आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
शिवाजी महाराजांच्या ‘वाघ्या’ कुत्र्याला आपण सर्वचजण ओळखतो. वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळलेला कुत्रा. प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठतेसाठी ओळखला जाणारा! असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वाघ्या फारच दुःखी झाला आणि हेच दुःख सहन न होऊन त्याने शिवाजी महाराजांच्या जळत्या चितेवर उडी घेऊन आपला जीव दिला. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीजवळच वाघ्याचा पुतळा उभा केलाय. जिवंतपणीही तो महाराजांसोबत होता आणि मृत्यूनंतर इतक्या वर्षांनीही तो महाराजांच्या सोबतच आहे. निस्वार्थ प्रेम म्हणजे अजून काय असतं!
महाराणा प्रताप यांच्या ‘चेतक’ घोड्याचीही कहाणी अशीच. चेतक हा महाराणा प्रतापांचा निष्ठावंत आणि लाडका घोडा. तो अतिशय चपळ आणि हुशार होता. महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात एक युद्ध झालं ज्यात महाराणा प्रताप स्वतः चेतक घोड्यावर स्वार झाले होते. याच युद्धाच्या चकमकीत एका मुघल सैनिकाच्या तलवारीचा वार चेतकच्या एका पायाला लागला आणि चेतक त्यात जखमी झाला. जखमी होऊनही चेतक थांबला नाही, महाराणा प्रतापांचा जीव वाचवण्यासाठी तीन पायांवर तो वेगाने धावत सुटला, मध्ये एक तुडुंब भरलेला नाला लागला, त्यातूनही त्याने महाराणा प्रतापांना सुखरूप बाहेर काढलं. महाराणा प्रताप वाचले पण चेतकने मात्र आपले प्राण सोडले. या प्रसंगानंतर हा स्वामिनिष्ठ ‘चेतक’ इतिहासात अजरामर झाला.
‘हचीको’ हा असाच एक जपानमध्ये राहणारा अतिशय प्रामाणिक कुत्रा. जपानमधल्या एका प्रोफेसरने हचीकोला आपल्या घरी आणलं होतं. त्याला प्रेमाने वाढवलं होतं. प्रोफेसर कामावरून परत येताना हचीको स्टेशनला जाऊन त्यांची वाट बघत बसायचा. त्याचा दिनक्रमच होता हा. एके दिवशी प्रोफेसर कामावर असतानाच आकस्मिक आजाराने त्यांचा मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे हचीको स्टेशनवर जाऊन त्यांची वाट बघत बसला. यावेळी मात्र प्रोफेसर कामावरून परतले नाहीत. इथून पुढची सलग ९ वर्ष रोज हचीको स्टेशनवर जाऊन बसत होता. आपल्या लाडक्या प्रोफेसरची वाट बघत होता. कधीनाकधी तो नक्की परत येईल ही भाबडी आशा हचीकोला रोज स्टेशनकडे घेऊन जायची. याचा शेवट तेव्हाच झाला जेव्हा ९ वर्षांनी हचीकोचाही मृत्यू झाला.
हे सगळे प्राणी आता आपल्यात नसले तरीही इतिहासात ते अजरामर होऊन राहिले आहेत. अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ आता इंटरनेटवर व्हायरल होतोय. जॉर्जिया देशातल्या बाटुमी शहरातला हा कुत्रा. त्याचं नाव कुपाता.
या कुत्र्याच्या लोकप्रियतेमागे एक वेगळंच कारण आहे. बाटुमीमधल्या एका बालवाडीतील लहान लहान मुलं रस्ता क्रॉस करत होती. ही मुलं रस्ता क्रॉस करत असताना कुपाताही त्यांच्यासोबत रस्ता क्रॉस करत होता.
रस्त्यावरच्या गाड्यांकडे बघून तो भुंकत होता, गाड्यांना तिथेच थांबायला सांगत होता. मुलांना रस्ता नीट सुरक्षितपणे ओलांडता यावा म्हणून कुपाता सतत त्यांच्या आजूबाजूला घुटमळत होता. कुपाताचा हा मुलांना रस्ता ओलांडायला मदत करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि कुपाता जगभरात जाऊन पोहोचला.
नोना नावाची एक बाई कुपाताचा सांभाळ करते. तिच्या घराबाहेर तो दिवसभर बसलेला असतो, ती त्याला खाऊ-पिऊ घालते. कुपाताला लहान मुलं फारच आवडतात. तो त्यांच्यासाठी बागेत जाऊन थांबतो, लहान मुलांसोबत खेळतो. त्याला कोणतीही लहान मुलं रस्ता क्रॉस करताना दिसली की तो लगेच उठून त्यांना मदत करायला जातो.
कुपाताला शहरातले अनेक लोक वेगवेगळ्या लाडाच्या नावाने ओळखतात. कोणी त्याला बिम हाक मारतं तर कोणी कुर्शा. कोणी त्याला टेट्रा म्हणून हाक मारतं तर कोणी कुपाता.
त्याचं कुपाता हे नाव जास्त लोकप्रिय झालं. कुपाता एक जॉर्जियन शब्द आहे. कुपाताचा अर्थ सॉसेज (एक खाण्याचा पदार्थ). कुपाताला सॉसेज खायला फार आवडतात म्हणून एका मांसविक्रेत्याने त्याचं नाव कुपाता असं ठेवलं. लोकांनाही ते फार आवडलं आणि सगळे त्याला त्याच नावाने ओळखू लागले.
आता तर बाटुमीच्या टुरिझम ऑफिसने त्याला स्वतःचं छोटंसं ‘डॉग हाऊस’ आणून दिलं. त्यावर त्याने केलेल्या कामाचं कौतुक म्हणून एक चांदणीच्या आकाराचा शिक्का उमटवला आणि त्यावर “पिपल्स चॉईस” असे शब्द छापले. कुपाताला लहान मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे तो आता एक लोकल सेलिब्रिटी झालाय. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे तो जगभरातल्या लोकांच्या कौतुकाचा विषय होऊन बसलाय.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.