आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मला आजही स्पष्ट आठवतं. मी नुकतीच सातव्या इयत्तेतून आठवीमध्ये गेले होते. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मूळ गावी जाऊन धमाल करायची ही जणू आमच्यासाठी एक परंपराच होती आणि आम्ही एकदम इमानेइतबारे तिचं पालन करत असू. शाळांना सुट्ट्या असल्यामुळं जवळपास सगळी चुलत-निलत भावंडं गावी येत.
आमची एक चुलत आत्या मुंबईला रहायची ती देखील आपल्या मुलांना घेऊन गावी यायची. तिची मुलं आमच्यापेक्षा थोडी मोठी होती. त्यांच्यातील जो वयानं सर्वात मोठा होता त्याच्याकडे तर मोबाईल फोन देखील होता. आम्हाला भारी कौतुक वाटायचं त्याचं. दिवसभर त्याच्या मोबाईलच्या प्लेलिस्टमधील गाणी ऐकत-ऐकत आमचा गोट्या, चंफुल्ल्या आणि पत्त्यांचा डाव पडायचा. त्याच्याकडे अनेक इंग्रजी गाणी देखील होती. तेव्हा मला गाण्यांचे लिरिक्स तर काही समजायचे नाही पण त्याचं म्युझिक आणि रिदम कानांना मस्त वाटायचा. मी हट्ट करून ब्लूटूथनं दोन-तीन गाणी पप्पांच्या मोबाईलमध्ये घेतली. त्यातील एक गाणं होत, ‘डू यु नो’. हो तेचं, एनरिक इग्लेसियसचं (स्पॅनिश उच्चार एनरिके) पिंग पाँग साँग. ते गाणं मला प्रचंड आवडायचं आणि अजूनही आवडतं. जोपर्यंत माझ्या हातात स्वत:चा फोन आणि घरात अनेक चॅनेल्स भरणा असलेला कलर टीव्ही आला नाही तोपर्यंत मी पप्पांच्या फोनमधील ‘ती’ दोन-तीन इंग्रजी गाणी ऐकून अक्षरश: पाठ केली होती.
मी माझं टीनएज एनरिक इग्लेसियसचं ‘डू यु नो’ ऐकत-ऐकत घालवलं असं म्हटल तरी वावगं ठरणार नाही, इतकी मी या गाण्यासाठी वेडी होते. आज देखील माझ्या प्लेलिस्टमध्ये एनरिकची जवळपास सगळी गाणी सापडतील. ही फक्त माझ्या एकटीची टीनएज स्टोरी नाही. माझ्यासारखे कितीतरी मुलं-मुली असतील ज्यांनी आपल्या टीनएजमधील दिवस एनरिकची गाणी ऐकून काढले आहेत. २००० ते २०१० या काळात जी मुलं आपल्या टीनएजमध्ये होती त्यांच्यासाठी एनरिक एक सेन्सेशन होता. सगळ्या जगाला आपल्या गाण्यांवर ताल धरण्यास भाग पाडणाऱ्या या ‘स्पॅनिशबॉय’ बद्दल हा विशेष लेख.
१९९९ मध्ये जेव्हा स्पॅनिश-अमेरिकन गायक एनरिक इग्लेसियसनं इंग्रजीमध्ये त्याची पहिली पूर्ण सीडी रिलीज केली, तेव्हा हजारो तरुण-तरुणींनी तिच्या पहिल्या प्रती मिळवण्यासाठी गर्दी केली. त्यातील ‘रिदम डिवाइन’ या ट्रॅकनं तर अनेकांना वेड लावलं. ‘बायलामोस’ हे गाणं अल्पावधीत चार्टमध्ये अव्वल स्थानी आल्यानंतर त्यानं पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही.
२०००नंतर तर त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ सुरू झाला. त्याच्या हिरो, एस्केप, बी विथ यू, डू यु नो आणि डोन्ट टर्न ऑफ दि लाइट्स या गाण्यांनी त्याला त्याच्या काळातील सर्वात यशस्वी कलाकार बनवले. त्याचा आवाज तर जादुई होताच शिवाय त्याचं दिसणं देखील अनेक मुलींच्या काळजाचा ठाव घेण्यास पुरेसं होतं. जरासे विस्कटलेले सरळ केस, लॅटिनो डोळे, मोहक स्मित आणि लो जीन्समुळं जगभरातील लाखो मुलींना वेड लागलं होतं.
इनरिकच्या गाण्यांमुळं इंग्लिश म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्पॅनिश सेन्शुयसनेसचा नव्यानं जन्म झाला. त्यांची बहुतेक गाण्याचा तो स्वत: सहलेखक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती सर्वच गाणी चार्टमध्ये वेळोवेळी अव्वल होती. त्याच्या ऍडिक्टेड, बायलांदो, हार्टबिट, हिरो, बायलामोस अशा कितीतरी गाण्यांनी चाहत्यांना अक्षरश: ऍडिक्शनचं लावलं आहे.
आपल्या आवाजानं संपूर्ण जगावर अधिराज्य करणाऱ्या एनरिक इग्लेसियसच्या प्रभावापासून भारतासारखा संगीत वेडा देश तरी कसा दूर राहील? एनरिकच्या गाण्यांना भारतामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. आपल्या देशात त्याचे लाखो चाहते आहेत. अनेकांची कॉलेजलाईफ त्याच्या गाणी ऐकून समृद्ध झालेली आहे.
आपल्या देशाला स्वत: अशी मोठी संगीत परंपरा आहे. क्लासिकल म्युझिक आणि बॉलिवुड म्युझिकचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. याशिवाय फोक म्युझिकचा देखील मोठा चाहता वर्ग आपल्याकडे आहे. अशा स्थितीमध्ये एक स्पॅनिश-इंग्लिश गायक आपला स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण करतो ही नक्कीच विशेष गोष्ट म्हणावी लागेल. एनरिक इग्लेसियसच्या गाण्यांनी ज्यावेळी भारतात धुमाकूळ घातला त्यावेळी सोशल मीडिया आजच्या इतका तळागाळापर्यंत पोहचलेला नव्हता ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तरी देखील त्याची गाणी भारतात प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानं देखील भारतातील आपल्या चाहत्यांना कधी निराश केलं नाही. त्यानं आतापर्यंत दोनदा भारत दौरा केला. २००४मध्ये तो पहिल्यांदा भारतात आला होता. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे २०१२मध्ये त्यानं पुन्हा भारत दौरा केला.
२०१२मधील भारत दौऱ्यावेळी त्यानं तीन शहरांमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट केले होते. १७ ते २१ ऑक्टोबर या पाच दिवसांच्या काळात त्यानं पुणे, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये आपल्या चाहत्यांसाठी परफॉर्म केलं. दिल्लीमध्ये झालेल्या कॉन्सर्टला प्रचंड गर्दी होती. दिल्लीकरांनी पहिल्यांदा एखाद्या कॉन्सर्टसाठी इतकी गर्दी पाहिली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून चाहत्यांनी एनरिकची एक झलक पाहण्यासाठी दिल्ली गाठली होती.
गिटार गळ्यात अडकवून त्यानं ‘आय एम लव्हिंग यू’ या गाण्यानं दिल्लीतील कॉन्सर्टची सुरुवात झाली होती. रिदम डिवाइन, बायलामोस, एस्केप, डर्टी डान्सर, जस्ट वॉना बी विथ यू, बेबी आय लाइक इट, हिरो ही गाणी ऐकवून चाहत्यांना एनरिकनं एकदम स्वर्गीय अनुभव दिला होता.
सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आपल्या स्पॅनिश ऍक्सेन्टमध्ये हिंदी बोलून त्यानं भारतीयांची मनं जिंकून घेतली होती. स्टेजवर जेव्हा ‘नमस्ते दिल्ली, आप कैसे हैं, मैं आपसे प्यार करता हूँ’ ही वाक्य त्यानं म्हटली तेव्हा उपस्थितांना फक्त वेड लागायचं बाकी होतं. इतकंच काय ज्या व्यक्तीचा एक मिनिट देखील महत्त्वाचा आहे त्या एनरिकनं आपल्या एका १२ वर्षीय चाहत्यासोबत १५ मिनिट गप्पा मारल्या होत्या. त्याच्या भारत दौऱ्यात चाहत्यांनी त्याला खूप प्रेम दिलं.
एनरिक अजूनही आपली इंडिया टूर विसरलेला नाही. दोन वर्षांपूर्वी त्यानं आपल्या इन्स्टाग्रामवर इंडिया टूरमधील एक जूना व्हिडिओ पोस्ट करून आठवणींना उजाळा दिला होता. ‘India is one of my most favorite places in the world. I am waiting to make another trip to the country,’ असं कॅप्शन देखील या व्हिडिओला त्यानं दिलं होतं. त्याच्या एकदम सुरुवातीच्या दोन रिलीजच्या प्रत्येकी दोन लाख कॉपीज भारतात विकल्या गेलेल्या आहेत. त्याला भारतातील आतापर्यंतचा सर्वात जास्त लोकप्रिय आंतरराष्ट्रीय कलाकार मानलं जातं. भारतात त्याला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे. त्याच्या बायोग्राफीमध्ये देखील त्यानं इंडिया टूरचा उल्लेख केलेला आहे.
आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्यानं जगभरातील कोट्यवधी लोकांचं मनोरंजन केलं आहे. याशिवाय त्यानं लहान मुलांच्या कल्याणकारी योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्याचं काम देखील केलं आहे. एक उत्कृष्ट कलाकार आणि एक परोपकारी माणूस असलेला एनरिक इग्लेसियसनं चाहत्यांच्या मनात आपला एक अमिट ठसा उमटवलेला आहे हे नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










