या एका शहराने भारताला तब्बल चार नोबेल पुरस्कार विजेते दिलेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून तीन शहरं फार प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. दक्षिण भारतामध्ये मद्रासचा मोठा गवगवा आहे. या शहराला खूप जुना इतिहास आहे, पश्चिम भारतामध्ये मुंबई हे शहर महत्त्वपूर्ण मानले जाते, तर उत्तर भारतात सांस्कृतिक विरासत असलेले कलकत्ता हे पश्चिम बंगालमधील महत्त्वाचे ठाणे मानले जाते.

मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी मानली जाते, तसे कलकत्ता हे शहर देशाची सांस्कृतिक राजधानी मानले जाते. या देशाला साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला आहे. ब्रिटिशपूर्व काळात या शहरांमध्ये अनेक देखण्या गॉथिक इमारती बांधल्या गेलेल्या आहेत.

नदीच्या काठावर वसलेल्या कुठल्याही शहराचा विकास इतर शहरांपेक्षा जास्त झालेला पाहायला मिळतो. कलकत्ता देखील याला अपवाद नाही. हुगळी नदीच्या काठाशी वसलेले हे शहर आज भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बंगाली मिठाई, मोहन बागानची फुटबॉल टीम, रेल्वे गाड्या, वेगवेगळी जुनी ग्रंथालये, नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे अशा अनेक गोष्टींची खिचडी या शहरात पाहायला मिळते.

स्वातंत्र्यपूर्व काळात या शहराने अनेक क्रांतिकारक भारताला दिले. सुभाष चंद्र बोस सारखा स्वातंत्र्यसेनानी, जगदीश चंद्र बोस सारखे वनस्पतीशास्त्रज्ञ, रासबिहारी बोस, चित्तरंजन दास यांच्यासारखे क्रांतिकारक हे कलकत्त्याच्या भूमीची उपज आहे. जहाल आणि मवाळ अशा दोन्ही विचारसरणीची माणसे या ठिकाणी नांदून गेलेली आहेत.

प्राचीन काळापासून सागरी मार्गामुळे कलकत्ता हे भारताच्या बाहेरील देशांबरोबर देखील जोडले गेले होते. कलकत्त्यामध्ये बाहेरून डच पोर्तुगीज फ्रेंच जर्मन इंग्रज हे व्यापारासाठी येत राहिले या लोकांनी येथे वसवलेली स्वतःची अशी सरमिसळ झालेली संस्कृती आजही पाहायला मिळते.

आज कलकत्त्याचे वय सुमारे सव्वातीनशे वर्षे इतके आहे. ब्रिटिशांनी हे शहर स्वतःची राजधानी म्हणून निवडले होते. त्याकाळात या शहराचा दिमाख काही औरच होता परंतु नंतर ब्रिटिशांनी आपली राजधानी दिल्लीला हलवली आणि शहराला थोडीशी उतरती कळा लागल्यासारखे झाले. परंतु कलकत्त्याची स्वतःची अशी एक शैली आहे. परंपरा आहे आणि इतिहास देखील आहे.

या शहराने भारताचे चार नोबेल पुरस्कार्थी पाहिले आहेत.

नोबेल पुरस्कार हा जगातला सर्वोच्च सन्मान मानला जातो. स्वातंत्र्यपूर्वकाळात 1913 साली रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता.

रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या गीतांजली नावाच्या कवितेच्या पुस्तकास हा पुरस्कार देण्यात आलेला होता.

रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म मूळचा कलकत्त्याचा. या शहराशी त्यांचे अनोखे नाते होते. याच शहरात त्यांनी स्वतःची अभिनव शाळेची कल्पना मांडली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शाळा या चार भिंतीच्या आता कधीही बसत नव्हत्या, झाडांच्या खाली वर्ग भरवून त्यांना शिकवण्याची प्राचीन गुरुकुल पद्धत टागोरांनी कलकत्त्यामध्ये स्वतःच्या शाळेत विकसित केली होती.

आज टागोरांनी रचलेले जनगणमन हे गीत भारताची ओळख बनलेले आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या रूपाने कलकत्ता त्याने एक महान विरासत आपल्या भारत देशाला दिली हे विसरता येण्यासारखे नाही.

टागोरांनंतर कुठल्याही भारतीयाला साहित्यासाठी नोबेल प्राईज जिंकता आले नाही. काही भारतीय वंशाच्या लेखकांना हा पुरस्कार मिळाला आहे.

भारताला दुसरा नोबेल पुरस्कार मिळाला तो मदर टेरेसा यांच्या रूपाने. आता मदर टेरेसा या खरेतर परदेशामध्ये जन्मलेल्या आणि परदेशात शिकलेल्या त्या कलकत्त्यामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी आल्या. कलकत्त्यामधील गोरगरिबांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले.

या शहरात गरीब आणि दिव्यांगांसाठी त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी नावाची मोठी संस्थादेखील उभारली.

या संस्थेचे जाळे नंतर भारतभर पसरले अनाथ अपंग कुष्ठरोगी अशा महिलांना आणि मुलांना सांभाळण्याचे कार्य या संस्थेने केले परंतु या संस्थेची मुहूर्तमेढ पहिल्यांदा कलकत्त्यामध्ये रोवली गेलेली होती.

मदर टेरेसांनी नंतर पश्चिम बंगालमध्ये कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी वेगळे आश्रम देखील उभारले. या कार्यासाठी मदर टेरेसा यांना नोबेल पिस पुरस्कार प्राप्त झाला होता.

यानंतर अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार 1999 अमर्त्य सेन या अर्थशास्त्रज्ञाला प्राप्त झालेला आहे हे आपण सगळे जाणतोच. अमर्त्य सेन यांचे कुटुंबीय ढाका शहरात राहत होते. मात्र कलकत्तामधील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अमर्त्य सेन यांनी बीए अर्थशास्त्राची पदवी मिळवलेली होती. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडच्या केंब्रीज विद्यापीठामध्ये गेले.

अमर्त्य सेन यांच्यानंतर 2019 साली अभिजीत बॅनर्जी नावाच्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. अभिजित बॅनर्जी अमेरिकेमध्ये राहतात परंतु त्यांचे आई-वडील हे मूळ कलकत्ता शहरांमध्ये शिकलेले आहेत.

विशेष गोष्ट म्हणजे ज्या दहा भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाले त्यातील चार नोबेल पुरस्कार हे कलकत्ता शहराशी संबंधित व्यक्तींना मिळालेले आहेत.

आज कलकत्ता मुंबई, पुणे बंगलोर, दिल्लीच्या चकचकाटा समोर थोडेसे झाकोळले गेले असेल परंतु या शहराची स्वतःची अशी रुमानी हवा आजही आपल्याला त्याच्याकडे येण्यास भाग पडते हेच खरे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!