आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जिद्द असेल तर मनुष्य आयुष्यात कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो. भले ती अडचण शारीरिक विकलांगतेची असू देत. असाच एक जिद्दी माणूस आहे सत्येंद्र सिंह, ज्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण असलेल्या विकलांगतेवर मात करून एक मोठा विक्रम केला आहे. तो कॅटालीन आणि इंग्लिश खाडी पोहून ओलांडणारा आशियातला पहिला विकलांग खेळाडू ठरला आहे.
ग्वाल्हेरचा रहिवासी असलेला सत्येंद्र सिंह हा शरीराने ७०% विकलांग आहे. त्याला चालता येत नाही. व्हीलचेअरवर तो आपलं दैनंदिन आयुष्य जगतो आहे.
पण अफाट इच्छाशक्तीच्या बळावर त्याने पोहण्याची कला अवगत करून अगदी धडधाकट असलेल्या लोकांनासुद्धा अवघड वाटणाऱ्या इंग्लिश आणि कॅटालीना खाडीला त्याने ओलांडले आहे.
सत्येंद्र जन्मापासून विकलांग आहेत. एवढं असूनही त्यांच्या पालकांनी त्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला. सत्येंद्रचे वडील हे एका बँकेत सिक्युरिटी गार्ड होते. अत्यल्प उत्पन्नात ते आपल्या घराचा कारभार चालवत होते. सत्येंद्र विकलांग असल्याने परिवारावर भार आहेत असे त्यांच्या परिवाराने त्यांना भासवले नाही.
आपल्या हालाखीची धग त्याच्यापर्यंत पोहचू दिली नाही. २००७ साली सत्येंद्रने पदवीला प्रवेश घेतला. बालपणीच त्याला पोहण्याची कला गवसली. त्याला पोहताना बघून गावकरी आश्चर्यचकित होत होते. पण पदवीला गेल्यावर त्याच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली.
ग्वाल्हेरमध्ये शिक्षण घेत असताना सत्येंद्रची भेट प्रोफेसर डॉ. वि. के. डबास यांच्याशी झाली. ते शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख होते. ते लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या जलतरण विभागाचे देखील प्रमुख होते. त्यांनी सुरेंद्रला स्विमिंगसाठी प्रोत्साहित केले. २००७ साली सुरेंद्रला पहिल्यांदा भेटल्यावरच त्यांनी त्याला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली होती.
मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवत सुरेंद्रने आपली प्रतिभा दाखवून दिली.
२००९ सालच्या राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत त्याने स्विमिंगमध्ये कांस्यपदक मिळवले, या स्पर्धेत तब्बल ४०० लोक सहभागी झाले होते.
त्यानंतर त्याने कधी मागे वळून बघितले नाही. काही काळातच सत्येंद्र जागतिक स्तरावरच्या स्पर्धांचा भाग बनला आणि त्याने त्या स्पर्धात यश मिळत गेलं. २०१४ साली मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं. २०१९ साली त्याला राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ह्या पुरस्काराला दिव्यांगजन पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते.
मार्च २०१९ मध्ये सत्येंद्रने चार जणांच्या टीम बरोबर इंग्लिश खाडी पार करण्याचा पराक्रम केला. ती संपूर्ण खाडी पोहून पार करायला त्यांना १२ तास २६ मिनिटं इतका वेळ लागला. ह्यामुळे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्याचा नावाची नोंद झाली. पुढे ऑगस्ट २०१९ मध्ये एक अशक्यप्राय गोष्ट सत्येंद्रने शक्य करून दाखवली.
त्याने तब्बल ३६ किमी लांबीची कॅटलिना खाडी १० तास ५९ मिनिटात ओलांडली. थंडगार वारे, बर्फयुक्त पाणी, शार्क आणि विषारी अशा जेली फिश असे अनेक जीवघेणे धोके असलेल्या कॅटलिना खाडीला जगातील सर्वात भयानक पोहचण्याची जागा असा बिरुद मिळाला आहे.
अशा ह्या अत्यंत भयानक कॅटोलीना खाडीला पार करून सत्येंद्रने एक विक्रमच केला आहे.

सत्येंद्र आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या वडिलांना देतो. सत्येंद्र म्हणतो की तो दिव्यांग असून देखील त्यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मला त्यांनी मार्गदर्शन केलं. आपली जमीन विकून मला शिकवलं. त्यांच्या व आईच्या पाठिंब्याशिवाय हे यश मिळवणे अशक्य होते. सत्येंद्रने अनेक मुलाखती आणि मीडिया कॉन्फरन्सेसमध्ये आपला इंग्लिश खाडी आणि कॅटलिना खाडीमध्ये पोहण्याचा अनुभव सांगितला आहे.
त्याच्या मताने कॅटालिना खाडी एक फार मोठे आव्हान होते. अंगावर काटा आणणारी थंडी, अत्यल्प तापमान, बर्फयुक्त पाणी सोबतच शार्क आणि जेलीफिशसारख्या अत्यंत जीवघेण्या प्राण्यांचा धोका असून देखील मी हिंमत करून त्या खाडीत उतरलो.
मला फक्त माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि मी फक्त त्या आत्मविश्वासाने ती संपूर्ण खाडी अगदी सुखरूपरित्या पार केली. मी जिवंत परतेल का ह्याबाबत मी साशंक होतो. पण मी परतलो.
अपंगत्व हा एक अभिशाप आहे, असं समजणे त्याला आवडत नाही. सत्येंद्र म्हणतो, अपंगत्व ही त्याची खरी ताकद असून, त्यामुळेच तो स्वतःच्या आतल्या शक्तीचा शोध घेऊ शकला आहे. तो म्हणतो जास्तीत जास्त अपंग लोकांनी खचून न जाता आपली आवड जोपासायला हवी. मग नक्कीच आपण कोणापेक्षाही कमी नाही हे सिद्ध करू शकतो.
आज आपल्या अपंगत्वावर मात करून सुरेंद्रने जे यश कमावलं आहे, ते निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









