आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पृथ्वीवरील कोणत्याही जीवाला अत्यावश्यक असणारी बाब म्हणजे स्वच्छ पाणी. आज स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचे साठे कमी होत चालले आहेत. जमिनीवर गोड्या पाण्याचे जे साठे आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी कचरा आणि सांडपाणी सोडल्याने हे स्वच्छ पाण्याचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेत. पुढेही अशीच अवस्था राहिली तर एक दिवस पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल आणि कितीही किंमत मोजली तरी कमी होत जाणाऱ्या पाण्याची पातळी पुन्हा पूर्ववत करणे खूपच अशक्य बाब असेल.
अनेक लोक पाण्याच्या वापराबाबत जागरूक झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या दैनंदिन वापरात पाण्याचा काटकसरीने कसा वापर केला जाईल याबद्दल स्वतःपुरते का होईना काही नवे शोध आणि नवे बदल अवलंबले आहेत.
ओडीसातील एका छोट्याशा गावातील सामाबेश नायक यांच्या कुटुंबात पाणी खर्च करण्यापूर्वी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा विचार केला जातो. सामाबेश नायक हे एका मॅनेजमेंट स्कूलमध्ये प्रशासनिक अधिकारी आहेत आणि त्यांची पत्नी याच ठिकाणी ग्रंथपाल आहे. हे दोघेही पती-पत्नी आपल्या घरातील पाण्याचा खूपच काटकसरीने वापर करतात.
अंघोळीसाठी लागणारे पाणी, कपडे धुतलेले पाणी, इतर कामासाठी लागणारे पाणी, अशा सगळ्या दैनंदिन कामासाठी पाणी वापरत असताना त्याचा कमीतकमी वापर कसा होईल याची काळजी या कुटुंबातील प्रत्येकच सदस्या घेतो.
यातूनच त्यांचा मुलगा आयुष्मान नायक याने पाणी वाचवण्यासाठी एक अनोखी आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडली. त्याने वॉशिंग मशीनमधून वाया जाणाऱ्या साबणाच्या पाण्याचा पुनर्वापर करता येईल का याबाबत संशोधन सुरू केले. १३ वर्षाच्या आयुष्मानला त्याच्या या प्रयत्नात यश देखील मिळाले.
त्याने एक असे मशीन बनवले आहे, ज्यामुळे वॉशिंग मशीनमधून बाहेर पडणारे पाणी शुद्ध होते आणि ते पुन्हा वापरता येते.
नायक कुटुंबात पाण्याचा वापर कसा कमी करता येईल यावर नेहमीच चर्चा सुरु असते. ते सांगतात, “अंघोळीला असो, वॉशिंग मशीनसाठी असो की आणखी कशासाठी पाण्याचा वापर करताना आम्ही खूपच काळजी घेतो. जमिनीतील पाण्याची पातळी कमी कमी होत आहे. त्याबाबतीतही आम्ही सजग असतो. ही पातळी कशी वाढवता येईल यावरही आमच्यात नेहमी चर्चा सुरू असते.” पाण्याचा काटकसरीने आणि पुनर्वापर व्हावा यासाठी ते नेहमीच काही नव्या कल्पना शोधत असतात.
अशाच वेगवेगळ्या कल्पना शोधत असताना आयुष्मानला वॉशिंग मशीन्सचे पाणी शुद्ध करून वापरण्याची कल्पना सुचली. वॉशिंग मशीनमधून रिसायकल केलेले हे पाणी पुन्हा कपडे धुण्यासाठीच वापरणे सहज शक्य आहे. वॉशिंग मशीनलाच पाणी शुद्ध करण्यासाठी एक नवे तंत्र जोडले गेले तर?
आयुष्मान सध्या सातव्या वर्गात आहे. पाण्याची काटकसर म्हणजे काय हे त्याने लहानपणापासूनच घरात अनुभवले आहे. तो स्वतःही पाण्याचा काटकसरीने वापर करू लागला आणि पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याच्या पुनर्वापराबाबत विचार करू लागला. वॉशिंग मशीनमधून जे साबणाचे पाणी बाहेर पडते त्याचा जर पुनर्वापर सुरु केला हजारो लिटर पाण्याची बचत होऊ शकते. साबणाचे पाणी फिल्टर करण्याची ही एक नवी युक्ती त्याला सुचली. आयुष्मानचा हा शोध त्याने केंद्र सरकार समोरही मांडला.
त्याच्या या शोधासाठी त्याला ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट’ मिळाले आहे.
आयुष्मान म्हणतो, “मला असे मशीन बनवायचे होते ज्याद्वारे वाशिंग मशीनमधून बाहेर पडणारे पाणी शुद्ध करता येईल. तिसरीत असल्यापासूनच मी यावर विचार करत आहे. २०१७ साली त्याला एपीजे अब्दुल कलाम इग्नाइट अवॉर्ड मिळाले होते. या पुरस्कारासाठी जेव्हा तो गुजरातला आला तेव्हा त्याला इंजिनियर्सनी त्याच्या कल्पनेतील मशीनला मूर्त रूप दिल्याचे पाहून सुखद धक्का बसला.
एनआयएफच्या इंजिनियर्सनी वॉशिंग मशीनमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्याला पाच स्तर असलेली फिल्ट्रेशन सिस्टम बसवली होती. इंजिनियर्सनी आयुष्मानला त्यातील प्रत्येक स्तरावर कसे पाणी स्वच्छ केले जाते याची माहिती दिली. हजारो लिटर वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा होऊ शकतो हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहताना मला खूप आनंद झाला, असे आयुष्मान सांगत होता. या संशोधनासाठी आयुष्मानला पेटंट मिळाले आहे, जे वीस वर्षापर्यंत वैध आहे. सध्या हे पेटंट त्याचे वडील समाबेश नायक यांच्या नावावर आहे.
एनआयएफचे तज्ज्ञ दरवर्षी केआयआयटी इंटरनॅशनल शाळेला भेट देतात. तेव्हा ते विद्यार्थ्यांना नवनव्या कल्पना शोधण्यासाठी आणि त्या सर्वांसमोर मांडण्यासाठी प्रोत्साहन देतात. विद्यार्थ्यांच्या या कल्पना ते लिखित स्वरुपात स्वीकारतात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेचे वैज्ञानिक स्पष्टीकरण केलेले असते. पुढे ते या कल्पनेवर कामदेखील करतात.
आयुष्मानने दोन कल्पना सादर केल्या होत्या – पहिली होती वॉशिंग मशीन्समधील पाण्याचा पुनर्वापर आणि दुसरी होती हेल्मेटला वायपर बसवण्याची ज्यामुळे पाऊस पडत असतानाही वाहन चालवताना काही त्रास होणार नाही, समोरचे स्पष्ट दिसेल.
एनआयएफच्या इंजिनियर्सनी यातील पाण्याच्या फिल्ट्रेशनवर काम करण्यास सुरुवात केली आणि असे फिल्ट्रेशन करणारे यंत्रही बनवले. आयुष्मानची कल्पना प्रत्यक्षात उतरली होती. आपली कल्पना सत्यात उतरल्याचे पाहून आयुष्मानचा तर आनंद गगनात मावत नव्हता.
आयुष्मानप्रमाणेच आणखी ६९ विद्यार्थ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. देशातील या ६९ मुलांमधे माझा समावेश असल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे असे आयुष्मान म्हणतो. त्याला मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये करिअर करायचे आहे. दैनंदिन जीवनात वापरण्यास सुलभ असतील आणि पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही असे नवे पर्याय मला शोधून काढायचे आहेत, असे तो म्हणतो.
मुलांच्या विचारांना योग्य वयातच एक सकारात्मक दिशा मिळाली तर, पुढे जाऊन त्याचा कसा व्यापक परिणाम होऊ शकतो हे आयुष्मानच्या उदाहरणावरून दिसून येते. आयुष्मानसारख्या कल्पक आणि जागरूक मुलांकडे पाहिल्यास पर्यावरण आणि भविष्यात उद्भवणाऱ्या पर्यावरण विषयक समस्यांवर काही ठोस उपाय निर्माण करणे शक्य असल्याचा आशावाद जागा होतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










