आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
UEFA EURO 2020मध्ये पोर्तुगाल आणि फ्रान्सने जिंकून या चॅम्पियनशिपची सुरुवात केली. पोर्तुगालने हंगेरीला तर फ्रांसने जर्मनीचा फडशा पाडला. पोर्तुगालचा क्रिस्टीयानो रोनाल्डोला कोण नाही ओळखत? या सामन्यात रोनाल्डोने २ गोल करत अजून एक विक्रम स्वतःच्या खात्यावर जमा केलाय.
आता रोनाल्डोच्या नावावर EURO चॅम्पियनशिपमध्ये तब्बल ११ गोल आहेत. फ्रान्सच्या मायकल प्लाटीनिचा ९ गोलचा रेकॉर्ड त्याने हे दोन गोल करत मोडून काढला आहे. रोनाल्डोच्या नावावर या आधी सगळ्यात जास्तं EURO सामने खेळण्याचा रेकॉर्ड होताच. आता सगळ्यात जास्तं गोल पण.
बुडापेस्ट येथे झालेल्या या सामन्यात हंगेरीने पूर्वविजेता पोर्तुगालला तब्बल ८३ मिनिटांपर्यंत एकही गोल करू दिला नाही पण त्यानंतर पुढच्या दहाच मिनिटात पोर्तुगालने तीन गोल करत सामना आपल्या नावावर केला.
आता तुम्ही म्हणाल हे सगळंब ठीक आहे, पण हे आम्हाला का सांगताय! तर रोनाल्डोने हा सगळ्यात जास्तं गोल करण्याचा विक्रम तर केलाच पण याशिवाय त्यानं अजून एक चमत्कार केला. तो म्हणजे कोका-कोला कंपनीचे ४ बिलीयन शेअर्स अर्ध्या तासात पडण्याचा!
हे कसं?
झालं असं की, सामन्याच्या आधी रोनाल्डोची एक पत्रकार परिषद होती. त्यावेळी तिथे टेबलवर दोन कोकाकोलाच्या बाटल्या ठेवल्या. कोकाकोला या स्पर्धेच्या प्रायोजकांपैकी एक असल्याने हे साहजिकच! पण रोनाल्डो तिथे आला, बसला. त्याने त्या दोन्ही बाटल्या उचलल्या आणि बाजूला ठेवल्या. एवढ्यावर तो थांबला नाही, त्याने पाण्याची बाटली उचलली आणि म्हणाला “ऍग्वा” म्हणजे पाणी!
आता तुम्हाला हे माहिती नसेल पण रोनाल्डो कोक वगैरे सारख्या कार्बोनेटेड पेयांचा अजिबात शौक नाहीये. शौक काय त्याला हे पेय आवडतच नाही, तो स्वतःच नाही तर आपल्या मुलालासुद्धा हे पिऊ देत नाही. त्या बाटल्या बाजूला करत त्यानं पाण्याची जाहिरात केली, म्हणजे कोकऐवजी पाणी प्या, तेच शरीरासाठी चांगलं असतं असं त्याला सांगायचं होतं.
बास! एवढंच झालं होतं. पण याचा कोकोकोला कंपनीवर मात्र खूप मोठा परिणाम झाला.
दोन बाटल्या उचलून बाजूला ठेवल्याने या कंपनीचे शेअर्स तब्बल ४बिलीअन डॉलरने पडले. १.६ टक्क्यांनी त्यांच्या किंमती पडून $२४२ बिलीयनवरून किंमत $२३८ बिलीयनवर गेली.
द सन नावाच्या वृत्तसंस्थेनुसार रोनाल्डोच्या या वागण्यानंतर कंपनी, “प्रत्येकाची आवड वेगळी असते. सगळ्यांना एकसारखेच पदार्थ आवडतील असं नाही” असं स्पष्टीकरण दिलं.
सगळ्याच खेळाडूंना पत्रकारपरिषदेत पाणी, कोकाकोला, शुगरफ्री कोका कोला दिलेच जातात. पण एक बाटली उचलून बाजूला ठेवल्याने एखाद्या कंपनीला एवढं मोठं नुकसान सोसावं लागेल याची कोणीही कल्पनाच केली नव्हती!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.