आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताला गुलामीचा इतिहास मोठा आहे. अरब आक्र*मकांनंतर कोचीन आणि गोव्यातील परकीय सत्ताधारी पोर्तुगीजांनी गुलामांचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरु केला. पोर्तुगीजांबरोबरच डच ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि जंजिऱ्यातील आफ्रिकन सिद्द्यांनी गुलामांचा व्यापार सुरु ठेवला होता.
‘राष्ट्र’ म्हणून भारत परकीय आक्र*मणांच्या आधी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होता, या उपखंडावर होणारी कृषिउत्पादने क्वचितच जगात आणखी कुठेतरी होत असतील. फक्त मसालेच नाहीत, तर धान्य, फळं आणि विविध प्रकारच्या भाज्या अशा पिकांची भरभराट तर होतीच पण ते उत्कृष्ट दर्जाचेही होते. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर भारताच्या कृषी उत्पादनांना क्वांटिटी बरोबरच क्वालिटी होती. यामुळेच कधीकाळी जागतिक अर्थव्यवस्थेत भारत अव्वल स्थानावर होता.
पण इतकी भरभराट असूनही आपापसांतील वाद, जातीभेद, स्वार्थ आणि विविध प्रदेशांतील राजांच्या एकमेकांशी समन्वयाचा आभाव यांमुळे खैबर खिंडीतून आणि समुद्रातील आक्र*मणांना थोपवण्यात भारतीयांना यश आले नाही. शिवाय देशात अनेक मीर जाफरही होतेच. परिणामी, अनेक शत्रूच्या लागोपाठ झालेल्या आक्र*मणांमुळे सैन्यांतील आत्मविश्वास तुटून पडू लागला.
जरी देशाच्या काही लहान भागांत पराक्रमी आणि मुत्सद्दी राजांमुळे शत्रूचं वर्चस्व नव्हतं तरी गंगा-यमुनेचं समृद्ध खोरं आणि जवळजवळ संपूर्ण कोकणपट्टीच शिवरायांच्या उदयापर्यंत शत्रूच्या भक्ष्यस्थानी पडली होती. वेंगुर्ल्याचे डच, गोवा, दीव-दमण आणि मुंबईचे पोर्तुगीज, राजापूर आणि सुरतचे ब्रिटिश तसेच पूर्व किनाऱ्यावर पॉंडिचेरीसह आपला प्रभाव पाडणारे फ्रेंच आणि ब्रिटिश यांमुळे संपूर्ण भारतातील अफाट संपत्ती आणि लोक लुटले गेले. आज जरी काही लोक गोव्यातील पोर्तुगिजांचा पुरस्कार करणारे असले, तरी पोर्तुगीज हा ‘परकीय लुटेरा’च होता हे ध्रुव सत्य आहे.
सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, मकाऊमधील पोर्तुगीजांच्या सुरुवातीच्या सत्तेदरम्यान, मकाऊ या शहरात २००० पोर्तुगीज आणि २०,००० चिनी लोकांव्यतिरिक्त सुमारे ५००० गुलाम राहत होते. क्वचितच चिनी स्त्रियांनी पोर्तुगीज लोकांशी विवाह केला. सुरुवातीला बहुतेक गोव्यातून आणलेल्या स्त्रिया, श्रीलंकन आणि जपानी स्त्रिया मकाऊमध्ये पोर्तुगीज पुरुषांच्या बायका होत्या.
पोर्तुगीजांप्रमाणेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि डच ईस्ट इंडिया कंपनीसुद्धा गुलामांचा व्यापार करून धनार्जन करीत असत. एका ब्रिटिशाने तर गुलामांच्या व्यापारातून मिळालेल्या रकमेचा वापर करून इंग्लंडमधील एका विद्यापीठाला निधीपुरवठा केला होता. अमेरिकेतील येल विद्यापीठ हे जगातील अव्वल विद्यापीठांपैकी एक मानले जाते. जागतिक पातळीवर कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून सातत्याने क्रमवारीत आहे. याच विद्यपीठाचा संबंध भारतातील तत्कालीन मद्रास शहराशी असल्याचे दिसून येईल.
मद्रासचा गव्हर्नर एलीहू येलने या येल विद्यापीठाच्या बांधकामासाठी निधी दिला. हा निधी गुलामांच्या व्यापारातून मिळवल्याचे सांगितले जाते. एलिहू येलचा जन्म मॅसेच्युसेट्समधील बोस्टन येथे झाला. त्याचे कुटुंब इंग्लंडला स्थलांतरित झाले आणि त्याने लंडनमध्ये आपले पुढील शिक्षण घेतले. येल ईस्ट इंडिया कंपनीत रुजू झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठे परिवर्तन आले.
आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या भारतातून तथाकथित व्यापार करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जो रुजू होत असे, त्याचे आयुष्य अशाच प्रकारे बदलत असत. ईस्ट इंडिया कंपनी लवकरात लवकर पैसे कमवण्यासाठी लंडनहून दरवर्षी लोक पाठवत. अँड्र्यू कोगन आणि फ्रान्सिस डे यांना दक्षिण भारतातील मद्रास हे ठिकाण मिळाले.
अँड्र्यू कोगन आणि फ्रान्सिस डे यांनी १६३९ साली भारतात ब्रिटिशांचा पहिला किल्ला बांधला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हा किल्ला तत्कालीन मद्रासमध्ये आहे. येल अँड्र्यू कोगन नंतर मद्रासचा पहिला राज्यपाल बनला. याच किल्ल्यात सध्या तामिळनाडूची विधानसभा आणि अन्य सरकारी कार्यालये आहेत.
खाजगी व्यापारावर तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीने बंदी आणूनही येलने खाजगी व्यापार केला. येल एक भ्रष्ट अधिकारी होता आणि सेंट जॉर्ज किल्ल्याचा मुख्य न्यायाधीश असल्याने अनेक वाद मिटवण्यासाठी आणि खटल्यांचा निकाल श्रीमंत लोकांच्या बाजूने लावण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात लाच घेतली. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला आवश्यक भाडेतत्त्वावरील जागेसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणी केली आणि अतिरिक्त निधी स्वतःच्या खात्यात जमा करून घेतला.
ईस्ट इंडिया कंपनीने गुलामांच्या व्यापारावर बंदी आणूनसुद्धा, मद्रासहुन युरोपमध्ये जाणाऱ्या व्यापारी जहाजांमध्ये किमान दहा गुलाम तरी असावेत असे निर्देश त्याने दिले. येलने गुलामांच्या व्यवसायातून मोठा नफा कमावला. येलने केलेल्या बेकायदेशीर व्यापाराची बातमी लंडनमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयापर्यंत पोहोचताच कंपनीने येलला पदच्युत केले आणि ब्रिटनला परत बोलावून घेतले.
१६९९ साली ब्रिटनला परतल्यावर, येल लंडनमधील एका भव्य बंगल्यात राहू लागला. १७१८ साली येलला कॉटन मॅथर नावाच्या व्यक्तीकडून त्याच्या अमेरिकेतील कनेक्टिकट येथील महाविद्यालयासाठी देणगीची विनंती आली. येलने ६०० पुस्तकं, किंग जॉर्ज द फर्स्टची प्रतिमा आणि काही वस्तू पाठवल्या. कॉलेज प्रशासनाने या सर्व वस्तू सुमारे ८०० पौंड्सना विकल्या आणि त्याचा वापर कॉलेजमध्ये नवी इमारत उभारण्यासाठी करण्यात आला.
जसजसे महाविद्यालय मोठे झाले, तसे या संपूर्ण कॅम्पसला ‘येल विद्यापीठ’ हे नाव देण्यात आले. येल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि १९६८ साली अमेरिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत यांनी सेंट जॉर्ज किल्ल्यातील सेंट मेरी चर्चच्या नूतनीकरणासाठी मोठे दान केले. या चर्चमध्ये येलचे लग्न झाले होते आणि या चर्चमध्ये त्याचे स्मारकही आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










