आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सकाळी कसेबसे उठून मोठ्या कष्टाने डोळ्यातली झोप आणि अनावर होणाऱ्या जांभया जमेल तशा आवरत, पाठीला दप्तर अडकवून रडतखडत शाळेत जाणारी लहान मुले हे आपल्याकडे सर्रास दिसणारे चित्र. हिवाळ्यात तर बिचाऱ्यांचे अजूनच हाल. विशेषतः ज्या मुलांची शाळा सकाळची असते त्यांच्याकडे त्या मुलांनी लवकर न उठणे ही नेहमीची ओरड असते. परंतु याचा संपूर्ण दोष त्या मुलांना देता येणार नाही. यामागे एक वेगळेच कारण आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. ते म्हणजे भारतासाठी सर्वत्र एकच टाईमझोन किंवा प्रमाण वेळ असणे.
भारत हा आकाराच्या दृष्टीने जगातील सातवा मोठा देश आहे. परंतु एवढ्या विशाल देशामध्ये सर्व राज्ये एकाच प्रमाण वेळेचे पालन करतात. अमेरिका, कॅनडा याप्रमाणे आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रदेशांसाठी वेगवेगळे टाईमझोन नाहीत. मोठ्या देशासाठी अशाप्रकारे एकच टाईमझोन असणे हे अनेक समस्यांना निमंत्रण देऊ शकते.
समजा १९०४ मध्ये एखाद्याने मुंबईहून कलकत्त्याला जायचे ठरवले असते तर त्याला आपले घड्याळ साधारण एक तासाने ॲडजस्ट करावे लागले असते. त्यावेळी भारतामध्ये अनेक टाईमझोन अस्तित्वात होते, आणि मुंबई व कलकत्ता या दोन शहरांमध्ये एक तासाचा फरक होता. आज मात्र भारतामध्ये एकच टाईमझोन आहे. त्यालाच आपण इंडियन स्टॅण्डर्ड टाईम किंवा भारतीय प्रमाण वेळ असे म्हणतो.
आता ही सर्व संकल्पना समजून घेण्यासाठी आपण आधी काही मूलभूत गोष्टींचा विचार करू.
पृथ्वीवरच्या सर्व भागांना एकावेळी सारखाच सूर्यप्रकाश मिळत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे एका विशिष्ट वेळी पृथ्वीचा जो भाग प्रकाशित असतो तेथे दिवस असतो आणि उरलेल्या भागात रात्र असते. हे गृहीत धरून पृथ्वीवर २४ टाइमझोन अस्तित्वात आहेत. हे टाईमझोन पृथ्वीच्या रेखांशांवरून ठरतात.
लगतच्या दोन टाईमझोनमध्ये पंधरा अंशाचा आणि एक तासाचा फरक असतो. (३६०/२४=१५) या रेखांशांच्या मदतीने एखाद्या विशिष्ट ठिकाणाची वेळ निश्चित करता येते. म्हणजेच एखाद्या ठिकाणी समजा दुपारचे दोन वाजले असतील तर त्याच्या डावीकडील १५ अंशांवर दुपारचा एक वाजला असेल आणि उजवीकडे ३० अंशांवर दुपारचे चार वाजले असतील.
हे टाईमझोन निश्चित करण्यासाठी एका काल्पनिक संदर्भ रेषेचा उपयोग केला जातो. तिला प्राईम मेरिडियन असे नाव आहे. या ठिकाणच्या वेळेला कोऑर्डीनेटेड युनिव्हर्सल टाईम असे म्हणतात.
आता परत भारताकडे वळूयात. भारतीय प्रमाणवेळ ही ८२.५ अंश रेखावृत्तावरून घेतलेली आहे. हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातील मिर्झापूरवरून जाते. ही प्रमाणवेळ कोऑर्डीनेटेड युनिव्हर्सल टाईमपेक्षा साडेपाच तास पुढे आहे. आता यामुळे कोणती समस्या निर्माण होऊ शकते?
याचे उत्तर दडले आहे सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळांमध्ये. भारताच्या अति पूर्वेकडच्या प्रदेशात जसे की अरुणाचल प्रदेशसारख्या ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्तही लवकर होतो. म्हणजेच येथे दिवस उजाडणे आणि अंधार पडणे या दोन्ही घटना उर्वरित भारताच्या तुलनेत आधी घडतात. आता भारताच्या पश्चिमेकडे पाहू.
गुजरातमध्ये याच्या बरोबर विरुद्ध गोष्ट आढळून येते. येथे सूर्यास्त आणि सूर्योदय दोन्ही तुलनेने उशिरा होतात. या दोन्ही ठिकाणच्या सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळांमधील फरक तब्बल दोन तासांचा आहे. पण भारतीय प्रमाण वेळ हा फरक लक्षात घेत नाही. उलट भारतीय प्रमाणवेळेनुसार जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये सकाळचे सहा वाजलेले असतात तेव्हा गुजरातमध्येही सकाळचे सहाच वाजलेले असतात. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे झोपेचे चक्र बिघडणे. कसे ते बघू.
भारतामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी शाळा आणि ऑफिसेस सुरू होण्याची वेळ एकच असते. परंतु भारताच्या पश्चिमेकडच्या भागांमध्ये सूर्यास्त उशिरा होत असल्याने येथील लोकांना कमी झोप मिळते. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो.
कॉर्नेल विद्यापीठाने यावर एक पेपर प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या संशोधनानुसार ज्या प्रदेशांमध्ये सूर्यास्त एक तासाने उशिरा होतो, तेथील मुलांना अर्धा तास झोप कमी मिळते. उदाहरणार्थ दोन मुलांपैकी एक मूल अशा प्रदेशात राहते जिथे संध्याकाळी सहा वाजता सूर्यास्त होतो आणि दुसरे मूल अशा ठिकाणी राहते जिथे सूर्यास्त संध्याकाळी सात वाजता होतो.
तर दुसऱ्या मुलाला रोज अर्धा तास झोप कमी मिळेल. हे रोजच होत राहिले तर त्या मुलाची कार्यक्षमता किती पटीने कमी होईल याची सहज कल्पना करता येते. याच्याच पुढे जाऊन सूर्यास्ताच्या वेळेमध्ये वर्षभरात सरासरी एक तासाचा विलंब म्हणजे मुलांच्या शिक्षणाचे एक वर्ष नुकसान.
यामुळे इतरही काही तोटे होत आहेत. एका पुराव्यानुसार गरीब कुटुंबातील मुलांची रात्रीच्या झोपेची रोजची सात मिनिटे नष्ट होत आहेत. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणावर झोप न मिळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
अजून एक महत्त्वाची समस्या म्हणजे यामुळे विजेचाही मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अति पूर्वेकडे लवकर उजाडते आणि लवकर अंधार पडतो. मात्र भारतीय प्रमाण वेळेनुसार बहुतेक कार्यालये संध्याकाळी किमान सहा वाजेपर्यंत सुरू असतात, ज्यावेळी पूर्वेकडील प्रदेशात अंधार पडलेला असतो. यामुळे त्यांना काम चालू ठेवण्यासाठी कृत्रिम प्रकाशाचा, पर्यायाने विजेचा, आधार घ्यावा लागतो आणि यातून मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जा खर्च होते. हिवाळ्यामध्ये तर ही समस्या अजूनच गंभीर बनते. याचे कारण हिवाळ्यामध्ये दिवस लहान असल्यामुळे सूर्यास्त अजूनच लवकर होतो आणि अजून जास्त प्रमाणात विजेचे दिवे वापरावे लागतात.
मग यावर उपाय काय? तर एका संशोधनानुसार भारतीय प्रमाणवेळ अर्ध्या तासाने पुढे नेली तर वर्षभरात २.७ बिलियन युनिट्स एवढी वीज वाचू शकेल. म्हणजे भारतीय प्रमाणवेळ कोऑर्डीनेटेड युनिव्हर्सल टाईमपेक्षा साडेपाच ऐवजी सहा तासांनी पुढे न्यावी लागेल.
अजून एक उपाय म्हणजे भारतात एकच प्रमाण वेळ न ठेवता दोन टाइमझोन्स निश्चित करणे. यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये म्हणजेच जीडीपीमध्ये वार्षिक ०.२ टक्क्यांची वाढ होऊ शकते. यामध्ये बहुतांश भारतासाठी एक टाइमझोन आणि भारताच्या पूर्वेकडील आठ राज्यांसाठी एक टाइमझोन असे दोन झोन्स सुचवले आहेत. या दोन टाईमझोन मध्ये एक तासाचे अंतर असेल.
विशेष गोष्ट अशी की आसाममधल्या चहाच्या मळ्यांमध्ये हा प्रकार आधीपासूनच राबवला जात आहे. येथे काम करणाऱ्यांनी आपली घड्याळे आधीच एक तास पुढे नेऊन ठेवली आहेत. मात्र संपूर्ण भारतासाठी अशाप्रकारे दोन टाइमझोन निर्माण करणे अवघड आहे. यामुळे प्रशासकीय स्तरावर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
अशा अवघड परिस्थितीमध्ये त्या त्या प्रदेशानुसार उत्तरे शोधणे जास्त फायद्याचे ठरते. जसे देशाच्या पश्चिमेकडील भागात सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही उशिरा होत असल्याने तेथे कार्यालय, शाळा यांच्या वेळा उशिराच्या ठेवणे श्रेयस्कर ठरते. यामुळे लोकांचे झोपेचे चक्र बिघडणार नाही आणि कार्यक्षमता अर्थातच वाढेल. पूर्वेकडील राज्यांमध्ये याच वेळा लवकर ठेवल्या तर अनावश्यक ऊर्जा खर्च होणार नाही आणि सूर्यप्रकाशात सारख्या नैसर्गिक स्रोतांचा पुरेपुर वापर केला जाईल.
कोणते समाधान या समस्येसाठी योग्य राहील असे तुम्हाला वाटते? आपली उत्तरे जरूर कॉमेंट बॉक्स मध्ये टाका.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










