आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मायकल फेल्प्स. बस नाम ही काफी है. ऑलिम्फिकच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ जलतरणपटू. ज्यानं एक, दोन नव्हे तर तब्बल २८ ऑलिम्पिक पदकं पटकावली. त्यातील २३ सुवर्ण पदकं आहेत. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये पदार्पण ते २८ पदकांपर्यंतच्या मजलेचा या अमेरिकन खेळाडूचा प्रवास थक्क करणारा आहे. जलतरणपटू होण्यासाठी त्यानं घेतलेले कष्ट, मिळवलेलं उत्तुंग यश, त्या यशानंतर हरवलेलं ध्येय, आलेलं नैराश्य. एखाद्या सिनेमाची रोमांचक स्क्रीप्ट असावी असं त्याचं आयुष्य..
३० जून १९८५ रोजी अमेरिकेच्या मॅरिलँड प्रातांतील बाल्टीमोर शहरात या महान जलतरणपटूचा जन्म झाला. ३ भावडांपैकी मायकल सर्वात धाकटा. त्याचे वडील पोलीस तर आई माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका होती. १९९४ साली पालकांच्या घटस्फोटानंतर तो आणि त्याच्या दोन बहिणी त्याच्या आईच्या सानिध्यात वाढल्या.
बहिणींचं अनुकरण करत वयाच्या ७व्या वर्षापासून मायकल पोहायला लागला. मजल दरमजल करत २००० साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये त्यानं पहिल्यांदा सहभाग नोंदवला. आपल्या पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकमध्ये खाली हात परतलेल्या मायकलनं त्यानंतर झालेल्या सर्व ऑलिम्पिक्समध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडला.
२००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ६ सुवर्ण पदकांसह ८ पदकं, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्ण पदकं, २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्ण पदकं कमावल्यानंतर मायकलने स्विमींगमधून तात्पुरती निवृत्ती घेतली. त्यानंतर पुन्हा २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कमबॅक करत त्यानं ६ पदकं पटकावलीत. ज्यात तब्बल ५ सुवर्ण होती. ‘वर्ल्ड स्वीमर ऑफ द ईयर’चा किताब त्यानं तब्बल ८ वेळा पटकावला.
पदकांची भुक मायकलला स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्यातला सर्वश्रेष्ठ जलतरणपटू बाहेर काढण्यासाठी तो प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत धडपडत होता. या धडपडीतून यश त्याच्या पायावर लोळण घेऊ लागलं आणि येथूनच त्याच्या आयुष्यानं एक विदारक वळण घेतलं. यशाच्या शिखरावर असताना मायकलला नैराश्यानं गाठलं.
प्रत्येक ऑलिम्पिकनंतर मायकल नैराश्याकडे जाऊ लागला. ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतर जल्लोष तर सोडाच मायकल नैराश्याच्या खाईत लोटला गेला. २००८च्या बीजींग ऑलिम्पिकनंतर मायकल ड्र*ग्जच्या आहारी गेला होता. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकनंतर तर परिस्थिती आणखीनच वाईट होत गेली.
त्यानं स्वत:ला ४ दिवस खोलीत कोंडून घेतलं होतं. काहीही न खातापिता, अनिद्रेचा सामना करत असतानाच त्याची जगण्याची इच्छा संपत चालली होती. यादरम्यान, अनेकदा त्याच्या मनात आत्मह*त्येचे विचार आले. जीवन जगण्यासाठीचा उद्देश गमावल्याची भावना त्याच्यामध्ये प्रबळ होत गेली. अशाच विचित्र परिस्थितीत त्यानं निवृत्ती जाहिर केली.
या मानसिक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्याने डॉक्टरांची मदत घेतली. स्वीमींग पूलमधला हा ‘फ्लाईंग फिश’ अक्षरश: उपचारादरम्यान थरथरायचा. प्रदिर्घ उपचारानंतर अखेर मायकल यातून सावरला आणि त्यानं पुन्हा २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्या विजयाचा डंका वाजवला.
कुणालाही नैराश्य येऊ शकतं हे लोक आता समजायला लागले आहेत, त्याबद्दल बोलायला लागले आहेत. हा एक सकारात्मक बदल आहे. लोकं खुलेपणानं बोलायला घाबरतात म्हणूनच आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्याचं मायकल सांगतो.
नैराश्याच्या दुष्ट चक्राला भेदल्यानंतर या समस्येबाबत काम करण्याचं त्यानं ठरवलं. यातूनच ‘मायकल फेल्प्स फाऊंडेशन’ या संस्थेनं आकार घेतला. आज ही संस्था शारिरीक आणि मानसिक आरोग्याशी निगडीत समस्यांसह पाणी सुरक्षेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. याशिवाय, मानसिक आरोग्याशी निगडीत ‘मेडीबिओ’ या संस्थेसोबत देखील तो २०१७ पासून काम करतोय.
स्वीमींगमधून निवृत्ती घेतल्यानंतर मायकल व्यवसायातही उतरला आहे. मायकलच्या ‘एमपी’ या ब्रँडचे स्वीमींग कॉश्युम जगभर प्रसिद्ध आहेत. या व्यवसायात त्याचे प्रशिक्षक बॉब बॉऊमन पार्टनर आहेत. २०१५ मध्ये लॉन्च झालेली ही कंपनी २०२० साली रिलॉन्च करण्यात आली.
मायकलच्या आयुष्यात बरेच चढ-उतार आले. ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात वयाच्या १९ व्या वर्षी त्याला अटक झाली. २००९ मध्ये मॅरिजुआना घेतल्याप्रकरणी त्याला अमेरिकन स्विमींग असोसिएशनने ३ महिन्यांसाठी निलंबित केलं होतं. त्याचा १ हजार ७५० डॉलर्सचा मासिक भत्तादेखील बंद करण्यात आला होता. या गैरवर्तनांमुळे अनेक स्पॉन्सर्सने देखील मायकलकडे पाठ फिरवली होती.
कंपनीची प्रतिमा खराब होत असल्याचं कारण देत ‘केलोग’ या कंपनीनं मायकलसोबत पुन्हा करार करण्यास नकार दिला होता. हे प्रकरण अमेरिकी माध्यमांनी बरंच उचलून धरल्यानंतर मायकलने माफी मागितली. आपण केलेलं वर्तन अयोग्य असल्याचं त्यानं मान्य केलं. २०१४ साली पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्याला तुरुंगाची हवा खावी लागली.
मायकलनं त्याची प्रेयसी निकोल जॉन्सन हिच्याशी २०१६ साली विवाह केला. या दाम्पत्याला २ मुलं आणि १ मुलगी आहे. पत्नी निकोलही ‘मायकल फेल्प्स फाऊंडेशन’ चालवण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे. नैराश्याचा शिकार होणारा मायकल हा काही एकटाच खेळाडू नव्हता. जपानची टेनिसपटू नाओमी ओसाका, टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू सेरेना विल्सम्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू सारा टेलर सारख्या अनेक खेळाडूंनी मानसिक समस्यांचा सामना केला आहे.
शारिरीक, मानसिक आणि सामाजिक अशा कोणत्याही कारणाने आलेला मनस्ताप, वाढती स्पर्धा, अपयश, चिंता अशा एक ना अनेक कारणामुळे नैराश्याचा विळखा घट्ट होऊ शकतो. हा विळखा वेळीच न सोडवल्यास त्यात ती व्यक्ती अधिकाधिक गुंतत जाते. मायकल फेल्प्ससारखा गुणी खेळाडूही यातून सुटला नाही.
आयुष्यात प्रत्येकाला यश हवं असतं. त्यासाठीची धडपड, तगमग सोसून मिळवलेलं यश बऱ्याच जणांना पेलवत नाही. यशाचा गर्वच येईल असं नाही, तर कधीकधी जे हवं ते मिळाल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न आवासून उभा असतो. असाच काहीसा प्रकार मायकल फेल्प्स सोबतही झाला. नैराश्याच्या या काळात मायकलही अडखळला, पडला आणि पुन्हा सावरून उभा राहिला एका खेळाडूसारखा..
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










