The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

by Heramb
25 April 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“महाराष्ट्र म्हणजे भारत मातेचा खड्गहस्त..” स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं हे वर्णन निश्चितच महाराष्ट्राच्या आणि मराठी लोकांच्या भीमपराक्रमासाठी आहे. इथल्या दऱ्याखोऱ्यांत वावरणाऱ्या सामान्य पण स्वाभिमानी शेतकऱ्यांनी, बारा बलुतेदारांनी एकत्र येत ‘अहत् तंजावर तहत् पेशावर’ असं विस्तीर्ण हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या या साम्राज्याच्या पाऊलखुणा आधुनिक भारत आणि पाकिस्तानातसुद्धा सर्वत्र दिसून येतात. नैऋत्य पाकिस्तानातील बलोचिस्तानमधील मराठ्यांपासून ते दक्षिण भारतातील मराठ्यांपर्यंत आजही महाराष्ट्राबाहेर काही प्रमाणात तग धरून राहिलेली ही मराठी संस्कृती म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सुवर्णपानच.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या साम्राज्याने औरंगजेबाशी निकराचा लढा दिला, त्यानंतर झालेल्या अंतर्गत राजकारणामुळे मराठ्यांच्या दोन गाद्या निर्माण झाल्या, एक करवीर संस्थान, ज्याची स्थापना छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि खुद्द छत्रपती शिवरायांच्या सुनबाई, महाराणी ताराबाई साहेबांनी केली, तर अनेक वर्षे मुघलांच्या कैदेत राहून परत आलेल्या शाहू महाराजांनी सातारा येथे स्वतंत्र गादी स्थापन केली. हे शाहू महाराज म्हणजे छत्रपती शंभूराजांचे पुत्र. पुढे सातारा संस्थानच्या पंतप्रधानांमध्ये अर्थात पेशव्यांमध्ये थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, सवाई माधवराव पेशवे यांसारखे कर्तबगार आणि पराक्रमी पंतप्रधान होऊन गेले. याशिवाय याच संस्थानामध्ये महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, उदाजी पवार, पिलाजीराव गायकवाड असे पराक्रमी सरदार होऊन गेले, पुढे त्यांच्या वारसदारांनी उत्तर भारतात स्वतंत्र संस्थाने स्थापन केली.

सातारा आणि कोल्हापूर व्यतिरिक्त भोसल्यांच्या आणखी दोन गाद्या होत्या, एक नागपूर आणि दुसरी तंजावर. नागपूरचे संस्थान बिरारच्या रघुजीराव भोसल्यांनी १७३० साली स्थापन केले, या संस्थानची स्वायत्तता केवळ ८८ वर्षेच टिकू शकली, १८१८ साली यावर ब्रिटिशांचा प्रभाव पडला आणि १८५३ साली हे संस्थान विसर्जित झाले. दुसरीकडे तंजावर मात्र मोठे संस्थान होते. याची स्थापना खुद्द शहाजीराजे-तुकाबाईंचा मुलगा आणि शिवरायांचा सावत्र भाऊ, व्यंकोजीराजे भोसल्यांनी शिवराज्याभिषेकाच्या वर्षीच अर्थात १६७४ साली केली.

१६७३ साली, मदुराईच्या नायकाने तंजावर नायकांच्या अधिपत्याखालील तंजावर राज्यावर आक्र*मण केले आणि तेथील राजाला हाकलून दिले. त्यानंतर त्याने आपला धाकटा भाऊ अलागिरी नायक याला तंजावरच्या गादीवर बसवले. यामुळे दरबारातील उच्च पदस्थ अधिकारी रायसम वेंकन्ना नाराज झाला. त्याने तंजावरचा दिवंगत नायक विजयराघव यांचा पदच्युत पुत्र चेंगमाला दासूला समर्थन दिले. तो अल्पवयीन चेंगमलादासांसह विजापूरच्या अली आदिल शाहच्या दरबारात गेला आणि त्याच्याकडे मदत मागितली. आदिलशहाने शहाजी राजांचा पुत्र व्यंकोजीला तंजावरवर स्वारी करण्यासाठी आणि नायकांना त्यांचे राज्य मिळवून देण्यासाठी पाठवले.

व्यंकोजीराजांनी रायसम वेंकण्णाच्या मदतीने अय्यमपेटाई शहरावर विजय मिळवला आणि अलागिरीचा पराभव केला. विजापूर सुलतानाच्या मृत्यूनंतर, व्यंकोजीराजे स्वतः तंजावरचे राजे बनले. अलागिरीचे त्याचा भाऊ चोक्कनाथ नायक आणि चंगमलदास यांच्याशी मतभेद होते. या संघर्षांत विजय मिळविल्यानंतर व्यंकोजी तिथला शासक बनला. पुढे विजापूरचा सुलतान मरण पावल्यावर व्यंकोजीने स्वतःला तंजावर प्रदेशाचा स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले.



याच तंजावरच्या भोसले घराण्यात अनेक राजे-महाराजे होऊन गेले. त्यांच्यापैकीच एक होते सरफोजीराजे भोसले (दुसरे). त्यांनी तंजावर राज्यात अनेक सुधारणा केल्या.

राजे-महाराजे म्हटल्यावर ऐषाराम करणारे, व्यसनं करणारे, नाच-गाण्यांत मश्गुल असणारे राजे आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराजे गायकवाड, अशा अनेक राजांनी मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी कामे केली. अशा लोकसेवेचा ध्यास घेतलेल्या राजांमध्ये तंजावरच्या सरफोजीराजे भोसल्यांचे नाव देखील प्रकर्षाने घ्यावे लागेल. त्यांनी एवढी मोठी कामे केलेली असूनही आपल्यापैकी अनेकांना त्यांचे नाव देखील माहित नाही हे मोठे दुर्दैव.

सरफोजीराजे भोसलेंचा जन्म तुळजाराजे भोसले यांच्या पोटी दिनांक २४ सप्टेंबर १७७७ रोजी झाला. तंजावरचा राजा तुळजा याने २३ जानेवारी १७८७ रोजी सर्व धार्मिक विधी करून सरफोजीला आपला मुलगा म्हणून स्वीकारले. डॅनिश मिशनरी ख्रिश्चियन फ्रीड्रिच श्वार्ट्झच्या देखरेखीखाली सरफोजींना ठेवण्यात आले होते. राजा तुळजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा सावत्र भाऊ अमरसिंग सत्तेवर आला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

अमरसिंगने सरफोजी राजांना शिक्षण द्यायचे नाकारले. सरफोजी राजांची बाजू घेत श्वार्ट्झने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि त्यांना शिक्षणासाठी मद्रासला पाठवले. तिथे त्याचे शिक्षण ल्युथेरन मिशनचे विल्हेल्म गेरिके यांच्या साहाय्याने पूर्ण झाले. काहीच काळात सरफोजीराजे तामिळ, तेलगू, उर्दू, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, डॅनिश, ग्रीक, डच आणि लॅटिन भाषांमध्ये पारंगत झाले.

सरफोजीराजांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी त्यांची बाजू लावून धरली आणि सरतेशेवटी २९ जून १७९८ रोजी सरफोजीराजांचा तंजावरच्या गादीवर राज्याभिषेक झाला. पण इंग्रज कोणत्याही गोष्टीचा मोबदला घेतात. सरफोजीराजांना सत्ता मिळवून देण्याचा मोबदला होता तंजावरचे सार्वभौमत्व. या मदतीच्या बदल्यात सरफोजीराजांना तंजावरचा कारभार ब्रिटिशांच्या हाती सोपवावा लागला. त्यासाठी सरफोजीराजांना १ लाख स्टार पॅगोडा इतके वार्षिक पेन्शन आणि राज्याच्या महसुलाचा पंचमांश भाग देण्यात आला.

या घटनाक्रमामुळे तंजावरच्या राजकारणावर आता सरफोजीराजांचे नियंत्रण राहिले नव्हते. त्यामुळे त्यांनी समाजकार्यात लक्ष केंद्रित केले. काही अनपेक्षित कारणांनी त्यांनी सार्वभौमत्व जरी गमावले असले तरी ते भोसले घराण्यातील सर्वांत महान राजांपैकी एक होते. त्यांनी तंजोरला ‘विद्येचे माहेरघर’ बनवले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सरस्वती महल ग्रंथालयासाठी त्यांनी जगभरातून ४ हजार पुस्तके खरेदी केली होती. याशिवाय त्यांनी अरबी आणि फारसी भाषेतील पुस्तकांचे मराठीत भाषांतर देखील करून घेतले.

याच सरस्वती महल ग्रंथालयात शतकानुशतके हरवलेला, कवींद्र परमानंद रचित “शिवभारत” ग्रंथ सापडला होता. आपण हे काव्य शिवाजी राजांच्याच सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद या ग्रंथात सांगतो आणि यामुळेच त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास येते.

आरोग्यक्षेत्रात त्यांचे अफाट काम होते, त्याचे अफाट ज्ञानही त्यांना होते. ते आयुर्वेदाचे जाणकार होते. त्यांनी तंजावरमध्ये धन्वंतरी महाल बांधला, या धन्वंतरी महालात आयुर्वेद, ॲलोपॅथी आणि युनानी या औषधशास्त्रांवर संशोधन होत असे. ते स्वतः मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाही करत असत. आपल्या वैद्यकीय अनुभवांवर आधारित “सरभेंद्र वैद्य मुरैगल” नावाचे पुस्तक देखील त्यांनी लिहिले आहे.

दक्षिण भारतातील सर्वांत पहिला देवनागरी छापखाना सुरु करण्याचे श्रेय सरफोजीराजांना जाते. याशिवाय सरफोजीराजांनी तंजावर राजवाड्याच्या परिसरात आजच्या तामिळनाडूतील पहिले प्राणी उद्यान तयार केले.

सर्फोजीराजांनी शिक्षण क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले होते. त्यांनी “नवविद्या कलानिधी साला” नावाच्या शाळेची स्थापना केली. या शाळेत वेद आणि शास्त्रांव्यतिरिक्त भाषा, साहित्य, विज्ञान, चित्रकला आणि हस्तकला शिकवल्या जात होत्या. सरफोजीराजांनी तरंगंबडी येथील डॅनिश लोकांशी चांगले संबंध ठेवले होते, ते त्यांच्या शाळांना अनेकदा भेट देत असत. त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक सरफोजीराजांना कौतुक वाटे. आपल्या साम्राज्यात युरोपियन पद्धतीने शिक्षण देता यावे यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न देखील केले.

उद्यम क्षेत्रात देखील सरफोजीराजे कमी नव्हते. त्यांनी तंजावरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर मानोरा येथे एक शिपयार्ड उभारले. तसेच त्यांनी व्यापार व शेती सुलभ करण्यासाठी हवामान केंद्राची स्थापना केली. याशिवाय सरफोजीराजांनी बंदुकीची फॅक्टरी, नेव्हल लायब्ररी, आणि सर्व प्रकारचे नेव्हीगेशन उपकरण मिळतील असे नेव्हल स्टोअर सुरु केले.

सर्फोजीराजांना चित्रकला, बागकाम, विविध प्रकारची नाणी संग्रही करणे, मार्शल आर्ट्स आणि रथांच्या शर्यती, शिकार आणि बैलांच्या लढाईमध्ये रस होता. तसेच त्यांनी नृत्य आणि संगीत या मूळ भारतीय कलांना राजाश्रय दिला होता. त्यांनी कर्नाटकी शास्त्रीय संगीताला व्हायोलिन आणि सनईची ओळख करून दिली. सर्फोजीराजांना तंजावरच्या अनोख्या चित्रकलेचा शोध लावण्याचे श्रेयही जाते.

तंजावरच्या राजवाड्यातील पाच मजली सर्जाह महाडी आणि सलुवानायकनपट्टिनम येथील मनोरा फोर्ट टॉवर हे सरफोजीराजांच्या कारकिर्दीत बांधले गेले. त्यांनी या स्मारकांच्या वरच्या भागात वीज पडू नये यासाठी पोल्स बसवले. सरफोजीराजांचे ऐतिहासिक कार्यात देखील मोठे योगदान आहे. त्यांनी बृहदेश्वर मंदिराच्या नैऋत्य भिंतीवर भोसले वंशाचा इतिहास कोरून घेतला. हा भारतातील अनेक मोठ्या शिलालेखांपैकी एक मानला जातो. त्यांनी नवीन बांधकामांव्यतिरिक्त बृहदेश्वर मंदिरासारख्या अनेक मंदिरांचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी केली.

१८२०-२१ साली, सरफोजीराजे  सुमारे तीन हजार लोकांसह काशीयात्रेला निघाले. त्यांनी मार्गात अनेक ठिकाणी तळ ठोकला, वाटेत अनेक धर्मादाय कार्य देखील केले. आजही त्यांच्या या यात्रेच्या पाऊलखुणा गंगेच्या घाटांवर टिकून आहेत. सुमारे ४० वर्षांच्या राज्यकारभारानंतर ७ मार्च १८३२ रोजी सरफोजीराजे कैलासवासी झाले. अशा या लोककल्याणकारी राजाच्या मृत्यूमुळे रयतही हळहळली. सरफोजीराजांच्या अंत्ययात्रेत ९० हजारहून अधिक लोक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या “जाणता राजा” या पदवीला साजेसं कार्य या राजाने केलं, त्या राजाला आज देखील इतिहासाच्या पानांत थारा नाही, हे आपलं दुर्दैव!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

Next Post

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.