आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
ज्युरासिक वर्ल्डमध्ये दिसणारे ते महाकाय डायनासॉर्स आत्ता काल्पनिक असले तरी एकेकाळी पृथ्वीवर असे जीव अस्तित्वात होते. तसं तर ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोर्ससारखे महाकाय प्राणी पृथ्वीवरून नष्ट झाले आहेत हे विज्ञानाने सिद्ध केलं. पण विज्ञानाच्या या सिद्धांतावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांच्या मते काही वर्षांपूर्वी डायनासॉर्स माणसांबरोबरच पृथ्वीवर राहत होते.
असं असलं तरी कोणत्याही माणसाने जिवंत डायनासॉर पाहिल्याची नोंद इतिहासात नाही आणि याचे प्रमुख कारण म्हणजे, ‘पॅलेओन्टोलॉजिकल’ सिद्धांतांनुसार, पृथ्वीवर आदिमानव येण्याच्या ६३ दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासॉर्ससारखे प्राणी पृथ्वीवरून कायमचे नाहीसे झाले. पण अनेक पौराणिक, धार्मिक कथा आणि काही ऐतिहासिक गोष्टींमुळे या सिद्धांतावर अनेक प्रश्नचिन्हे देखील उभी केली गेली, डायनासॉर्स नाहीसे झाले नव्हते तर ते मानवांसोबत एकत्र राहिले आहेत, असाही काहींचा दावा आहे. या ‘सायफाय’ मताबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आजचा हा विशेष लेख..
जगातील प्रत्येक प्राचीन संस्कृतींमध्ये सरपटणारे अवाढव्य प्राणी, थोडक्यात डायनासॉर्स अस्तित्वात असल्याची अनेक चिन्हे दिसतातच. ड्रॅगनफ्लाय आणि मॉन्स्टर्सपासून ते आशियाई ‘ड्रॅगन’पर्यंत, मानवजातीचा संपूर्ण इतिहास अशा प्रकारच्या भयाण जीवांच्या वर्णनांनी भरला आहे. या सगळ्याला जरी श्रद्धा, भावना किंवा इमॅजिनेशन अशी नावे देण्यात आली असली तरी ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या प्रचंड प्रलयानंतर सर्व डायनासॉर्स नाहीसे झाले नव्हते हे विसरून चालणार नाही.
‘लॉच नेस राक्षस’, ‘यती’ किंवा त्यासारख्या काही प्राण्यांचे अस्तित्व फक्त ‘क्रिप्टोझूलॉजी’मध्ये आहे. वास्तविक जगामध्ये त्यांच्या अस्तित्वाचे सबळ पुरावे नाहीत. परंतु हा लेख आणि काही तज्ज्ञांचे डायनासॉर्सच्या अस्तित्वाबद्दलचे मत हे क्रिप्टोझूलॉजीवर आधारित नसून सबळ ऐतिहासिक आणि पुरातत्वशास्त्रीय पुराव्यांवर आधारित आहे.
ईसा खडक:
१५६२ साली अमेरिकेत विजयी ठरलेल्या स्पॅनिश लोकांनी दक्षिण अमेरिकेत मिळालेल्या प्रचंड सोन्याव्यतिरिक्त ‘अँडसाइट’ दगडांसारख्या अनेक रहस्यमयी कलाकृतीदेखील युरोपात आणल्या. स्पॅनिश लोकांनी आणलेल्या अँडसाइट दगडांवर डायनासॉर्ससारख्या महाकाय प्राण्यांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या. या दगडांचा सर्वांत पहिला उल्लेख १५२६ साली झालेला दिसून येतो. १५२६ साली झालेल्या क्लॉडिओ पिझारोच्या मोहिमेत फादर सायमन नावाच्या ‘जेझुएट पादऱ्याने’ आपल्या दैनंदिन जर्नलमध्ये या दगडांचा उल्लेख केला होता.
पुरातत्वशास्त्राचे तत्कालीन विद्यार्थी आणि संशोधक या दगडांवरील प्राण्यांच्या चित्रांना ‘प्री-कोलंबियन’ काळातील कथांमधील महाकाय प्राणी मानत असत. त्यांच्यामते हे प्राणी ‘प्री-कोलंबियन’ काळातील कथांमधील ‘काल्पनिक पात्र’ होते. पण १९३० साली लागलेल्या एका आश्चर्यकारक शोधाने त्यांचे हे मत विलक्षणरित्या बदलले.
१९३० साली पेरूच्या ‘इका’ परिसरात, पुरातत्वशास्त्रज्ञांनी विविध थडग्यांमध्ये अशा प्रकारच्या दहा दगडांचा शोध लावला. त्यावेळी संशोधकांना या ५०० ते १५०० वर्षांपूर्वीच्या रेखाचित्रांमध्ये लाखो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनासॉर्सचे तपशीलवार वर्णन सापडले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या दगडांवरील चित्रांवर सरपटणारे महाकाय प्राणी (ट्रायसेराटॉप्स, स्टेगोझॉर किंवा टेरोसॉर) मानवाच्या सहवासात असल्याचे दाखवले गेले आहे. ‘अशा प्रकारचे ११०० पेक्षा जास्त खडक सापडलेले असून त्यापैकी बहुतेक खडकांवर तत्कालीन लोकांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग रेखाटलेले आहेत आणि अगदी काहीच खडकांवर डायनासॉर्ससारख्या महाकाय सरपटणाऱ्या प्राण्यांची चित्रे आहेत.’ असा युक्तिवाद पेरूच्या सांस्कृतिक मानववंशशास्त्र केंद्राचे प्रतिनिधी डॉ. जेवियर कॅब्रेरा यांनी केला.
सिव्हिल वॉ*रमधील टेरोसॉर:
पृथ्वीवर सर्वांत प्राचीन अस्तित्व असलेल्या महाकाय प्राण्यांचे सर्वात अलीकडील फोटोज् १८८० सालच्या आसपास ‘टॉम्बस्टोन’च्या स्थानिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहेत. या वर्तमानपत्रातील बातमीच्या शीर्षस्थानी असलेल्या फोटोमध्ये अनेक सैनिक एका विशाल पक्ष्याच्या मृत शरीराजवळ उभे असल्याचे दिसते. या सैनिकांनी बंदुकीच्या अनेक गोळ्या झाडून या महाकाय पक्ष्याला खाली पाडले होते. फोटोतील प्राणी खरं तर टेरोसॉर होता हे कोणाच्याही लक्षात आले नाही असे दिसते.
अजूनही बहुतांश लोक हा फोटो खरा आहे यावर विश्वास ठेवत नाहीत आणि ठेवणारही नाहीत. पण त्याकाळी फोटोशॉपसारख्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या हेसुद्धा लक्षात ठेवायला हवे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या घटनेचा कोणताही दुसरा पुरावा उपलब्ध नाही. परंतु असे महाकाय प्राणी काळाबरोबर उत्क्रांत झाले आहेत हे अनेकांना समजले नाही. उत्क्रांत झाल्याने त्यांच्या आकारामध्ये बदल होऊन ते अवाढव्य राहिले नाहीत. पण त्यांची वाईट आणि भयाण वैशिष्ट्ये टिकून राहिली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.