आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गुगल हा आपल्या आयुष्यातील एक परवलीचा शब्द झाला आहे. अगदी गुगलशिवाय आपलं पानही हलणार नाही अशी सध्याची स्थिती आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे गुगलचादेखील वापर वाढतो आहे. अगदी रोजच्या घडामोडींपासून ते इतिहासाच्या पानात दडलेल्या/विस्मरणात गेलेल्या एखाद्या घटनेबद्दल, विज्ञानातील एखाद्या संकल्पनेबद्दल किंवा नव्या जुन्या चित्रपटांबद्दल, इतकेच कशाला आपल्या घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या एखाद्या दुकानाबद्दल आपल्याला काही माहिती हवी असली तर आपण पटकन गुगुल सर्च इंजिन उघडतो. आपल्याला हव्या असणाऱ्या माहितीसाठी आवश्यक शब्द सर्च बारमध्ये टाकतो आणि सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत, तिथे उपलब्ध असल्यास आपल्याला हव्या त्या माहितीचा भरमसाठ खजाना आपल्यासमोर उभा राहतो.
जणू एखाद्या माहितीच्या खजान्याची चावी म्हणजे गुगल असे म्हटले तरी हे शब्दही गुगलचे वर्णन करण्यास तोकडेच पडतील. शिवाय, गुगलविषयी जरी आपल्याला काही अधिक माहिती हवी असेल तर तीदेखील आपण गुगल करून मिळवू शकतो.
तर, आता गुगल हा किती महत्त्वाचा घटक आहे हे कुणाला सांगत बसण्याची तशी अजिबात आवश्यकता नाहीये. पण, तरीही खुद्द गुगलला असं वाटत आहे की गुगल सर्च इंजिन लोकांसाठी किती उपयुक्त ठरू शकते, हे लोकांना पटवून देण्याची गरज आहे. गुगलच्या व्यवसायात भारताचा चक्क ९७% वाटा असताना देखील गुगलला आपण काय आहोत, कोण आहोत, कशासाठी आहोत, हे पटवून देणे महत्त्वाचे वाटत असेल तर, ही गोष्ट नक्कीच सामान्य नाही.
गुगलने स्वतःची जाहिरात करणारा एक छोटासा व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओचा कंटेंट खूपच छान आहे.
गुगलच्या माध्यमातून फाळणीच्या काळापासून विलग झालेले दोन लंगोटी यार कसे पुन्हा जोडले जातात याचे अत्यंत भावूक दर्शन या जाहिरातीतून केले आहे. या जाहिरातीला फक्त पाच दिवसांत तब्बल ३ लाखांहून जास्त लोकांनी बघितले आहे.
गुगलचे महत्त्व पटवून देण्यासाठी गुगलने तीन ते साडे तीन मिनिटांची ही जी छोटी जाहिरात बनवली आहे, त्यावर निश्चितच भरपूर पैसा देखील खर्च केला असेल. ९७% वाटा असलेल्या भारतीय बाजारपेठेत अचानक गुगलला अशाप्रकारे स्वतःची जाहीरात करण्याची गरज का भासली हा महत्वाचा प्रश्न आहे.
याचे उत्तर आहे- गुगलला भविष्यात आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी भीती वाटत आहे. अर्थात ही भीती अनाठायी अजिबात नाही. संपूर्ण जग हल्ली स्मार्टफोनने जोडले जात आहे. लोकांना हवी ती माहिती मिळवण्यासाठी आता कुणावरही अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.
त्यामुळे गुगलच्या www.google.com या युआरएलवर जाऊन लोक आपल्याला हवी ती माहिती सर्च करतीलच असं नाही. कारण प्रत्येक व्यवसायाचे मार्केटिंग करणरे ॲप्स आहेत. त्यांच्या त्या ॲप्समध्ये जाऊन हवी ती माहिती सर्च केल्यानंतर सगळे तपशील समोर येतात. समजा एखाद्या व्यक्तीला जवळपासचे रेस्टॉरंट आणि तिथे मिळणाऱ्या विशेष पदार्थांची माहिती हवी आहे. तर, अशा माहितीसाठी गुगलचाच वापर केला पाहिजे असे नाही.
अन्नपदार्थांची माहिती आणि त्यांची डिलिव्हरी देण्यासाठी झोमॅटो, स्वीगीसारखे कितीतरी ॲप्स आहेत. जिथे माहिती मिळते आणि घरपोच सेवाही मिळते. समजा एखादा ब्रँडेड स्मार्ट फोन घ्यायचा आहे, त्यासाठी ग्राहकाला Samsaung Galaxy Note 3 हा फोन कुठल्या दुकानात मिळेल याची माहिती शोधत बसण्यापेक्षा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ॲपवरून त्याची किंमत पडताळून तो घरी मागवणे जास्त सोयीचे ठरते. गुगलवर जाऊन मोबाईल स्टोअर शोधा मग ते स्टोअर शोधत तिथे पोहोचा आणि मग तो मोबाईल विकत घ्या. यापेक्षा होम डिलिव्हरीचा पर्याय जास्त सोपा नाही का?
जवळपास सगळ्याच उत्पादनांची, दुकानांची किंवा इतरही गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी किंव उत्पादन खरेदी करण्यासाठी गुगलपेक्षा ॲप्सचा वापर जास्त फायद्याचा ठरतोय हे नक्की. म्हणूनच गुगलचा भारतीय बाजारपेठेतील वाटा ९७% असला तरी, त्याला आपला रिच कमी होण्याची जास्त भीती आहे.
अशा परिस्थितीत गुगल तुम्हाला जमेल तितक्या सेवा प्रदान करण्याच्या प्रयत्नात आहे. गुगल तुमचे ठिकाण, दिवसातील वेळ आणि तुम्ही गुगलसर्चमध्ये किंवा युट्युब आणि गुगल मॅप यावर पूर्वी जे काही शोधले आहे त्या माहितीवरून जास्तीत जास्त चांगली माहिती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करते.
या सगळ्या सेवांना एकत्र करून गुगलने गुगल न्यूज ही नवी सेवा सुरु केली आहे. ही नवी सेवा अँड्रॉइड आणि गुगलच्या आयओएस सर्च ऍपचा एक अविभाज्य भाग असणार आहे. डेस्कटॉपपेक्षा गुगलला मोबाईलवर अधिकाधिक युजर्स मिळतील हे तर गृहीतच आहे.
गुगलने सध्या जी रियुनियन ॲड सुरु केली आहे, त्याची सुरुवात जरी डेस्कटॉप सर्चने होत असली तरी, लवकरच ती फोनकडे शिफ्ट होते. आजकाल तरुण युजर्स हवामानाचा अंदाज, विमान वाहतुकीच्या वेळा यासारख्या माहितीसाठी गुगलने नव्याने आणलेल्या डिस्प्ले कार्ड्सचा वापर करत आहेत.
अर्थात, गुगलने घेतलेल्या या नव्या अवतारामुळे हे स्पष्ट होते की तुम्हाला हवी असलेली माहिती देण्याचा गुगलचा सर्वतोपरी प्रयत्न असेल. शिवाय, हवामान आणि वाहतूक सेवेची माहिती घेण्यासाठी त्यासाठीचे विशेष ॲप्स न वापरता गुगलच्या डिस्प्ले कार्ड्सचा वापर करणे जास्त सोयीचे ठरेल.
भारतात अँड्रॉइड फोन्सच्या वापरात वाढ होत असताना, लोकं गुगलऐवजी ॲप्सवर जास्तीत जास्त अवलंबून राहतील ही गुगलची भीती नक्कीच अनाठायी नाही.
यासाठी गुगलने बनवलेली जाहिरात भावनिक आवाहन करण्यास यशस्वी झाली असली तरी गुगलची जी भीती आहे, तिच्यावर मात करण्यात मात्र यशस्वी झालेली नाही. मोबाईल वापरणाऱ्या लोकांना आपल्याकडे खेचण्यास ही जाहिरात फारशी यशस्वी ठरणार नाही. येत्या काळात गुगलसमोरील आव्हाने बिकट होत जाणार आहेत हे मात्र नक्की!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










