“उद्योजक होण्यासाठी जिद्द, चिकाटी नव्हे; पॅनकार्ड, शॉपऍक्ट लायसन्स लागतं!” हे सांगणाऱ्या मराठी उद्योजकाचं पुस्तक

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


“उद्योजक होण्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम, प्रेरणा वगैरे गोष्टींची गरज नसते, त्यासाठी पॅनकार्ड आणि शॉप ऍक्ट लायसन लागतं!” हे इच्छुक नवउद्योजकांना स्पष्टपणे सांगण्याचा प्रामाणिकपणा अंगी असणाऱ्या एका उद्योजकाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. शरद तांदळे यांचं ‘द आंत्रप्रन्योर’!

मराठी भाषेत उद्योजकता या विषयावर तुलनेने कमी साहित्यनिर्मिती होत असली, तरी पाश्चिमात्य उद्योजकांची, प्रेरणादायी लेखकांची, भारतीय पण इंग्रजीतून लिहिणाऱ्या लेखकांची अनेक पुस्तके मराठीत भाषांतरित झालेली आहेत. ही पुस्तके मोठ्या प्रमाणावर वाचलीही गेली आहेत.

पण शरद तांदळे यांचं ‘द आंत्रप्रन्योर’ या सगळ्या पुस्तकांच्या साच्यात बसत नाही.

त्याचं कारण असं, की व्यवसाय, व्यावसायिक आणि त्याच्या भोवती असणारं वलय यावर न बोलता शून्यातून प्रवास सुरु करताना आलेल्या हजारो अडीअडचणी, ग्रामीण भागातून येणाऱ्या युवकांमध्ये शहरात आल्यानंतर दीर्घकाळ राहणारा न्यूनगंड, योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने झालेली ससेहोलपट या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे लेखकाने मांडल्या आहेत.

या कथेचा पूर्वार्ध म्हणजे लेखकाचे औरंगाबाद येथे झालेले अभियांत्रिकीचे शिक्षण, त्यानंतर नोकरीच्या शोधात पुणे, अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही हवी तशी नोकरी न मिळणे अशा संघर्षाने व्यापून टाकला आहे. हा संघर्ष मराठी युवकाला नवीन नाही. ग्रामीण भागातून शहरात येऊन स्वतः अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडणारा प्रत्येकजण आयुष्याच्या एका टप्यावर या सगळ्याचा सामना करत असतो.

योग्य संधी, कष्ट करण्याची प्रवृत्ती या गोष्टी असल्या की यश दूर नसते.

पण अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जगाला वळून पाहायला भाग पाडेल असं नेत्रदीपक यश संपादन करण्यापर्यंतचा लेखकाचा हा प्रवास सामान्य नाही. तरुण वयात सतत येणारे अपयश आपल्याला नैराश्यपर्यंत घेऊन जाते. आपण काहीच करू शकत नाही, आपल्या भविष्याचं काही खरं नाही असा विचार करून उद्विग्नता येते.

या टप्प्यावर कित्येकजण आत्महत्येचा टोकाचा विचार करतात. या नैराश्याशी नेमकं कसं लढावं हा आपल्याकडे प्रचंड दुर्लक्षित राहिलेला विषय आहे.

या पुस्तकात लेखकाने स्वतःला आलेल्या नैराश्याविषयी अनेक ठिकाणी लिहिलं आहे, त्यातून मार्ग कसा सापडला हेही लिहिलं आहे. यशस्वी होण्यासाठी झगडत असताना पदरात अपयश पडणाऱ्या प्रत्येकासाठी हा ठेवा लाखमोलाचा आहे. कॉलेजच्या वयात असणारा बेदरकारपणा, परिणामांचा विचार न करता काहीही करण्याची वृत्ती, भविष्यबाबत निष्काळजी असणे, शिक्षणाचे महत्त्व न समजणे या गोष्टी सहजपणे वाचकांसमोर मांडल्यामुळे कॉलेज जीवन, नोकरी आणि उद्योग सुरू करेपर्यंत चाललेली धडपड हा भाग वाचकाला ‘आपला’ वाटेल यात शंका नाही.

कुठलेली व्यावसायिक शिक्षण नसताना व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यातल्या खाचाखोचा ओळखत.. बांधिली काढीत, बुडाली सोडीत पुढे जाणे म्हणजे काय हे त्या प्रवासावरून कळेल.

सरकारी खात्यांच्या निविदा भरून कामे करताना कोणत्या मार्गाने जावे लागते, कागदपत्रे किती महत्वाची असतात, बँकेशी उद्योजकांचे संबंध कसे असावेत या व्यावहारिक गोष्टी सांगणारे उद्योजक आणि पुस्तके क्वचित असतात. ‘द आंत्रप्रन्योर’ मध्ये या गोष्टी लेखकाने प्रकर्षाने सांगितल्या आहेत. व्यावसायिक नैतिकता अर्थात ‘बिझनेस एथिक्स’ हा आणखी एक महत्वाचा विषय!

व्यवसाय करताना आपण कोणत्या मार्गाने पैसे कमावतो, जेवढा पैसा कमावतो त्याच्या मोबदल्यात योग्य सेवा किंवा उत्पादन आपण ग्राहकाला देतोय का? या गोष्टी व्यवसायात किती गांभीर्याने घ्यायच्या असतात हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते.

या पूर्ण कथेत एक पात्र असं आहे की ज्याचा प्रचंड प्रभाव लेखकावर आणि कथेवरही पडलेला जाणवतो, ते पात्र म्हणजे ‘बाप’! प्रत्येक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जसा असतो तसाच हा बाप, पण आपल्या मुलाला असामान्यत्वापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या गोष्टी योग्य आणि कोणत्या अयोग्य हे त्याला पक्कं माहीत असतं.

“शरद, मला तुला जिंकलेलं पाहायचंय!” हे बापाचं साधं वाक्य! कित्येक प्रेरणादायी पुस्तकं, तुफान गर्दी खेचणारी भाषणं या वाक्यासमोर क्षुल्लक ठरतात.

अमाप पैसा खर्च करूनही मुलगा जेव्हा मनासारखं यश मिळवत नाही तेव्हा त्याचं अपयश जगापासून लापावण्यासाठी धडपडणारा बाप, मूल जेव्हा यशस्वी होतं तेव्हा त्याचं यश अभिमानाने जगाला सांगत असतो. बोलून व्यक्त न करता येणारं मुलावरचं निस्सीम प्रेम त्या बापाच्या वागण्यातून दिसत राहतं.

या सगळ्या प्रवासाचा अभिमान वाटावा असा एक थांबा म्हणजे शरद तांदळे यांना लंडन शहरात आमंत्रित करून प्रिन्स चार्ल्स यांनी ‘यंग आंत्रप्रन्योर अवार्ड’ ने सन्मानित केले तो क्षण.

पुस्तकाच्या उत्तरार्धात लेखकाने या लंडन प्रवासाचे वर्णन केले आहे. मराठवाड्यातील छोट्याश्या गावातून आलेला एक तरुण पुण्यात येऊन उद्योजक होतो, आणि त्याला जागतिक स्तरावरील एक संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करते… म्हटलं तर ही इतर अनेक कथांप्रमाणे एक असलेली ‘सक्सेस स्टोरी’. पण हा सगळा प्रवास सुरुवातीपासून वाचल्यानंतर तो पुरस्कार स्वीकारताना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागलेली धडपड, संघर्ष वाचकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि लेखकाची कथा नकळत ‘आपली’ होऊन जाते.

एखाद्या पट्टीच्या गायकाचा अचूक सूर लागावा आणि त्यात ऐकणाऱ्याने त्यात तल्लीन होऊन जावं असा तो क्षण आहे.

उद्योग, उद्योजकता म्हटलं की मराठी तरुणांना त्यापासून कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न पालकांकडून केला जातो असं चित्र गेल्या तीनचार दशकांपासून आहे. याला प्रतिक्रिया म्हणून तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देणारे, उद्योजक होणं ही फार काही अवघड गोष्ट नाही असं सांगणारेच अनेक उद्योग उभे राहिले.

चिक्कार पैसे घेऊन व्यक्तिमत्व विकास, उद्योजकता, मार्केटिंग वगैरे विषयावर मोठमोठे सेमिनार्स, कार्यशाळा आयोजित करून या व्यावसायिकांनी बक्कळ पैसे कमावले.

या सगळ्यातून शरद तांदळे यांचं ‘द आंत्रप्रन्योर’ हे पुस्तक वेगळं उठून दिसेल, त्याचं कारण असं.. की स्वतःचा प्रवास मांडताना लेखकाने खूप अलंकारिक भाषा, अवजड वाक्प्रचार वगैरे न वापरता कमालीच्या प्रामाणिकपणाने कथा सांगितली आहे. पुस्तकाचं नाव ‘द आंत्रप्रन्योर’ असं असलं तरी कोणत्याही वयाच्या, कोणतीही नोकरी व्यवसाय करत असलेल्या माणसांसाठी ते उपयुक्त आहे.

यश म्हणजे नक्की काय? या प्रत्येकाला पडणाऱ्या प्रश्नाचं लेखकाने स्वतःपुरतं शोधलेलं आणि जगलेलं उत्तर वाचकाला केवळ साहित्य वाचल्याचा आनंद देत नाही, तर त्याच्या जगण्यावरही विलक्षण प्रभाव मागे ठेवतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!