आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कुठल्याही व्यवसायाला मोठं करायचं असल्यास ग्राहकांशी असलेले संबंध मजबूत करणे हे कुठल्याही कंपनीचे पहिले काम असते. यासाठी या कंपन्या विविध प्रकारचे प्रयोग करत असतात जेणेकरून ग्राहक आणि विक्रेते यांच्याशी असलेले संबंध मजबूत होऊ शकतील आणि आपलं उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकेल.
अमेझॉन ही भारतातील अग्रगण्य ऑनलाईन रिटेलिंग कंपनी असून आपल्या ग्राहकांशी असलेल्या संबंधांच्या बाबतीत या कंपनीने तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड केले आहे. अमेझॉनने भारतात पॅकेजिंगमध्ये एक नवीन संशोधन केले असून या संशोधनानुसार त्यांनी त्यांच्या पॅकेजिंग सिस्टमला ग्राहकांच्या आणि विक्रेत्यांच्या दृष्टीने आकर्षक बनवले आहे.
या पॅकेजिंगला त्यांनी एक भावनात्मक रंग प्रदान करून ग्राहकांसोबत जिव्हाळ्याचं नातं निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला आहे. या नव्या पॅकेजिंग बॉक्सेसला त्यांनी अमेझॉन स्टोरी बॉक्सेस असे नाव दिले आहे.
या स्टोरी बॉक्सच्या मदतीने अमेझॉन आपल्या भारतीय विक्रेत्यांच्या कथा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू पाहत आहे, जे स्वतःच्या अनोख्या उत्पादनांची निर्मिती करत आहेत. हे उत्पादन बनवण्यापासून त्याच्या विक्रीपर्यंतचा संघर्ष हा या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
याबरोबरच ग्राहक जे उत्पादन आज विकत घेत आहेत, त्याचा त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा संघर्ष या माध्यमातून सांगितला जाणार आहे. आपल्या कर्मचारी आणि विक्रेते यांच्यासह ग्राहकांशी असलेली बांधिलकी दाखवून देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आपल्या ग्राहकांशी असलेल्या संबंधांना अजून उजाळा देण्यासाठी अमेझॉनने पहिल्यांदाच त्यांच्या स्टोरी बॉक्सेस वर विक्रेत्यांचे चेहरे बार कोडिंगच्या माध्यमातून प्रिंट केले आहेत.
हे चेहरे आपल्या मोबाईलवर स्कॅन केल्यावर आपण सरळ www.amazon.in/storyboxes या संकेतस्थळावर जातो आणि त्यात आपण अमेझॉनवर आपल्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या अजून काही लोकांच्या स्टोरीज वाचता येतात.
आपल्या योजनेचा भाग म्हणून अमेझॉनने एक नवीन जहिरात काढली आहे, ह्या जाहिरातीच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना विकत घेतलेल्या उत्पादनाच्या विक्रेत्याची कथा ऐकून होणारा आनंद दाखवला आहे.
सोबतच त्यांनी आपल्या विक्रेत्यांच्या आणि उत्पादनाच्या निर्मितीच्या संघर्षगाथा दाखवल्या आहेत. त्यांनी अशा ६ विक्रेत्यांची कथा लिहली असून अमेझॉनने त्यांच्या आयुष्याला बदलण्यात कशी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, हे दाखवण्यात आले आहे.
रविंद्रन सिल्क कॉटनच्या राणी रविंद्रन, हस्तिकाचे बिस्वजीत सेन, सिरीमिरीच्या विजया राजन, झिझीराच्या इब्न्शारा शुल्लाई, ट्रेडीशनल रोग्नाआर्टचे अब्दुल गफार खत्री आणि वॉव स्कीन सायन्सच्या अश्विनी सोक्के ह्या विक्रेत्यांचा आणि विक्रेत्यांचा उत्पादनाच्या प्रवासाचा समावेश ह्यात करण्यात आला आहे.
आपल्या पॅकेजिंग आयडिया प्रमाणे अमेझॉनने ह्या जहिरातीच्या निर्मितीत ग्राहकाला पुढे करण्याची किमया साधली आहे.
ह्या जाहिरातीत त्यांनी ग्राहक जो त्याने घेतलेल्या उत्पादनाच्या निर्मितीची कथा ऐकून आनंदी झाला असल्याचं चित्र दाखवलं आहे.
ऑनलाईनप्रमाणे ऑफलाईन स्तरावर देखील अमेझॉन ग्राहकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी आणि त्यांची अनुभूती अजून अविस्मरणीय बनवण्यासाठी अमेझॉनने ऑन ग्राऊण्ड मार्केटिंगचा मार्ग निवडला आहे.
अमेझॉनने भारतातील विविध पब्लिक प्लेसेसवर विविध जाहिराती लावल्या आहेत, त्यासाठी पोस्टर्स, बॅनर्स आणि आउटडोअर मार्केटिंगचा आसरा घेतला आहे.
उदाहरणार्थ बंगलोर विमानतळावर अमेझॉनने आपले एक विक्रेते आणि प्रसिद्ध कलावंत अब्दुल गफार खत्री यांचं पोट्रेट लावलं आहे. खत्री यांनी रोगण आर्टची स्थापना केली असून ते अमेझॉनवरचे एक प्रसिद्ध विक्रेते आहेत.
खत्री यांच्या ह्या पोट्रेटचे वैशिष्टय असे आहे की हे पोट्रेट ३०० वेगवेगळ्या अमेझॉन बॉक्सेसचा वापर करून साकारण्यात आले आहे. हे आउटडोअर मार्केटिंगचे उत्तम उदाहरण आहे. या कलात्मक पद्धतीचा वापर केल्याने लोकांचे लक्ष त्याकडे आकर्षिले जात आहे.
अमेझॉनच्या ह्या जहिरातीच्या संपूर्ण योजनेच्या यशामागे अमेझॉनच्या क्रिएटिव्ह एजन्सीच्या लियो बर्नेट ऑर्चर्ड यांचा मोठा वाटा आहे.
शबँग नावाची जहिरात कंपनी देखील ह्या अत्यंत यशस्वी अशा कॅम्पेनमध्ये डिजिटल मार्केटिंगची महत्वपूर्ण भूमिका बजावते आहे. त्यांनी अमेझॉनच्या ह्या अत्यंत महत्वपूर्ण मोहिमेला लोकांपर्यंत विविध मीडिया प्लँटफॉर्म्सच्या माध्यमातून पोहचवण्याचे काम केले आहे.
अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष गोपाल पिल्लई यांनी या कॅम्पेन आणि जहिरात मोहिमेविषयी मत व्यक्त करताना म्हटलं आहे की विक्रेते हे अमेझॉनच्या व्यवहाराचा महत्वपूर्ण भाग आहेत.
आमच्याकडे ५ लाखापेक्षा जास्त लहान मोठे बिझनेसमन, कलाकार, महिला उद्योजक तसेच अनेक नवे ब्रँडस विक्री करतात. त्यांना व त्यांच्या प्रॉडक्टसला लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आमची आहे.
आम्ही स्टोरीबॉक्सेसच्या माध्यमातून त्यांची जीवनगाथा जगासमोर आणतो आहोत. आम्ही आतापर्यंत ६ विक्रेत्यांच्या कथा आमच्या बॉक्सेसच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या आहेत आणि आम्ही अजून काही कथा तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत.
आम्हाला अशी आशा आहे की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांशी आणि विक्रेत्यांशी चांगले संबंध निर्माण करण्यात यशस्वी होऊ.
अमेझॉनने आपल्या ह्या नव्या कॅम्पेनच्या माध्यमातुन त्यांची ग्राहक व विक्रेत्यांच्या प्रतीची भूमिकाच समोर आणली नसून भारतातील ग्राहकांसोबत एक भावनिक नातं तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या ह्या प्रयत्नांना किती यश मिळेल हे येणार काळच सांगेल. पण त्यांच्या माध्यमातून ग्राहक विक्रेत्यात एक अनोखं नातं निर्माण होईल हे मात्र नक्की!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.