आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाण्यानं आणि २१ भाग जमिनीनं व्यापलेला आहे. या एकूण पाण्यापैकी ९६.५ टक्के पाणी समुद्र आणि महासागरात आहे. फक्त २१ टक्के जमिनीचा विचार केला तर त्यावर अमर्याद स्वरूपाची जैवविविधता आपल्याला आढळते. जशी जैवविविधता जमिनीवर आढळते, तशीच पाण्याखाली देखील आहे. अथांग समुद्र आणि महासागर अशा कितीतरी गोष्टी आपल्या पोटामध्ये दडवून बसलेले आहेत, ज्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी संशोधक समुद्राच्या तळाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतात. संशोधन करताना त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव येतात.
साधारण तीन वर्षांपूर्वी असाच एक रोमांचक अनुभव मरीन बायोलॉजिस्ट (समुद्री जीवशास्त्रज्ञ) नॅन हॉसर यांना आला. एका व्हेलमाशानं आपला जीव वाचवल्याचा दावा नॅन यांनी केला होता. याचा एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला.
१४ सप्टेंबर २०१७ रोजी रारोटाँग बेटाजवळ नॅन यांच्या हंपबॅक व्हेलशी जवळून सामना झाला. त्या व्हेलनं एका १५ फूट लांब टायगर शार्कच्या ह*ल्ल्यापासून त्यांचा बचाव केला. १९ सप्टेंबर, २०१८ रोजी तोचं व्हेल त्यांना पुन्हा भेटला. आपल्या संशोधन कारकिर्दीत असे फक्त दोनच वेळा घडल्याचं नॅन यांचं म्हणण आहे. तर काहींच्या मते, हा केवळ योगायोग होता. मात्र, नॅन यांचा हंपबॅक व्हेलबाबतचा अभ्यास आणि संशोधन पाहता त्यांच्या दाव्यावर संशय घेणं कठीण आहे.
नॅन लहान असताना तिचं कुटुंब बर्मुडामध्ये वास्तव्याला होतं. त्यामुळं विशाल अटलांटिक महासागर आणि त्यातील व्हेल्सबद्दल स्वप्न पाहतच आपण लहानचे मोठे झालो, असं त्या सांगतात. या पार्श्वभूमीमुळेचं त्यांनी मरीन बायोलॉजिस्ट होण्याचा निर्णय घेतला. नॅन, सीटेसियन रिसर्च अँड कन्झर्वेशन सेंटरच्या अध्यक्ष व संचालक आहे. याशिवाय, त्या कुक बेटांवरील ‘व्हेल रिसर्च प्रोजेक्ट’च्या प्रमुख संशोधक आणि ‘व्हेल अँड वाईल्ड लाइफ सेंटर’च्या संचालक देखील आहेत. व्हेल्सबाबत त्यांचं संशोधन दांडगं आहे. त्यांच्या संशोधनात व्हेल लोकसंख्येची ओळख, त्यांचे फोटो आयडी, त्याचे आवाज, अनुवंशशास्त्र, व्हेल्सचं पृष्ठभाग आणि पाण्याखालील वर्तन, नेव्हिगेशन आणि स्थलांतर हे घटक समाविष्ट आहेत.
जवळपास २८ वर्षांपासून नॅन हॉसर संशोधनानिमित्त व्हेल्सच्या सानिध्यात आहेत. एकदा पाण्यात गेल्यानंतर कितीतरी वेळ नॅन व्हेल्ससोबत डायव्हिंग करतात.
१४ सप्टेंबर २०१७ रोजी देखील त्या नेहमीप्रमाणं एका हंपबॅक व्हेलभोवती डायव्हिंग करत होत्या. त्या व्हेलचं वजन साधारण ४० टन इतक आणि लांबी ६० फूट होती. अगोदर एक शांत असलेला व्हेल अचानक नॅन हॉसरच्या समोर आला. त्यानं आपलं तोडं बंद करून त्यांना पुढं ढकलत नेलं. काही काळ त्यांना आपल्या पॅक्टोरल फिनच्या (शेपटी जवळची पिसे) खाली झाकून टाकलं आणि नंतर आपल्या पाठीचा वापर करून त्यांना पाण्यातून बाहेर काढलं. जवळपास १० मिनिटे हा थरार चालला.
अचानक घडलेल्या प्रकारामुळं नॅन सुरुवातीला घाबरल्या होत्या. व्हेलनं आपल्यावर ह*ल्ला केल्याचा तिचा समज झाला होता. मात्र, पाण्यातून बाहेर आल्यानंतर तिला मागचा एक प्रसंग आठवला आणि व्हेलनं आपला जीव वाचवल्याची जाणीव तिला झाली.
एकदा नॅन आणि तिचा एक सहकारी कुक बेटांवर एका व्हिडिओसाठी काम करत होते. पाण्यात जाताना दोघांकडे कॅमेरे होते. ते व्हेलचं चित्रिकरण करत होते. तेव्हा देखील अचानक व्हेलनं त्यांना काही अंतरावर ढकलत नेऊन पाण्याबाहेर काढलं होतं. तेव्हा ती काही प्रमाणात जखमी देखील झाली होती. मात्र, जेव्हा त्यांनी काळजीपूर्वक कॅमेऱ्यात झालेलं चित्रिकरण पाहिलं तेव्हा तिला व्हेलपासून काही अंतरावर आणखी एक शेपूट दिसलं. नॅनच्या मते, ते शेपूट टायगर शार्कचं होतं आणि व्हेलनं त्यांना पाण्याबाहेर काढून त्यांच्या जीव वाचवला होता. १४ सप्टेंबरला झालेल्या घटनेमागे देखील हेचं कारण असावं, असा नॅनला विश्वास आहे.
नॅन हॉसरच्या मते, दोन्ही वेळा तिला पाण्याबाहेर काढून व्हेलनं नि:स्वार्थीपणा (altruism) दाखवून दिला. हंपबॅक व्हेल्सच्या स्वभावामध्ये परोपकाराचा हा गुण असल्याचं नॅन म्हणाल्या. याबाबत जगभरात अनेक चर्चा झाल्या. काहींनी नॅनच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, ही काही पहिली वेळ नव्हती.
२०१६ मध्ये ‘द मरिन मेमॅल सायन्स’ या जर्नलमध्ये गेल्या ६२ वर्षांमध्ये झालेल्या अशा ११५ घटनांचा उल्लेख केलेला आहे ज्यामध्ये हंपबॅक व्हेल्सनं कुठल्याना कुठल्या शिकारीमध्ये हस्तक्षेप केलेला आहे. हंपबॅक आपल्या पिलाचं अतिशय प्रभावीपणे संरक्षण करताना दिसतात. अशाचं प्रकारे व्हेल्सच्या इतर प्रजाती, सील्स आणि समुद्री सिंह यांचं देखील त्यांनी शिकारीपासून संरक्षण केल्याची काही उदाहरणे समोर आलेली आहेत.
हंपबॅक व्हेल्सच्या अशा वर्तनाविषयी शास्त्रज्ञांनी अनेक शक्यता मांडलेल्या आहेत. जे आपल्यापेक्षा दुर्बल जीव आहेत त्यांचं आपण संरक्षण करू शकतो, असा व्हेल्सचा समज असावा किंवा कदाचित त्यांना स्वत:वर झालेल्या ह*ल्ल्यांची आठवण जाणवत असले किंवा आपल्या श्रवणशक्तीच्या बळावर ते आसपास कुणीतरी संकटात असल्याचा अंदाज घेत असावेत.
नॉर्वेतील मरीन रिसर्च इन्स्टिट्युटमधील शास्त्रज्ञ, मार्टीन ब्यू यांच्या मते, नॅन हॉसर यांच्या निरीक्षणामध्ये थोडीफार गडबड आहे. व्हिडिओतील व्हेल नर असल्याचं नॅन यांनी सांगितलं. मात्र, ती मादी असल्याचं मार्टीनचं म्हणणं आहे. आणि तो व्हेल जर खरंच मादी असेल तर, तिनं एखाद्या मानवाचा जीव वाचवणं शक्य आहे. मात्र, यामागे देखील मार्टीन यांनी एक अट टाकलेली आहे. त्यामादीनं नजीकच्या काळात तिचं पिलू गमावलेलं असलं पाहिजे. यावर नॅन हॉसर यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘मी स्वत: एक शास्त्रज्ञ आहे. जर एखाद्या सामान्य व्यक्तीनं मला ही गोष्ट सांगितली असती तर मी विश्वास ठेवला नसला. मात्र, माझा तीन दशकांचा अनुभव पाहता मी व्हेल्सची वर्तणुक नक्कीच ओळखू शकते’.
नॅन हॉसर यांच्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे येत्या काळात संशोधनातून सिद्ध होईलचं. जर हा दावा खरा ठरला तर प्राण्यांमध्येही माणुसकी असल्याचं वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट होईल, हे नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










