आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताला ज्ञानाबरोबरच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात पहिल्यापासूनच मोठे यश मिळाले आहे. हीच परंपरा आजही अबाधित ठेवत अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू भारताचा मान वाढवतात, टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सानिया मिर्झा यांचा आज जन्मदिवस, त्यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न..
प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा, या त्यांच्या शक्तिशाली ‘फोरहँड ग्राउंड स्ट्रोक’साठी प्रसिद्ध आहेत. एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारात त्या सर्वोच्च मानांकित महिला टेनिसपटू आहेत.
क्रीडा पत्रकार इम्रान मिर्झा आणि गृहिणी असलेल्या नसीमा यांच्या पोटी १९८६ साली जन्मलेल्या सानियाचे पालन-पोषण हैदराबादमधील एका मुस्लिम कुटुंबात झाले.
तिने हैदराबादच्या ‘निजाम क्लब’ येथे वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. दिग्गज भारतीय माजी टेनिसपटू महेश भूपती यांचे वडील सीजी कृष्णा भूपती यांच्याकडून तिने प्रारंभिक टेनिसचे प्रशिक्षण घेतले. सानियाचे कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, त्यांनीच तिला हा खेळ प्रोफेशन म्हणून स्वीकारण्यास प्रवृत्त केले. महेश भूपतीनेही प्रोफेशनल टेनिसपटू म्हणून तिची कारकीर्द घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. एक काळ असाही होता जेव्हा सानियाचे पालक तिच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलू शकले नाहीत. त्यावेळी तिचे वडिल तिचे प्रशिक्षक बनले.
अगदी रॅकेट पकडायला शिकल्यापासून, जर्मनीची माजी जागतिक नंबर एक टेनिसपटू स्टेफी ग्राफ ही तिची प्रेरणा आहे. तिचे वडील इम्रान मिर्झा हे तत्कालीन बॉम्बे आणि हैदराबाद स्टेट्ससाठी क्रिकेट खेळले होते. तर तिचे आजोबा हैदराबाद राज्याचे टेनिसपटू होते. सानियाला देखील एक प्रभावी क्रीडा पार्श्वभूमी आहे.
सानिया मिर्झा यांनी १९९९ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यास सुरुवात केली, परंतु त्यांनी २००३ साली टेनिसमध्ये खऱ्या अर्थाने आपले करियर बनवायला सुरुवात केली. सानिया यांनी ज्युनियर खेळाडू म्हणून १० एकेरी आणि १३ दुहेरी विजेतेपदे जिंकली. एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि आफ्रो-एशियाई गेम्स यासारख्या प्रमुख क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी १४ पदके जिंकली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी स्वेतलाना कुझनेत्सोवा, वेरा झ्वोनारेवा, मेरियन बार्टोली, मार्टिना हिंगीस, दिनारा सफिना आणि व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यावर उल्लेखनीय विजय मिळवले आहेत. १२ वर्षे प्रोफेशनल टेनिसपटू म्हणून खेळल्यानंतर, सानिया यांनी २०१५ साली विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये आपल्या पहिल्या महिला दुहेरी स्पर्धेत विजेतेपद मिळवले.
सानिया यांनी २०१० साली पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी विवाह केला. हा विवाह फक्त दोन कुटुंबांसाठीच नाही, तर सतत तणावपूर्ण वातावरण असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांसाठीही एक मोठा प्रसंग होता. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्यावर खूप टीका झाली. टेनिस कोर्टवर स्कर्ट घालण्यापासून ते पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करण्यापर्यंत त्यांनी अनेक आरोपांचा सामना केला.
एक काळ असाही होता जेव्हा त्यांच्या विरोधात शॉर्ट स्कर्ट घालून खेळल्याबद्दल फतवा काढण्यात आला आणि “अभद्र कपडे” परिधान केल्याचा आरोप होत होता, परंतु त्यांनी निर्भय राहून स्कर्टमध्ये टेनिस खेळणे सुरू ठेवले. या महान खेळाडूला अनेकदा देशद्रोही मानले गेले आणि भारताच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याचा आरोप केला गेला.
नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याच्या ब्रँड ॲम्बेसेडर बनवल्यानंतर त्यांना ‘पाकिस्तानची सून’ असल्याबद्दल खूप टीकेला सामोरे जावे लागले. मुस्लिम कट्टरतावादी गट आणि काही तथाकथित राष्ट्रवाद्यांकडून सतत शाब्दिक ह*ल्ले होत असतानाही, मिर्झा मोठ्या सन्मानाने देशाचे प्रतिनिधित्व करत राहिल्या.
सर्व अडचणींना यशस्वीपणे सामोरे जाणारी सानिया ही एक प्रबळ इच्छाशक्ती असलेली महिला आहे. त्यांच्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे २०१३ साली त्यांना एकेरी खेळून निवृत्त व्हावे लागले. २०१२ साली दुखापतींच्या मालिकेनंतर, त्यांच्या कारकिर्दीतील २७ ची सर्वोत्तम रँकिंग १०४ वर गेली. परंतु दुखापतीमुळे त्यांची यशस्वी घोडदौड संपणार नव्हती.
त्यानंतर त्या पूर्णपणे दुहेरीत खेळल्या आणि डब्लूटीए रँकिंगमधील पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला, इतकंच नाही तर २०१५ साली त्यांनी पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले. एकेरीमध्ये जगातील अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणाऱ्या, तसेच एकेरी आणि दुहेरीमध्ये डब्लूटीए विजेतेपद पटकावणाऱ्या सानिया मिर्झा एकमेव भारतीय महिला आहेत.
टेनिस हा केवळ पुरुषांचा खेळ नाही हे त्यांनी सिद्ध केले आणि महिलांसाठीचे सर्व जाचक नियम मोडून काढले. त्या पहिल्या भारतीय महिला टेनिसपटू आहेत हे लक्षात घेऊन २००४ साली ‘आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने’ ‘सेव्ह द गर्ल चाईल्ड’ मोहिमेची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही त्यांची नियुक्ती केली होती. अजूनही स्त्री भ्रूणह*त्या होत असलेल्या समाजात जागरूकता वाढवण्याची भूमिका त्यांना सोपवण्यात आली होती.
आज सानिया आगामी टेनिसपटूंसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तिच्या यशामुळे तिला मोठे फॅन फॉलोइंग मिळाले आहे आणि तिची स्टारडममध्ये वाढ ही देशभरातील तरूण क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणा आहे. विविध चॅम्पियनशिप आणि पदके जिंकण्याबरोबरच टेनिसमधील योगदानाबद्दल सानिया यांना २००४ साली अर्जुन, २००६ साली पद्मश्री, २०१५ साली मेजर ध्यानचंद खेलरत्न (राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार), २०१६ पद्मभूषण इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानकडून सानिया मिर्झा यांना कोणतेही पुरस्कार मिळालेले नाहीत. दक्षिण आशियासाठी युनायटेड नेशन्स गुडविल ॲम्बॅसॅडर म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला देखील आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










