The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘वास्को द गामा’ने आधीच अस्तित्वात असलेल्या भारताचा शोध कसा लावला?

by द पोस्टमन टीम
18 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“वास्को द गामा” हे नाव ऐकलं की आपल्याला आठवतं शाळेत शिकवलेला इतिहास, ज्यात सांगितलं होतं की वास्को द गामा याने भारताचा शोध लावला आणि आपणही ते उत्तर पाठ केलं होतं, बरोबर ना? पण भारताचा शोध वास्को द गामा कसा लावू शकतो ? भारत थोडी ना कुठे हरवला होता. भारत तिथेच होता, फक्त वास्को द गामा भारतात आला होता. त्याने भारताचा नाही तर युरोपातून भारतात येणाऱ्या सागरी व्यापारी मार्गाचा शोध लावला होता.

पण त्याला काय गरज पडली होती हे सगळं करायची? कोण होता नेमका हा वास्को द गामा? फक्त फिरायचं म्हणून आला होता का तो? जसं आजकाल आपण सोलो ट्रिप करतो, बॅकपॅकिंग टूर वर जातो, असंच काहीसं करायला आला होता का तो इथं? नेमका हेतू काय होता त्याचा भारतात येण्याचा? चला तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडण्याचा प्रयत्न करूयात.

वास्को द गामा हा एक पोर्तुगीज नाविक होता. पंधराव्या शतकात पोर्तुगाल ही युरोपमधील सर्वात मोठी सागरी शक्ती होती. युरोपमध्ये सागरी व्यापार मार्ग शोधून काढून, सागरी व्यापार वाढवण्याची जणू स्पर्धाच लागली होती. 

यामध्ये पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांमध्ये जोरात स्पर्धा चालू होती. दोघांनाही एकच गोष्ट हवी होती “भारताला जोडणारा व्यापारी मार्ग.”

कारण भारताकडून येणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांची युरोपात खुप मोठी चलती होती. युरोपियन बाजारपेठेत भारतीय मसाल्यांना खूप मागणी होती. पण या मसाल्याच्या व्यापारावर मक्तेदारी होती ती अरबी लोकांची आणि अरबी लोकं युरोपियन लोकांना अजिबात थांगपत्ताही लागू देत नव्हते की ते हे मसाले कुठून आणतायेत. काहीही करून पोर्तुगीज किंवा स्पॅनिश यांच्यापैकी एकाला भारतात येणाऱ्या व्यापारी मार्गाचा शोध लावायाचाच होता.



पण भारत हा एक असा देश होता ज्याच्या एका बाजूला उत्तुंग असा हिमालय होता तर बाकी तीनही बाजूना समुद्र. त्यामुळे भारतात येणं एवढं काही सोपं नव्हतं. युरोपातून भारतात येण्यासाठी ३ मार्ग होते. पहिला – रशिया पार करून चीनमार्गे बर्माला पोहोचून मग भारतात येणे. पण हा मार्ग खूप लांब आणि जोखमीचा होता. दुसरा मार्ग होता – अरब आणि इराण मार्गे भारतात. पण अरब लोकांची या मसाला व्यापारात मक्तेदारी होती त्यामुळे ते कोण्या युरोपियनला यामार्गे भारतात जाऊ देणं शक्यच नव्हतं. आता उरला फक्त तिसरा मार्ग – सागरी मार्ग. इकडे अडचण फक्त सागरी लाटांचीच होती.

युरोपियन लोकांना फक्त पूर्वेकडील देशातून आपल्याला मसाले येतात एवढंच माहिती होतं. पण ना त्याचं नाव माहिती होतं, ना तिथली लोकं. पण या देशात जायचं तर आहे. मग सुरू झाली युरोपियन देशांमध्ये स्पर्धा कारण जो इथे आधी पोहोचेल त्याचीच या व्यापारात मक्तेदारी सिद्ध होणार होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

स्पेनने यात लवकर सुरुवात केली. त्यांनी इटलीचा रहिवासी असणाऱ्या ख्रिस्तोफर कोलंबसला ह्या मोहिमेवर पाठवले.

तो निघाला पूर्वेकडे होता, पण अटलांटिक ओलांडून तो पूर्वेकडे जाण्याऐवजी पश्चिमेकडे गेला आणि एका किनाऱ्याला लागला. ज्या देशात तो पोहोचला होता त्याला तो भारत समजून पुन्हा युरोपात गेला. पण नंतर कळलं की तो भारत नसून अमेरिका होता. जो अटलांटिकच्या पश्चिमेला होता.

स्पेन अपयशी झाल्यानंतर आता वेळ होती पोर्तुगालची. जसं मी आधीच सांगितलं पोर्तुगाल ही १५व्या शतकातली युरोपातील सर्वात मोठी सागरी शक्ती होती. पोर्तुगाल सगळ्यात मोठी सागरी शक्ती बनण्यामागे सर्वात मोठा वाटा होता तो “प्रिन्स हेन्री” चा. त्याने पोर्तुगाल मध्ये Navigation School स्थापन केले होते. या Navigation school मध्ये त्याकाळचे प्रतिभावंत खगोलशास्त्रज्ञ, खलाशी, चित्रकार (नकाशे तयार करणारे), भौगोलिक अभ्यासक यांचा समावेश होता.

प्रिन्स हेन्रीला भारतात जाणारा सागरी मार्ग शोधायचा होता. जेणेकरून त्याचा मसाल्याच्या व्यापारात पोर्तुगालला फायदा करता आला असता. हेन्रीचे वडील जॉन यांनी आधीच सागरी मार्ग शोधून काढण्यासाठी खूप वर्ष कष्ट घेतले होते.

आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायच्या हेतूने, हेन्रीने ४० वर्षे अनेक सागरी मोहिमा प्रायोजित करून पश्चिम आफ्रिकेपर्यंत मजल मारून तेथील सोन्याचा आणि गुलामांचा पुरेपूर फायदा करून घेतला. पण पूर्वेकडील देशांकडे जाण्याचं हेन्रीच स्वप्न अपूर्ण च राहिलं होतं. दक्षिण आफ्रिकेत पोहोचण्यासाठी त्यांना १४८७ पर्यंत वाट पहावी लागली होती.

१४८७ मध्ये ‘बाल्टिमोर डियाझ’ याने आफ्रिकेचे दक्षिण टोक “केप ऑफ गुड होप” पर्यंत मजल मारली होती. तिथे सर्वप्रथम त्याच्या निदर्शनास आलं होतं की अटलांटिक महासागर हा अजून दुसऱ्या एका महासागरास मिळत होता. तो महासागर होता “हिंद महासागर”.

डियाझच्या या मोहिमेने एक गोष्ट पोर्तुगीजांना कळली होती ती म्हणजे भारतात म्हणजे मसाल्याच्या देशात पोहोचण्यासाठी त्यांना फक्त अटलांटिक नाही तर हिंद महासागरसुद्धा ओलांडावा लागणार आहे.

डियाझच्या मोहिमेनंतर नेमका हा मसाल्याचा देश कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी, किंग जॉन (दुसरा) याने “पेड्रो दे कोविल्हा” या पोर्तुगीज पण उत्तम अरेबिक बोलणाऱ्या शोधक प्रवाशाला अतिशय जोखमीच्या मोहिमेवर पाठवले. ३ वर्ष तो अरबी वेषांतर करून अरेबिक देशांमधून भारताची माहिती गोळा करत फिरत होता. या तीन वर्षात त्याने पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या मुस्लिमबहुल बंदर आणि भारताबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती गोळा केली.

पण हे सगळं होत असताना इकडे १४९३ मध्ये कोलंबस अमेरिकेला भारत समजून पुन्हा युरोपात आला होता. कोलंबस म्हणजेच स्पेनच्या या आततायीपणामुळे पोर्तुगाल आणि स्पेनमधली स्पर्धा आता शिगेला पोहोचली होती. आता स्पर्धा एवढी तीव्र झाली होती की शेवटी ख्रिस्ती धर्मगुरू “पोप” यांना मध्यस्थी करावी लागली.

१४९४ मध्ये दीर्घ वाटाघाटीनंतर “टोर्डेसील्स”चा तह झाला. या करारामध्ये उत्तर -दक्षिण (केप वर्देच्या पश्चिमेस सुमारे १७०० किमी) एक कल्पनिक रेखा आखली गेली, ज्याने अटलांटिक दोन भागात विभागला गेला. रेखेच्या पश्चिमेचा प्रदेश स्पेनला तर पूर्वेचा प्रदेश पोर्तुगालला देण्यात आला. राजा जॉनला तर तेच हवं होतं. पूर्वेचं नियंत्रण मिळाल्याने आफ्रिकेच्या पश्चिमेकडील किनाऱ्याकडे आणि भारताकडे जाणारे मार्ग आता पोर्तुगालला मोकळे झाले होते.

१४९७ मध्ये पोर्तुगालचा नवीन राजा, राजा मॅन्युएल याने वास्को द गामाला भारताकडे जाणारे सागरी मार्ग शोधण्याच्या मोहिमेचा कप्तान केला. ४ जहाजं घेऊन गामा ८ जुलै १४९७ रोजी या मोहिमेवर निघाला. या मोहिमेत वास्को द गामाला मदत करण्यासाठी स्वतः डियाझ सुद्धा येणार होता. डियाझ “केप वर्दे” पर्यंत या मोहिमेत होता. इथून पुढे जाण्यासाठी त्याने गामाला नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळ्याच मार्गाने जाण्यास सांगितलं.

डियाझने सांगितलेल्या मार्गाने पुढे जात असताना ब्राझीलपासून १००० किलोमीटर असताना त्यांना “दक्षिण-पश्चिम” वाहणाऱ्या वाऱ्याने पछाडलं आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेकडे लोटले. १३ आठवड्यांच्या अथक सागरी प्रवासानंतर, ७५०० किमी पार केल्यानंतर सरतेशेवटी त्यांना कोरडी जमीन दिसली. केप ऑफ गुड होप च्या दक्षिणेकडे २०० किमी असणाऱ्या सेंट हेलेना बंदरावर ७ नोव्हेंबर १४९७ रोजी गामा पोहोचला.

२ दिवसांनी केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो “मोस्सेल” च्या उपसागरात थांबला. ४ जहाजांपैकी ज्या जहाजात सगळी रसद ठेवली होती नेमक्या त्याच जहाजाने काम दाखवलं. मग त्यावरची सगळी रसद ३ जहाजांवर विभागून भरण्यात आली. तीव्र आणि उसळणाऱ्या लाटांतून मार्ग काढत काढत गामाने २७०० किमीच अंतर पार केलं.

२ मार्च १४९८ रोजी पहिल्यांदच गामा मुस्लिम बहुल असलेल्या एका बंदरावर पोहोचला होता. त्या बंदराचं नाव होतं “मोझांबीक”. पूर्व आफ्रिका हा बहुतांश मुस्लिम प्रदेश होता. यामुळेच त्यांना भारताशी व्यापार करणं सोपं जात होतं. कोणीतरी युरोपिअन शोध-प्रवाशांचं टोळकं आपल्या बंदरावर आलंय, ही गोष्ट काही मुस्लिम व्यापाऱ्यांना पटणारी नव्हती. त्यांच्या राजाला काही भेटवस्तू देऊन खुश करावं म्हणून त्यांनी त्याला खूप साऱ्या वस्तू दिल्या, पण राजाला काही त्यांचं इथे येणं पटत नव्हतं.

पोर्तुगीजानी आणलेले मोती, माणके, सोनं आणि हस्तिदंतसुद्धा मोझांबीकच्या राजाला खुश नाही करू शकले. इथे अजून थांबलो तर काहीतरी अघटित होईल म्हणून गामाने तिथून होता होईल तेवढा लवकर काढता पाय घेतला आणि पुढचं बंदर मुंबासा कडे निघाला. मुंबासाला पोहोचल्यावर पण त्यांना आधीसारखीच वागणूक मिळाली. फक्त एकच समाधानकारक गोष्ट घडली ती म्हणजे “मलिंदि” बंदराचा जो नेता होता त्याने गामावर दया दाखवली आणि त्यांना रसद भरण्यास सूट दिली.

याच कालावधीत गामाने प्रख्यात अरब खलाशी “अहमद इब्न माजिद” ला आपल्या समूहात दाखल करून घेतले. आता इथून पुढचा मसाल्याच्या देशाकडे जाणारा मार्ग माजिदच दाखवणार होता.

आता सुरू झाला होता मोहिमेचा शेवटचा टप्पा. भारतात पोहोचण्यासाठी आता फक्त अरेबिक सागर पार करायचा होता. अथक परिश्रम केलेल्या गामावर आता वायूदेवहीही प्रसन्न होता. फक्त २७ दिवसांतच गामा आणि त्याचा समूह भारतभूमीवर पोहोचला होता.

२० मे १४९८ ला म्हणजे पोर्तुगाल सोडल्यानंतर जवळजवळ वर्षभराने गामा भारताच्या पश्चिम भागातील कालिकत बंदरावर पोहोचला. सोन्याची खाण सापडूनही जेवढा आनंद झाला नव्हता, तेवढा आनंद गामाला मसाल्याचे ढीग पाहून झाला होता. आता आशियाई आणि भारतीय व्यापारावर पोर्तुगीजांना वर्चस्व गाजवता येणार होतं.

३ महिने भारतात फिरल्यानंतर १८ सप्टेंबर १४९८ ला गामाने परतीचा प्रवास सुरू केला. गामाच्या याच यशस्वी मोहिमेने भारताचा सगळा इतिहास बदलणार होता. भारताकडे जाणारे व्यापारी मार्ग सापडल्याने युरोपियन व्यापाऱ्यांना आता भारतीय व्यापार खुला झाला होता. सुरुवातीला व्यापारासाठी आलेले युरोपियन नंतर भारताचे कसे शासक बनले हे आपण जाणतोच आहोत.

१७० लोकांच्या समूहाने सुरू केलेल्या भारतशोधाच्या मोहिमेत गामा भारतात पोहोचला तेव्हा फक्त ५४ लोकं राहिले होते. दोन वर्षातील म्हणजेच १४९७ ते १४९९ यामधील कालावधीत गामाने ३०० दिवस समुद्रात काढले होते. त्याने एकूण २४००० मैलाचा प्रवास केला होता. या मोहिमेत त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. “Scurvy” सारख्या जीवघेण्या आजारात त्याच्या खूप साथीदारांचा जीव गेला, त्यात गामाचा भाऊ पाओलोचासुद्धा समावेश होता.

गामाचे विचार काहीही असो पण त्याच्या अथक परिश्रम, कष्ट आणि जिद्दीला माझा कायम सलाम.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: vasco da gama
ShareTweet
Previous Post

दहा वर्षांच्या पोटच्या मुलाला सोबत घेऊन सावित्रीमाई प्लेगग्रस्त रुग्णांचा आधार बनली होती.

Next Post

गरज नसतानाही हँडसेट अपग्रेड करण्यामुळे पर्यावरणावर भयानक परिणाम होतायत

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

गरज नसतानाही हँडसेट अपग्रेड करण्यामुळे पर्यावरणावर भयानक परिणाम होतायत

कपडा लत्ता शकल सुरत सब सवासो करोड जैसी है मेरी.. नही ढुंढ पाओगे!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.