आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्वप्न बघायला वय नसतं आणि ते पुर्ण करायलाही नाही. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी स्वत:मध्ये आवश्यक ते बदल घडवून आणण्याची सुरुवात कधीही केली जाऊ शकते. स्वत:ला बदलण्यासाठी कधीही उशीर होत नाही. जब जागो तब सवेरा. जिद्द आणि महत्वाकांक्षा या गोष्टी वेळेलाही हरवू शकतात.
तुम्हाला मिळणारं यश तुमचं वय बघून येत नाही तर तुमचे कष्ट, जिद्द आणि चिकाटी बघून येतं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आसाममधील ८९ वर्षीय लतिका गुप्ता.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही सुरुवात केली जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण असलेल्या लतिका गुप्ता यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
लतिका यांचा जन्म आसाममधील धुबरी शहरात झाला. त्यांचं शिक्षणही आसाममध्येच पूर्ण झालं. लतिका यांना बालपणापासुनच शिवणकाम करण्याची आवड होती. शिवणकाम करण्यात त्यांना अतिशय आनंद मिळत असे. त्यांच्या आजच्या यशाचं सगळ्यात मोठं गुपित त्यांच्या या शिवणकामावर असणाऱ्या त्यांच्या प्रेमात आहे. त्यांच्या बालपणाची आवड आज अनेक तरुणांना प्रेरणा देत आहे.
प्रवास, सततची स्थलांतरे हे लतिका यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग. त्यांचे पती कृष्ण लाल चक्रवर्ती भारतीय सर्वेक्षण खात्यात नोकरीला असल्यामुळे नेहमीची बदली आणि वेगवेगळ्या शहरांची धर-सोड ही नेहमीचीच गोष्ट. त्यामुळे भारतातील विविध ठिकाणी फिरण्याचा योग लतिकाजींच्या आयुष्यात आला. या संधीचा फायदा घेत नाहीत त्या लतिकाजी कसल्या.
विविध ठिकाणी गेल्यानंतर तिथले वेगवेगळे कापडं आणि साड्या त्या घेऊन येत. त्यांनी या गोष्टींचा एक वेगळा संग्रहच बनवला. प्रत्येक शिलाई केलेल्या गोष्टीच्या मागे काहीतरी रंजक अनुभव जोडलेला आहे असं त्या आज सांगतात.
पहिलं शतक केलेली बॅट जसा प्रत्येक फलंदाज सांभाळून ठेवतो तसंच काहिसं लतिकाजींनी आपल्या पहिल्या आणि एकमेव शिलाई मशीनसोबत केलंय. आजही त्या त्यांची ६४ वर्ष जुनी ‘उषा’ शिलाई मशीन मोठ्या अभिमानाने वापरतात.
लग्न झाल्यानंतर झालेल्या तिन्ही मुलांसाठी त्या सतत काही ना काही शिवत असत. वेळ गेली तसं त्यांनी बाहुल्या बनवायला पण सुरुवात केली. या शिलाई कामातील त्यांचा अनुभव एवढा दांडगा आहे की आता त्या कापड बघून त्याच्यासाठी योग्य अशा डिजाइन अगदी अचूकपणे सांगतात.
वेळेनुसार त्यांनी हळूहळू बटवे बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी बनवलेले बटवे त्यांच्या नातेवाईकांना अतिशय आवडत असत. त्या बटव्यांसाठी त्या प्रसिद्ध झाल्या. जुन्या साड्यांवर केलेल्या नाजुक विणकामामुळे त्यांनी बनवलेले बटवे जास्त आकर्षित करतात. विविध प्रकारच्या कपड्यांवर जुळतील अशा बटव्यांमुळे त्यांच्या बटव्यांना सणामध्ये किंवा लग्नाच्या वेळी खूप मागणी असते.
एक बटवा बनवण्यासाठी लतिकाजी २-३ दिवस वेळ घेतात. बटव्यांवर मोती, हिरे, तारे यांची सजवणुक असते. आता पर्यंत त्यांनी विविध प्रकारचे ३०० बटवे बनवले आहेत.
ज्या वयात शरीर त्रास देण्यास सुरुवात करते त्या वयातसुध्दा एवढ्या चपळतेने काम करणाऱ्या लतिकाजी सगळ्यांना प्रेरित करतात. आपली आवड मरू न देण्यासाठी त्यांची चाललेली धडपड आज वाखाणण्याजोगी आहे.
लतिकाजींचा नातु ‘जॉय’ जर्मनीत राहतो. त्यांना भेटायला तो नेहमी यायचा. आजीच्या हातचं अफाट कौशल्य बघून जॉय चकित झाला. आपल्या आवडीपोटी असलेली एवढी निष्ठा बघून हे कौशल्य मर्यादित न ठेवता शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवायची गरज जॉयला वाटू लागली. तेव्हाच त्याला हे बटवे ऑनलाइन विकण्याची कल्पना सुचली.
मूळ उद्देश फक्त पैसे कमवने नसुन आपल्या आजीची ही आगळी-वेगळी कला शक्य तेवढ्या लोकांच्या उपयोगात यावी हा होता असं जॉय आज सांगतात.
वेबसाइट बनवताना ही वेबसाइट एवढी प्रसिद्ध होईल असा अंदाज कोणालाही नव्हता असं लतिकाजी सांगतात. आज या वेबसाइटवर लतिकाजींनी बनवलेले बटवे विकले जातात. फक्त भारतातच नाही तर या बटव्यांना परदेशातूनही प्रचंड मागणी आहे. यामधे जर्मनी, न्यूझीलंड, ओमान या देशांचा समावेश होतो. इंटरनेट वरुन या बटव्यांंना आज खुप भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक बटव्यामागे असलेली रंजक गोष्ट त्या बटव्यांना अजुनच वेगळं महत्त्व प्राप्त करुन देते.
लतिकाजींच्या एका बटव्याची किंमत ५००-१५०० या दरम्यान असते.
या वयातही आपल्या आवडीला कमी होऊ न देण्याची लतिकाजींची जिद्द आज एक प्रेरणास्त्रोत आहे. प्रत्येक तरुण आणि वृद्ध व्यक्तीसाठी त्या आज एक प्रेरणास्थान आहेत. तसेच उतारवयात वृद्धांना दिली जाणारी वागणूक बघितली तर लतिकाजींच्या कुटंबाकडून ही प्रेरणा घेणे गरजेचं आहे.
वयाचा विचार न करता त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी खंबीरपणे साथ देणाऱ्या कुटंबाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. लतिकाजींच्या कौशल्याबरोबरच त्यांच्या नातवाने केलेल्या प्रयत्नांचा हातही या यशात आहे हे ही खरं.
तुमचं प्रेरणास्थान वय बघून नाही तर कार्य बघून ठरवणं गरजेचं आहे हेच लतिकाजी आपल्या बटव्यांमधून सांगत आहेत. या आजीबाईंच्या बटव्यात यशस्वी आयुष्याची जडी- बुटी लपलीय एवढं मात्र नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









