आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताचा ज्ञात इतिहास सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. या इतिहासात शेकडो राज्ये होऊन गेली. आपल्या संस्कृतीचं संवर्धन आणि जतन करणारी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच राज्ये होती. यांपैकी एक होते ते आजच्या तामिळनाडू भागातील चोल राजे. कावेरीच्या तटावर वसलेल्या या साम्राज्याने तेराव्या शतकापर्यंत दक्षिण भारत तसेच दक्षिण पूर्व आशियाच्या काही भागावर राज्य केले. मानवी इतिहासातील काही श्रेष्ठ सागरी साम्राज्यांपैकी एक म्हणून चोल साम्राज्याकडे पाहिले जाते. मौर्य साम्राज्यातील तिसऱ्या शतकाच्या शिलालेखांमध्ये चोलांचा उल्लेख सापडतो. काही दिवसांपूर्वी प्रचंड चर्चेत असलेला सेंगोलही याच साम्राज्याचा भाग होता.
या चोल साम्राज्यात अनेक सम्राटांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहासात ठसा उमटवला. चोल साम्राज्याप्रमाणेच भारतातील इतर प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक राज्यकर्त्यांनी आणि विविध सत्तांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ही भूमी सुजलाम् सुफलाम् केली, पण दुर्दैवाने आधुनिक आणि स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक इतिहासात मात्र बाबर, अकबर आणि औरंगजेबासारख्या दरोडेखोरांना जागा मिळाल्या. चोल साम्राज्याचा आणि त्याच्या कर्तृत्ववान कारिकाल चोल या राजाच्या कर्तृत्वाचा आढावा घेण्याचा हा लहानसा प्रयत्न.
कारिकाला चोल सुरुवातीच्या चोल राजांपैकी सर्वांत प्रसिद्ध राजा आहे. राजराजा चोल, राजेंद्र चोल आणि कुलोथुंगा चोल प्रथम मध्ययुगीन चोलांचे उल्लेखनीय सम्राट म्हणून गणले जातात. कारिकाला चोल, दक्षिण भारतातील संगम साहित्य युगातील सुरुवातीच्या चोल राजांपैकी महान, इलामसेटसेनीचा मुलगा होता. त्याने इसवी सन ९० च्या काळात राज्य केल्याचे दिसून येते. त्याला कारिकाला पेरुवल्लटन आणि थिरुमावलवन या नावाने ओळखले जात होते,
आपल्या नेतृत्वाखाली त्याने तीन द्रविड साम्राज्यांना चोल साम्राज्यात विलीन करून एक ऐतिहासिक मोहीम यशस्वी करून दाखवली होती. कारिकाला म्हणजे ‘जळलेला पाय असलेला’. त्याला हे नाव एका घटनेवरून पडले आहे. झटापटीच्या एका घटनेत त्याच्या पायाला मोठी दुखापत झाल्याने त्याला हे नाव पडले. कारिकालाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सौंदर्यपूर्ण रथ. त्याच्या यु*द्धातील रथांच्या सौंदर्यासाठी मोठी प्रशंसा होत असे..
कारिकाला चोलने वेन्नीची मोठी लढाई लढली. या लढाईत पांड्यान आणि चेरान राजा उथियान चेरलाथन या दोघांचा मोठा पराभव झाला. पांड्या आणि चेरा देशांच्या दोन अभिषिक्त राजांव्यतिरिक्त, अकरा किरकोळ सरदारांनी मोहिमेत कारिकेलाविरुद्ध लढा दिला आणि त्यांचा या यु*द्धात सपाटून पराभव झाला. यु*द्धात त्याच्या पाठीवर घायाळ झालेल्या चेरा राजाने उपासमारीने आत्मह*त्या केली.
वेन्नी क्षेत्र कारिकालाच्या काळात पाणलोट होते. यामुळे कारिकालाच्या राज्यात सुबत्ता तर आलीच, शिवाय या तीन राज्यांना एकत्र करून त्याने चोल साम्राज्याचा विस्तार केला. वेन्नीला वेन्निपरंदलाई म्हणूनही ओळखले जात असत आणि आज ते कोविलवेन्नी म्हणून ओळखले जाते. हे ऐतिहासिक शहर तंजावरजवळ आहे.
साहजिकच वेन्नीच्या लढाईनंतर कारिकालामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. त्याने आपल्या पराक्रमाला आणखी मोठ्या स्तरावर आजमवायचे ठरवले. वाकायपरंदलाईच्या लढाईत नऊ किरकोळ सरदारांच्या संघाचा पराभव केला. त्याच्या समकालीन कवी असलेले परानार यांनी त्यांच्या अग्नानूरू कवितांमध्ये या लढायांची सविस्तर माहिती दिली आहे. पण त्यांच्या या काव्यरचनांत कोठेही लढायांची कारणे दिलेली नाहीत. अनेक कथा-काव्यांनुसार कारिकालाने संपूर्ण श्रीलंका काबीज केली होती. सागरापलीकडील श्रीलंका काबीज करणारे अनेक राजे चोल साम्राज्यात होऊन गेले.
दक्षिणेवर आपली सत्ता स्थापन केल्यानंतर कारिकालाने आपला मोर्चा उत्तरेकडे वळवला. त्याने आपले पूर्वाभिमुख व्याघ्राचे निशाण पार हिमालयात रोवले. त्यामुळे ‘भयबिनु होय न प्रीत’ या न्यायानुसार अनेक राजांनी त्याच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले.
पूर्वेच्या गरजणाऱ्या समुद्रापर्यन्त प्रभाव असलेल्या महान वज्राच्या राजाने त्याला मोत्याची झालर भेट म्हणून दिली. काही काळापूर्वी त्याचे शत्रू असलेल्या मगधच्या राजाने त्याला पट्टीमंडपम नावाचा सभागृह भेट म्हणून दिला. मगधचे हे राजघराणे आपल्या तलवारबाजीसाठी भारतीय इतिहासात प्रसिद्ध आहे. अवंतीच्या राजाने त्याला अप्रतिम नक्षीकाम केलेली आणि अगणित रत्नांनी मढवलेली कमान भेट म्हणून दिली.
सिंहल साम्राज्यावर विजय मिळवल्यानंतर कारिकलाने ‘ग्रँड ॲनिकट’ बांधले. त्याने सिंहल साम्राज्याच्या यु*द्धकैद्यांचा वापर डोंगरांवरील दगड कावेरीच्या पात्रापर्यंत वाहून नेण्यासाठी केला. ‘ग्रँड ॲनिकट’ म्हणजे नदीचे पाणी शेती आणि अन्य उपयोगीतेसाठी वळवणे. थोडक्यात त्याने कालव्यांची निर्मिती केली. यांना कारिकालाने निर्माण केलेले असल्याने कल्लनई असेही म्हणतात. हे कल्लनई जगातील सर्वात जुन्या जल-नियामक संरचनांपैकी एक आहे. विशेष म्हणजे अद्यापही ते वापरात आहे. तसेच कल्लनई हे कावेरीच्या मुख्य प्रवाहाच्या पलीकडे ३२९ मीटर लांब आणि २० मीटर रुंद असे दगडाचे एक मोठे धरण आहे.
कल्लनईमध्ये धरण आणि कालव्यांबरोबरच सिंचन आणि टाक्यांचाही समावेश होतो. सिंचनासह त्याच्या नवकल्पनांनी अशा अनेक प्रकल्पांद्वारे त्याच्या राज्यात शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले.
कारिकालाने रोमन साम्राज्याबरोबर केलेल्या व्यापारात मोठी संपत्ती मिळवली. त्याने त्या संपत्तीचा उपयोग त्याच्या लष्करी मोहिमांना निधी देण्यासाठी आणि शहरे बांधण्यासाठी केला. त्याने कांचीपुरमची राजधानी सोन्याने सजवली होती. ग्रँड ॲनिकटची निर्मिती करून तो कार्यरूपाने अमर झाला आहे. कारिकालाचा एक सक्षम आणि न्यायी राजा म्हणून वारसा आहे. त्याने व्यापाराला मोठी चालना देऊन अर्थव्यवस्था मजबूत केली, जेणेकरून त्याचं सैन्य अजिंक्य राहिल्याचं दिसतं शिवाय त्याने स्वावलंबासाठी शेतीलाही न्याय दिला.
आपल्या कर्तृत्वाने या भूमीला खरोखर ज्यांनी ‘सोनें की चिडिया’ बनवले अशा महान व्यक्तित्वांचा इतिहास बाजूला ठेऊन शाळाशाळांमध्ये फक्त गुलामगिरी आणि लुटारूंचा इतिहास शिकवला जात आहे, हीच शोकांतिका!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.