वयाच्या सोळाव्या वर्षी तिचे लग्न झाले. तिला तीन मुले झाली, पण त्यापैकी एकच मूल जगले. त्याचदरम्यान तिला नवऱ्याने सोडून दिले.



मग अडा आपल्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन आपल्या मूळ गावी नोम येथे पोहोचण्यासाठी ४० मैल अंतर चालत निघाली. तिचा मुलगा बेनेट क्षयरोगाने आजारी होता. शिवाय एकंदरीत त्याची प्रकृती तोळामासाच होती. तरीदेखील अडाने जिद्दीने आपला प्रवास सुरू ठेवला. मुलाच्या कलाने घेत, कधी त्याला चालू देऊन तर कधी कडेवर उचलून, तिची वाटचाल सुरू राहिली. अखेर एक क्षण असा आला की खिशात छदामही नसल्याने तिला आपल्या पोटच्या गोळ्याला एका अनाथालयात ठेवावे लागले.

निदान तिथे त्याच्या खाण्यापिण्याची तरी सोय झाली असती.. मात्र त्याच क्षणी तिने पुरेसे पैसे कमवून आणून आपल्या मुलाला एक ना एक दिवस त्या अनाथालयातून परत आणण्याचा निर्धार केला. दरम्यान या मोहिमेबद्दल तिच्या कानावर आले. या मोहिमेसाठी त्यांना इंग्रजीचे ज्ञान असणारी आणि शिवणकाम येणारी स्त्री हवी होती. अडा दोन्ही अटींमध्ये बसत होती. तिने ताबडतोब या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

शिवणकामाची जी कामे तिला नोममध्ये मिळत होती, ती बेनेटला परत आणण्यासाठी पुरेसा पैसा कधीच मिळवून देणार नव्हती. त्या तुलनेत या मोहिमेसाठी तिला दरमहा तब्बल ५० डॉलर्स इतका पगार मिळणार होता. तिच्यासाठी ही रक्कम फारच मोठी होती. शिवाय मोहिमेमध्ये तिच्याबरोबर इतरही अनेक एस्किमो लोक असतील, असेही तिला सांगण्यात आले होते. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच होते. कोणतीही मोहीम कशी असू नये, त्याचे नियोजन कसे करू नये, याचा या मोहीमेने वस्तुपाठच घालून दिला होता. रँगल आयलंडवर ब्रिटीश मालकीचा दावा सांगणे हा या मोहिमेचा हेतू असला तरी प्रत्यक्षात ब्रिटनने कधीही या बेटात रस दाखवला नव्हता. ही मोहीम स्टेफनसन नावाच्या आर्क्टिक एक्सप्लोअररने आखली होती. तो स्वतः सेलिब्रिटी एक्सप्लोअरर असल्याने त्याच्या नावाला वलय होते आणि त्या नावाला भुलूनच लोक मोहिमेत सहभागी होण्यासाठी तयार होत होते.

प्रत्यक्षात हा मनुष्य स्वतः मोहिमेत सहभागी होणारच नव्हता. त्याऐवजी त्याने चार तुलनेने कमी अनुभवी लोकांची निवड केली होती. मोहिमेचा कालावधी एक वर्षाचा होता आणि सहा महिने पुरेल इतका शिधा त्यांच्यासोबत दिला गेला होता. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या खडतर मोहिमा अनेकदा ठरवलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ चालू शकतात. त्यामुळे जास्तीच्या सामग्रीची तरतूद करून ठेवणे हा नियोजनाचा भाग असतो. स्टेफनसनने यापैकी काहीही केले नव्हते. उलट आर्क्टिक वृत्ताजवळचा प्रदेश म्हणजे शिकारीच्या आणि मासेमारीच्या दृष्टीने चंगळ आहे, त्यामुळे आहे तो शिधा आरामात पुरेल असा या मोहिमेतील सदस्यांचा ग्रह करून देण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात मोहिमेतील बाकीच्या एस्किमो लोकांनी माघार घेतली. अडा मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. तिला कसेही करून पैसे मिळवायचे होते. अखेर ९ सप्टेंबर १९२१ रोजी त्यांची मोहीम सुरू झाली आणि अडाने सिल्व्हर वेव्ह या जहाजावर पाऊल ठेवले.

रँगल आयलंडवर पोचल्यानंतर सुरुवातीचे वर्ष स्टेफनसनने सांगितल्याप्रमाणे गेले. पण जसा उन्हाळा सरत आला, तसे निसर्गाचे रंग दिसू लागले. सगळीकडे बर्फच बर्फ, जवळपास कुठेही मनुष्यवस्ती किंवा एखादे जहाज यांचे नामोनिशाणही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या टेडी बेअर नावाच्या जहाजाला बर्फामुळे परत फिरावे लागले. या चमूला याबद्दलही काही माहिती नव्हती. जवळपास असलेले शिधा आणि इतर सामान संपत आले होते. अजून येथे किती काळ काढावा लागेल हेही अनिश्चित होते.

१९२३ च्या सुरुवातीला परिस्थिती अजूनच बिघडली. मोहिमेतील सहभागी सदस्यांची उपासमार सुरू झाली. त्यापैकीच एक सदस्य असलेला नाईट नावाचा मनुष्य आजारी पडला. शेवटी २८ जानेवारी १९२३ रोजी इतर सदस्यांनी अडा ब्लॅकजॅकला नाईटच्या निगराणीसाठी तिथेच ठेवून ते बेट सोडण्याचा निर्णय घेतला.

कुठे मदत मिळेल का याचा ते शोध घेणार होते. त्यानंतर ते परत कधीच दिसले नाहीत. जवळपास सहा महिने अडाने नाईटची शुश्रुषा केली. एकाच वेळी ती डॉक्टर, परिचारिका, सहकारी, शिकार करून आणणारी, आणि त्याला खाऊ-पिऊ घालणारी अशा अनेक भूमिका पार पाडत होती. बदल्यात तिला नाईटचा संताप सहन करावा लागत होता.

एवढे सगळे करूनही ती त्याची व्यवस्थित काळजी घेत नाही असा त्यांचा आरोप होता. तो असहाय बनला होता आणि सगळा राग तिच्यावर काढत होता. अडा अर्थातच त्याला प्रत्युत्तर देत नव्हती, मात्र आपल्या मनातल्या भावनांना तिने एका डायरीमधून वाट करून दिली होती. या काळात तिने जे सोसले त्याचे प्रतिबिंब डायरीच्या त्या पानांवर उमटत होते.

काही दिवसांमध्येच नाईटचा मृत्यू झाला. अडा मात्र हरली नव्हती. तिने परिस्थितीशी झगडायचे ठरवले. नाईटचे शव तिने त्याच्या स्लीपिंग बॅग मध्येच ठेवले आणि जंगली श्वापदांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या बाजूला पेट्यांचे थर रचून ठेवले. हा तिचा चांगुलपणा होता. पण आता त्या क्षणांमध्ये ती अडकून पडणार नव्हती.

तिने तिच्या तंबूची रचना बदलायला सुरुवात केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने तिने आपल्या बिछान्यावर बंदुकीसाठी एक रॅक तयार केली. पुढचे तीन महिने ती एकटी होती. त्या काळात कोल्ह्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावणे, पक्ष्यांची शिकार करणे या गोष्टी ती शिकली. आपल्या कॅम्पवरच तिने एक उंच ओटाही बांधून काढला, जेणेकरून पोलर बेअरला ती दूरवरूनही बघू शकेल.

गरज पडल्यास हाताशी असावी म्हणून तिने एक छोटी होडीही तयार केली. शिवाय मोहिमेबरोबर आलेल्या सामग्रीतील फोटोग्राफी इक्विपमेंटवरही तिने प्रयोग केले. हळूहळू ती स्वतःचे फोटो घ्यायला शिकली. आजूबाजूच्या निसर्गाशी तिने इतके जुळवून घेतले, की तिची सुटका झाली नसती तरी अजून वर्षभर ती आरामात राहू शकली असती.

अखेर तिची सुटका झाली. पुढे तिला तिचा मुलगाही परत मिळाला. मात्र तिला कबूल केल्याइतके पैसे मिळाले नाहीत. स्टेफनसन आणि इतरांना या मोहिमेतून भरपूर फायदा झाला. पण या मोहिमेची खरी नायिका अडा ब्लॅकजॅक आहे तिथेच राहिली.

ज्या मुलाला वाचवण्यासाठी, त्याला एक चांगले आयुष्य देण्यासाठी तिने जिवाचा आटापिटा केला होता, तोही दुर्दैवाने फार जगला नाही. वयाच्या ५८ व्या वर्षी पक्षाघाताच्या झटक्याने तो मरण पावला. त्यानंतर सुमारे दहाएक वर्षांनी अडा ब्लॅकजॅकचाही मृत्यू झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अन्नपूर्णा महाराणाने दिलेलं योगदान विसरून चालणार नाही

Next Post

इंग्लंडमधला पहिला सीरिअल कि*लर होता ‘मफिन मॅन’..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

इंग्लंडमधला पहिला सीरिअल कि*लर होता 'मफिन मॅन'..!

युरोप आज एवढा प्रगत आहे त्याचं कारण ही चार माणसं आहेत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.