पं. दीनदयाळ उपाध्यायांनी जगाला भारताच्या तत्त्वज्ञानाची खरी ओळख करून दिली होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


लेखक- श्रीपाद कोठे (नागपूर)


भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद’ हा पक्षाचा वैचारिक आधार म्हणून स्वीकारला आहे. त्यामुळे अनेकांच्या कानावर `एकात्म मानववाद’ हे शब्द पडले आहेत. परंतु `एकात्म मानववाद’ म्हणजे नेमके काय? काय आहे हा `एकात्म मानववाद’? हे मात्र फारसे चर्चेचे विषय नसतात. एकूण `एकात्म मानववाद’ याचं आकलन फारसं नाही हे वास्तव आहे. भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद’ म्हणजे `अंत्योदय’ असं सोपं, सुटसुटीत समीकरण केलं आहे. ते योग्य तर नाहीच, पण घातकही आहे.

फारशी साधकबाधक चर्चा आजवर झाली नसल्याने स्वाभाविकच `एकात्म मानववाद’ याबद्दल गैरसमज आहेत आणि आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावून त्यावर टीकाटिप्पणीही होत असते.

एक बाब अगदी स्पष्ट आहे की, `एकात्म मानववाद’ हे एक वैचारिक दर्शन आहे. दर्शन ते असते जे दिशा देते. म्हणूनच `एकात्म मानववाद’ सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था आणि जीवन यांना दिशा देणारा विचार आहे.

तो राजकीय किंवा आर्थिक कार्यक्रम नाही. तो राजकीय, आर्थिक नियोजनाचा आराखडा नाही. निवडणुका, राजकीय पक्ष, निरनिराळ्या नियुक्त्या, कार्यक्षेत्रे, कामाचे वाटप, निधीचे वाटप, आर्थिक रचना, उद्योगांचे स्वरूप इत्यादी गोष्टी त्यात नाहीत. तशी अपेक्षा ठेवून `एकात्म मानववाद’ पाहिल्यास निराशाच पदरी पडेल.

आपलं कंडीशनिंग इतकं झालं आहे की, स्वयंपाक किंवा बालसंगोपनसुद्धा नेमक्या सूचनांशिवाय आपण करू शकत नाही. आपल्याला सगळे साचे तयार हवेत. त्यात कच्चा माल ओतून मूर्ती घडवणे एवढेच आपल्याला जमते. दृष्टी, कल्पना आणि हात वापरून मूर्ती तयार करणे आम्ही विसरलो आहोत. पण ही समस्या आपली आहे. त्यामुळे `एकात्म मानववाद’ अपुरा वा चुकीचा वा निरर्थक ठरत नाही.

आपल्या मर्यादांमुळे आम्हाला त्याचं आकलन होत नाही. `एकात्म मानववाद’ सर्व प्रकारच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक रचना, व्यवस्था, त्यातील परिवर्तने यांची दिशा काय असावी हे स्पष्ट करणारे एक विचारदर्शन आहे, एखादा नियोजन आराखडा नाही हे नीट समजून घेणे आवश्यक आहे.

१९६५ च्या एप्रिल महिन्यात २२, २३, २४ आणि २५ तारखांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची मुंबईत चार भाषणे झालीत. ती भाषणेच एकात्म मानववाद म्हणून ओळखली जातात.

त्यातील पहिले भाषण होते- `राष्ट्रवाद की सही कल्पना’, दुसरे भाषण होते- `एकात्म मानववाद’, तिसरे भाषण होते- `व्यष्टी, समष्टी मे समरसता’ आणि चौथे भाषण होते- `राष्ट्रीय जीवन के अनुकूल अर्थरचना’.

या सगळ्या भाषणांमध्ये धोरण, नीती, आकडेवारी इत्यादी नाही. सरकारी वा गैरसरकारी धोरणांची चिरफाड नाही. वर्तमान वा भूतकालीन संदर्भ हे विषयाच्या स्पष्टीकरणासाठी अन् विवेचनासाठी आहेत. मग या भाषणांमध्ये एवढे काय आहे?

त्यात मानवी जगण्याच्या अन् त्यासाठी उभ्या करण्यात येणाऱ्या व्यवस्थांच्या संदर्भात मुलभूत तात्विक चिंतन आहे. राष्ट्र म्हणजे काय? आधुनिक राष्ट्रकल्पना काय आहे अन ती कशी विकसित झाली? भारतीय राष्ट्रकल्पना काय आहे? दोन्हीतील मूलभूत फरक काय? सुख म्हणजे काय? जीवनाची दृष्टी कशी असावी? राज्य म्हणजे काय? समाज म्हणजे काय? पैशाकडे कसे पहावे? आदर्श काय असावेत?

व्यक्ती आणि समाज कसा विचार करतात? अनेक राष्ट्रे संपून का गेलीत? धर्म म्हणजे काय? सत्ता आणि संपत्ती यांची बलस्थाने आणि दुर्बलस्थाने कोणती? त्यांच्या मर्यादा काय? चतुर्विध पुरुषार्थ, मानवाचे स्वरूप; इत्यादी गोष्टींची या भाषणांमध्ये चर्चा आहे.

अशा प्रकारे विचार करण्याची आणि तो देशासमोर ठेवण्याची गरज दीनदयाळजींना का वाटली? `एकात्म मानववाद’ मांडण्यापूर्वीच्या एका लेखात त्यांनी हे स्पष्ट केले आहे. `समाजवाद, प्रजातंत्र आणि हिंदुत्ववाद’ या शीर्षकाच्या लेखात लोकशाही, समाजवाद, सर्वोदय, यंत्रवाद, भांडवलशाही; या साऱ्याचा आणि त्यातील प्रत्येकाच्या मुळाशी असलेल्या तत्वज्ञानाचा परामर्श घेऊन, त्यांच्या यशापयशाची आणि संभाव्यतांची चर्चा करून शेवटी निष्कर्ष मांडताना दीनदयाळजी म्हणतात-

`आपणास राजनैतिक, आर्थिक, सामाजिक आणि सैद्धांतिक अशा सर्वच आघाड्यांवर यंत्रवादाशी सामना करावा लागेल. धर्मराज्य, प्रजासत्ताक, सामाजिक समानता आणि आर्थिक विकेंद्रीकरण हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. या सर्वांचा संमिलीत निष्कर्षच आपणास एक असे जीवनदर्शन देईल की ज्यामुळे आपण आजच्या झंझावाती वादळामध्येही सुरक्षित राहू शकू.

आपण त्याला कोणतेही नाव देऊ शकतो- हिंदुत्ववाद, मानवतावाद किंवा आणखी कोणताही नवा वाद. पण हाच एकमेव मार्ग भारतीय आत्म्याला अनुरूप असा होईल. तोच जनतेमध्ये नवीन उत्साह निर्माण करील आणि कदाचित संभ्रमाच्या चौरस्त्यावर उभ्या असलेल्या विश्वालाही तो मार्गदर्शन करू शकेल.’

१९६५ साली एप्रिल महिन्यात सगळ्या देशापुढे `एकात्म मानववाद’ ठेवून दीनदयाळजींनी त्यांना वाटणारी ही गरज पूर्ण केली.

आपण ज्या मार्गाने आजवर चालत आलो त्याने लोक, समाज, राज्य, यंत्र या सगळ्यात एक संघर्ष उत्पन्न केल्याचे रोज पाहायला मिळते. यातील प्रत्येक घटकाची ओढाताण, प्रत्येक घटकाला कमी वा अधिक महत्व- स्थान- प्राधान्य- प्रमाण- यामुळे जन्माला येणारे दु:ख, अस्वस्थता, उद्रेक, असमाधान, अशांती; आज नवीन राहिलेले नाही.

या पार्श्वभूमीवर `एकात्म मानववाद’ लक्षणीय ठरतो. हा सार्वत्रिक संघर्ष आणि असमाधान दूर करण्यासाठी; प्रत्येक घटकाचे महत्व, स्थान, प्राधान्य, प्रमाण कमी वा अधिक होऊ नये हे आवश्यक आहे. परंतु हे कमी आहे की अधिक आहे हे कसे ठरवायचे? त्याचा निर्णय कसा करायचा?

त्यासाठी हवी दृष्टी. ही दृष्टी विकसित होण्यासाठी हवा ठोस विचार. असा विचार आकारास येण्यासाठी हवे तत्वज्ञान आणि असे तत्वज्ञान सिद्ध होण्यासाठी हवे जीवनाचे दर्शन. असे जीवनाचे दर्शनच या सगळ्या धावपळीला दिशा देऊ शकते.

`एकात्म मानववाद’ हे असे दिशा देणारे दर्शन आहे. काय सांगते हे दर्शन?

 •  आत्यंतिक व्यक्तिवाद नको.
 •  आत्यंतिक समाजवाद नको.
 •  पैशाचा अभाव नको तसेच पैशाचा प्रभावही नको.
 •  संघर्षाऐवजी समन्वयाची कास धरावी.
 •  राजकीय सत्ता सर्वोपरी आणि सर्वेसर्वा नाही.
 •  माणूस हा आर्थिक, राजकीय वा सामाजिक प्राणी नाही.
 •  माणूस हा शारीरिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यासोबतच मानसिक, बौद्धिक व आत्मिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यांनी संचालित होत असतो.
 •  माणूस हा ठोकळा वा यंत्र नाही. (यंत्रवाद म्हणताना दीनदयाळजींना यंत्रांचा अतिरेक नसावा हे जसे अभिप्रेत होते तसेच माणूस हा यंत्र नाही; किंबहुना हे विश्व म्हणजे चार भाग जोडून बनवलेले यंत्र नाही हेही अभिप्रेत होते. विचार आणि दृष्टीतील यांत्रिकता हा यंत्रवाद याचा आशय.)
 •  मानव हा या विश्वापासून वेगळा isolated नाही. माणूस, समाज, निसर्ग, ब्रम्हांड, अन या सगळ्याचे मूळ जे काही असेल ते; या सगळ्यांचा समन्वय सुखासाठी आवश्यक. सगळ्यापासून फटकून अथवा सगळ्यावर सत्ता गाजवण्याच्या वृत्तीतून सुखी होता येणार नाही.
 •  उच्च प्रेरणांच्या अभावी मानवी जाणिवांचा आणि प्रेरणांचा विकास अशक्य. अन या विकासाअभावी सुखशांतीपूर्ण सह अस्तित्वाकरीता माणूस सहकार्यही करणार नाही.
 •  विचार आणि चेतनेचा विकास झालेला माणूस. नराचा नारायण होण्याचा ध्यास घेतलेला माणूस. त्याच्या आधारे मर्यादांची जाण असणाऱ्या व्यवस्था. सामूहिक पुरुषार्थाच्या आधारे या व्यवस्थांच्या द्वारे सगळ्यांचे संपूर्ण सुख.
 •  यासाठी अनुकूल जीवनशैली.

एकात्म मानववादाचे हे काही ठळक पैलू. यांच्यावर एक नजर टाकली तरीही एक गोष्ट लगेचच स्पष्ट होते की, राजकीय पक्ष, राजकीय सत्ता यांची यातील भूमिका मर्यादित आहे. ती मुलभूत आहे असेही नाही. हा समाजाने समाजासाठी करावयाचा विचार आहे. ही समाजाने स्वत:साठी स्वीकारावयाची दिशा आहे.

राजकीय सत्तेला वेठीला धरून व्यक्ती वा समाजाच्या इच्छांची आवर्तने पूर्ण करण्याचा खटाटोप किंवा व्यक्ती व समाजाच्या इच्छांच्या आवर्तनांचा उपयोग करून घेत सत्ता बळकट करण्याचा उपद्व्याप; असे `एकात्म मानववादाचे’ स्वरूप नाही.

एकात्म मानववाद हजारो वर्षांच्या मानवी संचितातून निघालेले नवनीत काय आहे याचा मार्ग आणि दिशा स्पष्ट करतो. त्यासाठी सत्ता, पक्षोपपक्ष यांच्यासोबतच समाजाकडूनही विशिष्ट गुणांची, कर्तव्यांची, जबाबदाऱ्यांची, समजूतदारीची अपेक्षा करतो.रेडीमेड टेलर्ड सुखाचा दावा एकात्म मानववाद करीत नाही.

खोट्या आणि फसव्या कल्पना आणि दावे तो मोडीत काढतो. तो ना आशावादी आहे ना निराशावादी. एकात्म मानववाद यथार्थवादी आहे. तो डावा किंवा उजवा नाही, तर सरळमार्गी आहे.

एकात्म मानववाद समजून घेण्यासाठी आणि त्यातील खाचखळगे, शंकाकुशंका यांच्या समाधानासाठी दीनदयाळजींचं अन्य साहित्य आणि विशेषत: त्यांची `चिती’ कल्पना आणि `लोकमत परिष्काराचा’ विचार समजून घेणे आवश्यक आहे. अन्य विचारधारांच्या तुलनेत हे एकात्म मानववादाचे वैशिष्ट्यही आहे.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
 फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!