जाणून घ्या, दुतोंड्या सापांची किंमत करोडोंमध्ये का असते..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


वन्य प्राण्यांची कातडी, दात, त्यांचे अवयव यांची तस्करी गेली कित्येक वर्षे केली जाते. मटण, चिकन, अंडी, हे तर सर्व सामान्य मांसाहारी लोक खातातच. पण, काही लोक, शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी, कुणी लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी, तर कुणी तांत्रिक शक्ती, काळ्याजादूची शक्ती वाढवण्यासाठी, वन्यप्राण्यांचे मांसभक्षण करतात, त्यांचा बळी देतात.

शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी हस्तिदंतांची तस्करी केली जाते हेही आपल्याला माहिती आहे. पण, भारतात आढळणाऱ्या एका सापाचीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खरेदी विक्री होते हे तुम्हाला माहित आहे का? अनेक प्राण्यांचा बाबतीत समाजात विशिष्ट रूढी, समाज गैरसमज पसरलेले आहेत. अशा रूढी आणि समज-गैरसमजांना सर्वात जास्त बळी पडणारा प्राणी म्हणजे साप. अशाच गैरसमजांमुळे सापाच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सापाच्या अशा जातींपैकी एक म्हणजे दुतोंडी साप.

दुतोंडी साप हा सर्रासपणे वालुकामय प्रदेशात आढळून येतो. भारताच्या राजस्थान, बिहार, बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यात या सापाचे प्रमाण अधिक आढळून येते. 

या दुतोंडी सापाला वैज्ञानिक भाषेत रेड सँड बोआ स्नेक असे म्हटले जाते. या सापाच्या बाबतीत अनेक भागात वेगवेगळ्या रूढी, अंधश्रद्धा आणि गैरसमजुती पसरलेल्या असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या प्रकारच्या एका सापाची किंमत ही ३ कोटींपासून २५ कोटींच्या घरात आहे.

बापरे इतकी मोठी किंमत! वाचून आश्चर्य वाटते ना? पण, यामागे करणेही तशीच आहेत. सगळ्यात मोठे कारण म्हणजे अंधश्रद्धा.

इतकी मोठी किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळत असल्याने अनेक जण या सापाच्या तस्करीत गुंतले आहेत. परंतु, या तस्करीमुळेच हा जीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार या दुतोंडीसापाला विशेष प्राण्यांच्या गटात स्थान दिले आहे. तसेच याची तस्करी करणे या कायद्यानुसार गुन्हा आहे.

दुतोंडी सापाचा वापर जास्तीत जास्त तांत्रिक क्रियेत केला जातो. काही लोकांच्या मते या सापाचे मांस खाल्ल्याने शारीरिक शक्ती आणि लैंगिक शक्ती वाढते. याशिवाय, या सापाच्या सेवनाने एड्ससारख्या रोगांवरही उपचार शक्य असल्याचे मानले जाते.

अर्थात, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तरीही लोक या गैरसमजाला बळी पडून विनाकारण या सापाच्या जीवावर उठतात. अशा अनेक गैरसमजांमुळे मोठ्या प्रमाणावर या सापाची तस्करी केली जाते.

या सापाला दुतोंडी साप म्हटले जात असले तरी, याला दोन तोंडे अजिबात नसतात. याची शेपूट आणि याच्या तोंडाचा आकार सारखाच असतो. ज्यामुळे या सापाला दोन्हीकडे तोंड असल्याचा भास होतो. 

हा साप माणसाला घाबरतो. माणूस दिसताच हा साप जागा मिळेल तिथे लपून बसतो. या सापाचे विष फार तीव्र नसते, त्यामुळे हा बिनविषारी साप समजला जातो. किडे, कीटक, उंदीर, लहान प्राणी हेच याचे मुख्य भक्ष आहे. 

या सापापासून माणसाला काहीही धोका नाही. पण, माणसापासून मात्र या सापाला प्रचंड धोका आहे. वन्य जीव तज्ञांच्या मते हा साप शांत प्रवृत्तीचा असतो. स्वतःच्या जीवाला धोका आहे याची जाणीव होताच हा साप आपली शेपटी उंचावतो.

विविध समाजात, देशात या सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत. अशा अफवांच्या प्रसारामुळेच या सापाला मोठी किंमत देऊन विकत घेतले जाते. हा साप खाल्ल्याने दीर्घकाळ आजारी असलेली व्यक्ती बरी होते असा समज मध्य आशियाई देशात प्रचलित आहे.

असेही मानले जाते की, या सापाचे मांस खाल्ल्याने पुरुष मरेपर्यंत तरुण राहतात. असे चिरतारुण्य टिकवण्यासाठी अनेकांना हा साप मिळवण्याची अभिलाषा असते. शिवाय, हा साप खाल्ल्याने त्यांची लैंगिक शक्ती वाढते.

काही आदिम जमातींच्या मान्यतेनुसार या सापाच्या माध्यमातून आपण ईश्वरीय शक्तींची कृपा मिळवू शकतो आणि त्यांच्यावर आपले नियंत्रण मिळवू शकतो. यातून खरेच ईश्वरीय शक्तींवर नियंत्रण मिळते की नाही ते माहिती नाही. पण, त्यासाठी या सापाचे मात्र विनाकारण हाल केले जातात.

चीनमध्ये हा साप खाल्ल्याने सेक्स पॉवर वाढते असा गैरसमज आहे. मलेशियन लोकांच्या प्रथेनुसार ज्याच्याकडे हा दुतोंडी साप असेल त्याच्यासाठी भाग्याचे दरवाजे खुले होतात. अशा व्यक्तीला जगातील सर्व सुखे, संपत्ती धन मिळते असा गैरसमज तिथेही प्रचलित आहे.

भारतासह पाकिस्तान आणि इराणच्या वालुकामय प्रदेशात हा साप मोठ्या प्रमाणावर आढळतो. म्हणून या सापाला मिळवण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास लोक तयार असतात. म्हणूनच या सापाच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे. या तस्करीमुळे या सापांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे असे म्हटले जाते. म्हणजे पर्यायाने संपूर्ण मानवी प्राण्यांचा मित्र आहे. तरीही सापाविषयी ज्या अनेक अंधश्रद्धा आहेत त्यामुळेच या प्राण्यांची कत्तल होते. सगळेच साप विषारी नसतात, तरीही साप दिसताच त्याला ठेचण्याची मानवी प्रवृत्तीवर काही केल्या अंकुश लावला जात नाही.

गावोगावी अनेक सर्पमित्र सापांबद्दल आपल्या कार्यक्रमातून जागृती करत असतात. कुठे साप सापडल्याची माहिती मिळताच त्यांना पकडून सुरक्षित जंगलात सोडतात. सापाबद्दल असणाऱ्या या अंधश्रद्धा, भीती आणि गैरसमजातून त्यांचे अतोनात हाल होतात.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत दुतोंडी सापाला संरक्षित प्राणी गटात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिथे कुठे हा साप दिसेल तिथे आधी वन्य अधिकाऱ्यांना त्याबद्दल माहिती देणे बंधनकारक आहे.

वन्य अधिकारी या सापाची नोंद करतात आणि त्याला सुरक्षित स्थळी सोडून देतात. या सापाला मारणे किंवा त्याची तस्करी करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

एकीकडे आपण नागाला देवता म्हणून पुजतो. त्याच्या नावाने सण साजरा करतो आणि दुसरीकडे तोच नाग इतर दिवशी दिसला की त्याला मारण्यासाठी तुटून पडतो. मुळात दुतोंडी साप असो किंवा दुसरा कुठलाही साप असो त्याला मारणे चुकीचे आहे.

आपल्या परिसरातील, गावातील सर्पमित्रांचे नंबर आवर्जून स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. साप दिसताच घाबरून न जाता या सर्पमित्रांच्या मदतीने त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचण्यास मदत करा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!