The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणून घ्या, भारताच्या खऱ्याखुऱ्या ‘टायगर मॅन’बद्दल

by द पोस्टमन टीम
1 July 2024
in भटकंती
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जंगलाचा राजा नसला तरी तेवढाच दरारा असलेला वाघ आजही आकर्षणाचा बिंदू आहे. जगातील ७० टक्के वाघ भारतात आहेत आणि याच वाघांचे संरक्षण करण्याचे पालकत्व राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाकडे आहे. जंगलासह वाघांवर प्रेम करून देशसेवा करण्याची अनोखी संधी हे क्षेत्र देते.

“वाघ संकटात आले आहेत, त्यांची संख्या कमी होते आहे, आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत”, असे एका शाळेत शिक्षिका वाघाविषयी पोटतिडकीने सांगत होत्या. सारे विद्यार्थी गंभीरपणे ऐकत होते. त्यातीलच एक विद्यार्थिनी मात्र दिवसभर अस्वस्थ होती. काय करता येईल, काय करायला हवे, असा विचार ती करत होती. त्याच वेळी तिला एक कल्पना सुचली. आपल्या पिगी बँकेत जे पैसे आहेत तेच आपण वाघांच्या संरक्षणासाठी दिले तर? तिने तातडीने पिगी बँक काढली. पैसे मोजले आणि वडिलांकडे गेली. त्यांना सांगितले. वडिलांनी होकार दिल्यानंतर तिने एक पत्र लिहिले – तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना.

‘माझ्या खाऊचे पैसे मी या पत्रासोबत पाठवीत आहे. कळकळीची विनंती करते की वाघांना वाचवा.’

ते पत्र आणि पैसे दिल्लीत येऊन धडकले. इंदिरा गांधी यांनी ते पाहिले आणि त्यांनाही रडू कोसळले. एखाद्या चिमुकलीला वाघांविषयी एवढे प्रेम वाटावे! त्याचवेळी त्यांच्यातले नेतृत्व जागे झाले आणि त्यांनी व्याघ्र प्रकल्पाची घोषणा (प्रोजेक्ट टायगर) केली.

ही काही कपोलकल्पित घटना नाही तर ते वास्तव आहे. १ एप्रिल १९७३ रोजी देशात व्याघ्र प्रकल्प ही नवीन संकल्पना जन्माला आली. आज या संकल्पनेचा जो विस्तार झाला आहे त्याद्वारेच केवळ भारतात नाही तर जगभरात वाघांचे संवर्धन होण्यात अतुलनीय असे काम झाले आहे.



अर्थात व्याघ्र प्रकल्पाच्या मागे फक्त या चिमुरडीचे पत्र कारणीभूत नव्हते. कारणीभूत होती ती एका वाघवेड्याची तपश्चर्या.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या त्या व्यक्तीचे नाव होते कैलास सांखला.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

भारत सुरुवातीपासूनच शिकारीच्या खेळासाठी प्रसिद्ध देश. राजे-रजवाड्यांच्या काळात वाघ, सिंह यांच्या शिकारी विशेष मनोरंजनाचा खेळ मानला जाई. ब्रिटिशकालीन भारतात वाघ, सिंहाच्या प्रचंड निष्काळजीपणे शिकारी करण्यात आल्या.

शिकार करून त्या प्राण्यांचे मांस काढून त्यात लाकडाचा भुसा भरून राजमहालात ठेवले जात असे. महालात शिकार करून आणलेले जेवढे जास्त प्राणी दिसतील तेवढा त्या राजाचा रुबाब जास्त असे मानले जायचे.

स्वातंत्र्योत्तर काळात तर या शिकारीच्या संख्येत अजूनच भर पडली. जगभरातील शिकारप्रेमी लोक भारतात येऊन स्थानिक ट्रॅव्हल एजंट्सला हाताशी धरून त्यांना किरकोळ आमिष दाखवून आपला कार्यभाग साधून घेत.

प्रसिद्ध वन्यजीव शास्त्रज्ञ जॉर्ज शँलर १९६० साली जेव्हा भारतात आले तेव्हा भारतात खऱ्या अर्थाने वन्यजीव संवर्धन क्षेत्रात अभ्यास सुरू झाला. त्यांच्या येण्याआधी ब्रिटिशांनी वन्यजीवांबाबतच्या अनेक गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. शिकारीची आवड असणारे लोक इथल्या वाघांच्या सौंदर्याला भुलून जात. पण अंतिमतः त्यांची शिकारच करत. या वाढत्या शिकारींमुळे वन्यजीव संपत्तीतून ही प्रजात आपल्या डोळ्यासमोर नामशेष होण्याच्या मार्गावर होती.

कान्हा व इतर काही अभयरण्यांचा अभ्यास केल्यावर जॉर्ज शँलर यांनी ‘The deer and The tiger’ नावाचे पुस्तक लिहिले, जे १९६७ साली प्रकाशित झाले. ज्यात या खुर असलेल्या सस्तन प्राण्यांच्या व बंगालच्या वाघाच्या चार प्रजातींचे पर्यावरणीय वर्णन केले होते शिवाय सूक्ष्म व तपशीलवार माहिती नमूद करण्यात आली होती.

भारतात खरोखर वन्यजीव संवर्धनाची सुरुवात १९७०च्या काळात झाली. ज्या काळात संसदेने खालील महत्वाचे कायदे पारित केले-

  1. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२
  2. व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९७३
  3. स्टॉकहोम डिक्लेरेशन १९७२
  4. Convention on International Trade in Endangered Species.

व्याघ्रप्रकल्पाचे पहिले संचालक म्हणून कैलास सांखला यांची निवड करण्यात आली. भारताच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणारे, वाघांच्या दैनंदिन सवयीपासून त्यांचे वागणे, त्यांच्या संख्येची गतिशीलता यावर काम करणारे ते पहिलेच क्षेत्र अधिकारी.

कैलास सांखला यांचा जन्म ३० जानेवारी १९२५ जोधपूर येथे झाला. वडिलांची इच्छा कैलास यांनी इंजिनियर व्हावे अशी होती मात्र त्यांनी वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन जीवशास्त्राची पदवी घेतली. जोधपूरच्याच जसवंत महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर १९५३ साली भारतीय वन महाविद्यालयातून वन्यजीवशास्त्राची पदवी घेतली व त्याच वर्षी भारतीय वनसेवेत रुजू झाले. पहिली पोस्टिंग होती राजस्थान.

“The story of indian tiger”  या पुस्तकात ते राजस्थानचे वर्णन, “माझ्या भविष्याला आकार देणारे ठिकाण” असे करतात.

कैलास सांखलांचे नातू अमित सांगतात, स्वतः कैलास यांनी सुरुवातीच्या काळात वाघाच्या शिकारीसाठी परवानग्या जारी केल्या होत्या. पण एक क्षणी एका वाघाच्या शिकारीनंतर त्यांचे आयुष्यच पालटले. त्यांना त्या गोष्टीचा एवढा पश्चात्ताप झाला की त्यांनी व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले आणि उर्वरित सर्व आयुष्य व्याघ्र संरक्षण आणि संवर्धनासाठी खर्ची केले.

स्वतः कैलास सांखला आपल्या पुस्तकात या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतात,

मला अजूनही तो प्रसंग स्पष्टपणे आठवतो जेव्हा शिकार केलेला तो वाघ डोळे उघडे ठेवून माझ्यासमोर मृतावस्थेत पडला होता. माझ्या पाश्चात्तापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी मी माझे आयुष्य वाघांसाठी व्यतीत करायचे ठरवले.

त्यांनी १९५६ साली राजस्थान वन्यजीव मंडळाला पत्र लिहून वाघांच्या शिकारीवर बंदी घालावी असा आग्रह धरला. वाघांच्या शिकारीविरुद्ध आवाज उठवणारे कदाचित ते पहिलेच भारतीय. जवळपास दशकानंतर त्यांना दिल्लीच्या प्राणिशास्त्र उद्यानाचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. वाघांच्या निर्यातीचा मागोवा घेणारी प्रणाली त्यांनीच सुरू केली.

१९६५ ते ७०च्या दरम्यान दिल्ली प्राणिसंग्रहालयाचे संचालक असताना, जेव्हा त्यांचे वाघांच्या संदर्भातले काम वाढू लागले तेव्हा त्यांनी स्थानिक माध्यमांचा विरोध न जुमानता लोकांच्या मनोरंजनासाठी प्राण्यांच्या होणाऱ्या वापरावर निर्बंध घातले. प्राण्यांसाठी निर्माण करण्यात येणारे क्वार्टर्सही जास्तीत जास्त नैसर्गिक अधिवासासारखे बनवण्यात येऊ लागले. आसपासच्या उपलब्ध असणाऱ्या वाघांवर त्यांनी सखोल संशोधन सुरू केले.

१९६७ साली त्यांनी वाघ आणि बिबट्या यांच्या कातडीच्या तस्करीबाबत सखोल तपास करून समोर आलेल्या बाबी थेट इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर प्रकाशित केल्या. दोन वर्षांनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रकृती संवर्धन संघाचे वाघांच्या झपाट्याने कमी होणाऱ्या संख्येकडे लक्ष वेधले व त्यावर त्वरित पाऊले उचलण्याची विनंती केली.

खरंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या स्तरावर जनसमर्थन मिळवून त्यांना तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचं वाघांच्या शिकारीवर बंदी घालण्यासाठी मन वळवायचं होतं. अनेक महाराजा लोकांनी या विनंतीमागचं चातुर्य ओळखलं होतं.

अमित म्हणतात, “जंगलात जाऊन वाघांची शिकार करणे हे पूर्वीच्या राजा महाराजांचे आवडते मनोरंजन होते पण एक दिवस असा येईल की भारतीय जंगलात वाघच शिल्लक राहणार नाहीत हा विचारच ते करू शकत नव्हते.”

सांखला यांना मे १९७० साली मनापासून हवी असणारी जवाहरलाल नेहरू फेलोशिप मिळाली ती त्यांच्या ‘The controversial tiger: A study of ecology, behavior and status’ या प्रकल्पासाठी!

या फेलोशिपमुळे त्यांना वन्यजीव संवर्धन क्षेत्रात ठोस काम करण्यासाठी अनेक दारं उघडले. या संधीचा फायदा घेत त्यांनी भारतात शिल्लक असणाऱ्या वाघांची संख्या मोजण्याचे मोठे पाऊल उचलले.

सप्टेंबर १९७० मध्ये त्यांनी तत्कालीन पर्यटन व नागरी उड्डाण मंत्री करण सिंह यांना वाघांची, बिबट्यांची आणि त्यांच्या कातडीची होणारी निर्यात यांवर बंदी घालण्यासाठी तयार केले. पुढच्या दोन वर्षात भारताच्या विविध भागात शिल्लक राहिलेल्या वाघांच्या संख्येचा आढावा घेतला.

दरम्यान वन्यजीव संरक्षणासाठी नेहमी आवाज उठवणाऱ्या एने राईट यांनी १९७१ साली एक लेख लिहिला ज्यात त्यांनी कलकत्त्यात होणाऱ्या वाघांच्या व बिबट्यांच्या कातडीच्या अवैध विक्रीचा तपशील जगासमोर मांडला. व्याघ्र संवर्धनाचा मुद्दा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा एक प्रयत्न होता.

याची फलश्रुती म्हणजे तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी वाघांच्या संदर्भात काम करणारी स्थापन केलेली कार्यसमिती. समितीचे अध्यक्ष करण सिंह यांना नेमण्यात आले तर कैलास सांखला, एने राईट, डॉ. एम. के. रणजितसिंह, जफर फतेहली हे या समितीचे सदस्य होते.

९ सप्टेंबर १९७२ रोजी भारतीय संसदेने वन्यजीव संरक्षण अधिनियम पारित केला. प्राण्यांच्या व वनस्पतींच्या दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणासाठी हा कायदा वरदान ठरला.

१९७३ साली इंदिरा गांधींनी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केली, ज्याचे प्रथम संचालक होते श्री. सांखला.

अमित सांगतात, “व्याघ्र अभयरण्यांची निर्मिती करत असताना सर्वांत मोठे आव्हान होते स्थानिकांच्या पुनर्वसनाचे. अभयारण्याच्या सीमा आखणे, अधिकारी-नागरिक यांचा ताळमेळ करणे शिवाय हे सगळं काही खेळीमेळीच्या वातावरणात होणे महत्त्वाचे होते.”

कैलास सांखला १९७६ पर्यंत व्याघ्र प्रकल्पाचे संचालक राहिले. मात्र त्यांचं योगदान संचालक असेपर्यंतच मर्यादित नव्हते.

ज्येष्ठ वनसेवा अधिकारी रमेश पांडे म्हणतात, “सांखलांच्या कामाची खरी छाप त्यांनी करून ठेवलेल्या संशोधनात आहे. त्यांच्या पुस्तकात त्यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणाची झलक बघायला मिळते. ते तासनतास व्याघ्र निरीक्षण करत असत. वाघांची वागणूक, आपला भूभाग ठरवण्याची पद्धत, एकमेकांना हाक मारायची पद्धत या सर्वांचे ते निरीक्षण करत.”

‘७६ साली व्याघ्र प्रकल्पाचे संचालकपद सोडल्यावरही त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. त्यांनतर त्यांची ३ पुस्तकेही प्रकाशित झाली. १९७८ते ८३ दरम्यान ते राजस्थानचे वन्यजीव अधिकारी राहिले.

१९९२ साली त्यांना बहुमानाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वाघांच्या स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या या अवलियाचे भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट १९९४ रोजी निधन झाले.

१९७३ साली व्याघ्र प्रकल्प सुरू झाला, तेव्हा भारतात एकूण ९ अभयारण्यात मिळून केवळ २६८ वाघ शिल्लक होते. सध्याच्या घडीला देशभरात ५० अभयारण्यात मिळून जवळपास ३००० वाघ आहेत. वाघांच्या संख्येतील या वाढीला निर्विवादपणे १५ वर्षे काम करणारी यंत्रणा कारणीभूत आहे.

राष्ट्रीय उद्यानांना आता वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण प्राप्त झाले आहे. या भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई  करण्यात येते.

व्याघ्र प्रकल्पासाठी २००५ साली राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत दरवर्षी व्याघ्रगणना केली जाते. व्याघ्र प्रकल्प आता फक्त प्रकल्प राहिला नसून ही एक यंत्रणाच बनली आहे. या क्षेत्रात अनेक आव्हाने आपल्यासमोर आ वासून उभे आहेत. जसे की प्राणी-मानव यांच्यातील संबंध सुधारणे, अभयारण्याच्या परिसरात राहणाऱ्या वनवासी लोकांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी ताळमेळ ठेवणे इत्यादी.

पण या सर्व समस्यांचे उत्तर कैलास सांखलांनी आधीच देऊन ठेवले आहे. ते म्हणतात, “भारताच्या मातीतच काहीतरी जादू आहे जी संवर्धनाला प्रेरक आहे आणि माणूस निसर्गाच्या या भव्य जाळ्याचा एक पातळ धागा आहे.”

आज या ‘टायगर मॅन’मुळे भारतातील वाघ सुरक्षित आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Project Tiger
ShareTweet
Previous Post

एकेकाळी मोबाईल जगताचा राजा असलेली मोटोरोला आज नामशेष का झाली?

Next Post

कादंबिनी गांगुली : रूढी-परंपरांचा पगडा मोडून सामाजिक क्रांती करणारी पहिली महिला डॉक्टर

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

कादंबिनी गांगुली : रूढी-परंपरांचा पगडा मोडून सामाजिक क्रांती करणारी पहिली महिला डॉक्टर

याने १८५७ साली अटलांटिक महासागरात केबल्स टाकून अमेरिका आणि युरोपला जोडलं आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.