आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
तुमच्या कंपनीसाठी तुम्हाला कोणी २.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स देण्याची तयारी दर्शविली तर तुम्ही काय कराल? हसत हसत ‘हो’ हेच उत्तर बरेच लोक देतील. परंतु व्हिएतनाममधील एका कुटूंबाने या ऑफरला चक्क नकार दिला होता.
२.५ अब्ज डॉलरची रक्कम धुडकावून लावणाऱ्या या व्यावसायिकाचे नाव आहे ‘ट्रान कि थान्ह’. कौटुंबिक व्यवसाय म्हणुन व्हिएतनाममध्ये स्वत:चा शीतपेय व्यवसाय चालवणाऱ्या ‘ट्रान कि थान्ह’ यांना कोका कोला कंपनीने २.५ अब्ज डॉलर्सची ही ऑफर दिली होती जी त्यांनी धुडकावून लावली.
‘ट्रान कि थान्ह’ यांच्या आईचे एका कार अपघातात निधन झाले, त्यावेळी ते फक्त ९ वर्षांचे होते. तिथुन त्यांना एका अनाथाश्रमात भरती करण्यात आले. तिथे त्यांनी पुढची सहा वर्षे काढली. अनाथाश्रमात त्यांना अतिशय वाईट वागणूक मिळत होती. स्वत:च्या जिवीकेसाठी भांडण्याची त्यांची वृत्ती इथुनच निर्माण झाली.
अतिशय घाणेरड्या जागी त्यांना झोपावे लागत असे. जेवनात मिर्ची टाकताना पकडले असता फक्त मिरची त्यांना कशी खाऊ घातलेली हे सगळे प्रसंग आजही त्यांच्या अंगावर शहारे आणतात.
या सगळ्यातून त्यांची सुटका झाली आणि १९७५ मध्ये त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यावेळी त्यांना सरकारी मंत्रालयात नोकरी मिळाली ती धातू विभागात. इथे त्यांना अतिशय तोकडा पगार मिळत असे.
यात खुश नसल्याने त्यांनी २ वर्षात ही नोकरी सोडली आणि यीस्ट निर्मितीचा व्यवसाय सुरु केला. अजुन काही उद्योगात हात आजमावून त्यांनी बीअरची निर्मिती सुरु केली. १९९४ मध्ये त्यांनी ‘टीएचपी’ या त्यांच्या उद्योग समुहाची सुरुवात केली. हे तेच वर्ष जेव्हा अमेरिकेने व्हिएतनाम वरील व्यापारी निर्बंध उठवले.
२००० च्या दशकात ट्रान कि थान्ह यांनी अल्कोहोलच्या उत्पादनांऐवजी चहा आणि शीतपेयांच्या निर्मितीवर लक्ष देण्याचे ठरवले. यात त्यांना नफाही चांगला होत होता.
टीएचपीने खरी भरारी घेतली ती २००६ ते २००९ या काळात. काही नविन पेयांची सुरुवात करुन कंपनीच्या उत्पन्नात ४०० टक्क्यांची वाढ झाली.
ट्रान कि थान्ह यांची मुलगी ‘फुओंग उयेन ट्रान’ तिच्या वडीलांपासून खुप प्रेरीत आहे.
कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची त्यांची वृत्ती आणि आयुष्याबद्दल कधीही तक्रार न करणे हे त्यांचे गुण तिला सगळ्यात जास्त प्रेरीत करतात असे ती म्हणते. “काहीच अशक्य नाही. आपल्या क्षमतेला कोणतीही मर्यादा नाही.” हे त्यांच्या वडिलांचे आवडते वाक्य आहे.
‘फुओंग उयेन ट्रान’ यांनी टीएचपी समुहाच्या प्रवासाबद्दल एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात लिहिताना त्यांनी आपल्या पालकांची भेट कशी झाली हे ही सांगितले आहे.
“आई-वडील साखर कारखान्यात काम करत असताना पहिल्यांदा भेटले. १९७९मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांची जोडी एकमेकांना पुरक अशी असुन वडीलांकडे असणाऱ्या दूरदृष्टी आणि बुद्धीमत्तेला योग्य जोड भेटली आहे ती त्यांच्या आईच्या लोकव्यवस्थापन कौशल्याची. दोघेही अतिशय जिद्दी असुन कष्ट करण्यासाठी नेहमी तयार असतात.”
‘फुओंग उयेन ट्रान’ यांना एक लहान बहीण आहे, तसेच एक छोटा भाऊ पण आहे. तिघेही आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करतात. ‘फुओंग उयेन ट्रान’ या स्वत: हार्वर्ड विद्यापीठातुन पदवीधारक आहेत. पदवी घेतल्यानंतर त्यांना सिंगापूरमध्ये चांगली नोकरी भेटली होती. परंतु त्यांच्या मते घरच्या कंपनीत काम करणेच जास्त योग्य होते.
दुसरीकडे कुठे स्वत:च्या वडीलांच्या कंपनीत काम करण्यासाठी कष्ट घेण्याची गरज कोणाला पडेल का..? परंतु ‘फुओंग उयेन ट्रान’ या सांगतात की त्यांना ही नोकरी मिळवण्यासाठी आपली योग्यता सिद्ध करावी लागली. यासाठी १९९९ मध्ये त्यांनी कंपनीला डिजीटाईज करण्याचे सुचवले. त्यांनी दिलेल्या या सुचनेनुसार कंपनीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यात आले.
Enterprise Resource Planning (ERP) या नावाने ओळखली जात असलेली ही प्रक्रिया कंपनीच्या भरभराटीचे मुख्य कारण बनली.
या कार्याची दखल घेत त्यांच्या वडीलांनी त्यांना विपणन संचालकाच्या सचिवपदावरुन समुहाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त केले. आजही कामात चुक झाली तर त्यांचे वडील त्यांना बाकीच्या कर्मचाऱ्यांएवढेच ओरडतात. आपला पगार ठरवण्यासाठीसुद्धा त्यांना आपल्या वडीलांची मनधरणी करावी लागली होती असे त्या पुस्तकात लिहितात.
पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी कोका कोला कंपनीने टीएचपी विकत घेण्यासाठी २.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स देण्याची तयारी दर्शविल्याचा किस्सा सांगितला आहे. २०१२ मध्ये हा किस्सा घडला.
कंपनी विकत घेऊन टीएचपी समूहाला यापुढे कोणतेही पेय बनवता येणार नाही असा हा करार होता.
कराराची एवढी मोठी रक्कम बघुनही ‘ट्रान कि थान्ह’ यांनी या कराराला धुडकावले. कोका-कोला कंपनी विकत घेईल अशी अपेक्षा त्यांना नव्हती, उलट कोका- कोला बरोबर भागीदारी करुन आपला व्यवसाय जागतिक पातळीवर पोहचवण्याचा त्यांचा मानस होता असे ते सांगतात.
टीएचपी समुह आज अगदी जगप्रसिद्ध नसला तरी १६ देशांमध्ये समुहाचे शीतपेय निर्यात केली जातात. थायलंड, कंबोडिया, लाओस, ऑस्ट्रेलिया, रशिया या महत्त्वाच्या देशांतसुद्धा शीतपेयांची निर्यात केली जाते. डॉ. थान्ह हर्बल चहा, झिरो डिग्री ग्रीन चहा, नंबर वन एनर्जी ड्रिंक आणि नंबर वन ज्युसी फ्रूट हे समूहाचे काही प्रसिद्ध पेय आहेत.
उद्योगाच्या सुरुवातीला असलेले २० लोकांचे मनुष्यबळ आता ४००० एवढे झाले आहे. दिवसाला ३००० लिटर शीतपेय याप्रमाणे वार्षिक १ दशलक्ष लिटर शीतपेय उत्पादित करणारा उद्योग आज प्रत्येक वर्षी १ अब्ज लिटरपेक्षाही जास्त शीतपेयाचे उत्पादन करतो. 2०१५ साली कंपनीचे उत्पन्न ५०० दशलक्ष अमेरीकन डॉलर एवढे होते.
बीबीसीच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार लवकरच अमेरिकी बाजारात पदार्पण करण्याची तयारी टीएचपी समुह करत आहे. २०२३ पर्यंत उत्पन्नाचा आकडा १ अब्ज डॉलर, तर २०२७ पर्यंत ३ अब्ज डॉलर्स पर्यंत पोहचवण्याचा मानस असल्याचे ‘फुओंग उयेन ट्रान’ आपल्या पुस्तकात लिहितात.
एवढ्या उंचीवर पोहचूनही ‘ट्रान कि थान्ह’ आणि त्यांची मुलगी ‘फुओंग उयेन ट्रान’ थांबण्यास तयार नाहीत. कर्तुत्वाची किंमत पैशात नसुन कष्टात असते याचे ज्वलंत उदाहरण असलेले ‘ट्रान कि थान्ह’ हे नविन तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.