आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
काही लोकं प्रचंड ध्येयवेडी असतात. आपल्या कामाच्या बाबतीत ते कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसतात. एखादी गोष्ट करायची मनापासून ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मग त्या गोष्टीसाठी कितीही वेळ लागो, ती ते पूर्ण करूनच निवांत होतात. आतापर्यंत आपण अनेक ध्येयवेड्या लोकांना पाहिलं असेल.
तुम्हाला माहिती असलेल्या ध्येयवेड्या लोकांच्या यादीमध्ये आता आणखी एक नाव समाविष्ट करण्यास हरकत नाही. हे नाव आहे, वांग डोंग युक (Hwang Dong-hyuk) या कोरियन दिग्दर्शक आणि पटकथाकाराचं. आता तुम्ही म्हणाल या व्यक्तीनं असं काय केलं आहे की, मी त्याला ध्येयवेडा म्हणत आहे. वांग डोंग युक आणि त्यांच्या कामाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
मध्यंतरी ‘स्क्विड गेम’ हे नाव तुमच्यापैकी अनेकांच्या कानांवर पडलं असेल. काहींनी तर स्क्विड गेम पाहिली देखील असेल. यावर्षी १७ सप्टेंबर रोजी ‘स्क्विड गेम’ नावाची एक कोरियन सर्व्हायव्हल ड्रामा सीरिज नेटफ्लिक्स या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झाली. जेव्हा सीरिज स्ट्रीम झाली तेव्हा कुणीही कल्पना केली नव्हती की पुढील दोन महिन्यात ही सीरिज जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल.
मार्केटिंगची मारामार असूनही, या सीरिजनं अमेरिकेसह उर्वरित जगामध्ये लोकप्रियता मिळवली. त्यावेळी सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वातील बातम्यांमध्ये स्क्विड गेम हा सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा बनला होता. सामाजिक घटकांवर तीव्र भाष्य करणारी सीरिज म्हणून समीक्षकांनी या ड्रामाची स्तुती केली आहे. स्क्विड गेममध्ये ली जंग-जे, पार्क हे-सू, वाय हा-जून, जंग हो-यून, ओ येओंग-सू, हेओ सुंग-तई, अनुपम त्रिपाठी आणि किम जू-योंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
एक डिस्टोपियन सर्व्हायव्हल गेम हा मुख्य गाभा असलेली सीरिज, जपानी बॅटल रॉयल फॉरमॅटवर आधारित आहे. त्यामध्ये ४५६ कर्जबाजारी व्यक्ती दाखवण्यात आले आहेत. हे लोक श्रीमंत होण्यासाठी लहान मुलांच्या खेळांच्या मालिकेत भाग घेतात. या खेळांची रचना अतिशय घातक पद्धतीनं केलेली आहे. त्याचे निकाल अतिशय जीवघेणे असतात. सीरिजच्या शेवटपर्यंत सहभागी स्पर्धकांपैकी एक-एक जण मृत्युमुखी पडतो आणि शेवटी एक लहान मुलगा विजयी होतो. बक्षिसाची सर्व रक्कम शेवटी त्याला मिळते, असे या स्क्विड गेममध्ये दाखवण्यात आलं आहे.
स्क्विड गेम नेटफ्लिक्सवरील सर्वांत जास्त पाहिली गेलेली सीरिज बनली आहे. तिनं ‘ब्रिजर्टन’ या सीरिजला मागे टाकलं आहे. स्क्विड गेम हा त्यावेळी जगभरातील ९० देशांमध्ये पहिल्या क्रमांकाचा शो झाला होता. आजही दिवसेंदिवस त्यांची प्रेक्षकसंख्या वाढतच आहे.
सध्या जगभरात वाहवा मिळवत असलेला ‘स्क्विड गेम’ तयार करणं लेखक-दिग्दर्शक वांग डोंग-युक यांच्यासाठी कठीण गोष्ट होती. हॉलिवूड रिपोर्टरला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, स्क्विड गेमचे लेखक आणि दिग्दर्शक वांग डोंग-युक यांनी या शोबद्दल एक गुपित उघड केलं आहे. हा प्रोजेक्ट त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. आपला ड्रीम प्रोजेक्ट सत्यात उतरावा यासाठी त्यांनी एक खूप वाट पाहिली.
वांग यांनी २००८ मध्ये स्क्विड गेमवरच्या पटकथेवर काम करण्यास सुरुवात केली होती. २००९ मध्ये त्यांनी पटकथेचा पहिला ड्राफ्ट पूर्ण केला होता. कथेचे पहिले दोन भाग पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला होता. त्यासाठी त्यांनी अनेक कॉमिक बुक्सचं देखील वाचनं केलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पटकथा लिहिताना त्यांनी ती चित्रपट तयार करण्यासाठी लिहिली होती.
जेव्हा स्क्विड गेमची पटकथा लिहून पूर्ण झाली तेव्हा ती घेऊन वांग यांनी अनेक निर्मात्यांच्या पायऱ्या झिजवल्या. कुठलाही निर्माता या कथेमध्ये आपले पैसे गुंतवण्यास तयार नव्हता. प्रत्येक निर्मात्याला वांग यांनी लिहिलेलं कथानक विचित्र आणि हिं*सक वाटत होतं. काहींना स्क्विड गेमची कथा अगम्य वाटत होती. व्यावसायिकदृष्ट्या तिला यश मिळणार नाही, अशी त्यांची धारणा होती. शिवाय कलाकार देखील अशा चित्रपटामध्ये काम करण्यास तयार नव्हते. जवळपास वर्षभर पायपीट केल्यानंतर वांग यांनी शेवटी आपली पटकथा बांधून ठेवून दिली.
जेव्हा त्यांनी स्क्विड गेमचं लेखन केलं होतं तेव्हा त्यांची स्वत:ची आर्थिक स्थिती देखील अतिशय वाईट होती. त्यामुळं त्यांना माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, वांग यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती चोवीस तास जिवंत होती. त्यानंतर वांग यांनी अनेक यशस्वी चित्रपट तयार केले. त्यांना प्रसिद्धी मिळाली मात्र, तरी देखील त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला मुहूर्त मिळत नव्हता.
जेव्हा नेटफ्लिक्सनं विविध विषयांना जागा देऊन जगभरात आपला डंका वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा दिग्दर्शक वांग यांच्या मनात आशेची पालवी फुटली. ‘राउंड सिक्स’ असं मूळ नाव असलेली स्क्विड गेमची पटकथा घेऊन त्यांनी नेटफ्लिक्सचा दरवाजा ठोठावला आणि नेटफ्लिक्सनं त्यांना आधार दिला. नेटफ्लिक्सनं स्क्विड गेमच्या निर्मितीमध्ये पैसा गुंतवण्याचा निर्णय घेतला. शिवाय एक दिग्दर्शक म्हणून वांग डोंग युक यांना पूर्ण कथानक पडद्यावर उभं करण्यास पूर्ण स्वातंत्र्य देखील दिलं. याबद्दल वांग यांनी नेटफ्लिक्सचे जाहीरपणे आभार देखील मानले आहेत.
‘मला अशी कथा लोकांसमोर आणायची होती जी आधुनिक भांडवलशाही आणि समाजाविषयीएक रूपक असेल. जी लोकांमधील अतिशय टोकाची स्पर्धा दर्शवेल. त्यासाठी मला अतिशय सामान्य पात्रांचा वापर करायचा होता. व्यावसायिक निर्मात्यांना अशी गोष्ट नको होती. मात्र, नेटफ्लिक्सनं मला संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभारी आहे,’ अशा शब्दांमध्ये वांग यांनी निर्मात्यांचे आभार मानले आहेत.
ज्या हेतूनं वांग यांना स्क्विड गेम तयार करायचा होता तो साध्य झाला, असं म्हणता येईल. कारण त्यावेळी कोविडमुळे जगभरातील आर्थिक आणि सामाजिक स्थिती विस्कटली होती. नेमक्या अशा वेळी स्क्विड गेमचा प्रिमीयर झाला. जगभरातील प्रत्येक सामाजिक स्तरातील व्यक्तींना, कथानकातील स्पर्धकांच्या स्थितीमध्ये आपली झलक दिसली.
दिग्दर्शक वांग डोंग युक यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, वांग खरोखर एक अतिशय प्रतिभावान पटकथाकार आणि दिग्दर्शक आहेत. २०११ मधील क्राइम ड्रामा फिल्म ‘सायलेंस्ड’च्या दिग्दर्शनामुळं त्यांना पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली होती. दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटीमधून बी.ए. कम्युनिकेशन्स पूर्ण केलं. त्यानंतर फिल्म मेकिंगचा अभ्यास करण्यासाठी ते लॉस एंजेलिसला गेले. त्यांनी सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातून चित्रपट निर्मितीमध्ये उच्च शिक्षण घेतलं.
आजवर त्यांनी माय फादर, सायलेंस्ड, मिस ग्रॅनी, द फॉट्रेस या चित्रपटांसह अनेक लघुपटांचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. सध्या त्यांच्या ‘स्क्विड गेम’नं मात्र, त्यांच्या कामाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या सीरिजचा दुसरा सिझन यावा, यासाठी जगभरातील प्रेक्षक वांगला विनंती करत आहेत, यातूनच त्याचं यश दिसून येतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.