आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
इंटरनेट हा आजच्या आधुनिक जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कोविडच्या महामारीत तर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं महत्व अधिकच अधोरेखित झालेलं आहे. सगळं जग थांबण्याच्या वळणावर असताना इंटरनेट मदतीला धावलं आणि त्यानं उद्योग धंदे, व्यवसाय ते शाळांपर्यंत सर्वकाही नव्या पध्दतीनं चालू ठेवलं. एका बाजूला हे फ़ायदे तर दुसर्या बाजूला तितकाच तणाव, तंटे असणारं असं हे दुधारी माध्यम आहे.
इंटरनेट हे असं माध्यम आहे जे अहोरात्र कार्यरत असत. जगभारत एकाचवेळेस करोडो, अब्जो लोक विविध स्क्रिनसमोर बसून इंटरनेटचा वापर करत असतात. काहीजण विधायक कामासाठी तर काहीजण गुन्हेगारी कृत्यांसाठीही याचा वापर करत असतात.
या सगळ्या गदारोळात तुमचं यापासून रक्षण करणारं कोणीतरी आहे, जे तुमच्यावर सतत लक्ष ठेवून असतं असं सांगितलं तर? कदाचित विश्वास बसणं शक्य नाही पण कॅथलिक चर्चचा असा विश्वास आहे की अनेक शतकांपूर्वी जन्मलेल्या एका संताचं कामच इंटरनेटची रक्षा करणं हे आहे. या संताचं नाव आहे, इसिदोर.
४ मार्च ५६० रोजी स्पेनमधे जन्मलेला एक मुलगा पुढे जाऊन कित्येक शतकं पुढच्या काळातील एका अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा रक्षक संत बनणार होता. आज हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र इंटरनेट या विसाव्या शतकातील शोधाचा रक्षक संत ज्यावेळी जन्मला त्यावेळी इंटरनेट तर राहूच द्या पण आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जन्मही झालेला नव्हता.
त्यांच्या भावाच्या जागेवर संत इसिदोर यांची आर्च बिशप म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपल्या कार्यकाळात त्यांनी अध्यात्मिक प्रसाराचं काम केलं त्याचबरोबर विज्ञान शाळांची उभारणी केली. अनेक विषयांवर त्यांनी ग्रंथ लिहिले. ४ एप्रिल ६३६ साली त्यांचा मत्यू झाला. त्यानंतर सन १५९८ साली संत बेनडिक्ट (चौदावे) यांनी इसिदोर यांना संत म्हणून जाहिर केलं. ख्रिस्ती समाजात संत परंपरेचा इतिहास रोचक आहे. विविध विषयांतले संत आणि त्यांच्याशी निगडीत सुरस कथा हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
विविध क्षेत्रातील संत आणि त्यांची महती सर्वश्रुत आहे. याचं लोकप्रिय उदाहरण म्हणजे सॅन्ताक्लॉज, लहान मुलांचे संत निकोलस, संत जोसेफ़ हे शाळातील परिक्षांचं प्रतिनिधित्व करणारे संत आहेत, संत व्हिचस हे झोपेचं प्रतिनिधित्व करणारे संत आहेत, संत ॲन्तेनिओ हे हरवलेल्या संपत्तीचे संत आहेत, संत सबॅस्टिन हे रोगांच्या साथीचे संत आहेत थोडक्यात सांगायचं तर तुम्ही ज्या गोष्टीचा विचार कराल त्या जगातल्या जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी अगदी कॉफ़ीच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी देखिल रक्षक संत ख्रिश्चन धर्मात नियुक्त आहेत.
या सगळ्या संतांचं काम काय? तर तुमच्या समस्या इश्वरापर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यम म्हणून मदत करणं. असा विश्र्वास आहे की तुमच्या समस्या इश्वरापर्यंत पोहोचविण्यासाठी ज्या प्रार्थनांची गरज असते त्या हे संत तुमच्या सोबत करतात, अशा प्रकारे प्रार्थनांना दुप्पट बळ येतं आणि इश्वरापर्यंत त्या जलद गतीनं पोहोचतात.
या संतपरंपरेचाच एक भाग म्हणजे संत इसिदोर यांचं इंटरनेट रक्षक संत असणं. ५६० साली जन्मलेल्या इसिदोर यांनी त्यांच्या हयातीत कधीही संगणकाला स्पर्शही केला नसताना ते कसे काय इंटरनेट रक्षक संत बनले? याचं कारण त्यांची जगावेगळी महत्वाकांक्षा. अध्यात्मापासून, धर्म, संस्कृती, आरोग्य असं जगभरातलं सर्व प्रकारचं ज्ञान एकाच पुस्तकात नोंदवून ठेवण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. आज संगणकामुळे हे अगदी सहज शक्य बनलेलं असलं तरीही त्या काळाचा विचार करता हा एखाद्या दैवी चमत्काराहून कमी प्रकार असणार नव्हता. हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात एकत्रित संग्रहित करताना त्यांनी अल्पविराम, पूर्ण विराम आदींचा शोध लावला.
नव्वदचं दशक संपता संपता इंटरनेट या आधुनिक तंत्रज्ञानानं मानवाचं आयुष्यच बदलून टाकलं. हवी ती माहिती सेकंदभरात मिळण्याची सोय इंटरनेटमुळे झाली. विकिपिडिया या संकेतस्थळाची निर्मिती ही माहिती संग्रहणाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा मानला जातो. जगभरातील प्रत्येक लहान मोठ्या विषयाचा डेटाबेस विकीपिडियानं बनवला.
संत इसिदोर यांच्या विचारांच्या, कार्याच्या जवळ जाणारं असं हे कार्य होतं. म्हणूनच इंटरनेटवरच्या माहितीचा संग्रह आणि संत इसिदोर यांचं कार्य सारखंच असल्यानं त्यांच्याकडे इंटरनेटचा रक्षक संत म्हणून पाहिलं जाऊ लागलं. पोप जॉन पॉल दुसरे यांनी डिजिटल माहिती संग्रहणाच्या प्रत्येक प्रकारासाठी संत इसिदोर यांना रक्षक संत म्हणून जाहीर केले. इंटरनेटच्या वापरात काही गैरप्रकार होऊ नयेत, ते टाळले जावेत आणि गैर प्रकाराला बळी पडलंच तर त्यापासून सुरक्षित सुटका व्हावी यासाठी प्रार्थनाही निर्माण करण्यात आली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.