आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
लहान मुलं आवडत नाही, अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. नवजात बाळांना पाहण्यात आणि हातामध्ये घेण्यात स्वर्गीय आनंद मिळतो. हसऱ्या-खेळत्या बाळाला पाहिलं की कुणाचाही मूड क्षणात ठिक होऊ शकतो. बाळांची वाढ होताना त्यांच्यामध्ये होणारे लहान-मोठे बदल पालकांना तर वेगळाच आनंद देतात. मात्र, कधी-कधी ही लहान मुलं प्रचंड मनस्ताप देणारी ठरतात. त्यांच्या काही कृती तर इतक्या अविश्वसनीय असतात की, त्यावर लवकर विश्वास ठेवणंही कठीण होतं.
सध्याची पिढी तर खूपच फॉरवर्ड आहे, असं सर्रास म्हटलं जातं. आत्ताची लहान मुलं वेळोवेळी त्याची प्रचितीही देतात.
ब्राझीलमधील एका नऊ वर्षाच्या मुलानं तर कहरच केला आहे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी या मुलानं विनातिकीट चक्क २ हजार ७०० किलोमीटरचा विमानप्रवास केला आहे! या ओळीमध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही. इमॅन्युएल मार्कस डी ऑलिव्हेरा नावाच्या या मुलानं गुगलचा वापर करून हजारो किलोमीटरचा विमानप्रवास केला आहे.
त्यानं ही करामत कशी केली हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देण्यासाठी लॉकडाऊनचा अवलंब करण्यात आला. या दरम्यानच्या काळात इंटरनेटचा वापर लक्षणीय प्रमाणात वाढला. लहान मुलांचा देखील मोबाईल आणि इंटरनेट वापरण्याचा वेळ वाढला. कारण, आता शिक्षणही इंटरनेटच्या माध्यमातून होत असल्यानं मुलं दिवसरात्र हातात फोन घेऊन बसतात.
अनेक शाळकरी मुलांनी तर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया साईट्सवर आपली अकाऊंट्सदेखील सुरू केली आहेत. लॉकडाऊनमध्ये मुलं सोशल मीडियावर ज्याप्रकारे वेळ घालवत होते, त्यावरून इंटरनेटवर घडणाऱ्या गोष्टींचा त्यांच्यावर खूप परिणाम झाल्याचं दिसतं. आपली मुलं दिवसभर इंटरनेटवर काय करतात याबाबत कित्येक पालकांना माहितीही नसते. याचाच गैरफायदा घेऊन मुलं कधी-कधी अविश्वसनीय गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात.
ब्राझीलमधील नऊ वर्षाच्या इमॅन्युएल मार्कस डी ऑलिव्हेरानंही हेच केलं. इमॅन्युएलच्या करामतीमुळं जे लोक त्यांच्या सोशल मीडिया बायोमध्ये ‘#wanderlust’ आणि ‘#globetrotter’ लिहितात त्यांनाही कदाचित हेवा वाटला असेल.
या लहान मुलानं गुगलवर ‘How to get onto a plane unnoticed?’ या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि त्याचं प्रात्यक्षिकही केलं. इमॅन्युएलनं ब्राझीलच्या मॅनौस शहरापासून सुमारे १ हजार ६७७ मैल अंतरावर असलेल्या ग्वारुलहोसपर्यंत प्रवास केला. या प्रवासादरम्यान, त्याच्यासोबत ना त्याचे पालक होते ना तिकीट!
त्याच्या या कृतीमुळं विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना, विमानतळ प्राधिकरण आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी चकित झाले. कारण, कितीतरी वेळा अनोळख्या ठिकाणी जाण्यापूर्वी पौढ व्यक्तीदेखील अनेकदा विचार करतात. कित्येकांना पहिल्यांदा विमान प्रवास करण्याची प्रचंड भीती वाटते. मात्र, ब्राझीलमधील नऊ वर्षांच्या इमॅन्युएलनं केवळ कुतुहलापोटी एकट्यानं या आव्हानांचा सामना केला.
इमॅन्युएल मार्कस डी ऑलिव्हेराला त्याच्या नातेवाईकांसोबत साओ पाउलोमध्ये राहाण्याची इच्छा होती. त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी त्यानं स्वत:च मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. सर्वात सोपा पर्याय म्हणून त्यानं गुगलची मदत घेतली आणि कुणाच्याही न कळत २७०० किलोमीटरचा विमान प्रवास केला.
गेल्या आठवड्यात २६ फेब्रुवारी २०२२ रोजी ब्राझीलमधील मॅनौस येथील नऊ वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली होती. तो मुलगा म्हणजेच इम्यॅन्युअल होता. त्याची आई डॅनिएलनं त्याला सकाळी पलंगावर झोपलेलं पाहिलं होतं. मात्र, काही तासांनंतर तो बेपत्ता झाला.
दरम्यानच्या काळात हा लहानगा ‘ग्लोबट्रोटर’ त्याच्या घरातून बाहेर पडला आणि कसा तरी जवळच्या विमानतळावर गेला. त्यानंतर तो बोर्डिंग पास, तिकीट किंवा संबंधित कागदपत्रांशिवाय विमानात चढण्यात यशस्वी झाला. त्यानं दे दिव्य कसं पार केलं याबाबत कुणालाही कल्पना नाही. विशेष म्हणजे संपूर्ण फ्लाइटमध्ये तो स्वतःला लपवून ठेवण्यात यशस्वी झाला.
फ्लाइट लँड झाल्यानंतर क्रूचं इम्यॅन्युअलकडे लक्ष गेलं. त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या मदतीनं फेडरल पोलीस आणि गार्डियनशीप कौन्सिलला याबाबत माहिती दिली. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२२ रोजी इम्यॅन्युअलच्या पालकांना याबाबत माहिती मिळाली. तोपर्यंत त्याला गार्डियनशिप कौन्सिलच्या देखरेखीखाली आश्रय देण्यात आला. त्यानंतर त्याला घरी परत पाठवण्यात आले.
आता या इमॅन्युएल मार्कस डी ऑलिव्हेराच्या आईनं विमानतळ प्रशासन आणि अल्पवयीन मुलाला घेऊन विमानानं उड्डाण करणाऱ्या विमान कंपनीवर खटला भरण्याची योजना आखली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मॅनौस विमानतळ प्राधिकरणानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
स्थानिक पोलीस सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून तो विमानतळापर्यंत कसा पोहचला याचा शोध घेत आहेत. इमॅन्युएलच्या करामतीनं सर्वांना गोंधळात टाकलं आहे.
इंटरनेटच्या मदतीनं अविश्वसनीय करामत करणारा इमॅन्युएल हा काही पहिलाच मुलगा नाही. यापूर्वी अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एका २२ महिन्यांच्या भारतीय वंशाच्या मुलानं मोबाईलवर खेळताना १.४ लाख रुपयांचं नुकसान केलं होतं. त्यानं फोनवर खेळत असताना वॉलमार्ट शॉपिंग कार्टमध्ये ठेवलेलं १.४ लाख रुपयांचं फर्निचर ऑर्डर केलं होतं. जेव्हा फर्निचरीची डिलिव्हरी सुरू झाली तेव्हा पालकांना मुलाच्या करामतीची माहिती मिळाली.
पावणे दोन वर्षांच्या अयांश कुमारला त्याच्या आईनं शांत बसण्यासाठी फोन दिला होता. नीट बोलताही न येणाऱ्या अयांशनं लाखो रुपयांची शॉपिंग केली. विशेष म्हणजे त्याला अद्याप बोलता-लिहिता-वाचता येत नव्हतं मात्र, मोबाईल वापरण्यात तो एक्सपर्ट झाला होता.
लहान मुलांचे असे अनेक किस्से घडलेले आहेत. मात्र, आतापर्यंत इमॅन्युएल मार्कस डी ऑलिव्हेरासारखा विमान प्रवास कुणी केला नव्हता. इमॅन्युएलनं हे काम करून दाखवलं आणि चाईल्ड कम्युनिटीच्या अतरंगीपणाला पुन्हा फेमस केलं, यात शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.