आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
मॅस्कॉट म्हणजे एखाद्या देशासाठी, संघटनेसाठी शकुनाचं प्रतीक म्हणून वापरली जाणारी वस्तू किंवा प्राणी. आजपर्यंत गरुड, सिंह, वाघ, हत्ती, गेंडा यांसारखे अनेक शूर आणि शक्तिशाली प्राणी आणि पक्षी मॅस्कॉट म्हणून वापरल्याचं तुम्ही ऐकलं असेल.
पण एखादं क्युट पेंग्विनही मॅस्कॉट म्हणून वापरलं जाऊ शकतं का? ते ही एका देशाच्या राजाच्या सेनेचं प्रतीक म्हणून?
खरंतर पेंग्विन दिसायलाही इतर पक्षांपेक्षा अगदी वेगळे असतात. पांढऱ्याशुभ्र हिमासारखा रंग, अतिशय गुबगुबीत शरीर आणि त्याला साजेशी अशी त्यांची चाल, या सगळ्यामुळे सर्वांनाच पेंग्विन आवडतात.
सहसा, पेंग्विन म्हटलं की बर्फाळ प्रदेशात बर्फावर घसरगुंडी खेळणारा, पाण्यातले लहान लहान मासे शोधून खाणारा एक पक्षी आपल्या डोळ्यासमोर येतो, पण एक पेंग्विन असासुद्धा आहे ज्याला “ब्रिगेडियर” ही उपाधी दिली आहे, ज्याच्या पंखावर चक्क आर्मीचं मेडल लावलं जातं आणि ज्याला राजाचे रक्षक सलाम ठोकतात!!
आज अशाच आगळ्यावेगळ्या पेंग्विनबद्दल जाणून घेऊयात!
या ब्रिगेडियर पेंग्विनचं पूर्ण नाव आहे “सर निल्स ओलाव्ह III” (Sir Nils Olav III). “सर निल्स ओलाव्ह” हे जगातलं सर्वात प्रसिद्ध पेंग्विन आहे. ब्रिगेडियर सर निल्स ओलाव्ह हे पेंग्विन नॉर्वे या देशाच्या राजाच्या रक्षक सेनेचा एक सदस्य आहे. हे पेंग्विन नॉर्वेच्या राजघराण्याच्या सेनेचं प्रतीक मानलं जातं. एखाद्या राजाच्या सेनेचा सदस्य होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. राजाच्या रक्षक दलात सहभागी होणे ही अतिशय प्रतिष्ठेची बाब मानली जाते.
एखाद्या पेंग्विनला अशा दलात सहभागी करून घेण्याची कल्पना नेमकी आली तरी कुठून?
साधारण ५० वर्षांपूर्वी, म्हणजेच ७०च्या दशकात याची सुरुवात झाली. नॉर्वे देशाचे मिलिटरी गार्ड्स एडिनबर्ग या ठिकाणी आले. तेव्हाचे कर्नल इन चीफ निल्स एगलन पेंग्विन्स बघायला तिथल्याच एका प्राणिसंग्रहालयात जायचे. तिथल्या पेंग्विन्सना बघून त्यांना वाटायचं जणू ह्यांची छोटीशी परेडच चालली आहे आणि किंग पेंग्विनला म्हणजेच पेंग्विन्सच्या मुख्य लीडरला आपण राजघराण्याच्या सेनेचं प्रतीक बनवण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. तेव्हापासूनच “किंग पेंग्विनला” एक शुभशकुन मानण्यात येऊ लागलं.
या पेंग्विनला नावंही सर नील्स आणि तत्कालीन राजा ओलाव्ह यांच्या नावावरून सर निल्स ओलाव्ह असं देण्यात आलं. १९७२ पासून आत्तापर्यंत असे ३ पेंग्विन्स झाले आहेत. या पदासाठी सर्वात चांगल्या पेंग्विनची निवड केली जाते.
“सर निल्स ओलाव्ह I” हे जे पहिलं पेंग्विन होतं त्याला १९७२ साली नेमण्यात आलं. पण दुर्दैवाने काहीच वर्षांत म्हणजेच १९८७ साली त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर “सर निल्स ओलाव्ह II” या अवघ्या 2 वर्षांच्या पेंग्विनने ही जागा घेतली. त्याला २००५ साली “कर्नल-इन-चीफ” ही उपाधी देण्यात आली.
२००५ साली तर या पेंग्विनचा ४ फूट उंचीचा ब्रॉंझचा पुतळा एडिनबर्ग प्राणिसंग्रहालयात आणला गेला.
त्यानंतर राजा हॅराल्ड पाचवा यांनी १५ ऑगस्ट २००८ रोजी त्याला नाईटहूड ही उपाधी दिली. यावेळी त्या पेंग्विनच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या परेडला हजारोंच्या संख्येनी लोक उपस्थित होते.
त्यानंतर २००८-२०१६ च्या दरम्यान “सर निल्स ओलाव्ह III” ह्या तिसऱ्या पेंग्विनची नियुक्ती करण्यात आली. २२ ऑगस्ट २०१६ रोजी त्याला “ब्रिगेडियर” ही उपाधी मिळाली.
“ब्रिगेडियर” ही खास उपाधी मिरवणारा हा पहिलाच पेंग्विन!
आत्ताचं सर निल्स ओलाव्ह III पेंग्विन हे तिसऱ्या क्रमांकाचं पेंग्विन आहे. याचं मूळ नाव डोपी असं होतं पण या पदावर त्याचं नाव बदलण्यात आलं. या पेंग्विनला व्यवस्थित ट्रेनिंग देण्यात आलं आहे. राजाचे रक्षक जेव्हा त्याची भेट घ्यायला येतात तेव्हा तो त्यांना ओळखसुद्धा दाखवतो.
ब्रिगेडियर सर निल्स ओलाव्हला पण योग्य त्या मानाने वागणूक मिळते. अगदी राजाच्या रक्षकांकडून त्याला मानाची सलामीसुद्धा मिळते. त्याची परेड म्हणजे तर आवर्जून बघण्यासारखा एक सोहळाच असतो. दूरवरून पर्यटक आणि स्थानिक नागरिक ही परेड बघायला हजर होतात.
तर असं हे आगळंवेगळं पेंग्विन सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय होऊन बसलं नसतं तर नवलच होतं, नाही का?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.