The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एडविन एच. आर्मस्ट्राँग – एफएम रेडियो तंत्रज्ञानाचा ‘अनसंग हिरो’

by Heramb
29 October 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पंधराव्या-सोळाव्या शतकापासून युरोपसह जगभरात अनेक वैज्ञानिक शोध लागू लागले. पंधराव्या-सोळाव्या शतकापासूनच वैज्ञानिक प्रगतीने कळस गाठला याला अनेक कारणे असू शकतील. याच काळात जगाने न्यूटनसारखे अनेक महान शास्त्रज्ञ पहिले. भौतिकशास्त्राबरोबरच न्यूटनने कॅल्क्युलसच्या क्षेत्रात अविश्वसनीय कामगिरी करून अभियांत्रिकी क्षेत्राला एका नव्या उंचीवर आणून ठेवले. न्यूटनच्या भौतिकशास्त्र आणि गणितशास्त्रातील योगदानाबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याच्याच अनेक समकालीन शास्त्रज्ञांनी याच क्षेत्रांमध्ये आपले बहुमूल्य योगदान दिले आहे.

अशाच अनेक शास्त्रज्ञांपैकी एक म्हणजे नागरिकत्वाने जर्मन असलेला ‘लेबनीज’. आजमितीसही कॅल्क्युलसमधील लिमिट्स आणि इंटिग्रेशनमध्ये न्यूटनच्या सूत्रांबरोबरच लेबनीजचे सूत्रही वापरले जाते. पण अभियांत्रिकी आणि त्या संबंधित अभ्यास करणाऱ्या लोकांव्यतिरिक्त किती सामान्य माणसांना लेबनीजच्या योगदानाबद्दल माहिती असेल?

तर त्या काळात ‘फेलो ऑफ रॉयल सोसायटीचा’ सदस्य असल्याने सर आयझॅक न्यूटनचा सर्वत्र दबदबा होता. न्यूटनलासुद्धा आपल्या संशोधनाचा आणि कर्तृत्वाचा प्रचंड अभिमान होता. शिवाय तो ब्रिटिश असल्याने संपूर्ण जगामध्ये त्याला प्रसिद्धीच्या उच्चासनावर स्थान देण्यात आले.

असंच काहीसं घडलं निकोला टेसला आणि एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँगच्या बाबतीत. निकोला टेसलाचेही भौतिकशास्त्रात बहुमूल्य योगदान आहे. इंडक्शन मोटर, ए. सी. मोटर, रेडियो कंट्रोल यांसारखी अनेक महत्त्वपूर्ण उपकरणे तयार करण्याचे श्रेय फक्त निकोला टेसलाला जाते. वास्तविक, निकोला टेसला ऑस्ट्रियन नागरिक होता, कालांतराने तो अमेरिकेत स्थायिक झाला.



असे असले तरी ज्या शास्त्रज्ञाचे आधुनिक ‘रेडियो कम्युनिकेशन’ तंत्रज्ञानात मोलाचे योगदान आहे, त्या शास्त्रज्ञाला अभियांत्रिकी शाखा किंवा विज्ञान शाखाही पूर्णपणे विसरली आहे तर सामान्य नागरिकांना तो कसा माहित असेल? आधुनिक ‘रेडियो कम्युनिकेशन’ तंत्रज्ञानाची पायाभरणी करणारा ‘एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँग’ क्वचितच काही जणांना माहिती असेल. एडविन आर्मस्ट्राँगबद्दल आणि त्याच्या वैज्ञानिक योगदानाबद्दल जाणून घेण्यासाठी आजचा हा विशेष लेख..

टेसलाप्रमाणेच आर्मस्ट्राँगसुद्धा इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा तज्ज्ञ होता. इतर अनेक शास्त्रज्ञांप्रमाणेच आर्मस्ट्राँग एकाकीपणे काम करत असे. कोणताही नियम-कायदा त्याच्या मार्गात आला तर तो असा नियम-कायदा बिनधास्तपणे झुगारून लावत. त्याने अनेक मोठ्या संस्थांबरोबर काम केले असले तरी त्याचे बहुतांश आयुष्य ‘पेटन्ट’ मिळवण्याच्या संघर्षातच गेले. त्याच्या फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनच्या (एफएम) संशोधनामुळे रेडियो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक उत्कृष्ट संशोधने होऊ शकली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

आर्मस्ट्राँगचे उद्दिष्ट टेसला किंवा अन्य कोणत्याही शास्त्रज्ञाला पाण्यात पाहण्याचे किंवा त्यांच्याबरोबर स्पर्धा करण्याचे अजिबात नव्हते. प्रस्तुत लेखाचेही असे काही उद्दिष्ट नाही. आधीही सांगितल्याप्रमाणे निकोला टेसलाचे आधुनिक तंत्रज्ञानातील योगदान अत्यंत मोलाचे आहे हे कोणीही अमान्य करू शकत नाही. आधुनिक जगातील अनेक अविष्कारांच्या पायाभरणीचे काम टेसला यांनी आपल्या संशोधनातून केले. त्यांच्या अल्टरनेटिंग करंटच्या (एसी) शोधामुळेच आज घराघरांमध्ये आणि प्रत्येक कार्यालयामध्ये सुरक्षितरितीने वीजपुरवठा होतो.

परंतु, अनेक जण टेसलाला ‘अनसंग हिरो’ म्हणतात. वास्तविक पाहायला गेलं तर हे चुकीचं ठरतं. पुस्तके, नियतकालिके, कार्टून्स आणि अनेक चित्रपटांमधून टेसलाचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व समाजासमोर ठेवण्यात यश आले आहे. इतकंच नाही तर जगप्रसिद्ध नायगरा धबधब्याजवळ निकोला टेसलाचे स्मारक आहे. याच ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम जलविद्युत प्रकल्प तयार केला होता. आर्मस्ट्राँग कदाचित टेसलासारखा ‘बोल्ड आणि मॅग्निफिसेंट’ नसल्याने त्याच्याकडे तत्कालीन ‘पॉप’ कल्चरने पूर्णतः दुर्लक्ष केले.

१८९० साली न्यूयॉर्क शहरात जन्मलेला आर्मस्ट्राँग टेस्लापेक्षा वयाने लहान होता. लहानपणी, त्याने आपला बहुतेक वेळ, शाळेत आणि इतरत्र, वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात घालवला. आर्मस्ट्राँग न्यूयॉर्कमधील योंकर्समध्ये एका हायस्कूलचा प्रमुख होता, तेव्हा त्याने वेस्ट फ्लोरिडा येथून येणारा टेलिग्राफ सिग्नल पकडू शकेल इतका प्रभावी आणि उंच रेडियो रिसिव्हर बांधला.

आर्मस्ट्राँगने कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले आणि पदवीधर होण्यापूर्वीच अनेक मोठे शोध लावले. प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून त्याने व्हॅक्यूम ट्यूबचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. व्हॅक्यूम ट्यूब हे एक असे उपकरण आहे जे रेडिओ सिग्नल शोधते आणि त्याची फ्रिक्वेन्सी वाढवते, अशा प्रकारे रेडियो सिग्नलची रेंज वाढवली जाते.

आर्मस्ट्राँगच्या आधी ‘ली. डी. फॉरेस्ट’ने १९०६ साली ‘ऑडियन’ म्हणून अशाच उपकरणाचे पेटंट घेतले होते. परंतु डी फॉरेस्टला ऑडियन कसे किंवा का कार्य करते हे समजले नाही. परिणामी, त्याने तयार केलेले उत्पादन पेटन्टच्या दृष्टीने अयोग्य ठरले आणि त्याने तयार केलेल्या व्हॅक्यूम ट्यूब्ससुद्धा कमकुवत होत्या.

१९११ पर्यंत, आर्मस्ट्राँगने व्हॅक्यूम ट्यूब्स कशा पद्धतीने काम करतात यावर सविस्तर विश्लेषण केले आणि सर्किट रीजनरेशनद्वारे रेडिओ सिग्नल वाढवणारे एक उत्कृष्ट तंत्रज्ञान विकसित केले. यामुळे सर्वोत्तम ट्रांसमिशन होत होते. रेडियोवरील संदेशाचा आवाज आता खूप दूर जाऊ शकत होता आणि पूर्वीपेक्षा जास्त मोठ्याने ऐकू येऊ शकत होता.

परंतु आर्मस्ट्राँग तरुण होताच पण त्याच्याकडे संशोधन क्षेत्राचा पुरेसा अनुभवसुद्धा नव्हता. यामुळे त्याने त्याच्या संशोधनाचे डॉक्युमेंटेशन (दस्तऐवजीकरण) काळजीपूर्वक केले नाही. आर्थिक समस्यांमुळे आणि इतर काही कारणांमुळे, तो १९१४ पर्यंत पेटंट किंवा त्याच्या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करू शकला नाही. यादरम्यान डी फॉरेस्टने १९१३ साली याच सिस्टिमसाठी पुन्हा पेटंटचा अर्ज दाखल केला. यामुळे दशकाहून अधिक काळ खटला सुरु होता आणि खटल्याचा अंतिम निकाल डी फॉरेस्टच्या बाजूने लागला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे डी फॉरेस्टला रीजनरेटिव्ह सर्किटचे पेटंट देण्यात आले. नियम-कायदे कसेही असले तरी, आर्मस्ट्राँगला ‘इन्व्हेन्टर’ म्हणून ओळख मिळाली आणि त्याच्या सततच्या संशोधनामुळे त्याने आणखी एक अविष्कार केला, तो म्हणजे, सुपर रिजनरेटिव्ह सर्किटचा. सुपर रिजनरेटिव्ह सर्किटचे पेटन्ट त्याने १९२२ साली घेतले.

आर्मस्ट्राँगच्या आणखी दोन संशोधनांमुळे रेडिओ उद्योग आणि श्रोते या दोघांसाठी रेडियो हाताळणे अतिशय सोपे बनले. पहिला शोध होता, सुपरहेटेरोडायनचा. यामुळे रेडिओला अचूक फ्रिक्वेन्सीनुसार ट्यून करणे शक्य झाले. पहिल्या महायु*द्धात रेडिओ कॉर्प्समध्ये काम करत असताना आर्मस्ट्राँगला सुपरहेटेरोडायनची आयडीया आली होती. त्याने १९१८ साली सुपरहेटेरोडायनचे पेटन्ट दाखल केले.

तर त्यांच्या दुसऱ्या संशोधनाने केवळ रेडिओ जगालाच हदरवले नाही तर दूरदर्शनचे प्रसारणही शक्य केले. हे संशोधन होते फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन अर्थात एफएम (FM) रेडियो बँडचे. रेडिओच्या पहिल्या काही दशकांसाठी, प्रक्षेपण हे ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशनद्वारे (AM) प्रसारित होत असे. आजही भारताचा सरकारी रेडियो, म्हणजेच ‘ऑल इंडिया रेडियो’ प्रामुख्याने ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशनद्वारेच प्रसारित होतो.

पण त्यावेळी सर्वच रेडियो चॅनेल्सचे प्रसारण ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशनद्वारे होत असल्याने, यामध्ये फार ‘नॉईस’ असायचा. यावरच उपाय म्हणून आर्मस्ट्राँगने फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचा (FM) अविष्कार केला. यासाठी त्यांनी १९३३ साली पेटन्ट घेतले. या संशोधनाच्या प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनमुळे ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमधील नॉईस काढून टाकला गेला आणि रेडियो स्पष्ट बोलू लागला होता.

यातही आर्मस्ट्राँगला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आर्मस्ट्राँगला मोठ्या कम्युनिकेशन कॉर्पोरेशन्सच्या विरोधात जावे लागले. १९३० पर्यंत, उत्पादक केवळ ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन (एएम) बँडसह डिझाइन केलेले रेडिओ बनवत होते. रेडिओ स्टेशन्समध्ये फक्त एएम तंत्रज्ञान होते.

एफएमचा अवलंब करण्‍यासाठी प्रस्‍थापित सिस्‍टमच्‍या संपूर्ण फेरबदलाची आवश्‍यकता होती आणि हा काळ ग्रेट डिप्रेशन म्हणजेच आर्थिक महामंदीचा होता. त्यामुळे कंपन्यांना एफएम सुरु करण्यासाठी आवश्यक गुंतवणूक करायची नव्हती. किंबहुना ते शक्यही नव्हते.

परंतु परिस्थितीसमोर हात न टेकता आर्मस्ट्राँगने एका दशकापर्यंत फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन (FM) प्रसारण प्रत्यक्षात आणण्यासाठी बराचसा खर्च स्वतःच्या खिशातून केला, परंतु आरसीए आणि इतर बड्या रेडियो कंपन्यांनी त्याला विरोध केला. या रेडियो कंपन्यांना फक्त एफएम या नव्या तंत्रज्ञानाचीच भीती वाटत नव्हती, तर त्यांना ‘टेलिव्हिजन’च्या वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचीसुद्धा भीती वाटत होती. पण अखेरीस १९४०च्या सुरुवातीला आर्मस्ट्राँगच्या प्रयत्नांतून एफएम रेडियोला सुरुवात झाली. यामध्ये फक्त दुसऱ्या महायु*द्धामुळे व्यत्यय आला.

१९६० आणि ७० च्या दशकापर्यंत अमेरिकेतील बहुतेक ग्राहक नियमितपणे एफएम रेडिओ ऐकत होते. पण दरम्यान, आपण एफएम वापरतोय याची कित्येक लोकांना कल्पनासुद्धा नसायची, कारण टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट कंपन्यांनी ध्वनी प्रसारणासाठी एफएम बँड वापरला होता. सुरुवातीच्या काळातील काही उपग्रह देखील फ्रिक्वेन्सी मोड्यूलेशन वापरूनच अवकाशात झेपावले होते.

एवढ्या महत्त्वाचे संशोधन करणाऱ्या आर्मस्ट्राँगच्या कथेचा शेवट मात्र दुःखद आहे. पेटंट खटला आणि आरसीएबरोबरच्या संघर्षांमुळे त्याला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप त्रास झाला. १९५४ साली त्याने त्याच्या तेराव्या मजल्यावरील राहत्या घराच्या  खिडकीतून उडी मारून आपले आयुष्य संपवले.

आज व्हॅक्यूम ट्यूबची जागा ट्रांझिस्टर्सने घेतली आहे. टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट आता डिजिटल ट्रान्समिशन वापरतात आणि बहुतेक रेडिओ उपग्रह प्रक्षेपणाद्वारे देखील चालतात. परंतु एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँगच्या विद्वत्ता आणि चिकाटीशिवाय, संपूर्ण रेडिओ आणि टेलिव्हिजन उद्योग क्षेत्र आज आहे तसे अस्तित्वात नसते.

दरम्यानच्या काळात अमेरिकेला त्यांच्या या प्रयत्नांचा पूर्णतः विसर पडला होता. योंकर्समधील आर्मस्ट्राँगचे घर राष्ट्रीय इतिहासाची खूण होती. परंतु १९८३ साली देखभाल न झालेले ते घर पाडण्यात आले. आयइइइ कम्युनिकेशन्स सोसायटी (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सची संस्था) या अभियंत्यांच्या संस्थेने मात्र त्यांचा मान अबाधित ठेवत त्यांच्या सन्मानार्थ ‘एडविन एच. आर्मस्ट्राँग अचिव्हमेंट अवॉर्ड’ नावाचा वार्षिक पुरस्कार ठेवला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

तेव्हा दोन ज्यू धर्मगुरूंनी मुस्लिमांच्या पवित्र ‘काबा’चं रक्षण केलं होतं

Next Post

अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी मॅनहॅटन प्रोजेक्टच्या पडद्यामागील कृष्णवर्णीय ‘नायक’

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी मॅनहॅटन प्रोजेक्टच्या पडद्यामागील कृष्णवर्णीय 'नायक'

त्यादिवशी दुबईत सचिन नावाचं डेझर्ट स्टॉर्म आलं आणि कांगारुंची धूळधाण उडाली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.