आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आपल्या साध्या राहणीने आणि स्वच्छ प्रतिमेमुळे व्ही. पी. सिंग यांनी भारतीय राजकारणात एकेकाळी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. १९८०-९० च्या दशकात व्ही. पी. सिंग म्हणजे राजकीय क्षेत्रातील एक आश्वासक व्यक्तिमत्त्व होते. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस अभूतपूर्व मताधिक्याने निवडून आली होती.
त्यावेळी राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री असलेल्या व्ही. पी. सिंग यांनीच बोफोर्स प्रकरणाचा भांडाफोड केला होता. ज्या सरकारमध्ये ते मंत्री होते त्याच सरकारविरोधात बोलण्याचे केवढे हे धाडस!
त्यांच्या याच निर्भीड बाण्याने आणि स्पष्टवक्तेपणामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले.
पण, मंत्रिमंडळात राहूनही पक्षाविरोधी भूमिका घेणाऱ्या या नेत्याला कॉंग्रेसने मात्र लगेचच मंत्रिमंडळातून डच्चू दिला.
अभूतपूर्व मताधिक्याने निवडून आलेले राजीव गांधी मात्र बोफोर्स प्रकरणावरून प्रचंड टीकेचे धनी बनले होते. राजीव गांधी यांच्याबद्दल जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाला होता. हा राजकारणातील असा काळ होता जिथे चारीबाजूला फक्त व्ही. पी. सिंग यांचीच हवा होती.
व्ही. पी. सिंग हे मंडा संस्थानचे संस्थानिक होते. परंतु याचा कधी त्यांनी तोरा मिरवला नाही. मंडा जमीनदारी संस्थानच्या जमीनदारांनी त्यांना दत्तक घेतले होते. ते अकरा वर्षांचे असताना त्यांच्या दत्तक पित्याचे निधन झाले आणि ते अकराव्या वर्षीच या छोट्या संस्थानाचे महाराज बनले. १९४८ पर्यंत म्हणजेच हे संस्थान भारतात विलीन होण्यापर्यंत ते या संस्थानाच्या गादीवर विराजमान होते.
अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठातून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. १९५० च्या काळात विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. या आंदोलनात त्यांनी आपली सारी जमीन दान केली. इथूनच सक्रीय राजकारणात त्यांचा प्रवेश झाला.
१९६० साली त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९८०-८२ या काळात ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते. १९८४-८६ याकाळात ते अर्थमंत्री तर त्यानंतर १९८६-८७ या काळात ते संरक्षण मंत्री होते. याच काळात त्यांनी राजीव गांधी यांचे सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. या आरोपामुळे संतापलेल्या पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. पण, याचा फटका कॉंग्रेसलाच बसला.
व्ही. पी. सिंग हे स्वभावाने अंत्यंत विनम्र आणि मुल्यानिष्ठ होते. १९८७-१९९० हा काळ फक्त व्ही. पी. सिंग यांचाच काळ होता. विशेष म्हणजे त्याच्याकडे मजबूत संघटन किंवा मजबूत पक्ष नसतानाही त्यांचा भारतातील राजकारणावरील प्रभाव मात्र अद्भुत होता. भ्रष्टाचाराविरोधात लढणारा नेता म्हणून अल्पावधीत ते संपूर्ण देशात ओळखले जाऊ लागले.
१९८८ मध्ये जनता पक्ष, कॉंग्रेस (एस), लोकदल आणि जनमोर्चा यांना एकत्र करून त्यांनी जनता दल हा नवा पक्ष स्थापन केला.
एक इमानदार आणि प्रामाणिक नेता अशा फक्त स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर त्यांनी १९८९ साली कॉंग्रेसच्या राजीव गांधींना आव्हान दिले. सगळ्यात आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांना डाव्या आणि उजव्या, म्हणजेच भाजप, या दोन्ही पक्षांनी समर्थन दिले. १९८९ च्या निवडणुकीत राजीव गांधींचा दारूण पराभव झाला.
कॉंग्रससारख्या मोठ्या पक्षाचा पराभव करून ते पंतप्रधान पदी विराजमान झाले. निश्चितच ही साधीसुधी गोष्ट अजिबात नाही. मात्र यासाठी त्यांनी कॉंग्रेस विरोधकांची मोट बांधून राजकारण करण्याचा जो प्रयत्न केला त्याच प्रयोगाने त्यांचा राजकीय घात केला.
कॉंग्रेसविरोधात सरकार स्थापन करण्यासाठी जनता पक्ष जनता दलामध्ये विलीन झाला होता. या सगळ्या पक्षांच्या वतीने व्ही. पी. सिंग यांनी सरकारचे नेतृत्व केले मात्र अधिक काळ ते सर्वाना एकत्र बांधून ठेवण्यात यशस्वी झाले नाहीत.
जनता पक्षाचे चंद्रशेखर यांनी आपला पाठींबा काढून घेतला आणि व्ही. पी. सिंग यांचे सरकार कोसळले. व्ही. पी. सिंग यांचा स्वतःचा पक्ष मजबूत नसल्याने ते भावनिक राजकारणाचे शिकार बनले.
त्यातच त्यांनी मंडल आयोगाने दिलेल्या शिफारशी लागू करण्याचा अट्टाहास सुरु ठेवला जो त्यांच्या सरकार मधील अनेक घटक पक्षांना मान्य नव्हता. संसदेत कॉंग्रेसने देखील याविरोधात प्रचंड गदारोळ केला.
मंडल आयोगाद्वारे ओबीसींना मिळणाऱ्या २७% आरक्षणाला अनेकांचा विरोध होता ज्यामुळे त्यांना रोष ओढवून घ्यावा लागला.
याच दरम्यान आडवाणींच्या रथयात्रेला विरोध झाला आणि आडवाणींना अटक करण्यात आली. या रागातून भाजपने देखील त्यांचा पाठींबा काढून घेतला. ज्या व्ही. पी. सिंग यांच्याकडे राजकारणातील आश्वासक चेहरा म्हणून पहिले जायचे तेच व्ही. पी. सिंग आत्ता अनेकांना दैत्यासमान भासू लागले.
त्यांच्या हातून हळूहळू एकेक गोष्ट निसटून जात असताना फक्त निर्विकारपणे पाहत बसण्याव्यतिरिक्त ते काहीही करू शकले नाहीत. पंतप्रधानपद गेल्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून नेहमीच दूर राहिले. परंतु सामाजिक न्यायाबद्दलची त्यांची भावनिक ओढ आणि कार्य कधीच कमी झाले नाही.
त्यांना वंचित समूहाबद्दल प्रेम असले तरी आपण कधीच वंचितांचे नेते म्हणवले जाणार नाहीत, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. परंतु समाजवादी चळवळीतून आलेल्या नेत्यांबद्दलही त्यांचे मत फारसे समाधानकारक नव्हते. लालू यादव, मुलायमसिंह यादव, मायावती यासारख्या नेत्यांशीही त्यांचे फारसे जुळले नाही.
समाजवादी चळवळ ज्या पद्धतीने लोकांमध्ये पोहोचवली जाते त्याबद्दल त्यांना खेद होता. इतक्या सकारात्मक आणि शक्तिशाली चळवळीचा ज्या पद्धतीने ऱ्हास झाला ते पाहून त्यांना यातना झाल्या.
देशातील गरीब आणि वंचित घटकांविषयी त्यांना कणव होती. त्यांच्यासाठी काही भरीव काम करण्याची इच्छा होती. पण, त्यांच्या पाठीशी ताकदीची राजकीय संघटना नव्हती म्हणूनच ते राजकारणात पिछाडीवर राहिले.
परंतु शेवटपर्यंत स्वतःच्या अटींवर जगत राहीले. देशातील उच्च पदावर राहून आणि राजकीय पार्श्वभूमी असूनही त्यांनी याचा दुरुपयोग केला नाही.
प्रत्येक व्यक्तीत काही उणीवा, त्रुटी या असतातच. कधीकधी नकळत त्यांच्या हातूनही चुका होतात. व्ही. पी. सिंग यांच्यातही या दोन्ही बाजू नक्कीच होत्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी खोट्या एन्काऊंटरना प्रोत्साहन दिले. त्यांच्या साध्या आणि मुल्यनिष्ठ व्यक्तित्वाची ही दुसरी बाजू होती.
अर्थात, नंतरच्या काळात त्यांचे नाव राजकीय पटलावरून अदृश्य झाले असले तरी, त्यांच्या समकालीन राजकीय नेत्यांचा विचार करता व्ही. पी. सिंग यांचे व्यक्तिमत्त्व निश्चितच वेगळे होते.
विशेष, म्हणजे भ्रष्टाचाराचा राजमार्ग तयार झाला अशा काळात त्यांनी आपल्या स्वच्छ आणि इमानदार प्रतिमेला जपले आणि फक्त त्या प्रतिमेच्या जोरावर राजकारणात मुसंडी मारली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








